अन्ननलिकेमध्ये अडकलेला शुक्राचार्य ! ....... अर्थात वैद्यकविश्वातील जेम्स बॉंडची एक करामत !

Submitted by SureshShinde on 20 April, 2014 - 22:44

image_19.jpg

'वाय टू के'ची गडबड नुकतीच संपून नवीन सहस्त्रकाचा उदय झाला होता तेव्हाची गोष्ट! सोमवार असल्यामुळे क्लिनिकमध्ये नेहमीपेक्षा थोडी जास्तच गर्दी होती. नव्या आठवड्याची सुरुवात नवीन उत्साहाने झाली होती. तेवढ्यात फोनची घंटी वाजल्याने मी फोन घेतला. माझ्या जुन्या घराजवळ रहाणारे व माझे मित्र श्री.राऊत यांचा आवाज मी पटकन् ओळखला.
"सर, माझ्या वहिनींना आपल्याकडे पाठविले आहे. त्यांच्या छातीमध्ये दुखते आहे. कृपया त्यांना अग्रक्रमाने घ्यावे अशी विनंती आहे.'' श्री.राऊत नेहमीच्या पुढारी थाटात बोलत होते.
"छातीत दुखणाऱ्या पेशंटला मी कधीही वेटींग हॉलमध्ये बसवित नाही. त्यांचा नंबर नेहमीच पहिला असतो. छातीत दुखणारा कोणता पेशंट कधी सिरीयस होईल याचा नेम नसतो.'' मी त्यांना असे सांगून फोन ठेवला.
तेवढ्यात माझ्या मदतनीस डॉ.दीपाली यांनी सौ.सुनेत्रा राऊत आल्या असून त्यांना ईसीजी रुममध्ये झोपविल्याचे सांगितले. समोर बसलेल्या पेशंटना थोडेसे थांबण्यास सांगून मी सुनेत्राला तपासण्यासाठी ईसीजी रुममध्ये गेलो. सौ.सुनेत्रा नावाप्रमाणेच सुरेख, वय सुमारे पस्तीस, छातीवर हात धरुनच कॉटवर बसल्या होत्या. गेले दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. छातीमध्ये खूपच वेदना होत होत्या, उलट्या होत होत्या व उलटीमध्ये आंबट पित्त पडत होते. प्रथमदर्शनी त्यांना पित्त झाल्यामुळे उलट्या होऊन अन्ननलिकेचा दाह होत असावा, त्यामुळे छाती दुखत असावी असा मी अंदाज बांधला. त्यांच्या शारीरिक तपासणीमध्ये इतर कोणतीही नवीन लक्षणे दिसली नाहीत. त्यांच्या नाडीचे ठोके नेहमीप्रमाणेच व नियमित होते. ब्लडप्रेशर नॉर्मल होते. ताप नव्हता. फुप्फुसांच्या तपासणीमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली नव्हती. हृदयाचे आवाज नेहमीप्रमाणे 'लब-डप' असे येत होते. पाठीचे मणकेही दाबून पाहिले असता दुखत नव्हते. एकंदरीत सुनेत्राला होणारा त्रास पित्तामुळेच असावा अशा निदानापर्यंत मी पोहोचलो होतो. खरे म्हणजे पित्तनाशक औषधयोजना करुन त्यांना परत पाठवावे असा विचार मनात आला होता पण सुनेत्राच्या चेहऱ्यावरील वेदनादर्शक भाव पाहून माझ्या मनात निदान त्यांच्या नेहमीच्या तपासण्या तरी कराव्यात असा विचार बळावला.
