कैकेयी

Submitted by भारती बिर्जे.. on 15 April, 2014 - 07:29

कैकेयी

अयोध्या अजूनही निद्रिस्त होती. दूर शरयू नदीचं पात्र निळसर धुक्यात मंद उजळून शहारत होतं. सौधावर गार बोचऱ्या झुळुका सुटल्या होत्या. युवराज राम सौधाच्या अगदी कडेला रेलून उभा होता. अंगावर सैलसर शाल पांघरून शरयूपैल हरवलेल्या नजरेने पाहत होता.उत्तररात्रीचा प्रहर. राजप्रासादाला अजून जाग यायला बराच अवकाश होता.

‘’ रामा ! राजकन्या सीतेपेक्षा शरयू नदी सुंदर आहे की काय ?’’ त्या खट्याळ किणकिणत्या स्वरातल्या शब्दांनी त्याची तंद्री भंग पावली. दचकून त्याने मागे वळून पाहिलं तर धाकटी राणी कैकेयी सौधाच्या दरवाजात उभी होती.. नि:स्तब्ध शांततेत दोघे एकमेकांकडे क्षणार्ध बघत राहिले.
‘’ माते! ये,पण बोलू नकोस.या सघन चांदण्यातल्या शांततेला तडा जाईल. तसाही तो जाणारच आहे नगराचे व्यवहार सुरू झाल्यावर.आत्ता अयोध्येचं हे निरागस रूप पाहून घे.’’
त्याचा गंभीर भाव पाहून तीही मूक झाली.काही क्षण त्याच्यासोबत शरयूचं पात्र न्याहाळत राहिली.मग रामच बोलला ,’’ माते, बोल ग हवं ते.आपल्याला तरी कुठे बोलायला वेळ मिळतो आजकाल ! तुला आठवतं, या सौधावर अशाच पहाटवेळी कितीदा तरी अगदी मनातल्या गोष्टी सांगितल्या असतील आपण एकमेकांना.’’
‘’ श्रीरामा ! प्रियपुत्रा ! भरतापेक्षाही प्रेम केलं आहे मी तुझ्यावर असं म्हणणंही कमीच वाटतं मला. या कैकेयीच्या जीवनातल्या सर्वात पवित्र प्रेमाचं नाव राम आहे.पुत्रा,तू माझा पुत्र आहेस आणि पिताही.तू माझं माहेर आहेस दूर कैकेय देशात राहिलेलं.’’
‘’ माता कैकेयी, ही तुझी माहेरची ओढ इतक्या तीव्रतेने इतका काळ मी कोणत्याच स्त्रीमध्ये पाहिली नव्हती. माता कौसल्या, माता सुमित्रा काय आणि अगदी आता विवाहबद्ध होऊन प्रासादात आलेल्या राजकुमारी सीता आणि तिच्या तीनही भगिनी. किती पटकन रुळल्या इथे.स्त्रियांना कळतंच की नव्या मातीशी नव्या आवेगाने रुजलं तरच जगणं सुसह्य सुंदर होतं ते.नाहीतर तू ! अशा वेगळेपणामुळे कायम अस्वस्थ असतेस.’’
‘’ लग्न काय झालं महाशयांना स्त्रियांवर बोलण्याचा मोठा अधिकारच मिळाला. एरवी मान उचलून मातांशिवाय अन्य स्त्रियांकडे, अगदी समवयीन कन्यकांकडेही बघतसुद्धा नव्हते युवराज.’’

यावर राम लाजला आणि पुटपुटला ,’’ तुझं सगळंच जगावेगळं एवढंच म्हणायचं होतं माते.तुझं खळखळून हसणं , तुझं अश्वारोहण, तुझा शस्त्राभ्यास, तुझं तातांना युद्धात सहकार्य करणं .. कधीकधी वाटतं तू या स्थळकाळाबाहेरची कुणी यक्षिणी आहेस.’’
‘’ यक्षिणी शापित असतात ना रामा ? मग तुला वाटतं ते बरोबरच असेल.म्हणूनच अशी मातृविहीन , सात भावांची दंगामस्ती करणारी बहीण म्हणून वाढले मी माहेरी.आणि मग.. बरं पण आधी मला सांग, नवीन- नवीन लग्न झालेला,तेही सीतेसारख्या गुणलावण्यसंपन्न राजकुमारीशी,राज्याभिषेक एक आठवड्यावर आलेला हा माझा ज्येष्ठ प्रियपुत्र उत्तररात्री एकटाच सौधावर कसली चिंता करतो आहे ? बाळा,कसला तणाव आहे तुला ? मी गेले कैक दिवस पाहते आहे पण बोलले नाही. एक तर तुम्हा सर्वांच्या विवाहांची धामधूम, तुझ्या राज्याभिषेकाची त्याहीपुढची उत्सवी तयारी.. वाटलं माझ्या शहाण्या बाळाला येणाऱ्या जबाबदारीचा तणाव आला असेल, त्याचा स्वभाव आहेच तसा धीरगंभीर ! इतकंच आहे ना रामा ? खरं खरं सांग पाहू मला ! माझ्यापासून लपत नाहीत तुझे मनोभाव. अगदी लहानपणापासून तुझे सगळे हट्ट कौसल्यामातेपेक्षाही माझ्याकडेच चालले आहेत.’’
राम हसला. ‘’ आणि त्यापायी तुला तिचा रोषही उगीचच पत्करावा लागला आहे. कसं विसरेन ? पण मनकवडी आहेस माते , माझे अनुच्चारित भाव अचूक वाचतेस नेहमीच, म्हणून माझं रहस्य तुझ्यासमोर उघडं पडतं नेहमीच, हे मात्र कोणाला समजत नाही..’’
‘’ होय ना बाळा? मग सांग पाहू काय खुपतं आहे माझ्या रामाच्या कोमल हृदयाला ?’’

