गुलझार

Submitted by अशोक. on 13 April, 2014 - 15:19

"...खिड़की पिछवाड़े को खुलती तो नज़र आता था
वो अमलताश का इक पेड़, ज़रा दूर, अकेला-सा खड़ा था
शाखें पंखों की तरह खोले हुए
एक परिन्दे की तरह...."

gulzar.jpg

झेलम जिल्ह्यातील दीना नामक एका छोट्याशा गावात (जे आता पाकिस्तानात गेले आहे) १८ ऑगस्ट १९३४ रोजी माखन सिंग कालरा आणि सुजानकौर या दांपत्याच्या घरी जन्माला आलेला संपूर्णसिंग कालरा याला लहानपणापासूनच साहित्याची जवळीक निर्माण करावीशी वाटली होती. हिंदी, ऊर्दू, पंजाबी या तिन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व त्याचबरोबर ब्रज भाषा, हरियाणवी अशा प्रांतिक बोलीशी जवळीक या सार्‍यांचा प्रभाव गुलझार यांच्या लेखनशैलीवर होताच. मात्र वडिलांच्या दृष्टीने लेखन करणे याला फारशी किंमत नव्हती. वडिलांचा रोष नको म्हणून संपूर्णसिंगने आपले सारे लिखाण "गुलझार" या टोपणनावाने लिहिणे सुरू केले आणि त्यालाच अशी काही प्रसिद्धी मिळाली की अजूनही कित्येक चाहत्यांना गुलझार यांचे सत्य नाव माहीत नसेल. बिमल राय आणि कवी शैलेन्द्र यांच्याकडे गुलझार यांच्या प्रकाशित कविता पोचल्या होत्या. त्या दोघांनी या युवकाला "बंदिनी" तील एक गाणे लिहिण्याची विनंती केली. चित्रपटातील बाकीची सारी गाणी शैलेन्द्र यांची पण पडद्यावर नूतनच्या तोंडी असलेले व लता मंगेशकर यानी म्हटलेले "मोरा गोरा अंग ले रे" हे गाणे आजही तितकेच श्रवणीय आहे जितके चित्रपट प्रसिद्धीच्या वेळी.

गुलझार....हे आता कुणा एका व्यक्तीचे टोपणनाव नसून ज्या ज्यावेळी आपण मनोरंजन क्षेत्रापलीकडेही जाऊन एखाद्या कलाकाराच्या जीवन मिळकतीचा अभ्यास करू लागतो त्यावेळी समजून येते की केवळ सफलताच नव्हे तर त्या शिखरावर जाण्यासाठी प्रत्येक लेखकाची कलाकाराची मनोकामना असते पण गुलझार यानी आपल्या गीतांनी आणि अन्य लेखन कार्याने जे यश मिळविले त्यामुळे त्याना तिथपर्यंत रसिकांनीच नेले आहे. भारत सरकारकडून चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी तनमन अर्पण करून अहोरात्र सेवा दिली आहे अशा ज्येष्ठांना "लाईफटाईम अचिव्हमेन्ट" ची पोच म्हणून "दादासाहेब फाळके पुरस्कारा"ने गौरविले जाते. यंदाचा (२०१३) हा पुरस्कार गुलझार याना जाहीर झाला आहे आणि विशेष म्हणजे निवड समितीच्या सातही सदस्यांनी या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले आहे.

