खराट्याच्या काडीने आणला वात ! …… साधासुधा नव्हे तर जीवघेणा 'धनुर्वात' !

Submitted by SureshShinde on 17 April, 2014 - 15:38

image_18.jpg

'धनुर्वात' - हा मानवास अगदी प्राचीन काळापासून माहिती असलेला एक जीवघेणा आजार! हा आजार ब्याक्टेरिया जातीच्या एका विशिष्ठ जंतूमुळे होतो. क्लौस्त्रेडिया टेट्यानाय नावाचे हे जंतू स्वतःभोवती एक प्रकारचे संरक्षक कवच तयार करुन सुप्त अवस्थेत वर्षानुवर्षे राहू शकतात. धनुर्वात ह्या आजारासाठी कारणीभूत असलेले हे जंतू वातावरणामध्ये सर्वत्र पसरलेले असतात आणि योग्य हवामान व खाद्य मिळाल्यावर कवच फोडून बाहेर येऊन आपली प्रजोत्पत्ती करतात. त्यांच्याकडे आणखी एक हत्यार असते, ते म्हणजे त्यांचे विष अथवा विखार. या जंतूंचा संसर्ग बहुतेक करुन अस्वच्छ जखमेमध्ये होतो व तेथे जंतू वाढून आपले टॉक्सिन अथवा विखार तयार करतात. हा विखार रुग्णाच्या शरीरात त्याच्या नसांद्वारे पसरतो व पेशंटच्या स्नायुंना अतिप्रमाणामध्ये चेतना निर्माण करतो. त्याचे हातापायाचे स्नायू घट्ट होतात, पोटाचे स्नायू घट्ट होतात, तोंड उघडत नाही व ही क्रिया आजाराच्या अगदी सुरुवातीचे लक्षण असते. तोंड घट्ट बंद होण्याच्या या क्रियेला 'लॉक जॉ' म्हणतात. पुढे आजाराची लक्षणे वाढतात व पाठीचे स्नायू घट्ट झाल्यामुळे माणूस पाठीवर कमान टाकल्याप्रमाणे वाकतो व त्यातच भर म्हणून की काय त्याला 'झटके' देखील येऊ लागतात. आजूबाजूला थोडासा मोठा आवाज जरी झाला तरी हे झटके सुरु होतात. हे झटके जर खूप वेळ चालले तर स्वरयंत्राचे तंतू फार वेळ बंद राहून हवा न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. पूर्वी जेव्हा चांगली औषधे उपलब्ध नव्हती तेव्हा धनुर्वाताचे रुग्णांना अंधाऱ्या खोल्यांत, आवाज येणार नाही अशा दूरवरच्या ठिकाणी ठेवून शुश्रुषा करीत असत. हळूहळू वैद्यकीय विचार बदलले आणि आता तर अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवून उपचार करण्याची पद्धत आल्यामुळे पूर्वीचा गावाबाहेर असणारा धनुर्वात विभाग आता जवळजवळ कालबाह्य झाला आहे. धनुर्वाताच्या विखारावर उत्तम लस तयार झाल्यामुळे, लोकशिक्षणामुळे व आरोग्यविषयक ज्ञानप्रसारामुळे 'धनुर्वात' हा आजार जवळजवळ संग्रहालयात जमा झाला आहे. पण तरी देखील अधूनमधून असे रुग्ण अचानक येतच असतात.

सन १९७९ साली माझी नेमणूक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून पुण्यातील डॉ.नायडू सांसर्गिक रुग्णालयात झाली होती. तेथे धनुर्वाताचा एक विभाग होता. त्यावेळी त्यात अनेक रुग्ण असत. बरेचसे रुग्ण कमी त्रास असलेले म्हणजेच 'माईल्ड' असत तर एखादाच गंभीर असे. असाच एक रुग्ण मी पाहिला त्याचे नाव होते चिमणभाई शहा. चारपाच दिवसांपासून त्याचा जबडा उघडत नव्हता. म्हणून त्याला 'माईल्ड' धनुर्वाताचे निदान करुन उपचार चालू होते. मी त्यांची माहिती करुन घेतल्यानंतर त्याला धनुर्वात नसून त्यांची अक्कलदाढ वाकडी आली असून तिच्या भोवतीच्या हिरडीला सूज आलेली आहे असे माझ्या लक्षात आले. त्याला उत्तम प्रतिजैविक औषध दिल्यामुळे दोनच दिवसात तो चांगला बरा झाला व धनुर्वात वॉर्डातून 'सुटका' झाल्यामुळे त्याच्या मनातील काळजी एकदमच कमी झाली. नाहीतर त्याकाळी काळे पडदे लावलेल्या अंधाऱ्या वॉर्डमध्ये इतर रुग्णांबरोबर राहून चांगल्या माणसावर देखील मानसिक दडपण आल्याशिवाय राहात नव्हते.