आता बोचऱ्या झुळुका निवळून हवासा गारवा सुटला होता.सौधावरच्याच एका संगमरवरी चौथऱ्यावर आपली रेशमी शाल पांघरून रामाने मातेसाठी आसन तयार केलं आणि बळेच तिला तिथे बसवलं. तिच्या पायाशी बसून तिला म्हणाला ‘’ माते ऐक तर. गोष्ट काही मासांपूर्वीची आहे. गुरुदेव विश्वामित्र तातांकडे आले आणि त्यांनी तातांकडे माझी आणि बंधू लक्ष्मणाची मागणी केली कारण राक्षस त्यांची यज्ञस्थळे उद्ध्वस्त करत होते हे तू जाणतेसच.’’
‘’ आठवतंय ना पुत्रा. तुझं आणि पुत्र लक्ष्मणाचं धनुर्विद्याग्रहण पूर्ण झालं होतं. धाकट्या दोन्ही कुमारांचं शिक्षण अजून चालू आहे म्हणून तुम्हा दोघांचीच मागणी केली त्यांनी.’’कैकेयी जणू ते दृश्य मनाने पुन: पाहत होती.
‘’ होय ग माते ! माहिती आहे मला भरत शत्रुघ्नही नुसते फुरफुरत होते यायला, वय लहान म्हणून नाही नेलं. मी कधी म्हटलं तुझा पुत्र कुठे कमी आहे धनुर्विद्येत ?’’ रामाने जरा विनोदाने तिला चिडवलं.
‘’ गप्प रे चहाटळा ! तुला माहितीय तूही माझाच पुत्र आहेस ते. उगीच चिडवू नकोस मला. पुढे काय झालं ते सांग.’’
‘’ तर गुरुदेव विश्वामित्रांबरोबर जनस्थानातील कित्येक आश्रमांमध्ये त्या काळात भ्रमण केलं मी. सोबत लक्ष्मण.गुरुदेवांची अखंड ओघवती वाणी. शस्त्रअस्त्रधनुर्विद्या, युद्धनीती, राजनीती, क्षत्रियधर्म ,राजधर्म याचबरोबर विविध वनस्पती, त्यांचे गुणधर्म , जलाशयांचे शोध, तिथे येणाऱ्या पशूंची वैशिष्ट्ये –एक ना अनेक विषयांवर अखंड ज्ञानसत्र चाललेले वाणीने. पायांखाली रानातल्या गच्च हिरवाईत लाल भांगासारख्या पाऊलवाटा. अरण्यातले पानाफुलांचे शीतल सुगंध ल्यायलेल्या दिवसरात्री माध्यान्ही सांजवेळा.अचानक समोर येणारे भयानक राक्षस-राक्षसिणी .. त्यांच्या नि:पाताचा थरार . आमचं खरं जीवनशिक्षण सुरू होतं आचार्यांबरोबर. प्रत्येक दिवस नवलाईचा , साहसाचा होता.’’
‘’आणि सर्वात सुंदर साहस या यशस्वी यात्रेच्या शेवटी होतं. विदेह राजकन्येचं स्वयंवर ! सगळं माहिती आहे रे रामा ! पण यात उदास होण्यासारखं काय आहे !’’
‘’ नाही माते ! सगळं माझ्याशिवाय कुणालाच माहिती नाही. आणि तूच पहिली आणि शेवटची व्यक्ती असशील ते समजून घेणारी. दुसऱ्या कुणातही ती क्षमता नाही.’’
रामचंद्राच्या विशाल डोळ्यात अश्रूंचं निळसर धुकं तरंगल्यासारखं वाटलं कैकेयीला आणि ती चपापली.मर्यादापुरुषोत्तम असं इतक्या लहान वयात अभिधान दिलं आहे त्याला त्याच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या , अपार विश्वास ठेवणाऱ्या अयोध्येच्या प्रजाजनांनी. सहजासहजी भावना ओसंडत नाहीत त्याच्या.तिने त्याचं मस्तक थोपटलं मायेने, चिंतेने.

