शतायुषी भवः ! ……आयुष्य म्हणजे (रक्तवाहिन्यांतील) अडथळ्यांची शर्यतच जणू !

Submitted by SureshShinde on 14 April, 2014 - 17:38

image_17.jpg

"रोज खावे एक सफरचंद, ते करील डॉक्टरांना प्रवेश बंद !''

काळाच्या ओघात घासून गुळगुळीत झालेल्या या इंग्रजी सुभाषिताचा प्रत्यय मानवजातीला अगदी अनादि काळापासून आला असावा. आदीमानव 'ऍडम' व आदिमाता 'ईव्ह' यांना प्रजोत्पादनाचे ज्ञान मिळाले ते एका सफरचंदाच्या सेवनाने आणि न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला तोही एका सफरचंदामुळेच! अर्थात् अनेकांच्या डोक्यावर सफरचंदे पडली असतील पण असा दशसहस्त्रेषु न्यूटन एखादाच! बरेचसे शोध योगायोगाने लागले असे म्हणतात. आधुनिक वैद्यकामध्ये रक्तातील गुठळी विरघळविण्याची क्रिया अनेक आजारांमध्ये वापरली जाते. हृदयाच्या कोरोनरी रक्तवाहिनीमध्ये अशी गुठळी तयार झाल्यामुळे हृदयविकाराचा तर मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये झाल्यास मेंदूविकार अथवा अर्धांगवायूचा झटका, स्ट्रोक, येतो. अशा गुठळ्या तात्काळ विरघळविल्यास रक्तपुरवठा सुरळीत होतो व हृदयाचे अथवा मेंदूचे होणारे नुकसान पूर्णपणे टळते. अशा जादुई औषधाचा शोध कसा लागला याचा पण एक मनोरंजक किस्सा आहे.