ज्या बिमल राय यांच्यासारख्या महान दिग्दर्शकापासून गुलझार यानी चित्रपट कारकिर्द सुरू केली त्यांच्याच हाताखाली त्यानी चित्रपट दिग्दर्शनाचे धडेही गिरविले. कोमल, अर्थपूर्ण गीतरचना हे त्यांचे वैशिष्ट्य तर राहुलदेव बर्मनसोबत त्यानी गाण्यासाठी केलेले गद्यप्रयोग ("इजाजत") एक चमत्कार मानले जातात. चित्रपटांसाठी गीताबरोबरीने त्याने कथा पटकथा संवादही लिहिले (आशीर्वाद, आनंद, खामोशी). याचा अनुभव त्याना झाला जेव्हा ते स्वतःच दिग्दर्शन क्षेत्रात उतरले. संवेदनशील, मार्मिक आणि हृदयस्पर्शी चित्रपटांची त्यानी मालिका तयार केल्याची उदाहरणे आहेत. १९७१ मध्ये त्यानी मीनाकुमारीला मुख्य भूमिका देऊन "मेरे अपने" हा सुशिक्षित बेरोजगारीवरील स्थितीवर पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. तो गाजल्यावर त्यांचे नाव चित्रपट निर्मितीच्या सर्वच घटकांशी जोडले गेले. "साऊंड ऑफ म्युझिक" कथेवर आधारित त्यानी "परिचय" निर्माण केला तर लागलीच मुके आणि बहिरे जोडपे यांच्या जीवनकथेवर "कोशिश" हा चित्रपट. १९७३ मध्ये विनोद खन्नाच्या भूमिकेने सजलेला "अचानक" आला तर नंतर सर्वार्थाने गाजलेला सुचित्रा सेन अभिनेता "आंधी" व त्यानंतर संजीवकुमार शर्मिला टागोर जोडीचा "मौसम". व्यक्तीशः मला मौसम बर्‍याच कारणांनी आवडलेला चित्रपट. पैकी संजीवकुमार आणि मदन मोहन यांचे संगीत ही दोन प्रमुख कारणे. या चित्रपटांशिवाय "किनारा...अंगूर....माचिस...लिबास...हुतूतू...इजाजत....मीरा" असे अनेक चित्रपट गुलझार यांच्या दिग्दर्शन संवादांनी समोर आले...गाजले. संजीवकुमार, विनोद खन्ना, जीतेन्द्र, शर्मिला टागोर, हेमा मालिनी अशा त्या त्या साली प्रथम क्रमांकावर असलेल्या कलाकारांनी गुलझार यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास नेहमीच उत्सुकता दाखविली आणि गुलझार यानी सार्‍यांच्याकडून अगदी उत्कृष्ट अभिनयाचे मेजवानी रसिकांना दिली आहे.

गाण्यांच्याबाबतीत तर गुलझार यांच्या चित्रपटांची केवळ यादी जरी दिली तर तो एक स्वतंत्र लेख तयार होईल. त्याबाबत इतकेच लिहिणे योग्य ठरेल की फिल्मफेअरचे उत्कृष्ट गीतलेखनाची तब्बल अकरा पारितोषिके त्यानी मिळविली आहेत...हे एक रेकॉर्डच बनून गेले आहे. देशभरातून त्यांच्यावर अनेक प्रकारच्या पारितोषिकांचा वर्षाव झाला आहे असे म्हटले तरी चालेल....आणि आज दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार.

(हा लेख म्हणजे गुलझार यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा वा साहित्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न नसून दादासाहेब फाळके पुरस्काराने त्याना गौरविण्यात आल्यामुळे प्रासंगिक म्हणून त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिले आहे. साहजिकच त्यांच्या सार्‍याच चित्रपटांविषयी तसेच त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी इथे काही उल्लेख केलेले नाहीत.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर हा लेख खूपच छान... पण तुमच्याकडून गुलझार यांच्या संपूर्ण कारकिर्दिचा आढावा घेणारा लेख वाचायला मिळाला तर सोन्याहून पिवळे.

काय अशोकमामा तुम्ही बरेचदा असे गंडवता, थोडक्यातच निपटवता. जेवढा लेख आवडला तेवढेच हे नाही आवडले. गुलझार फार मोठा विषय आहे, कबूल, पण येऊद्या ना थोडे आणखी. मला तर खरेच त्यांचे ओरिजिनल नाव माहीत नव्हते, ना त्यांचे काही वेगळे ओरिजिनल नाव आहे वा असेल असा विचारही मनात आला नव्हता. बाकी त्यांच्याबद्दल लिहायला मी खूप तोकडा आहे, त्यांची चित्रपटांची यादी आणि त्यातून हाताळलेले विषयच त्यांच्या व्यक्तीमत्वाला उलगडण्यास पुरेसे बोलके आहेत.

छान Happy

प्रसंगाला साजेसे थोडके मनोगत आवडले. आपल्या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या वास्तव्याला असणा-या काही मोजक्या व्यक्तिमत्वांपैकी असलेलं हे नाव. समृद्ध केलंय त्यांनी. फक्त ज्युरीच नव्हे, तर आज पुरस्काराचा सन्मान झाल्याचीच भावना जगभरातल्या त्यांच्या निस्सीम चाहत्यांमधून एकमुखाने व्यक्त होते आहे, हे दुर्मिळातले दुर्मिळ चित्र आहे...
त्यांना उदंड निरामय आयुष्य लाभो आणि आम्हाला त्यांच्याकडचा आनंद असाच कायम परावर्तित होत राहो हे शुभचिंतन Happy

समयोचित लेख..
गुलजार साहेबांचे खरे नाव दुसरे असु शकेल असे कह्रेच वाटले नव्हते.. धन्स मामा..