‘’ माते, या आश्रमांचे जीवनक्रम जवळून पाहिले या प्रवासात. शांत रम्य वनराईत उभारलेली सुंदर पर्णकुटी-संकुले.उगवतीबरोबरच सुरू होणारे पवित्र मंत्रघोष. लगबग करणाऱ्या ऋषिपत्नी, नित्यकर्माला लागलेला निरागस बटूसमूह. आणि सगळ्यांपेक्षा , धीरगंभीर तपाचरणात, संशोधनात , यज्ञकर्मात निमग्न ऋषीमुनी. वल्कले ल्यायलेले, तेज:पुंज तरीही करुणामय.मानवजातीवरच नव्हे तर वस्तुमात्रावर आणि चराचरावर त्यांच्या शुद्ध प्रेमाची गंगा अवतरताना प्रत्यक्ष अनुभवली . मी आश्रमात सिंहीणीच्या कुशीत झोपलेली हरीणशावकं पाहिली माते, जी या ऋषींच्या तपाच्या प्रभावात , शुद्ध प्रेमाच्या चांदण्यात नैसर्गिक वैरभाव विसरली होती. पशूही बदलले होते त्या दिव्य करुणेच्या धारेत माते मग मी अंतर्बाह्य बदलून गेलो यात काय आश्चर्य ? युवराज श्रीराम संपला तिथे.आत्मज्ञानाची तळमळ लागलेला विरागी नवाच राम जन्मला तिथे.’’

कैकेयी अंतर्बाह्य हादरली. कसलाशा अघटिताची चाहूल क्षितिजाच्या पलिकडे स्पंदन पावते आहे की आपल्याच हृदयाची धडधड फुटून बाहेर ऐकू येते आहे तिला कळेना .
‘’मग श्रीरामा ! कसं शक्य आहे हे ? नियोजित राजा तू अयोध्येचा. राज्याभिषेक एका सप्ताहावर आलेला. विसर ते सर्व आता.कर्तव्याबद्दल मी तुला काय सांगणार पुत्रा ? क्षत्रिय राजपुत्र तू. आश्रमधर्माची, वनवासाची ही ओढ एक स्वप्न समजून विसरून जा, राजसिंहासनावर विराजमान हो,अखंड विजयी हो बाळा.’’
‘’ विजय ? ते रक्तलांच्छित विजय मी डाव्या हातानेही मिळवेन, त्यात माझं जीवन घालवू मी ? खरा विजय स्वत:वर मिळवायचा असतो, त्यासाठी एकांतसाधना करायची असते ती माझी परमउत्कट इच्छा माझ्या श्वासांमध्ये निनादते आहे माते, हा राम आज अत्यंत दु:खी आहे. एखाद्या कैद्यापेक्षा त्याची अवस्था वेगळी नाही. सीतेसारख्या सुंदर कोमल पत्नीचा सहवासही या दु:खाचा विसर पडू देत नाही.’’

‘’तू गुरुदेव विश्वामित्रांशी बोलला होतास यावर ?’’ कैकेयीने विचारले.
‘’ मी केवळ तुझ्याशीच बोललो माते , तेही आत्ताच. पण होय, गुरुदेव विश्वामित्रांनी माझी अस्वस्थता जाणली होती जणू अंतर्ज्ञानाने. ‘’ रामाला कसलीशी गूढ आठवण आली .
‘’मग ? काय म्हणाले ते ?’’कैकेयीने औत्सुक्याने विचारलं .
‘’ तसं काहीच बोलले नाहीत , पण एका रात्री मला एकट्यालाच समोर बसवून म्हणाले- रामा , एकच लक्षात ठेव नेहमीच .घटना घडताना दिसतात, पण त्यामागच्या अंत:स्थ हेतूंचे प्रवाह कुणाला कालत्रयी दिसत नाहीत. या हाताने मी हा कमंडलू उचलून इथून तिथे ठेवला हे दिसेल तुला, का ठेवला हे कधी कळेल का ?’’