हॉलंड मधील शास्त्रज्ञ ल्युएनहॉक यांनी सन १६७४ मध्ये प्रथम सूक्ष्मदर्शकाचा शोध लावून प्रथम मानवी डोळ्यांनी बॅक्टेरिया पाहिले. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया जंतूंचा अभ्यास करुन त्यांचे अनेक प्रकार, जाती-प्रजाती शोधून काढल्या. या जंतूंजवळ मानवी शरीरात प्रवेश करुन आजार पसरविण्यासाठी अनेक जैविक, रासायनिक पदार्थ तयार करण्याची क्षमता असते. अशी अनेक रसायने आतापर्यंत शोधली गेली आहेत. मानवाच्या उपयोगासाठी बॅक्टेरियांचा उपयोग करण्यासाठी बायोटेक्नोलोजी ही नवीन शाश्त्रशाखा निर्माण झाली आहे. १९३३ साली टिलेट्ट नावाच्या एका सूक्ष्मजीव शास्त्रज्ञाला सकाळी दाढी करताना त्याच्या हनुवटीवर एक फोड अथवा 'बॉईल' आल्याचे दिसले. त्या ज्वारीच्या दाण्यासारख्या दिसणाऱ्या फोडात भरला होता पिवळा धमक 'पू' अथवा एक घट्ट अपारदर्शक द्रव. त्याच्या त्या पूवात असतात आपल्या शरीरातील संसर्गामुळे मृत झालेल्या पांढऱ्या सैनिक पेशी व रक्तातील गोठलेली प्रथिने. सूक्ष्मजैवीकज्ञानामुळे हा संसर्ग "स्ट्रेप्टोकोकाय'' नावाच्या जंतूंमुळे झाल्याचे त्याला माहित होते. त्या दिवशी त्याने त्या फोडाला शाबूत ठेवूनच दाढी उरकली. दुसऱ्या दिवशी आरशात पाहताना त्याला दिसले की त्या फोडातील घट्ट 'पू' नाहीसा होऊन त्याची जागा घेतली होती स्वच्छ पाण्यासारख्या द्रवाने. म्हणजेच त्या घट्ट 'पू' चे पचन झाले होते. त्यात असलेल्या मृत पांढऱ्या पेशी व गोठलेली प्रथिने नाहीशी होऊन स्वच्छ द्रव तयार झाला होता. त्याच्या डोक्यात न्यूटनप्रमाणेच एक नवीन विचार आला. त्याने या बदलाचे कारण शोधण्याचे ठरविले. येथेच सुरु झाले वैद्यकीय इतिहासातील एक नवे पर्व !
त्याने शोधले की हे जंतू एक असे रसायन तयार करतात की जे सर्व मृतपेशी, रक्तपेशी व इतर तंतूमय प्रथिने विरघळविते. त्याने त्या रसायनाचे नाव ठेवले "स्ट्रेप्टोकायनेज''. त्याने हा शोध प्रसिद्ध केला पण त्या शोधाला पुढे किती महत्त्व येणार आहे याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. पूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ज्या भागास रक्तपुरवठा बंद झाला तो स्नायूचा भाग मृतवत होत असे. त्याला संजिवनी देण्यासाठी तेव्हा काहीही औषध नव्हते. अशा रुग्णांना इतर गुंतागुंत अथवा कॉम्प्लिकेशन होऊ नये एवढीच काळजी घेण्याचे काम तेव्हा डॉक्टर करीत असत. खूप माणसे मृत्युमुखी पडत. एका तरल बुद्धीच्या डॉक्टरला ही कल्पना सुचली की, अशी गुठळी विरघळविण्यासाठी "स्ट्रेप्टोकायनेज'' या औषधाचा उपयोग करुन तर पाहू या. जनावरांमध्ये यशस्वी प्रयोग केल्यानंतर त्याने हे औषध प्रथम एका हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णामध्ये वापरले आणि काय आश्चर्य! त्या रुग्णाची छाती दुखण्याचे थांबले. ब्लडप्रेशर सुधारले व इसीजीमधील बदल झपाट्याने पूर्ववत झाला आणि नवीन इतिहास तयार झाला !
संपूर्ण जगामध्ये ही 'रक्तगुठळी विघटन' प्रक्रिया झंझावाताप्रमाणे पसरली. अशी गुठळी विरघळवू शकणारी नवनवीन रसायने तयार झाली, एक नवे शास्त्रच निर्माण झाले. अनेक प्राण वाचले. अनेक हृदये रोगमुक्त झाली. या औषधांनी हृदयविकारातील ही किमया पाहून मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टरांनी मेंदूच्या झटक्यामध्ये हे औषध वापरण्याची कल्पना पडताळून पाहिली व त्यातही अत्यंत चांगला उपयोग झाला. हे औषध असा झटका आल्यानंतर लवकरात लवकर म्हणजे मेंदूविकारात चार तासाच्या आत तर हृदयविकारात सहा तासांच्या आत द्यावे लागते. दहा वर्षांपूर्वी पुण्यामध्ये प्रथमच अशाच एका मेंदू विकार रुग्णास आम्ही हे औषध दिले तो प्रसंग मी कधीही विसरु शकणार नाही.