"गुलझार" हे पेन नेमच इतके प्रसिद्ध झाले आणि रसिकांच्या मुखी असे काही बसले की ह्या कवीचे अन्य काही दुसरे नाव असू शकेल असे कुणाला वाटत नव्हते.

गुलझारचा अर्थ = बहार (त्यांच्या काव्यांनी हिंदीत बहार आणली हे खरेच....)

"साहिर लुधियानवी" हे आणखीन् एक लोकप्रिय नाव आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील....यांचे खरे नाव होते अब्दुल हायी. पण कवी म्हणून अब्दुल ऐवजी त्यानी "साहिर" आणि ज्या गावचे ते होते त्या "लुधियाना" चे म्हणून साहिर लुधियानवी असे नवे नाव अस्तित्त्वात आले, लोकप्रियही झाले.....

साहिरचा अर्थ = मित्र.

एकेक चित्रपटाबद्दल स्वतंत्र लेख लिहायला हवा. एकेक गाण्यावर देखील..

इतकी विलक्षण कल्पना एखाद्या गाण्यात असते ना, कि हे असं असू शकतं, सुचू शकतं याचेच नवल वाटत राहते.

तोहे राहू लागे बैरी ( मोरा गोरा अंग लैले ) ही कल्पना तर इतर कुठल्याही गाण्यात मी कधी बघितली नाही.
हमने देखी है / वो श्याम कुछ अजीब थी / सांझ कटोरा ले भिकारन रात / दिन खाली खाली बर्तन / बाजरे के खेत मे कौए उडाएंगे./ बिडी जलाईले... प्रत्येक गाण्यात अशी एखादी कल्पना असते..

आणि संवाद.. अंगूर मधले नुसते संवादच ऐकत रहावेत असे आहेत.

अप्रतिम लिहिलंय अशोकदा! दादासाहेब फाळके पुरस्काराचा यथोचित सन्मान झाला असं वाटलंय खरंच!

मस्त धावता आढावा अशोक, गुलझार यांची कारकीर्दच इतकी बहुआयामी आहे की त्यांच्यावर लिहावं तेवढं कमीच . मूलत:एका कवीने आपल्या कवी-प्रवृत्तीशी तडजोड तर सोडाच, आपल्या टर्म्सवर प्रायोगिकता जपूनही यशस्विता मिळवणे हा गुलझार यांचा भाग्ययोग आहे..लोकांची अभिरुची बदलणारे, घडवणारे कवी आहेत ते. दिलदार श्रेष्ठ संगीतकारांनीही त्यांना या अर्थस्वी तीर्थयात्रेत मनापासून साथ दिली आहे.

दिनेशदांच्या पोस्टीला +१००१

गुलजार ह्यांच्या एकेक चित्रपटाबद्दल आणि एकेक गाण्यावर स्वतंत्र लेख लिहायला हवा / लिहु शकतो आपण.
जे न देखे रवी ते देखे कवी ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुलजार साहेब होय.

मग ते गाणे इजाजत मधले मेरा कुछ सामान सारखे गद्य आणि मुक्तछंदातले असो, जेथे जेथे पोते होलो ह्या पंचमदांच्या गाण्यावरुन बेतलेले तेरे बिना जिंदगी से (आंधी) असो किंवा मेरा यार मिला दे सायियां (साथिया) मधले मैने फोटा फोटा फलक छाना, मैने टोटे टोटे तारे चुने....सिर्फ एक तेरी आहट के लिये, कंकर पत्थर बुत सारे सुने..उंड वेने ते रुसवायिया ह्या ओळी असोत, प्रत्येक गाण्यातुन गुलजार साहेबांची भाषेवरची पकड लक्षात येते.