याऊलट दुसरा एक रुग्ण माझ्या विशेष लक्षात राहीला होता. या स्त्री रुग्णाचे नाव होते -राधा. ही तीस वर्षांची स्त्री एका चांगल्या सधन, सुशिक्षित घरातून आली होती. तिलाही धनुर्वात झाला होता व हात-पाय-पोट चांगलेच ताठरले होते. तोंडही बंद झाले होते. बोलताही येत नव्हते. तिच्या नातेवाईकांनी मी वॉर्ड बाहेर येताच माझ्याभोवती घोळका केला. ते सर्व खूपच घाबरलेले होते. मी त्यांना सदर रुग्णाच्या उत्तम उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवावे असे सूचविले. त्याकाळी म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये अशी सोय नसल्यामुळे व सर्वसाधारण डॉक्टर्स धनुर्वात झालेला रुग्ण शक्यतो टाळत असल्यामुळे त्यांनी माझ्या सूचनेप्रमाणे पुण्यातील हरजीवन हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे ठरविले.
तेथे दाखल झाल्यानंतर राधाची तब्येत आणखीनच खराब होत चालली. तिला झटके येऊ लागले. मी व तेथील डॉ.शेठ आळीपाळीने सतत राधाजवळ थांबून तिला 'कांपोज'चे इंजेक्शन देत होतो. त्यावेळी नुकतेच मुंबईमधील केईएम हॉस्पिटलमधील प्रसिद्ध प्रो. एफ. डी. दस्तूर यांनी 'कांपोझ' या औषधाचा शंभरपटी पर्यंत डोस वापरुन काही रुग्ण वाचविले होते. त्यांच्याशीही आम्ही चर्चा केली. राधाचे झटके कांपोझलाही जुमानत नव्हते. तिचा श्वास खूप वेळ थांबत असल्याने तिचे स्नायू औषधाने संपूर्ण शिथिल करुन तिला कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचे आम्ही ठरवितच होतो, तेवढ्यात तिला एक मोठा झटका आला आणि त्यातच तिचे हृदय बंद पडले. डॉ.शेठ हे प्रख्यात कसबी भूलतज्ज्ञ असल्याने त्यांनी व मी पटकन उपचार करुन तिचे हृदय पुन्हा चालू केले. तातडीने तिच्या श्वासनलिकेला छिद्र पाडून पुन्हा तिचा श्वास वेळ आल्यास कृत्रिमरित्या चालू ठेवता येईल याची खात्री केली.

बहुतेक राधा आता वाचणार नाही असे वाटत असल्याचे आम्ही तिच्या नातेवाईकांना सांगितले. त्या नातेवाईकांपैकी एकीने मला बाजूला घेऊन माझ्याशी एकट्याने बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्या स्त्रीने मला असे सुचविले की या रुग्ण स्त्रीला काहीतरी स्त्री रोग असल्यामुळे तुम्ही तिची स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी कराल तर बरे होईल. आम्ही त्याप्रमाणे तिला स्त्री-रोगतज्ज्ञ डॉक्टरांनाही दाखविले. डॉ.मायाताईंनी तपासून सांगितले की तिच्या योनीमार्गातून थोडा स्त्राव येत आहे व त्याचे ड्रेसिंग करावे. दुसरा काही आजार दिसत नव्हता. राधाचा उपचार, औषधे, कृत्रिम श्वासोच्छश्वास चालूच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची स्वच्छता करणाऱ्या नर्सने राधाच्या योनिमार्गातून काहीतरी बाहेर वस्तू बाहेर येत असल्याचे सांगितले. आम्ही आत जाऊन पाहतो तर काय की तिच्या योनीमधून बाहेर डोकावत होती एक 'खराट्याची काडी!' अलगदपणे चिमट्याने ती काडी आम्ही ओढून काढली व नंतर डॉ.मायाताईंनी तिची 'डी ऍण्ड सी' अथवा क्युरेटिंग शस्त्रक्रिया केली. निसर्गाचा चमत्कारच की काय पण त्यानंतर राधाचे झटके पूर्ण थांबले व तिच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होऊ लागली. पुढील चारपाच दिवसात तिचा स्वतःचा श्वास पुन्हा सुरु झाला व पुढील आठवड्यात तिच्या श्वासनलिकेचे छिद्रही भरुन आले. त्यानंतर तिला बोलता येऊ लागले.