शनिवारी सकाळी साडेदहाची वेळ. मी माझ्या सकाळच्या राऊंडसाठी पूना हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारापाशी असतानाच मोबाईल वाजला. माझे परिचित श्री.देडगे नाना यांचा मुलगा बोलत होता. नाना देडगे ससून हॉस्पिटलमधील मध्यवर्ती प्रयोगशाळेत मुख्य अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. ससूनमध्ये शिकत असताना दहा वर्षे त्यांच्याशी व्यावसायिक संबंध आल्यामुळे माझा घनिष्ट परिचय होता.
"नानांना बहुतेक पॅरालिसीसचा झटका आलेला दिसतो आहे. आता काही वेळापूर्वी नाना अंघोळीला गेले. बराच वेळ झाला तरी बाहेर येईनात म्हणून शटर ओढून पाहिले तर ते आत बेशुद्ध पडल्याचे दिसले. दरवाजा फोडून त्यांना बाहेर काढले आहे. श्वास चालू असला तरी ते बेशुद्ध आहेत.'' नानांचा मुलगा बोलत होता.
"त्यांना ताबडतोब पूना हॉस्पिटलमध्ये घेऊन या, मी पुढे काय करायचे ते पाहतो.''
पंधरा मिनिटातच नानांना घेऊन रुग्णवाहीका पुना हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यांना मी 'तात्काळ सेवा विभागा'मध्ये तपासले. नानांची उजवी बाजू संपूर्ण लुळी पडलेली होती. ते अर्धवट बेशुद्धावस्थेत होते. काहीही बोलत नव्हते, आपण बोललेले त्यांना समजत नव्हते. अंगावरचे कपडे घामाने चिंब झाले होते. चिमटा घेतल्यावर डावी बाजू थोडीशी हलत होती. ईसीजी व्यवस्थित होता. रक्तदाब १४०/९० म्हणजेच नॉर्मल होता व रक्तातील साखरेचे प्रमाणही एकशे वीस मिलिग्रॅम होते, म्हणजेच प्रमाणापेक्षा कमी अथवा जास्त नव्हते.
"नानांच्या डाव्या मेंदूच्या रक्तपुरवठ्यामध्ये जोरदार अडथळा निर्माण झाला आहे किंवा आत मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला असण्याचीही शक्यता आहे. तातडीने मेंदूची 'सीटी स्कॅन' नावाची तपासणी केल्यास नेमके काय झाले आहे ते समजेल.'' मी नातेवाईकांना सांगत होतो.
देडगे कुटुंबियांनी खर्चास तयारी दर्शवून नानांना सीटी स्कॅन विभागात हलवले. पुढील दहा मिनिटात सीटी स्कॅनमधील संगणकाच्या पडद्यावर नानांचा मेंदू पूर्णपणे नॉर्मल असल्याचे दिसून आले. सीटी स्कॅनचा अर्थ स्पष्ट होता. नानांच्या मेंदूचा रक्तपुरवठा खंडीत झालेला होता पण अजून मेंदू जीवंत होता. मेंदूपेशींचे काम थांबले होते पण त्या अजूनही मृत झाल्या नव्हत्या. आताच त्यांना आवश्यकता होती चांगल्या 'संजीवनी बुटी'ची अर्थात तो रक्तातीलअडथळा ज्या गुठळीमुळे झाला ती गुठळी विरघळविण्याची! नातेवाईकांना पूर्ण कल्पना देऊन मी त्यांना 'एम आर आय स्कॅन' नावाचा दुसरा स्कॅन की ज्यामध्ये मानेमधील व मेंदूमधील सर्व रक्तवाहिन्या दिसतील असा स्कॅन करावा असे सुचविले. पुढील अर्ध्या तासात 'एम आर अँजियोग्राफी' झाली. त्यात मात्र नानांचे निदान स्पष्ट दिसत होते.

image_15.jpg

नानांच्या मानेतील चारही मुख्य रक्तवाहिन्या उत्तम काम करीत होत्या. मात्र डाव्या मेंदूगोलार्धामध्ये ज्या तीन रक्तवाहिन्या असतात त्यातील मध्य रक्तवाहिनी मुळाशीच बंद झाली होती व त्यामुळे डाव्या मेंदूच्या जवळजवळ दोन तृतियांश भागास होणारा रक्तपुरवठा थांबला होता. या भागामध्ये असते वाचा व भाषा केंद्र, उजव्या हात व पायाचे नियंत्रण, चलनवलन शक्ती, संवेदना केंद्र. वाचा व भाषा केंद्र फक्त डाव्या मेंदूमध्ये असते व ते शिक्षणामुळे तयार होते. बोलणे, लिहिणे, वाचणे या क्रिया आपण समाजात राहून शिकतो. 'टारझन'सारख्या वनमानवास असे केंद्र तयार झालेले नसते. नानांचे नेमके हे केंद्रच धोक्यात होते. हा रक्तामधील अडथला वेळीच दूर न झाल्यास मेंदूचा तो भाग मृत होणार होता आणि परिणामतः नानांची उजवी बाजू कायमची पूर्ण निकामी होणार होती, त्यांची वाचा पूर्ण जाणार होती, आपण बोललेले त्यांना समजणार नव्हते. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये मृत झालेला मेंदू सूज येवून कवटीमधील प्रेशर वाढून नाना दगावण्याचीही दाट शक्यता होती. त्यांना मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये झालेली ही गुठळी जर विरघळविली तर फारच फायदा होणार होता. मी एका बाजूस नातेवाईकांशी तर दुसऱ्या बाजूस माझे मित्र मेंदूरोगतज्ज्ञ डॉ.सुधीर कोठारी यांच्याशी चर्चा करीत होतो. डॉ.कोठारीदेखील खूपच उत्तेजीत झाले होते. त्या दिवसापर्यंत पुण्यामध्ये अशा प्रकारच्या स्ट्रोकच्या पेशंटमध्ये रक्ताची गुठळी विरघळविणारे औषध कोणीही वापरलेले नव्हते कारण हे औषध स्ट्रोक सुरु झाल्यापासून तीन तासांच्या आत द्यावयाचे असते.आपले नाना ह्या तीन सोनेरी तासांच्या मुदतीच्या म्हणजे 'विंडो पिरीयड'च्या खूप आधीच हॉस्पिटलात दाखल झाले होते व त्यामुळे त्यांना या औषधाचा खूप चांगला उपयोग होण्याची दाट शक्यता होती. आम्ही ठरविले की, या रुग्णामध्ये 'स्ट्रेप्टोकायनेज्' ऐवजी नवीन व जास्त उपयोगी असे 'टीपीए' नावाचे औषध वापरावे. जगामध्ये सर्वत्र हेच औषध वापरले जाते. पण आपल्याकडे त्याचा जास्त वापर होत नव्हता याचे कारण त्याची महागडी किंमत व शिवाय डॉक्टरांना ते औषध वापरण्याच्या अनुभवाचा अभाव !