Change is the only constant हे पण गुलजार साहेबांच्या यशाचे गमक आहे. काळानुसार आणि चित्रपटातील गाण्याच्या demand नुसार त्यांनी आपल्या लेखणी चा बाज बदलला, पण साहित्यीक मुल्य ढळु दिलि नाहीत हे ही तितकेच खरे म्हणुनच चांद का टिका मत्थे लगा के, रात भर तारो में जिना भी ना ईझी नही....हे सुद्धा ते लिलया लिहु शकतात.

खरेच, दादासाहेब फाळके पुरस्काराचा यथोचित सन्मान झाला !!

मी थेटच मान्य केले आहे की लेख घाईत लिहिल्यासारखा झाला आहे....त्याला कारणही नेमके हेच की दादासाहेब फाळके सन्मान प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या कार्याविषयी सर्वच प्रेमिकांना किमान काही पातळीपर्यंत माहीत असतेच. सबब कितपत सविस्तर लिहावे हा विचार मनी गुंजी घालत होता. धीरेन्द्रनाथ गांगुली, बी.एन.सरकार, रायचंद बोराल, तपन सिन्हा अशी आणखीन् काही नावे फाळके पुरस्कार मिळालेल्या श्रेष्ठांची....यांच्याबद्दल मात्र सविस्तर लिहिणे जरूरीचे बनते कारण क्वचितच असे प्रेक्षक असतील की या नावामागील इतिहास त्याना पूर्णपणे माहीत असेल. पण व्ही.शांताराम, अशोककुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, दिलीप, राज, देव, नौशाद, सत्यजित रे, यश चोप्रा....ही खरी भरभक्कम नावे....देशातील घराघरात पोचलेली ही नावे. यांच्याबद्दल लेखामागून लेख लिहिले तर त्यातील ९०% मजकूर वाचकाला आधीच माहीत असतो. गुलझार हे नाव अशाच गटातील.

तरीही केवळ फोटो देवून त्यांचे अभिनंदन करणेही योग्य नव्हते म्हणून त्रोटक का होईना लिहिणे महत्त्वाचे होते. वर दिनेश आणि प्रसन्न म्हणतात तसे गुलझार यांच्या प्रत्येक कलाकृतीवर स्वतंत्रपणे लेख लिहिणे म्हणजे त्यांच्या क्षेत्रातील मोठ्या जागेला मान दिल्यासारखे होईल.

अशोक, आजकाल एखादे गाणे पडद्यावरच्या कलाकाराच्या व्यतीरिक्त जर कोणाचे म्हणून ओळखले जात असेल तर ते संगीतकाराचे. अशा काळातही आपली ओळख कायम ठेवणारे म्हणून गुलझार साहेब श्रेष्ठ.

कजरा रे कजरा रे आणि बिडी जलाईले जेव्हा गाजत होती त्यावेळी आधी मला ती आवडली नव्हती. पण जेव्हा कळले कि ती गुलझार साहेबांची आहेत तेव्हाच नीट ऐकली..
दिल तो बच्चा है जी.. किती गोड कल्पना.. तीदेखील इतर कुणाला सुचली नाही.

अशोकराव, सुरेख असा धावता आढावा घेतलात Happy आता सविस्तर लेखाची वाट पाहात आहे.

गुलजारसारख्या दिग्दर्शकाने विनोद खन्नाला वारंवार घ्यावं हे माझ्यासारख्या खन्नाप्रेमी माणसाला नेहेमीच आवडायचं. त्यांनी विनोद खन्नाचे विशिष्ठ कथानकात फुलुन येणारे अभिनयगुण ओळखले असावेत म्हणुन "अचानक" आणि "मेरे अपने" मध्ये खन्ना चपखल बसला होता. बाकी दिग्दर्शक म्हणुन मला त्यांना सलाम करावासा वाटतो ते "मौसम" मधील "दिल ढुंढता है" साठी...

गुलजारचा “मौसम” हा एक अविस्मरणिय चित्रपट. सर्वच दृष्टीने. कलाकारांचे अभिनय, गाणी, संगीत, कथा सारेच जबरदस्त. त्यातल्या कुठल्याही पैलूवर बरेच काही लिहिता येईल. येथे मात्र फक्त “दिल ढुंढता है” वर लिहायचं आहे. आणी तेही लता आणि भुपेंद्र च्या गाण्यावर. बर्‍याच जणांना फक्त भुपेंद्रच्या गाण्याची आवृत्ती आवडली असण्याची शक्यता आहे. मलाही ते गाणे खूप आवडते. द्वंद्व गीतात तर भुपेंद्रला फक्त दोन ओळी वारंवार म्हणण्याशिवाय दुसरं कामचं नाहीय. मात्र या गाण्यात लताने कमाल केलिय. आणि मदनमोहनने देखिल संगीताचा वापर अत्यंत कौशल्याने करुन अशी काही जादु केली आहे कि या गाण्याने कुणीतरी जुन्या स्मृती जागवतो आहे हे जाणवावं. विशेषतः लताची सुरुवातीची लकेर आणि त्यावेळचं संगीत जर डोळे मिटुन ऐकलं तर हे नक्की जाणवेल.