‘’ हे कसलं विचित्र विधान ? काय अर्थ आहे याचा ?’’ कैकेयी त्रस्त झाली.
राम हसला. ‘’ मलाही नाही कळलं माते , पण काहीतरी गूढ सत्य असावं त्यात असा त्यांचं मुखमंडळ उजळलं होतं हे वाक्य बोलताना. जाऊ दे. विसर माझं बोलणं. थोड्याच वेळात उजाडेल. जा तू आता माते. मला तर शोधत येतीलच तात. रोज नवे कर्मकांड चालले आहे उत्साहाने राज्याभिषेकासाठी.’’
पण कैकेयी स्तब्ध झाली होती. मान खाली घालून एकाग्र.जणू मंत्रमुग्ध. स्वत:शीच पुन: उच्चारत होती ते शब्द.

‘’ घटना घडताना दिसतात, पण त्यामागच्या अंत:स्थ हेतूंचे प्रवाह कुणाला कालत्रयी दिसत नाहीत.’’
मग तिच्या मुखावर एक वेगळाच अभिनिवेश प्रकटला .ती ताडकन उठून येरझारा घालू लागली .
राम अचंबित होऊन पहातच राहिला तिच्याकडे.

‘’ रामा , तुझी कोणतीच इच्छा, एकही शब्द मी खाली पडू दिला नाही.तुला आज राजप्रासाद बंदिशाळा वाटतो आहे आणि आश्रमीय जीवनाची, वनवासाची ओढ वाटते आहे.पुत्रा, तुझ्या इच्छेला कर्तव्यांनी बांधलेल्या जीवनात काय स्थान आहे ! हजारो प्रजाजनांची , तुझ्या तातांची जी इच्छा तीच तुझी इच्छा. पण नाही. तुझी माता कैकेयी तुला असं बळी जाऊ देणार नाही. तुझ्या आत्मशोधाच्या तळमळीचा मला अभिमान वाटतो आहे प्रियपुत्र ! तू वनवासाला जायची तयारी कर ! “

‘’ हे कसं शक्य आहे माते , तुलाही ठाऊक आहे ते.’’ रामाचे नेत्र विस्फारले होते. आपली जगावेगळी मनस्वी धाकटी माता आपल्यासाठी काहीही करण्याची क्षमता बाळगून आहे हे त्याला माहिती होतं.

‘’ घटना घडताना दिसतात, पण त्यामागच्या अंत:स्थ हेतूंचे प्रवाह कुणाला कालत्रयी दिसत नाहीत.- विश्वामित्रांच्या या वाक्याला खोल अर्थ आहे बाळा, आणि तो केवळ मलाच कळावा असा विधीसंकेत आहे. राम वनवासाला जाताना अयोध्येला दिसेल , तो हट्टी कैकेयीच्या हट्टापायी गेला असं चित्र उभं केलं तर तुझ्यावर दोष येणार नाही पुत्रा, तुझी विनासायास या तुरुंगातून सुटका होईल. ’’ कैकेयीचे शब्द जणू दूरच्या अंतराळातून येत होते. राम तिच्या पायाशीच कोसळलाच ते ऐकून !
‘’माते , मला महापातकात घालते आहेस. माझा ही इच्छा पुरवू नकोस ! जन्मजन्मांतरीचा कलंक तुला लागेल ! लोकक्षोभ भयंकर असतो माते.आधीच तुझ्या मनस्वी वागण्यामुळे तुझा तिटकारा करणारे अनेक आहेत . का सुचला तुला असा अघोरी विचार ?’’
कैकेयी मंद हसली. कधी नाही इतकी शांत दिसली तिची मुद्रा रामाला.

‘’ श्रीरामा, राजप्रासादाला बंदिवास म्हणालास तू आत्ताच, तेव्हाच माझ्या हृदयात सत्याचा प्रकाश पडला. पुत्रा, तुझी जगावेगळी माताही बंदिवासातच आहे. आता पुरेसा मोठा झाला आहेस, आज तुला हे सांगू शकते, तुझ्या पित्यानेही माझ्या केवळ बाह्य सौंदर्यावर प्रेम केलं आहे , युद्धातल्या कौशल्यावर प्रेम केलं आहे. इतर स्त्रियांसारखी मी कधीच नव्हते या असल्या प्रेमाला सर्वस्व मानायला.कैकेयीची बुद्धीमत्ता, तिच्या भावनांचं वैभव अगदी एकाकी होतं पुत्रा, मी बंदिवासात होते याच राजप्रासादात आणि तुझा जन्म झाला. तुझं अलौकिकत्व माझ्या अंगाखांद्यावर वाढलं कधी, पुत्र होतास तो सुहृद कधी झालास कळलंच नाही. रामा, तू माझ्या मनाचा विश्राम झालास.अस्वस्थ कैकेयी स्वस्थ झाली ती केवळ तुझ्यामुळे.. माझं तुझ्यावरचं हे प्रेम भरताच्याही मनात उतरलं आहे. तो पोर जीव लावतो तुला. दु:ख एकच आहे, तोही दुरावेल मला या प्रकारामुळे , पण रामा,मला तुझ्या उपकाराची परतफेड करू दे.हा आरोप माझ्यावर घेऊ दे. अट एकच आहे पुत्रा, हा वनवास चौदा वर्षांचाच असेल. नंतर परतून ये, मी अयोध्येवर याहून अधिक अन्याय करू शकणार नाही.. विचार कर पुत्रा,तुझा निर्णय उद्या मला इथेच सांग . आपल्या दोघातच राहील हे, माझ्या माहेरच्या विश्वासू दासी मंथरेची मदत घेईन मी या कामात ’’