सौ.राधा ही एक सुशिक्षित व नोकरी करणारी स्त्री होती. जवळजवळ तीन आठवडे उपचारानिमित्त आम्हा सर्वांशी तिचा जिव्हाळा निर्माण झाला होता. डॉ.मायाताईंनी हळुवारपणे तिच्याशी बोलून जी माहिती मिळविली ती मात्र अतिशय धक्कादायक होती. राधा व तिचा नवरा दोघेही नोकरी करीत होते व त्यांना तीन मुली होत्या. त्यांचा संसार अतिशय सुखात चालला होता. पण राधाच्या नवऱ्याला हवा होता वंशाचा दिवा, अर्थात मुलगा ! राधाला आता चौथे बाळंतपण, मुलगा काय किंवा मुलगी मुळीच नको होते. पण निसर्गनियमानुसार ती पुन्हा गर्भवती झाली. नवऱ्याला तिने काहीच सांगितले नव्हते. तिच्या एका मैत्रिणीने तिला सुचविला एक सोपा उपाय- गर्भपात करण्याचा !

त्याकाळी वैद्यकीय गर्भपात एवढा प्रचलित नव्हता. तिने निवड केली नारायण पेठेतील एका सुईणीच्या सूतिकागृहाची. तिच्याकडे जाऊन तिने गुपचूप गर्भपात करुन घेतला. त्या गर्भपाताच्या वेळी ती काडी बहुतेक आत गर्भाशयातच मोडली व तो एक तुकडा आतच राहीला. राधाचा गर्भपात तर झाला पण अपूर्ण! आत राहीलेल्या काडीने तयार केला संसर्ग; महाभयानक, जीवघेणा संसर्ग - धनुर्वात!

-------------------------------

हल्ली धनुर्वात अथवा टेटॅनस हा आजार पूर्णपणे टाळता येतो. ह्या जंतूंच्या विषापासून प्रतिबंधक शक्ती देणार्या 'टेटॅनस टॉक्साईड' अथवा 'टीटी' ह्या इंजेक्शनमुळे हा आजार जवळजवळ नाहीसाच झाला आहे. लहान बाळांना दिल्या जाणार्या 'ट्रिपल' या व्ह्याकसीनमध्ये 'टीटी' हा एक भाग असतो. टीटीची दर महिन्यास एक प्रमाणे तीन इंजेक्शन्स घेतल्याने येणारी प्रतिकारशक्ती सुमारे दहा वर्षे टिकते. त्यामुळे वारंवार टीटीचे इंजेक्शन घेवू नये, ते त्रासदायक होवू शकते. एकदा व्हॅक्सिनेशनचा एक महिन्याच्या अंतराने तीन वेळा असा पूर्ण कोर्स केला कि नंतरचा बूस्टर डोस दहा वर्षानंतरच घ्यावा, लवकर वा वारंवार नको. ट्रिपलमुळे हा कोर्स एकदा पूर्ण होतो, मुल शाळेत जावू लागताना डबल टाॅक्साईडचा एक बूस्टर व नंतर मात्र गरज पडल्यास टीटीचा बूस्टर दहा वर्षानंतरच !
अतिव्ह्यक्सिनेशन मुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होवू शकतो, अथवा संधिवातासदृश अॅलर्जी निर्माण होवू शकते.
काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट येथे सांगावीशी वाटते. ऑस्ट्रेलियामध्ये एका सांसर्गिक आजार रुग्णालयातील नर्स किडनीचे काम खूप कमी झाल्यामुळे दाखल झाली होती. किडनीची बायोप्सी केल्यानंतर किडनीमध्ये खूप अॅन्टीबाॅडीज् साठलेल्या दिसल्या. या एव्हड्या मोठ्या प्रमाणात अॅन्टीबाॅडीज् या स्त्रीच्या शरीरात कशा निर्माण झाल्या हे शोधताना त्यांना एक गमतीदार गोष्ट समजली. ह्या नर्सची ड्युटी या सांसर्गिक आजार रुग्णालयात झाल्यापासून तिला आपल्यालाही टिटॅनस अथवा डिप्थेरिया (घटसर्प ) असे आजार होतील अशी भीती वाटत असे. त्यावर खबरदारी म्हणून ही नर्स स्वतःच 'डबल टाॅक्साईड' हे व्ह्यक्सिनचे इंजेक्शन दर महिन्याला घेत होती. हे कारण समजल्यानंतर पुढील उपचार सोपे होते. डायलीसीस सदृश उपचारांनी तिचे सर्व रक्त शुद्ध केल्यानंतर तिच्या किडनी पुन्हा कार्यरत झाल्या. बिचारी केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच वाचली !