नानांचे एक बंधू भारतीय नौदलामध्ये अधिकारी असून त्यांचे वाचनही भरपूर असावे. त्यांना 'टीपीए' बद्दल माहिती होती. नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांना आमच्या मनातील विचार सांगताना या औषधाची किंमत सुमारे पन्नास हजार रुपये असून त्याने फायदा होण्याची शक्यता खूप आहे, पण एखादे वेळी या औषधामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन रुग्णाची तब्येत खालावण्याची अथवा रुग्ण दगाविण्याच्या शक्यतेची कल्पनाही त्यांना दिली. सर्व गोष्टी कागदावर लिहून, नानांच्या मुलाची सही घेऊन त्यांची मान्यता अर्थात 'कन्सेंट' घेतली.
मेंदू-अतिदक्षता विभागामध्ये नानांच्या या नवीन उपचाराची तयारी सुरु झाली. हा उपचार कसा करावा याच्या वैद्यकिय सूचना अथवा प्रोटोकोल तयार होत्याच. त्यांची अंमलबजावणी घड्याळानुसार चालू झाली. डॉक्टरांचा एक गट, परिचारिका व इतर सेवकांच्या मदतीने काम करु लागला. 'टीपीए' शंभर मिलिग्रॅमपैकी दहा टक्के इंजेक्शन शिरेतून ताबडतोब व उरलेले पुढील एक तासभर सिरिंज पंपाने द्यावयाचे होते.
"सर, टीपीए बोलस आणि सिरींज पंप रेडी आहे", सिस्टर म्हणाल्या.
"सिस्टर, प्लीज पुश १० mg टीपीए बोलस फास्ट ! " मी म्हणालो.

आम्ही सारे अनिमिष नेत्रांनी नानांकडे पाहत होतो. घड्याळाचा सेकंद काटा मिनिटकाट्याच्या वेगाने चालल्यासारखे वाटत होते. पहिले दहा मिलिग्रॅम 'टीपीए' नानांच्या रक्तात मिसळले आणि काय आश्चर्य ! तीनच मिनिटांनंतर नानांनी अचानक एक शब्द उच्चारला - "आई !''
नानांच्या भोवती उभे राहून आम्ही सर्वजण मॉनिटरवर त्यांचा ईसीजी, ब्लडप्रेशर, प्राणवायूचे प्रमाण इ. बघत होतो. नानांचा आवाज ऐकून आम्ही क्षणभर दचकलोच पण लगेचच सावरलो व त्या शब्दाचा 'अर्थ' समजून आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. नानांच्या मेंदूतील रक्ताची गाठ विरघळण्याची क्रिया सुरु झाली होती व मेंदूचे रक्ताभिसरण पूर्ववत होणे सुरु झाल्याचीच ती सूचना होती. लहानपणी बोलणे शिकताना नानांच्या शब्दसंग्रहातील पहिला शब्द 'आई' हाच असावा !
हळूहळू नाना शुद्धीवर येऊ लागले. उजवा हात व पाय हलवू लागले. एक तासामध्ये सिरिंज पंपाने शिटी वाजवून 'टीपीए'चे इंजेक्शन संपल्याची सूचना केली. एव्हाना नाना पूर्ण शुद्धीवर आलेले होते. बोलणे अजूनही थोडे तोतरे, असंबद्ध येत होते, पण 'टीपीए'ने खरोखरच जादू केली होती.