"हे पहा, तुम्हाला पित्त झाले आहे पण तरीही आपण बाकी सर्व नेहमीच्या तपासण्याही करुन घेऊया. मनुष्य चुकतो, मशीन चुकत नाही हा माझा अनुभव आहे.'' असे सांगून ईसीजी काढण्यासाठी सुनेत्राची मानसिक तयारी करुन डॉ.दीपाली यांना मी त्यांचा ईसीजी काढण्यास सांगितले. अपेक्षेप्रमाणेच ईसीजी पूर्णपणे नॉर्मल होता. पित्तासाठी औषधयोजना करीत असतानाच रक्त, लघवी, छातीचा एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी या प्राथमिक चाचण्या करण्यासाठी चिठ्ठी देऊन त्यांना दुसऱ्या दिवशी मी पुन्हा येण्याचा सल्ला दिला.
दुसऱ्या दिवशी सौ.राऊत माझ्या आधीच क्लिनिकमध्ये येऊन बसल्या होत्या. त्यांच्या छातीतील दुखणे मुळीच कमी नव्हते. चाचण्यांचे अहवाल पूर्णपणे नॉर्मल होते. मात्र चेहऱ्यावरील वेदनांच्या जोडीला किंचितशी चिंतेची छटा दिसू लागली होती. मी क्षणभर विचारमग्न झालो.
"हृदयविकार आपल्याला कधीकधी फसवतो. आज आपण पुन्हा एकदा तुमचा ईसीजी काढून पाहू या.'' थोड्याशा नाराजीनेच त्या ईसीजीसाठी तयार झाल्या. पण दुसरा ईसीजीदेखील तसाच नॉर्मल होता. त्यात काहीही नवीन बदल नव्हते.
हा पेशंट खरोखरच माझीच परीक्षा बघत होता.
असे पेशंट 'या डॉक्टरांचा गुण येत नाही' असे समजून व इतर नातेवाईकांच्या अनुभवानुसार दुसऱ्या 'चांगल्या' डॉक्टरांकडे जाण्याचा धोका असतो.
"आपल्या छातीमध्ये केवळ हृदयच नव्हे तर फुप्फुस, अन्ननलिका, श्वासनलिका इ. अनेक अवयव असतात. त्याच्यामुळे असे दुखू शकते. तुमच्या दुखण्याविषयी मला थोडी आणखी माहिती सांगा.''
"डॉक्टर, मला सतत दुखते तर आहेच पण अन्नाचा घास गिळताना मला आणखी जास्तच दुखते.''
त्यांच्या तक्रारीतील हा धागा पकडून मी त्यांना ताबडतोब 'बेरीयम स्वॅलो' करण्यासाठी जाण्याचा सल्ला दिला.
"या तपासणीमध्ये आपण तुमच्या अन्ननलिकेचा व गिळण्याच्या क्रियेचा अभ्यास करणार आहोत. बेरीयम सल्फेट नावाचे औषध पिण्यास देऊन ते गिळत असतानाचे फोटो काढल्यावर अन्ननलिकेमध्ये काय आजार आहे ते आपल्याला कळेल.''
अर्ध्या तासामध्येच एक्स-रे विभागाच्या डॉक्टरांचा मला फोन आला. सुनेत्राच्या आजाराचे निदान होण्याची सुरुवात झाली होती. तिच्या अन्ननलिकेमध्ये अंशतः अडथळा आल्याचे दिसत होते. मी फोन खाली ठेवताच पुन्हा रींग वाजली अन् आता आवाज होता माझे मित्र श्री.राऊत यांचा!
"डॉक्टर, माझ्या वहिनींचे नेमके निदान काय आहे? त्यांना नेमके काय झाले आहे?'' त्यांनी विचारले.
"हे पहा, त्यांच्या अन्ननलिकेला सूज आहे. त्यांची आणखी तपासणी करावी लागेल. त्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे अशी माझी सूचना आहे.'' माझ्या आवाजातील गंभीरपणा आणि सुलेखाच्या दुखण्याची तीव्रता यामुळे राऊत कुटुंबियांनी सुनेत्राला त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