कोठलेही व्ह्यक्सिन अथवा औषध हे एक दुधारी शस्त्र आहे हे नेहमी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे!! गर्भपात करायला खराट्याच्या काड्या वापरल्या होत्या?! काय बोलावं तेच समजत नाही! हा असला उपाय करावासा वाटण्यामागे नवर्‍याचं किती मानसिक प्रेशर असेल! तो काही शिकला की नाही यातून?!

फार सुंदर लिहिता तुम्ही डॉक्टर.

>>त्या नातेवाईकांपैकी एकीने मला बाजूला घेऊन माझ्याशी एकट्याने बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्या स्त्रीने मला असे सुचविले की या रुग्ण स्त्रीला काहीतरी स्त्री रोग असल्यामुळे तुम्ही तिची स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी कराल तर बरे होईल. >> हे एकदम त्या नातेवाईक स्त्रीला कसं आणि का सुचवावंसं वाटलं असेल ह्याची संगती नीट लागली नाही. बाकी लेख उत्तमच.

बापरे!

डॉ. नेहमीप्रमाणे आवडला लेख!

धर्नुर्वाताची लस प्रत्येक सहा महिन्यांनंतर किंवा जेव्हा जखम होईल तेव्हा (whichever comes first) घ्यायला पाहिजे असं एका डॉ. सांगितलं होतं. म्हणजे तीन महिन्यात दोनदा जखम झाली तर दोनदा घ्यावी. हे जरा पटले नव्हते. यावर तुमचे मत वाचायला आवडेल, धन्यवाद.

>>>>> त्यांचा संसार अतिशय सुखात चालला होता. पण राधाच्या नवऱ्याला हवा होता वंशाचा दिवा, अर्थात मुलगा. <<<<

संसार सुखात होता आणि लगेच हे वाक्य. आणि मग गर्भपातासाठी लपून अशी भयानक मार्गाने खटपट तो हि शिकलेल्या बाईकडून(अडाणी बाया कसलातरी रस, खोडाच्या बिया तत्सम वगैरे खावून गर्भपात करतात एक वेळ समजू शकतो ..पण शिकलेली बाई) मग संसार सुखात कसा काय असा प्रश्ण पडला.
जुनाट विचारसरणीचा नवरा, नवर्‍यापुढे मोकळेपणाने मत न मांडू शकणारी बाईचा संसार सुखात? तसंही शिकण्याचा वा कमावते असण्याचा सबंध नेहमीच जसा लावला जातो तो काही पटत नाही( अश्या अर्थाने की शिकलेली व्यक्ती व मिळवती व्यक्ती नेहमीच सारंसार विचार करु शकते ) असे बर्‍याचदा आढळलेय. (मला विरोधाभास वाटला तो लिहिला). असो.
-------------------------------------------------------------------------------------------------
बाकी, तुमच्या कथा नेहमीप्रमाणेच रोचक. ज्या बाईने राधा बद्दल बाजूला येवून सांगितले तिला बहुधा राधाच्या हा खटपटीची (अश्या मर्गाने गर्भपात)माहिती असावी असा अंदाज लावलाय मी हि गोष्ट वाचताना. तुम्हीच खुलासा करु शकाल.
Happy

खराट्याच्या काडीचं वाचून भयंकर वाटलं. लेख मात्र नेहमीप्रमाणेच शेवटपर्यंत श्वास रोखून लावणारा.