कैकेयी हुंदके देत झपाट्याने सौधावरून निघून गेली. ..

राम अवाक होऊन शरयूपैल पाहत राहिला.पहाटेचे पहिले किरण पूर्वेला उजळत होते.अयोध्येला जाग येत होती..

-जिगिषा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर, प्रवाहाबाहेरील आणि अतिशय अप्रतिम लेखन!!
ह्यातून सावरायला अजून वेळ लागेल जरा...खरंच थक्क करणारं लेखन.

>> "...घटना घडताना दिसतात, पण त्यामागच्या अंत:स्थ हेतूंचे प्रवाह कुणाला कालत्रयी दिसत नाहीत..."
व्वाह!!

जिगिषा,
काळाच्या प्रवाहात मूल्ये बदलत जातात, म्हणून कथानकेही बदलतात. जेव्हा रामायण काव्य रचले असेल त्या वेळी.. एकपत्नी राहणे हाच मोठा आदर्श होता. मग सावत्र आई ही अशीच असणार.. अशीही धारणा असणार.

रामायणातले जाचक संदर्भ पुढे कटाक्षाने टाळण्यात आले. ( उदा. सीतेला परत आणल्यावर रामाने तिला सांगणे तूला हवं तर तू परत जाऊ शकतेस ( गीत रामायणात या प्रसंगावर गीतही आहे ), सीतेने केलेला शतमुखी रावणाचा वध ( ललितापंचमीची कथा ) रामाने केलेला लक्ष्मणाचा वध आणि आत्महत्या )

श्रीलंकेत रावणाच्या बाजूचे कथानक लोकप्रिय आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेचा अपमान केला, तिचे नाक कापले, त्याचा बदला रावणाने घेतला. त्याने सीतेचे हरण केले असले तरी तिच्यावर बळजबरी केली नाही. तो दशग्रंथी ब्राम्हण होता. हे आवर्जून सांगतात.

एका लेखकाने ( नाव आठवत नाही आता ) तर सीता ही रावणाची कन्या होती, असे मानत रामायण लिहिलेले आहे.

एरवी पंचकन्येत गणली जाणारी तरी अनुल्लेखित राहणारी मंदोदरी, एका संगीत नाटकाचा विषय होती.
त्यात तिने रामाला आव्हान करून युद्ध थांबवल्याचे दाखवले होते.

रामराज्यवियोग नाटकात, मंथरेच्या अंगातला कलि ( मंथरेची भुमिका किर्ती शिलेदार करत असे ) कैकेयीच्या
अंगात शिरल्याने ती तशी वागली असे दाखवलेय.

मी वर उल्लेख केलेल्या नभोनाट्यात निलम प्रभू यांनी प्रमुख भुमिका केली होती.

अप्रतिम लिहिलंय. खूप आवडलं.

आजी एक गोष्ट सांगायची. "तुझं लग्न दशरथाशी होईल. त्याच्या मुलांपैकी कुणीही सिंहासनावर राजा म्हणून बसू शकणार नाही. तसं झालं तर रघूवंशाचा नाश अटळ आहे." असं लग्नापूर्वी कैकयीला कुठल्यातरी ऋषी-मुनीनं सांगितलं असतं. त्यानंतर कुठेतरी 'चौदा वर्षं' थांबण्याचा मुद्दा यायचा. आता संदर्भ आठवत नाही. 'रामाच्या माघारी भरत कधीच राज्याभिषेक करवून घेणार नाही' अशी कैकयीला खात्री असते. म्हणून ती हा सगळा प्लॅन करते. त्याकरता दोषही घेते. पण एरवी कैकयीचं पात्र खलनायकी शेडमधे रंगवून काढलेल्या गोष्टी ऐकून आम्हाला तिची ही गोष्ट लहानपणी अगदीच येडपट वाटायची.