image_16.jpg

संध्याकाळी पुन्हा केलेल्या 'एमआरआय स्कॅन'मध्ये त्यांची रक्तवाहिनी पूर्ववत सुरु झाल्याचे दिसत होते. मेंदूतील फक्त वाटाण्याएवढ्या आकाराचा भाग मृतवत झाला होता. ऐनवेळेवर 'टिपीए' दिले नसते तर मेंदूचा जो भाग मृत झाला असता, त्या मानाने हा मृत भाग केवळ एक शतांशही नव्हता आणि मेंदूच्या कार्यात तर काहीही दोष राहिलेला नव्हता.
धन्य धन्य ते टिपीए !

संध्याकाळी मी आणि सौ माधुरी नानांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा नाना आरामात बसून जेवण करीत होते. गेल्याबरोबर त्यांनी मला ओळखले व माझा हात आपल्या दोन्ही हातात धरुन नमस्कार केला आणि माझ्या मनात शब्द उमटले-
'शतायुषी भवः!'
त्यांची स्मृती जवळजवळ पूर्णपणे परत आली होती.
सकाळच्या दहा ते बारा वाजेपर्यंतची, त्या तीन कृष्णसोनेरी तासांची, मात्र त्यांना अजिबात स्मृती राहिली नव्हती. या तीन तासांतील घडामोडींची माहिती आमच्याकडून ऐकून ते ही थक्क झाले.
आज या प्रसंगाला, दहा वर्षे होऊन गेली आहेत. नानांची तब्येत अगदी ठणठणीत आहे. पुन्हा असा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी जीवनशैलीमध्ये बदल केला आहे, ऍस्पिरीन व कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठी 'स्टॅटीन' नावाचे औषध नियमितपणे घेत असतात. त्यांना 'शतायुषी भवः' असे म्हणताना 'शंभरी गाठणे ही एक अडथळ्यांची शर्यत' कशी असते व नानांनी त्यातील एक अडथळा 'टीपीए'च्या साह्याने कसा ओलांडला, या घटनेतील थरार माझ्या मनाला आजही सुखावतो!

---------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nemipramanech mastttt ani Khupp mahitipurna lekh ...dr kaka tumhi kharach khuppp Chhan lihita ....pratyek navin lekhachi mi vaat baghat asate ani Purna vachalyashivay rahavat nahi ...

Farach masttt. !

वाटच बघत होते तुमच्या गोष्टिची....
लहान मुलांन गोष्ट सांगुन त्यातुन एखादा बोध द्यावा,तसे तुमचे लेख आहेत आमच्यासाठि.आगदि बोधकथा पण खर्याखुर्या....आणी पुन्हा लहान झाल्या सारखे वाटते.लहान होउन गोष्ट वाचायचि आणि त्यातला सार आयुष्यभरासाठि लक्शात ठेवायचा...

काका मि तुम्हाला विपु केले आहे.नक्कि पहा Happy

अतिशय छान लेख!

'टारझन'सारख्या वनमानवास असे केंद्र तयार झालेले नसते.?
म्हणजे हे केंद्र विकसित होत नाही की तयारच होत नाही? हे नाही कळले. हे असं काही आहे की hardware आहे पण software नाही?

ग्रेट Happy

कधी प्रत्यक्ष भेटू शकलो तर एका जुन्या केसची चर्चा करायचीये!
(जस्ट अ‍ॅकॅडेमिकल इन्टरेस्ट म्हणून आणि बर्‍याच संभावित जरतर चे समाधान व्हावे म्हणूनही)

मस्त माहिती.
मेंदुच्या कुठल्या भागाच नेमकं कार्य कुठलं ह्याचा शोध कसा लागला ह्यावर जरा स्वतंत्र लेखामध्ये विस्तृत लिहु शकाल का ?

खुप सुंदर लेख.

एरवी अशी तांत्रिक माहिती असणारा लेख वाचायला आळस केला असता पण तूमच्या लेखातला ह्यूमन टच या लेखांना खुप वाचनीय बनवतो.