गुलजारने गालिबच्या पहिल्या ओळी घेऊन लिहिलेल्या या गीताची सुरुवात “जी ढुंढता है” अशी होती असा किस्सा आहे. मात्र मदनमोहनने या ओळी “दिल ढुंढता है” अशा बदलल्या आणि गुलजार थक्क होऊन गेला. चक्क गालिबच्या ओळींत बदल? मात्र त्यावेळचे संगीतकार देखिल असे जाणकार होते कि मदनमोहनने त्याच्याकडील गालिबच्या पुस्तकाची आवृत्ती आणली होती आणि त्याने गुलजारला पटवुन दिलं की काही आवृत्त्यांमध्ये “दिल ढुंढ्ता है” असं आहे. शेवटी तो बदल स्विकारला गेला.

गाण्याचे चित्रिकरणही अभिनव पद्धतीने केले आहे. म्हातारा संजीव कुमार पुर्वस्मृती जागवत अशा ठिकाणी फिरतो जेथे तरुणपणी त्याची प्रेयसी शर्मिला टॅगोर त्याच्याबरोबर असते. त्यावेळी त्याला त्याची तरुणपणची प्रतिमा प्रेयसीबरोबर दिसते आणि त्या दोघांच्या तोंडी हे गाणे गुलजारने दिले आहे. हे सारे पाहात असताना हा सीन अक्षरशः डोक्यात भिनतो. हे सारं काही इतक्या अप्रतिमरित्या चित्रीत झालं आहे कि प्रेक्षक संमोहीत होऊन जातो. एकमेकांच्या प्रेमात गुंतुन गेलेले तरुण प्रेमी युगुल आणी त्यांना आठवणारा, समोर पाहाणारा वृद्ध संजीव कुमार, त्यात मदनमोहनची आकर्षक चाल आणि लताने मोहकपणे म्हटलेले गुलजारचे बोल, त्याला समर्पकपणे उचलुन धरणारा भुपेंद्रचा आवाज. आणखि काय हवे?

अनेकदा मला असं वाटतं कि गीतकार गुलजारने दिग्दर्शक गुलजारला पूर्णपणे झाकोळुन टाकलंय कि काय...

अशोक मामा,

धीरेन्द्रनाथ गांगुली, बी.एन.सरकार, रायचंद बोराल, तपन सिन्हा ह्या सारख्या लोकांविषयी खरच फार लोकांना माहिती नाही. तुम्ही खरच यांच्याबद्दल सविस्तर लिहाल का ? एक सुंदर लेखमाला होउ शकेल.
कारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे क्वचितच असे प्रेक्षक असतील की या नावामागील इतिहास त्याना पूर्णपणे माहीत असेल. तुम्ही, दिनेशदा ह्यांच्यासारखे लोकं आम्हाला वरिल मंडळींच्या कामाविषयी खरोखर literate करु शकता.

धन्यवाद प्रसन्न.....

तुमच्याकडून आलेली ही सूचना खूप चांगली आहे. या निमित्ताने माझाही बर्‍यापैकी अभ्यास होवू शकेल याची खात्री आहे. वरील नावाशिवाय अजूनीही आहेत, त्यानी त्या त्या काळात चित्रपट सृष्टीत अथक काम केले होते ("काळ गाजविला" वगैरे अतीव कौतुकाचे शब्द त्यांच्या काळात प्रसिद्ध नव्हतेच. फक्त अनेकविध काम करतात तसे मनोरंजनातून शिक्षण वा शिक्षणातून मनोरंजन असाच जनसामान्य हेतू ह्या मंडळीच्या निर्मिती मागे असे). पण त्यांच्या कामाचा ना कुणी इतिहास ठेवला आहे ना कुणी ती परंपरा जपली आहे.