एकदा अंतर्नाद मध्ये ' गर्भस्य कथा रम्या' नावाची एक सत्यकथा वाचली होती. लेखक डॉक्टरच होते, नाव आता आठवत नाही. त्यातही एका लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या मुलीने गर्भपातासाठी अशा कुठल्यातरी वैदूचा आधार घेतला होता आणि या अशाच खराट्याच्या काड्यांनी जंतुसंसर्ग होऊन शेवटी त्या मुलीचा जीव गेला होता. अशा वेळी याला तितकेच ( किंवा जास्त ) कारणीभूत असणारे पुरुष नामानिराळे राहातात याचीही चीड येते.

डॉक्टर, तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कथा वाचल्यात. उत्कृष्ट आहेत. धन्यवाद!

बापरे काटा आला अंगावर .. तुमच्या सत्यकथा समाजातील असली सत्येही बाहेर आणताहेत.

बाकी गोष्ट सांगण्यात तुमचा पहिला नंबर आहे. इतकी रंगवुन सांगता की वाचणाराही श्वास रोधुन वाचतो.

पेशंटला अ‍ॅडमिट केल्यावर कायकाय होते हे तुमच्यामुळे कळतेय. डॉ. एवढे लक्ष देऊन पेशंट पाहतात हे पेशंट शेजारी बसुनही कळत नाही कारण आम्हाला दिसते काय तर डो. येऊन फक्त चार्ट पाहतात आणि जातात. त्यांचे काम कसे चालते हे तुमच्या लेखांमुळे कळतेय.

बापरे! खराट्याच्या काडीने गर्भपात??

काय भयानक प्रकार घडत असतात आपल्या समाजात आणि आपल्याला त्याची खबरही नसते.

बाकी गोष्ट सांगण्यात तुमचा पहिला नंबर आहे. इतकी रंगवुन सांगता की वाचणाराही श्वास रोधुन वाचतो.>>>>+९९

खुप माहितीपूर्ण लेख.
या जंतुंचा आणि गंजलेल्या लोखंडाचा व घोड्याच्या लिदीचा काय संबंध आहे.
मी लोखंडाच्या कारखान्यात काम करतो. इथे कुणालाही साधी जखम झाली तर डॉक्टर आधी हे इंजेक्शन देतात.
तसेच प्रा. घाणेकरांच्या पुस्तकात घोड्याच्या लिदीचा आणि या जंतूंचा संबंध आहे असे वाचले.

गर्भपाताचा हा अघोरी प्रकार अनेक वर्षे प्रचलित आहे. याच विषयावर एक चित्रपट आला होता. त्यात डेमी मूर होती.

सर, नेहमीप्रमाणेच उत्तम लेख .....

किडनीची बायोप्सी केल्यानंतर किडनीमध्ये खूप अॅन्टीबाॅडीज् साठलेल्या दिसल्या. या एव्हड्या मोठ्या प्रमाणात अॅन्टीबाॅडीज् या स्त्रीच्या शरीरात कशा निर्माण झाल्या हे शोधताना त्यांना एक गमतीदार गोष्ट समजली. >>>> याचा संपूर्ण संदर्भ कृपया देऊ शकाल का ? (मला या अॅन्टीबाॅडीज् संदर्भात अजून काही हवे आहे - त्यासाठी)
धन्यवाद.....

बापरे! नवर्‍याला वंशाचा दिवा हवा म्हणून लादले गेलेले गर्भारपण, गर्भपाताचा निर्णय हातात नाही म्हणून वैद्यकिय मदतीशिवाय स्विकारलेला अघोरी उपाय, त्याचे परिणाम, सगळेच भयानक.

Pages