image_20.jpg

संध्याकाळी माझे काम संपवून मी त्यांना भेटण्यास हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा सुनेत्राच्या छातीचा 'सीटी स्कॅन' काढून तयार होता. त्यात त्यांच्या श्वासनलिका व अन्ननलिका यांच्या भोवती गाठी वाढल्याचे दिसत होते.
"या गाठी म्हणजे फुप्फुस अथवा अन्ननलिका यांना काही आजार अथवा संसर्ग झाल्यामुळे, शरीराची प्रतिक्रिया म्हणून वाढलेली संरक्षक पेशींची अवधाने आहेत. पायाला जखम झाल्यास जांघेमध्ये अवधान येते तसेच अवधान छातीमध्ये झाले आहे. आता हे अवधान कशामुळे आहे ते शोधावे लागेल. सीटी स्कॅनमध्ये फुप्फुसांचा आजार नसल्याचे स्पष्ट दिसते आहे. आजार अन्ननलिकेचा असण्याची शक्यता आहे. त्याचे नेमके निदान अन्ननलिकेमध्ये दुर्बिण घालून पाहिल्यानेच होणार आहे.'' मी श्री.राऊत यांना समजावून सांगत असताना सुनेत्रा देखील ऐकत होतीच.
'एन्डोस्कोपी' ही सुमारे दहा मिनिटांची तपासणी असून त्यात पेशंटला भूल दिली जात नाही. उलट आपल्या अन्ननलिकेमध्ये काय आजार आहे हे, इच्छा असेल, तर समोरील व्हिडीओच्या पडद्यावर पाहताही येते. यांची कल्पना देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 'एन्डोस्कोपी ' करण्याचे ठरले.
राऊत कुटुंबीय खूपच चिंतातूर मुद्रेने पेशंटच्या खोलीपासून दूर माझी वाट पहात थांबले होते. एन्डोस्कोपीमध्ये काय निदान निघू शकेल याची त्यांना कल्पना देणे क्रमप्राप्त होते.
"अन्ननलिकेतील असा अडथळा व अवधान हे सामान्यतः कॅन्सरचे लक्षण असते. पण कधी कधी दुसरा एखादा आजारही असू शकतो.''
राऊत कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरारले. पण मला एक डॉक्टर या नात्याने त्यांना आजाराविषयी पूर्ण कल्पना देण्याचे कटू काम करणे आवश्यकच होते. सुनेत्रा स्वभावाने अतिशय मनमिळावू असल्यामुळे राऊतांच्या घरामध्ये त्या रात्री कोणीही झोपू शकणार नव्हते. सर्वांनीच देवाला साकडे घातले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच डॉ.थोरातांनी सुनेत्राची एन्डोस्कोपी केली. आश्चर्याची व सुदैवाची गोष्ट अशी की अन्ननलिकेमध्ये कोणताही आजार नव्हता. पण सीटी स्कॅनमध्ये ज्या गाठी वाढलेल्या दिसत होत्या, त्या पैकी एक मोठी गाठ अन्ननलिकेच्या बाहेरील बाजूने अन्ननलिकेवर चांगलाच दाब देत होती व त्यामुळेच अन्न खाताना सुनेत्राला त्रास होत होता. डॉ.थोरात हे अत्यंत अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर होते. त्यांनी ती गाठ मऊ व लिबलिबीत असल्याचे निरिक्षण केले होते. त्या गाठीची पुण्यामध्ये 'बायॉप्सी' करणे म्हणजेच त्याचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे धोक्याचे असल्याचे त्यांनी सांगितले व पुढील तपासणी व उपचारांसाठी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला.
