रेस अ‍ॅक्रॉस अमेरीका २०१४

Submitted by टीम अग्नी on 21 April, 2014 - 07:03

नमस्कार,
अमेरिकेच्या पश्चिम किना-यापासून पूर्व किना-यापर्यंतचा तब्बल ४८०० किलोमीटर प्रदेश पालथा घालणा-या रेस अक्रॉस अमेरिका अर्थात रॅम या सर्वांत खडतर सायकल रेससाठी आपल्या महाराष्ट्रातला सुमित पाटील पात्र ठरला आहे ही खरं तर आनंदाने, अभिमानाने सांगण्याची बातमी. आम्हाला मात्र ही आनंदाची बातमी काहीशा संमिश्र भावनांनी द्यावी लागतेय. १२ दिवस चालणा-या रॅममध्ये सहभाग तर सोडाच; पण केवळ त्यासाठी पात्र ठरणं हीदेखील खूप मोठी कामगिरी आहे. अलिबागच्या २८ वर्षीय सुमितने मिळवलेल्या या यशाचा आनंद तर नक्कीच आहे. तरीही सुमित आणि त्याच्या पाठीराख्यांच्या टीम अग्नीला सध्या चिंता सतावतेय ती आर्थिक पाठबळाची. हे पाठबळ मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आहेत.
एकीकडे सुमित रॅमचा सराव म्हणून संपूर्ण देशभर सायकलिंग करतोय, तर दुसरीकडे आमची टीम अग्नी या आर्थिक पाठबळासाठी सरकारी संस्थांपासून ते कॉर्पोरेट्सपर्यंत सर्व पर्याय चोखाळतेय. खरं तर अमेरिकेचा बहुतांश भाग पादाक्रांत (अर्थातच सायकलवरून) करणारा सुमित ही कंपन्यांसाठी ब्रँडिंगची सुवर्णसंधी आहे. शिवाय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सीएसआरखाली या कंपन्या सुमितला काही आर्थिक मदत करू शकतात का, हेही बघण्यासारखं आहे.
प्रायोजकत्वासाठी अनेकांच्या भेटी घेतल्या असता, स्पष्ट 'नकार' कुठेच मिळाला नाही. लोकांनी सुमितच्या रॅम मोहिमेत रस दाखवला, सदिच्छाही दिल्या. त्या आमच्या पाठीशी आहेतच. तरीही या सदिच्छांतून आर्थिक मदत किंवा त्यासाठीचा स्पष्ट वायदा मिळालेला नाही हे तितकंच खरं. सुमितच्या रॅम मोहिमेला 'फिनिश लाइन'पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा निधी त्यातून उभा राहू शकलेला नाही. आमच्या या अपयशाची अनेक कारणं असू शकतात. कदाचित आपल्या यंत्रणेतली एजंटांची तटबंदी भेदणं आम्हाला जमलं नसेल. ही चर्चा खूप लांबेल. त्यामुळे ती रॅमनंतर केलेलीच बरी.
प्रायोजक पुढे न आल्याने सुमितची मित्रमंडळी आणि हितचिंतकांना आवाहन करून पैसे जमवण्याचा पर्याय आम्ही स्वीकारला.
रॅमचं प्रवेश शुल्क (पार्टिसिपेशन फी) भरण्यासाठीही आम्ही हाच मार्ग अवलंबला होता. शक्य तेवढी सगळी काटकसर करूनही सुमित आणि त्याच्या टीमला सुमारे २० ते २५ लाख रुपयांची गरज आहे आणि सांगायला थोडं अवघडल्यासारखं वाटत असलं, तरी आम्ही आतापर्यंत केवळ पाच लाख रुपये उभे करू शकलो आहोत, हे सांगण्याशिवाय पर्याय नाही.
अगदी पैशाच्या स्वरूपात नाही, तरी अन्य स्वरूपांत मदत मिळाल्यास खर्चाचा आकडा कमी होऊ शकतो. सुमित शर्यतीत उतरल्यानंतर सपोर्ट टीमला त्याच्या सोबत जाण्यासाठी चारचाकी गाडी मिळाली किंवा सॅन दिएगो आणि अॅनापोलिस या शर्यतीच्या अनुक्रमे सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थळांना राहण्याची सोय झाली, तर मोठा हातभार लागेल. सपोर्ट टीममध्ये येण्याची कोणाची इच्छा असेल, तरी त्यामुळेही मोठी मदत होईल.
सुमितला पाठिंबा देऊ इच्छिणा-या अनिवासी भारतीयांपैकी बहुतेकांची आर्थिक स्थिती चांगली असेल, यात शंका नाही. त्यात सायकलिंगसारख्या खेळाबद्दल अमेरिकेत खूप जागरूकता आहे. रॅमचं आव्हान किती खडतर आहे हे अमेरिकेत राहणा-या लोकांना वेगळं सांगायला नको. सुमितपूर्वी केवळ दोन भारतीयांनी रॅममध्ये सहभाग घेतला आहे. रॅमसारखी प्रतिष्ठेची, मानाची सायकल रेस भारतीयाने पूर्ण करण्याची संधी पुन्हा आली आहे. केवळ आर्थिक कारणामुळे ही सोन्यासारखी संधी हातातून गेल्यास सुमितला वाटेल तेवढीच, किंबहुना अधिकच रुखरुख तुम्हाला वाटेल हे नक्की. ही संधी सुमितला मिळवून देणं आता फक्त तुमच्या हातात आहे.
सुमितच्या रॅम मोहिमेला आर्थिक आणि अन्य स्वरूपांत मदत करण्याचं आवाहन भारतातल्या आणि भारताबाहेरच्या आमच्या मित्रांना आम्ही करत आहोत. ही मदत करणा-यांच्या ऋणात आम्ही आयुष्यभर राहू. बाकी सुमितची सायकल रॅमच्या रस्त्यांवरून धावेल तेव्हा त्याचा जोम वाढवण्यासाठी आमची अमेरिकेतली भारतीय मंडळी उत्साहात रस्त्यावर उतरतील यात आम्हाला शंका नाही.

- टीम अग्नी
www.sumitpatil.com

अधिक माहितीसाठी:
http://goo.gl/Gy212t - Twitter Handle -- @patlanchasumit

http://goo.gl/Z7hh66 - Facebook Page

http://t.co/k2ZMpz0Toz - Mint newspaper (झेन अ‍ॅंण्ड द आर्ट ऑफ सायक्लिंग)

http://goo.gl/0SF1PL -midday (page 12,13)

http://goo.gl/X27U6A - times crest

http://goo.gl/BA7Dmp - Outlook Magazine

http://goo.gl/3gRwf3 --- Times of India

http://loksa.in/kbW72109 - Loksatta

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या अभियानास मदत करण्यास एच्छुक मित्रांनी इन्डीगोगो या क्राउड-फंडींग सन्केतस्थळावरील टीम अग्नीच्या उपक्रमाला भेट द्या. https://www.indiegogo.com/projects/india-at-race-across-america-2014/
धन्यवाद!

टीम, अभिनंदन.

तुम्ही अमेरिकास्थित मराठी मंडळाला http://www.bmmonline.org/contact कॉन्टॅक्ट कराल का? कदाचित BMM प्रत्येक शहरात राहण्यासाठी मदत करेल / शिवाय काही आर्थिक मदतही ती लोकं करू शकतील.