Submitted by सई केसकर on 17 April, 2014 - 04:24

आSSई! आम्ही आलो!! मला पट्टकन खायला दे ना!
अरे वा! ठके, आलीस पण! माझी आठवण आली का तला रात्री?
अगं आई, आठवण यायला वेळच मिळाला नाही.
मग? अनुकडे राहायला मजा आली की नाही? अनुच्या आईला त्रास नाही ना दिलात?
नाही गं आई! आम्ही तर उलट त्यांना आंब्याचा रस काढायला मदत केली. अनुच्या आईनी ना आम्हाला फक्त शॉर्ट्स मध्ये बाल्कनीत बसवलं. आणि ना दोघींना पाच पाच आंबे दिले. आणि मध्ये एक मोठ्ठं पातेलं ठेवलं.
मग?
मग काय! मी आणि आनुनी रेस लावली. कुणाचे आंबे पहिल्यांदा संपणार. पण अनुची आई म्हणाली की रेसमुळे ना, आम्ही बराच रस आतच ठेवला. सो मग आम्ही उलटी रेस लावली.
म्हणजे कशी?
म्हणजे कुणाची कोय सगळ्यात पांढरी. मग आधी ना आम्ही खूप हळू हळू सगळा रस काढला. आणि नंतर कोय चाटली!
मग कोण जिंकलं?
आम्ही दोघी जिंकलो. कारण आम्ही खूप वेळ कोय चाटून चिकट चिकट झालो. आणि नंतर आम्हाला गब्बरला अंघोळ घालायची होती.
हा कोण गब्बर? आणि त्याला तुम्ही का अंघोळ घालावीत?
अय्या आई! तुला माहित नाही? अनुकडे गब्बर नावाचा कुत्रा आहे. गोल्डन रिवॉल्वर.
हा हा! अगं रिवॉल्वर नाही ग ठकूताई, गोल्डन रिट्रीव्हर.
हा! तेच ते.
तुला माहितीये आई, गब्बरच्या केसांत आम्हाला परवा रात्री ऊ सापडली.
ऊ नाही गं, त्यांना पिसवा म्हणतात. सगळ्या प्राण्यांवर असतात थोड्या थोड्या.
मग अनुचे बाबा म्हणले की आपण उद्या गब्बरला अंघोळ घालू.रात्री आम्ही अनुच्या रूममध्ये गब्बरच्या केस विंचरत होतो. तर त्याचा भांग पडला ना, की त्यातून ती ऊ अशी रस्त्यावरून पळतात तशी पाळायची. मग आम्ही असा पुढे पुढे भांग पाडून तिला रस्ता तयार करून द्यायचो.
शी! काहीही करता तुम्ही मुली!
अगं नाही आई! खूप मस्त वाटतं. असं वाटतं की गब्बर म्हणजे एक मोठ्ठं जंगल आहे. असं खूप खूप गावत उगवलेलं. कुठलं गं आई ते? आफ्रिकेतलं?
सव्हाना.
हा! आणि त्या गवतातून वाट काढत काढत ऊ पुढे चाललीये. मग आम्ही तिला त्याच्या पाठीवरून वाट काढत काढत त्याच्या कानापर्यंत आणलं. आणि मग चुकून अनुचं बोट त्याच्या कानात गेलं. तर ना, त्यांनी असे फडफड करून कान हलवले आणि चिडून निघून गेला.
जाईल नाहीतर काय करेल! एवढा छळ झाल्यावर!
मग आमरस झाल्यावर आम्ही दोघी, अनुचे बाबा आणि गब्बर गच्चीवर गेलो. तिथे नळ आहे. मग अनुच्या बाबांनी आमच्या हातात पाईप दिला आणि आम्ही गब्बरवर खूप पाणी उडवलं. अनुच्या बाबांनी त्याला घट्ट धरून ठेवलं होतं. मग त्याला शॅम्पू लावला. तो इतका गब्बू आणि उंच आहे ना, त्यामुळे मी पुढून लावला आणि अनुनी मागून. तो तर सारखी जीभ बाहेर काढून पाणी प्यायचा प्रयत्न करत होता. अनुचे बाबा म्हणाले की त्याला उन्हाळ्याचा त्रास होतो. खूप फेस झाला! आम्ही तिघेही त्यात बुडून गेलो! मग अनुच्या बाबांनी आमच्या सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवलं. इतकी मज्जा आली!
आई आपण पण घेऊया ना भुभु.
वाटलंच मला आता ही मागणी येणार!
आई प्लीज! घेऊया ना!
आपण मांजर घेऊ.
मांजराला अंघोळ घालता येते?
नाही मांजर आपली आपली अंघोळ करतं. म्हणूनच घ्यायचं.
शी बाई! मग काय मजा! सगळी मजा तर अंघोळीतच आहे.
बरं बघू.
म्हणजे नाही. तू जेव्हा बघू म्हणतेस तेव्हा ते नाही असतं.
बरं बरं. चल आता गरम पोळी खा. ही बघ कशी फुगलिये, अगदी तुझ्यासारखीच!

http://thhakoo.blogspot.in/2014/04/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

cute. One of my dogs runs all over the place once she is released after a bath. too funny for words.

कित्ती गोड.
मुलांशी गप्पा मारण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही.

मुलं कुठे आणि कसं लॉजिक लावतील सांगता येत नाही.
कुत्र्याच्या केसांचं सव्हाना फारच मस्तं आहे.

आमचा कालचा संवाद- 'आई तुम और बाबा एक पेड हो और हम तुम्हारे कांधेपर बैठे पंछी है'

बहुतेक 'एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं...' हे गाणं सकाळभर पाहिल्याचा परिणाम असेल.

आवडलेच. Happy

'मांजर तरी ठेवूया ना त्याला अंघोळ नाही घालावी लागत' असे सांगून आम्ही माऊ पाळायला परवानगी मिळवली होती.

>>आमचा कालचा संवाद- 'आई तुम और बाबा एक पेड हो और हम तुम्हारे कांधेपर बैठे पंछी है'>> साती, किती छान विचार आहेत तुमच्या मुलाचे!

Lol मस्त आहे.

"बरं बघू.
म्हणजे नाही. तू जेव्हा बघू म्हणतेस तेव्हा ते नाही असतं.
बरं बरं. ..."
हा अगदी सेम टू सेम संवाद नुकताच दोन वेळा घडलाय. 'बरं बघू' चे कारण वेगवेगळे! Lol

मुलांशी गप्पा मारण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही.>> साती, मुलांची आणि गप्पांची आवड असेल तर अशी करोलरी अ‍ॅड कर त्या वाक्याला Wink

गोड आहे लेख.

मस्तय हे!
आणि <<<<<<<< आणिआमचा कालचा संवाद- 'आई तुम और बाबा एक पेड हो और हम तुम्हारे कांधेपर बैठे पंछी है'
>>>>>> हेही"

आवडलंच!
'आई तुम और बाबा एक पेड हो और हम तुम्हारे कांधेपर बैठे पंछी है '>>>>>> जियो आईबाबा! लईभारी.

आई ग्ग कसलं क्युट...माझी पोरं डॉगी घ्यायचा म्हणून मागे लागलीत त्याची आठवण झाली (सध्या आई कुत्र्यांना घाबरते इतक्याच कारणावर थोपवलंय)

मस्त गं सई. Happy

धन्यवाद! या ब्लॉग वर चित्र टाकावीत असा विचार आहे. कुणी तयार असल्यास प्लीज मला वि पू टाका!
ब्लॉग पार्टनर बनण्यासाठी. Happy