दिनेशना अनुमोदन. खरतर मेडिकल फिल्डमधले शब्द फार जड जड असतात. तुम्ही सगळं सोप्पं करून लिहिता त्यामुळे इंटरेस्टिंग वाटतं वाचायला. Happy

दिनेशना अनुमोदन. खरतर मेडिकल फिल्डमधले शब्द फार जड जड असतात. तुम्ही सगळं सोप्पं करून लिहिता त्यामुळे इंटरेस्टिंग वाटतं वाचायला. >>>+१

मस्तं लेख!
नेहमीचा अनुभव असला तरी मस्तं मांडलाय.
आमच्या गावात मी पॅरालिसीस स्पेशल डॉक्टरीण म्हणून प्रसिद्ध आहे. Wink
मग लोक लांबून लांबून दोन तीन महिने पॅरालिसीस झालेल्यालाही घेऊन येऊन बरे करूण दाखवा म्हणतात.
त्यांना समजावताना वाट लागते.
काविळ, टायफॉईड यासारखाच पॅरालिसीस हाही संदिग्ध रोग आहे.
लोकांना पटकन अ‍ॅलोपथिक उपचार घ्यावेसे वाटत नाहीत.
आयुर्वेदिक/ गावठी उपचार, पथ्यपाणी यावरच लोकांचा भर असतो.
यात हा गोल्डन पिरीयड वेस्ट होतो.
त्याहून गंमत म्हणजे लोक अगदी लग्गेचही येतात आणि मग एकदा पॅरालिसीस आहे हे कळले की पुढच्याच क्षणी पेशंट उचलून देवरुषाकडे पळतात.
आम्ही त्याला मजेने 'गोईंग टू हायर सेंटर' असे म्हणतो. Happy

तसेच आमच्या भागात पॅरालिसीस च्या रुग्णाने कोणतेही आय वी फ्लूईड लावून घेऊ नये असं देवरूषांचं आणी त्यामुळेच पेशंटांचं मत आहे. त्यामुळे मॅनिटॉल कनेक्ट करताच (सी टी साठी पैसे वैगेरेची अ‍ॅरेंजमेंट होईपर्यंत) पेशंटच्या नातेवाईकांत असंतोष पसरतो.
मी अजूनही टीपीए स्ट्रोकसाठी वापरले नाहीये. पेशंट तितके पैसेवाले क्वचित येतात. एम आय साठी मात्र अ‍ॅलोपथिकच उपाय करावे असा सर्वसामान्य समज असल्याने टी पी ए चे मॅजिकल रिझल्टस पाहिलेत खूप.
पण मग एस टी के लावून पेशंटाच्या समोर खुर्चीवर ठाण मांडून बसते अर्धा तास. Happy

बाकी नुसते एल एम डब्ल्यू हिपॅरिन वापरून आणि सहा ते आठ तासानंतरही पेशंट रिवर्ट झालेत.
आणी समंजस पेशंटाना थोड्या स्टॅबिलायजेशननंतर दुसर्या दिवशी एक दोन तास 'हायर सेंटरला' जाऊन एक्सपर्ट ओपिनीयन घेऊन यायची सवलत मी देते.
Wink

लवकर लक्षात आले पाहिजे. आमचे एक परिचित योग्य वेळेवर उपचार झाल्याने अगदी व्यवस्थित बरे झालेत. उच्चार थोडे अस्पष्ट झालेत, पण ते आमच्याच लक्षात येतात. ( कारण पुर्वीचे बोलणे ऐकलेय. ) नव्या माणसाच्या ते लक्षात येत नाहीत.

साती ने सांगितलेय त्याप्रमाणे बरेच "बाहेरचे" उपाय केले जातात. घोरपडीचे रक्त हा पण उपाय आहे वाटतं. बिचार्‍या घोरपडी आता नामशेष झाल्या असतील त्यामूळे.

>>>>>> तसेच आमच्या भागात पॅरालिसीस च्या रुग्णाने कोणतेही आय वी फ्लूईड लावून घेऊ नये असं देवरूषांचं आणी त्यामुळेच पेशंटांचं मत आहे. <<<<<<
असले देवरुषी(?) ही हिन्दु धर्माला लागलेली क्यान्सरसारखी कीड आहे! अन खेडोपाडी यान्चीच चलती असते.