तरीही जितके साहित्य मिळेल त्याच्या आधारे मी किमान काही व्यक्तींच्यावर जरूर लिहितो.

समयोचित मस्त धावता आढावा! प्रतिसादही छान.भार्तीनी अर्थस्वि शब्द वापरलाय.मि ऐकला नव्हता. भारती तुझी निर्मिती का?

शोभनाताई....

भारतीचे प्रतिसाद वाचणे हा आनंद कित्येक पदरी असू शकतो. नवनवीन शब्दांचा नादच तिने येथील वाचक वर्गाला लावला आहे असे मी म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आज तुमच्या प्रतिसादात तुम्ही भारतीने योजलेला "अर्थस्वी" घेतला आहे, तो वाचताक्षणी वाक्याची रचनाच किती सुंदर बनून गेली आहे याचा पुन्हा आनंद घेतला.

मूळ लेखापेक्षाही प्रतिसादच किती रोचक बनू शकतात हे इथले सदस्य आपल्या विलोभनीय अशा वाक्यरचनांनी वारंवार दाखवून देत असतात. लेख लिहिणार्‍याच्या दृष्टीने हे फार संतोषजनक असते.

अशोकमामा,

मी तुमच्याहुन सगळ्याच बाबतीत लहान आहे ....प्लीज अहो जाहो करु नका हो !!! फक्त प्रसन्न म्हणा Happy

मामा, हा लेख सुटून गेला होता नजरेतून..माझा प्राणच जणू हा विषय.. गुलझार यांनी त्यांच्याच या 'पेन नेम' बद्दल एका कवितेत लिहिले आहे..

नाव आहे की नाही, विचारच केला नव्हता,
'अरे' म्हणून कुणा एकाने बोलावले,
'अहो' म्हणून दुसर्‍याने आवाज दिला,
'अबे ओ' असे मित्र म्हणायचे,
ज्याच्या मनात जे आले
त्याने तशी हाक मारली.

तू एका वळणावर अचानक जेव्हा
मला 'गुलझार' म्हणून हाक दिलीस
एका शिंपल्यातून मोती प्रकटला
मला जणू एक नवा अर्थ मिळाला

अहा! हे नाव किती सुरेख आहे
पुन्हा या नावाने मला बोलाव ना-

(अनुवादित)

अशोक मामा, हा लेख वाचून मौसम पाहिला! काय अप्रतिम सिनेमा आहे. पहिल्या अर्ध्या तासात वाटलं की ही तर cliche गोष्ट आहे! शहर का छोरा- गांव की छोरी! गुलजार टच कुठाय पण मग सिनेमा असा पुढे सरकला की बघतच राहिले! कुठून कुठे गेली गोष्ट..अगदी खरीखुरी घडू शकणारी तरीही कहानी में ट्विस्ट असलेली! अप्रतिम!

जिज्ञासा....

"मौसम...." ~एक यशस्वी उद्योजक, प्रतिष्ठित, संसारी...पण आता जवळपास नकळत एका युवतीची फसवणूक केल्याबाबत त्याला डसणार्‍या इंगळ्या....त्या भूतकाळातील आहेत....अशी प्रौढ व्यक्ती ज्यावेळी कारमधून उतरून त्या डाक बंगल्याच्या आवारात पोहोचते आणि ज्या ढंगाने पावले टाकीत पुढे जाते, त्याचवेळी मी समजलो होतो की धिस इज समथिंग डिफरन्ट, सीरिअस....अ‍ॅन्ड सर्टनली नॉट अ बॉय मीट्स अ गर्ल काईंड ऑर्डिनरी स्टोरी.....शोधार्थ फिरत राहतो आणि एका क्षणाला ज्यावेळी त्याला कळून चुकते की ती प्रतिमा आता या दुनियेत नाही, त्यावेळेचे त्याचे कोलमडून पडणे संजीवकुमारने केवळ डोळ्यातून दाखविले, त्याला थिएटरमध्ये उभे राहून दाद द्यावी असे वाटले. ही त्याची जशी क्षमता तितकीच गुलझार नामक कवी दिग्दर्शकाची, ज्याने या माध्यमावर आपली अशी काही छाप उमटविली की जी आजही तितकीच टवटवीत आहे.

अशा एका सर्वार्थाने अप्रतिम चित्रपटाची आठवण इथे काढल्याबद्दल मीच तुमचे आभार मानतो.

Pages