धन्यवाद सर्वांचे हे लेखन आपलेसे करण्यासाठी , आणि दिनेश,मृण्मयी, या छोट्याछोट्या पण महत्वाच्या माहितीसाठी.
सत्य काय , कल्पित काय हे ठरवताना अभ्यासकही चक्रावून जातात , अगदी समकालीन घटनेच्या संदर्भातही.या तर महाकाव्यातल्या व्यक्तिरेखा आहेत.
एक उपेक्षित शक्यता दडलेली असते घटनेत , वेगळ्याच वाटेवर आकलनाचा प्रवास घडवणारी.

कैकयी नेहेमी १ खलनायिका वाटत आली आहे. म्हणूनच हे आल्हाद्पणे आदळले…

नाहीतरी चांगले करण्यासाठी वाईट पणा घेणारे खूप कमी लोक असतात…कोण जाने हे असे हि झाले असेल.

@स्वा ती
मुळात सीतेचा त्याग हा भागच मुळ रामायणात नाही असं इ राव तीबाई म्हणतात.

अप्रतिम भाषाशैली ! सुंदर लिहिलेय अन कल्पनाही सुंदर .

बाकी वाद इतिहासावर घालावेत पण पुराणावर घालण्यात काय हशील या मताचा मी असल्याने हे असे खरेच असावे की असू शकते की नसावेच यावर नो कॉमेंटस Happy

धन्यवाद जिगीषा !

एक वेगळा विचार अत्यंत जुन्या ऐतीहासीक कादंबर्‍यांच्या लेखन शैलीवर पाउल ठेऊन लिहलात.

महाराष्ट्रात डॉ. प.वि वर्तक हे असेच ( मायबोलीवर वादग्रस्त ) लेखक आहेत ज्यांनी हाच विचार एक आंतरराष्ट्रीय कारस्थान म्हणुन मांडलाय ज्याची नायीका कैकयी आहे. त्यांच्या शब्दात .....

रावणाला मारणे हा तो कट होता. त्याला मारायला एखादा राजा फौज फाटा घेऊन निघाला असता तर ते रावणाला समजले असते. सबब राजकारणाचा भाग म्हणुन वनवासाला निघालेला राजपुत्र हे लक्षात न येण्यासारखे होते.

जनमानसात आपली प्रतिमा वाईट झाली तरी चालेल पण हा कट यशस्वी करायचा हा कैकयीचा निर्धार होता. या कटात दशरथाला सुध्दा सामील केलेले नव्हते.

कैकयी ही राजकारण चतुर होती असाही उल्लेख यात आहे.

इच्छुकांनी " वास्तव रामायण " हा ग्रंथ वेगळा विचार म्हणौन वाचावयास हरकत नाही. रामायण आणि महाभारतावरील ( महाभारताचा खरा नायक भीम ) डॉ. वर्तक यांचे सर्वच विचार सर्वांना पटतीलच असे नाही.पण त्यांचे नाव आलेरे आले की इथे गहजब होतो आणि नामवंत मायबोलीकर अशी मते मांडतात की नविन वाचक त्या रस्त्याला जायला धजत नाही.

रामाने केलेला लक्ष्मणाचा वध आणि आत्महत्या Sad दिनेशदा मला ह्या कथेबद्दल काहीच माहिती नाही. प्लीज थोडी माहिती द्याल का?

खुप सुंदर कथा!

प्रियवंदा (?) नावाची एक कादंबरी वाचली होती. त्यात दशरथाने लग्नासाठी मागणी घातल्यानंतर कैकयीने त्याच्याकडुन माझा पुत्रच अयोध्येच्या सिंहासनावर बसेल असे वचन घेतले होते.
कालौघातात / रामाच्या प्रेमापोटी कैकयीही ते विसरून जाते. पण मंथरा तिला रघुवंशी राजाकडुन वचनभंग होइल हे निदर्शनास आणून देते व रामाला वनवासाला जायला भाग पाडते अस कथानक आहे त्याची आठवण झाली.

रमन्ते योगिन: यस्मिन् राम:।

अर्थात ज्यात योगि रममान होतात ते राम.

आता या रामाला भेटायच तर त्याचा मार्ग केवळ संंपुर्ण सदगुरुच सान्गु शकतात.

रामायण=राम + आयन(मार्ग)

अर्थात ज्या मार्गाने गेलो की रामाची भेट होते तो मार्ग रामायण.

दहा इन्द्रीयान्चा हा देह (दशरथ) पांच ज्ञानेंद्रिये ( डोळे , कान , नाक , जीभ व त्वचा ) आणि पांच कर्मेंद्रिये ( हात , पाय , वाणी , गुद व उपस्थ ) मिळून दहा इंद्रिये .

आत चाललेल सत असत युद्ध म्हजे मंथन म्हन्जे मंथरा.