"मी जे दुर्बिण सदृश्य फायबर-ऑप्टीक अथवा प्रकाशतंतूंचे यंत्र अन्ननलिकेमध्ये घालून तपासणी केली तसेच पण दुसरे आधुनिक यंत्र मुंबईमध्ये उपलब्ध आहे. या यंत्रामध्ये प्रकाशतंतू आधारीत दुर्बिणीबरोबरच एक छोटेसे करंगळीच्या पेराऐवढेे 'अल्ट्रा साऊंड' मशिन बसविलेले असते. त्यामुळे अन्ननलिकेमधून आपण त्या गाठीच्या अगदी जवळ जाऊन ध्वनीलहरींच्या आधारे त्या गाठीचा अभ्यास करु शकतो. संगणकाच्या पडद्यावर त्या गाठीचे चित्र पाहू शकतो, एवढेच नव्हे तर एक छोटीशी सुई घालून त्या गाठीतील द्रव पदार्थ ओढून काढून त्या गाठीमुळे आलेला दाब आपण कमी करु शकतो. त्या तपासणीमध्ये मिळालेल्या द्रवाचा अभ्यास करुन आजाराचे शंभर टक्के 'निदान' होऊ शकते व अडथळाही दूर होऊ शकतो. असा दुहेरी फायदा त्या यंत्रामुळे होऊ शकतो. मुंबईमधील डॉ.राठोड हे अशा प्रकारच्या तंत्रशस्त्रक्रियेमध्ये वाकबगार आहेत. ''
आम्ही तातडीने डॉ.राठोड यांच्याशी संपर्क साधून दुसऱ्या दिवशीची वेळ ठरविली. ताडदेव येथील भाटीया हॉस्पिटलमध्ये ही तंत्रक्रिया होणार होती. राऊत कुटुंबियांच्या इच्छेनुसार व मलाही असणाऱ्या उत्सुकतेमुळे मी देखील तेथे जाण्याचे कबूल केले.
डॉ.राठोड म्हणजे सहा फूट उंचीचे गोरेपान भारदस्त व्यक्तिमत्व! अनुभव व ज्ञान यांचा अपूर्व संगम त्यांच्या मृदुपणामध्ये प्रकर्षाने जाणवत होता.
सुनेत्राची तंत्रक्रिया चालू असताना ते आम्हाला प्रत्येक क्रियेविषयी माहिती देत होते व संगणकाच्या पडद्यावर दिसणाऱ्या आकृत्यांचे विश्लेषणही करीत होते. त्यांचा तो जादुई स्कोप त्या गाठीजवळ जाताच ती गाठ पडद्यावर स्पष्ट दिसू लागली. त्या गाठीच्या आत घट्ट द्रवपदार्थ होता. त्या करंगळीएवढ्या रुंदीच्या छोट्याशा स्कोपमध्ये अनेक चॅनेल्स होते. निरनिराळ्या सुया, चिमटे इत्यादीसाठी एक, तर आतील द्रव शोधण्यासाठी एक सक्शन चॅनेल, तर एक व्हीडीओ चॅनेल असे अनेक चॅनेल असलेला तो स्कोप म्हणजे आधुनिक अभियांत्रिकी शास्त्राची करामतच! तो स्कोप हाताळणारे 'हॅण्डसम' डॉ.राठोड व त्यांची ती तंत्रशाळा पाहून जणू वैद्यकीय क्षेत्रातील 'जेम्स बॉण्ड'चा आभास होत होता! त्यांनी त्या गाठीजवळ स्कोप नेऊन त्या स्कोपमधील एका सुईने त्या गाठीचा छेद घेतला. ती क्रिया संगणकाच्या पडद्यावर स्पष्ट दिसत होती. पुढील क्षणी त्यांनी त्या गाठीमधील सुमारे पाच मिली एवढा द्रव सक्शन चॅनेलमध्ये ओढून खेचून घेतला. अन्ननलिकेवरील दबाव कमी झाला होता! तंत्रक्रिया संपली होती.
सुनेत्राचे छातीत दुखणे तर टेबलावर असतानाच थांबले होते. डॉ.राठोड यांनी आम्हाला आनंदाची बातमी सांगितली की, तो द्रव म्हणजे 'पू' होता व ती गाठ बहुतेक क्षयरोगाची होती. अर्थात त्याचा नक्की रिपोर्ट नंतर येणार होता. पण पुढील ट्रीटमेंट सुरु करण्यास डॉ.राठोडांना त्या रिपोर्टची आवश्यकता नव्हती. त्यांनी ताबडतोब मला क्षयरोगावरील औषधे सुरु करण्यास सांगितले, कारण नऊ महिने घेतल्यानंतर हा आजार शंभर टक्के बरा होणार होता. चार दिवसांनी डॉक्टर राठोड यांचे निदान बरोबर असल्याचा रिपोर्ट आला.
इतके दिवस हरविलेले हास्य सुनेत्राच्या चेहऱ्यावर पुन्हा विराजमान झाले होते. त्या दिवशी वैद्यकशास्त्रातील एका नवीन आधुनिक तंत्राच्या यशस्वी प्रयोगामुळे माझ्रे मन भारावून गेले होते. जणू सुनेत्राच्या अन्ननलिकेतील 'शुक्राचार्यांचा अडथळा' डॉ.राठोड रुपी बळीराजाने आधुनिक वैद्यकतंत्राचा डोळा वापरुन दूर केला होता. आणि माझे मन म्हणत होते, "इडापीडा टळो, बळी राजाचे राज्य येवो !''