अहो नाही लिंबूजी, देवरूषी हा मी एक जनरलाईज्ड धर्मनिरपेक्ष शब्दं म्हणून वापरला. Wink
तिथे मुल्ला मौलवी पीर इ. पण चालले असते.
आमच्या इथे एकंदर सगळ्याच समाजात आहेत असे.
आमच्या इथला स्पेषल सापाचे वीष वाला तर मुस्लिम आहे.
चाळीस दिवस उपास करून एच आय वी घालवणारा ख्रिश्चन आहे.
माताजीचे रूप घेऊन अगदी गाय्नॅक डॉक्टरची इनफर्टिलिटी घालवणारा ख्रिश्चन आहे.
उदी देऊन डायबेटिस बरे करणारा लिंगायत आहे.
त्यामुळॅआपण सरसकट भारतीय समाज म्हणू.

साती, अग ते माहिते ग! पण इतर धर्माबद्दल बोलणे "सर्वधर्मसमभावीय वा निधर्मी" भारतात निषिद्ध मानले जाते ना? म्हणून बाकी धर्मांचा उल्लेख केला नाही.
अन हिन्दु धर्माचा उल्लेख करण्याचे कारण असे की गावोगन्नीच्या "हिन्दु धर्मिय देवरुषी/भगत/भक्ते वगैरे मण्डळींच्या कूकर्मासाठी घाऊकरित्या जबाबदार मात्र धरले जाते ते साडेतिनटक्क्यान्ना, असे साडेतिन टक्के, जे खेड्यापाड्यात १९४८ नन्तर फारसे उरलेही नाहीत.
अन असल्या देवऋष्यान्च्या विरोधात उभे रहाण्यास मी "अन्निस" वाल्यान्च्या मागे १०१ टक्के उभारलो अस्तो, पण अन्निसवाल्यान्चा खाक्याच वेगळा तो असा की "इन्द्रायः स्वाहा, तक्षकायः स्वाहा: " म्हणजे देवऋषी पण सम्पुदेत, अन हिन्दु धर्म यच्चयावत प्रथा/मार्गासहित देवासहित सम्पुदे! कारण देवच अमान्य! असो.

तो विषय वेगळा आहे. व पुन्हा कुणी म्हणायला नको की लिम्ब्या जिथे तिथे ब्राह्मणत्व अन हिन्दुत्व धोक्यात अशी बोम्ब मारतो, ओढुनताणून संबंध जोडतो......!:ही पोस्ट आपली फक्त तुझ्याकरता बरका साती, बाकिच्यान्नी इग्नोर मारा!

इब्लिस टेक्निकल प्रतिसाद सरांसाठी आहे.
ते रिस्क बेनिफिट रेशोवर अवलंबून आहे.
म्हणजे हार्ट अ‍ॅटॅकचा पेशंट एवीतेवी मरण्याची शक्यता जास्त आहे तर किमान एस टी के देवू , जास्तीत जास्तं काय होईल रिपर्फ्यूजन अरिदमिआज हे हार्ट अ‍ॅटॅकमुळेही येतातच. दुसरं काय तर मेंदूत ब्लीड झाल्याने हेमिप्लेजिया.
'अर्धं त्यजति पंडितः' असा काय्सा श्लोक आहे ना त्यानुसार अख्खा जीव जायच्या ऐवजी पॅरालिसीस होऊन अर्धी बाजू लकवाग्रस्त होण्याची रिस्क कुणीही घेईल.
याऊलट जर इन्फार्क्ट मुळे पॅरालिसीस किंवा माईल्ड विकनेस आहे आणि एस टी के ने अरिदमिया/ हायपोटेंशन होऊन जीव गेला किंवा ब्लीड होऊन पेशंट डेन्स हेमिप्लेजिको/ कोमात गेला तर ते अ‍ॅक्सेप्टेबल नसते.

नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर लेख..मस्तं आणि वैद्यकीय पण सोप्या भाषेत सांगता-देता नेहमीच परिपूर्ण माहिती...

मी मागे म्हंटले होते.. ह्या सगळ्या लेखांचा व बाकी पण तुमच्या लेखनाचा एखादा संग्रह तयार करावा.. आम्हाला आमच्या पुस्तकांमधे ते पुस्तक संग्रही ठेवायला खुप आवडेल.. Happy

डॉ .... मस्त अनुभव ...आपल्या प्रभावी लेखन शैली ने अजुनच मस्त वाटते ....

आपल्याला असेच यश मिळत राहो ही मनापसुन केलेली प्रार्थना ...

Pages