कायेला सोडुन राहण्याचि विदेहि व्रुत्ति म्ह्न्जे कैकयी.

राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

राम हा कालचा सूत दशरथाचा, अनंत युगांचा आत्माराम!
राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

त्या रामासी हा राम ठावे जरी असता, शरण का जाता वसिष्ठासी!
राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

तुका म्हणे राम तुझा तुजपाशी, पुसुनी घेशी गुरुमुखे!
राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

जिगिषा, नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर शैलीत लिहिलंयस.

एक वेगळा विचार म्हणून भावलं.

मात्र,

घटना घडताना दिसतात, पण त्यामागच्या अंत:स्थ हेतूंचे प्रवाह कुणाला कालत्रयी दिसत नाहीत.- विश्वामित्रांच्या या वाक्याला खोल अर्थ आहे बाळा, आणि तो केवळ मलाच कळावा असा विधीसंकेत आहे. >>> हे असं कैकेयीला का वाटलं किंवा तो संकेत तिच्यापर्यंत का पोहोचवला गेला याचं तार्किक कारण लेखातून मिळत नाही.

आवडलं लेखन जिगिषा , 'रामायणातील राशोमान' हा तुमचा शब्दप्रयोग पटला.हे ललित लेखन म्हणूनच मी वाचलं,एक सुंदर सखोल शक्यता त्यात आहे इतकेच.
महाकाव्याचे, इतिहासाचे , कोणत्याही मानवी व्यवहाराचे अर्थ विविध पद्धतीने लावले जाऊ शकतात.जेत्यांकडून इतिहास लिहिला जातो.लिहिणारी/ऱ्या व्यक्ती आणि काळ -दोन्ही कळत नकळत विपर्यासाची कारणे असतात. मग निरनिराळ्या थिअरीज येत रहातातच..

खरे खोटे राम जाणे असं म्हणतोच ना आपण !

नितीनचंद्र , अजून एक नवा विचार! नक्कीच वर्तकांचं लेखन वाचायला आवडेल.
असेही, कैकेयीमुळेच रामायण घडले ,तेव्हा अत्यंत चांगल्या किंवा अत्यंत वाईट अशा दोन टोकांना तिची व्यक्तिरेखा जाऊ शकते. तिच्या आणि रामाच्या एकमेकांवरील प्रेमाचा आणि मग तिच्यात अचानक झालेल्या परिवर्तनाचा अर्थ वेगळा असू शकतो इतकंच.बाकी देवेन यांनी लिहिल्याप्रमाणे एक अगदीच वेगळा आध्यात्मिक अर्थ रामायण शिवपुराण गणेशकथा आदिंचा लावणारा एक मतप्रवाह आहेच, ते जग अगदी वेगळे.( जसे अगदी ज्ञानेश्वरांनीही पहिल्याच वंदनात गणेशाचा वेगळाच अर्थ लावला आहे ).
होय भारती, खरं खोटं रामच जाणे !
आभार मामी, एका छोट्या कथेच्या अवकाशात मला हा विचार मांडायचा होता.त्यामुळे काही उणीव राहिली असेल.
रामाशी बोलताबोलता,विश्वामित्रांच्या वाक्याचा विचार करतानाच कैकेयीला 'सत्याचा प्रकाश ' दिसला आहे. .एखादी वस्तू उचलून इथून तिथे ठेवली तर तिची जागा बदलल्याचे कळते पण बदलण्याचा हेतू कळत नाही असं विश्वामित्र म्हणाले होते. त्यांच्या या वाक्याचा अर्थ तिला तिच्यापुरता अंत:स्फूर्तीने कळला आहे , राम अयोध्येतून वनवासात जाईल , जगाच्या दृष्टीने त्याचं कारण ती असेल हे तिला कळलं आहे.
एरवीही inspiration असंच क्षणात येतं..

भारती.....

यू हॅव टेकन अ परफेक्ट पॉईन्ट. शक्यतेचे गृहितक मांडून मनावर बिंबलेल्या प्रसंगाचे तसेच व्यक्तीला दुसर्‍या आरशात पाहाणे त्यानुआर तिचा लसावी काढण्याचा यत्न करणे हे एक कौशल्य असते, ज्याकरीता घडलेल्या घटनेचा सखोल अभ्यास करणे ही प्राथमिक नव्हे तर महत्त्वाची बाजू. त्यानंतर त्याच घटनेवर आपल्या कल्पनेची मेंदी कोरणे हे कलाकाराचे काम. जिगिषा यानी ते करून दाखविले आहेच शिवाय शब्दावर त्यांची असलेल्य हुकूमत वाखाणण्यासारखी आहे.