................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Great!

Uttam lekh

डॉक्टर साहेब
तुमच्या साईटवर तुमचे अनेक अनुभव वाचले आहेत आणि त्यातून खूप बोध मिळाला आहे! आता आपणा मायबोली वर लेखन माला सुरु केली आहे. ते उत्तमच आहे.
आपले लिखाण सुलभ असते आणि त्यामध्ये एक प्रकारचा ओघ असतो. कुठल्याही सायन्स विषयावर सुलभ लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. ती आपण लीलया साधली आहे!
आपल्या अनुभवांचे एक पुस्तक आपण जरूर प्रकाशित करावे. त्याचा अनेकाना उपयोग होईल!
प्रदीप ओक

<<आपले लिखाण सुलभ असते आणि त्यामध्ये एक प्रकारचा ओघ असतो. कुठल्याही सायन्स विषयावर सुलभ लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. ती आपण लीलया साधली आहे!>>
+१.

अगदी नेहमीचा अनुभव आणि आजार. पण किती इंटरेस्टींगली मांडलाय.

<<आपले लिखाण सुलभ असते आणि त्यामध्ये एक प्रकारचा ओघ असतो. कुठल्याही सायन्स विषयावर सुलभ लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. ती आपण लीलया साधली आहे!>>
+१.

अगदी नेहमीचा अनुभव आणि आजार. पण किती इंटरेस्टींगली मांडलाय.

नेहमीप्रमाणे उत्कंठा वाढवणारी,ज्ञानात भर घालणारी चित्रदर्शी कथा.सुनेत्रा तिचे दीर डॉक्टर राठोड सर्व डोळ्यासमोर उभे राहतात.सुरुवातीचे फोटोही कथेनुरुप कसे शोधता?
वर्षु कथा वाचून भिती जाते आणि डॉक्टरना प्रत्यक्ष भेटल्यावर तर अनेक आजार असूनही आपण एकदम निरोगी असल्याचा फील येतो.

नेहमी प्रमाणे ओघवती भाषा आणी गोष्ट interesting...

आपण ह्या सगळ्या कथा एकत्र करुन एक पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाल्या तर खुपच मस्त पुस्तक तयार होईल......

खुप मस्त.

साध्या पित्ताच्या त्रासातही काही डॉक्टर फूल बॉडी चेकप करायला लावतात म्हणून ओरडणर्‍या पेशंट्स्ना लेख वाचायला द्यावा, पुढच्य अवेळेपासुन गपगुमान सगळ्या टेस्ट्स करतील Wink

प्रत्येक पेशंटमधली तूमची इनव्हॉल्व्हमेंट बघूनच त्यांचे अर्धे दुखणे दूर होत असावे. नेहमीप्रमाणेच मस्त लेख.

छान Happy

प्रत्येक पेशंटमधली तूमची इनव्हॉल्व्हमेंट बघूनच त्यांचे अर्धे दुखणे दूर होत असावे. नेहमीप्रमाणेच मस्त लेख.<< +१००

Pages