खरे खोटे राम जाणत असेलच. तरीही मूळ कथानकाला ढाळ न लावता वाचकाला "असे झाले असेल का?" म्हणायला लावणे ही लेखिकेची कमालच होय.

खरे खोटे राम जाणत असेलच. तरीही मूळ कथानकाला ढाळ न लावता वाचकाला "असे झाले असेल का?" म्हणायला लावणे ही लेखिकेची कमालच होय.>>> अगदी अगदी अशोकमामा

जिगिषा, नक्की नक्की प वि वर्तकांचं लिखाण वाचा. मी सगळी पुस्तकं अगदी मिळवून मिळवून वाचली आहेत. अतिशयच मनोरंजक आहे. ते सूक्ष्मदेहाने नासाच्या कित्येक दशके आधी मंगळावर सुद्धा जाऊन आलेत. तेव्हा थोर व्यक्तींमधेच त्यांची गणना करायला हरकत नाही. शास्त्रज्ञ, इतिहाससंशोधक यडपट लोक असतात. सगळ्या गोष्टींचे पुरावे, तार्किक संगती, इ. मागत बसतात आणि केवळ आत्मिक बळाने कळलेल्या गोष्टींवर विश्वास न ठेवता खुस्पटे काढतात. केवळ आणि केवळ अशा संकुचित दृष्टीकोनामुळेच असं मूलग्राही संशोधन करणारं लिखाण मुद्दाम दुर्लक्षित रहातं. नाहीतर आपला देश कुठच्याकुठे गेला असता आजपर्यंत Wink

(प्रतिसाद काहीसा अस्थानी आहे हे मंजूर आहे, पण रहावलं नाही. आणि मी हा 'गहजबयुक्त' प्रतिसाद दिल्याने 'नामवंत' मायबोलीकर होईन अशी आशा उराशी बाळगून आहे Proud )

वरदा Happy

फार सुंदर भाषा आणि विचार. या द्रुष्टीनी विचार करायला लावणारी. अस घडलच असेल अस नाही पण अस घडल असु शकत हा विचारही अंगावर काटा आणणारा आहे.
सुंदर, सुंदर.
प वि वर्तकांच्या लिखाणाचा उल्लेख आला आहे त्यावरुन... स्वतःच वाचुन ठरवा Happy प्रत्येकाचे अनुभव स्वतंत्र असतात, दुसर्याच्या ओंजळीने आपण पाणी नाही पिउ शकत :-). तुम्ही पुण्यात असाल तर स्वतः त्यान्ना भेटुही शकता. मी भेटलो आहे आणि त्यांची योग्यता सामन्य माणसांपेक्षा वरची आहे हे तुम्ही अनुभवु शकाल.

मी एक पुस्ताक वाचले होते. ़क्यकयी खरी कोण होति? असे त्याचे नाव.

पण हा काही मुदा पट्ला नाही. या पेक्षा त्या पुस्तकातला मुद्दा पटला होता.

काय सुंदर आहे हे लिखाण! मी कुठेतरी असेही वाचले होते की, दशरथाला पुत्रविरहाने म्रुत्यु हा जो शाप होता, त्यात पुत्रविरह दोन प्रकरच असु शकत होत , एक तर पुत्र काही कारणाने पित्यापासुन दुर जाणे किंवा पुत्र म्रुत्यु पावणे. म्ग ही दुसरी शक्यता व्हायला न्को म्हणुन विश्वामित्रांनी कैकेयीला रामास वनवासात धाडायला सांगितले!
जशी रामायणाची कथा आहे त्यातही कधी मला कैकेयी, रावण दुष्ट वाटली नाहीतच!

छान लिहिलंय. एक वेगळा विचार वाचायला आवडला. पटणं हा वेगळा भाग झाला.

कुलु +१.
तेच वाटत होतं की ही पण एक थेअरी कोणी कशी नाही लिहिली.

आम्हाला ११वीकिन्वा १२वीच्या संस्कृताच्या पुस्तकात हा धडा होता. श्रावणबाळाच्या आई-बाबांच्या शापामुळे दशरथाला मरण येईल असा पुत्रवियोग होइल तो पुत्राच्या मृत्युने न होता पुत्र दूर गेल्याने व्हावा असा कैकयीचा विचार त्यात मांडला होता. असंही की तिला १४ दिवस की महिनेच फक्त रामाला वनवासात पाठवायचं होतं पन तिचंही रामावर निरातिशय प्रेम अस्ल्याने दु:खाच्या आवेगात तिच्या तोंडून वर्ष निघून गेलं.

लक्ष्मण आणि राम दोघांच्याही अन्ताबद्दल काहिच माहिती नव्हती. काही वर्षांपुर्वीच वाचनात आलं. पण पुस्तकाचं नाव आता आठवत नाहिये.

Pages