तमाम उम्र का तनहा सफ़र - उमराव जान

Submitted by रसप on 12 April, 2014 - 03:00

रात्रीच्या मंद थंड हवेत तरळणारा रातराणीचा सुवास ज्याला भुलवत नाही असा माणूस विरळाच. दिवसभराचा थकवा, मरगळ दूर करणारा हा सुगंध. खिडकीत डोकावणारी रातराणीची फांदी आणि त्या फांदीच्या आडून चोरून पाहणारा चंद्र ही तर रोमान्सची परिसीमा असावी. सौंदर्याचा कडेलोट असावा.
पण प्रत्येक दैवी सौंदर्याला काही न काही शापच असतो.
कदाचित ज्याप्रमाणे अनेक घाव सोसून पैलू पाडले गेल्यावर हीरा तयार होतो, आगीतून पोळून निघाल्यावर सोन्याची परीक्षा होते तसंच नशीबाचे भोग भोगणारेच चेहरे सौंदर्याची व्याख्या ठरत असावेत.
रातराणीला शाप आहे, झाडापासून वेगळे झाल्याबरोबर सुगंधास मुकण्याचा, चंद्राला शाप आहे डागांचा आणि फक्त रात्रीच्या अंधारातच दृष्टीस लुभावण्याचा.
अन् 'अमीरन'ला शाप आहे 'उमराव जान' असण्याचा....

कब मिली थी कहाँ बिछड़ी थी हमें याद नहीं
ज़िंदगी तुझको तो बस ख़्वाब में देखा हमने

'अमीरन'ची व्यथा शहरयार साहेबांनी ह्या शेरात, चिमटीत फुलपाखरू पकडावं इतक्या अचूक व नाजूकपणे मांडली आहे.
वडिलांच्या दुश्मनीची किंमत बालवयातील अमीरनला मोजावी लागते, ते स्वत:चं अख्खं आयुष्यच गहाण टाकून. पोरवयात अपहरण करून कोठ्यांवर विकल्या जाणाऱ्या अनेक मुलींपैकी एक फैझाबादची अमीरन लखनौला येते आणि 'उमराव जान' (रेखा) बनते.
जवारीदार आवाज, आरस्पानी सौंदर्य आणि तरलपणे हृदयास भिडणारी शायरी ह्यांमुळे 'उमराव जान अदा' लखनौच्या अनेक नवाबजाद्यांना जिंकते. तिच्या मनाला जिंकणारा नवाब मात्र तिला 'सुलतान' (फ़ारूक़ शेख) मध्येच दिसतो. प्रेम फुलतं. पण कसं ?

तुझको रुसवा न किया खुद भी पशेमाँ न हुये
इश्क़ की रस्म को इस तरह निभाया हमने

जे हवं, ते न मिळण्याची; सर्वात आवडत्या गोष्टींना त्यागण्याची उमरावला तिच्या जिंदगानीने सवयच लावलेली असते. पण आयुष्याशी ही पाठशिवणी किती खेळायची ? हा प्रश्न उमरावला पडणार असतोच. पडतोच.
ती ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा प्रयत्न करते. पण चेहऱ्यावर गोंदवलेलं सत्य आरसा बदलल्याने जात नसतं.

तमाम उम्र का हिसाब मांगती है ज़िन्दगी
यह मेरा दिल कहे तो क्या, यह खुद से शर्मसार है

हे कडवट सत्य उमगलेली उमराव, जेव्हा उध्वस्त झालेल्या आपल्या जुन्या कोठ्यावर परत येते, तेव्हा समोर असलेल्या जुन्या आरश्यात स्वत:चं उध्वस्त झालेलं आयुष्यच पाहते. तीच नव्हे, तिला बघणारे आपणही तेच बघत असतो. इथेच उमराव हरते.
पण सिनेमा जिंकतो.
आणि आपल्याला प्रश्न पडतो की एक अप्रतिम सिनेमा पाहिल्याचा आनंद मनात जपावा की एक अभेद्य शून्य आमरण जगणाऱ्या अनेक 'अमीरनां'चं प्रतीक म्हणून दिसलेल्या 'उमराव जान'च्या व्यथेने व्याकुळ व्हावं ?

Umrao_Jaan_movie_poster.jpg

एक संवेदनशील मन काही वेळ हळहळतं. मग मनाच्या कुठल्याश्या कोपऱ्यात, सरकारी कचेरीत धूळ खात पडणाऱ्या फायलींच्या गठ्ठ्याप्रमाणे जपलेल्या अनेक 'पीड पराईं'च्या ढिगाऱ्यात अजून एक निस्तेज रातराणी पडते.

यह किस मुकाम पर हयात, मुझको लेके आ गई
न बस खुशी पे कहां, न ग़म पे इख्तियार है

ही उदासीनता उमरावला येणं स्वाभाविक पण आपल्याला का यावी ?
खरंच आली आहे का ?
हे प्रश्न पडणे म्हणजेच उदासीनता आलेली नाही असे नाही का ? आपली हताशा आपणच आपल्यापासून लपवण्यासाठी हे उदासीनतेचं नाटक करतो आहे का ?

'मिर्झा हादी रुसवा' ह्यांच्या 'उमराव जान अदा' ह्या कादंबरीवर आधारलेला 'मुझफ्फर अली' ह्यांचा 'उमराव जान' त्या कहाणीसोबत, पात्रांसोबत न्याय करतो. पण प्रेक्षकांसोबत नाही. त्यांना तो फार त्रास देतो. बेचैन करतो. आपल्याच प्रतिबिंबावरून हात फिरवून जेव्हा उमराव ते न बदललेलं प्रतिबिंब स्वीकारते, तेव्हा समाजाने नाकारलेल्या तिने आपलं संपूर्ण मन व्यापलेलं असतं. काही क्षण तर इतकं व्यापलेलं असतं की एक विलक्षण घुसमट जाणवते.

हा त्रास मुझफ्फर अलींसह तीन व्यक्ती देतात.

रेखा - तिच्याशिवाय उमराव कुणी साकारू शकलं असतं का ? अवघडच होतं ! रेखा ही चालती-बोलती शायरी दिसते. तिच्या डोळ्यांतून दु:ख, व्यथेचा सुगंधित पाझर सतत होत असावा असं वाटतं. पण असं असतानाही ती 'पाकिजा'सारखी सदैव रडीयल दिसत नाही. आपण कुणी नवाब-बिवाब नसलो, तरी नकळत तिच्यावर किंचित का होईना भाळतोच.

शहरयार -
इस अंजुमन में आपको आना है बार बार
दीवार-ओ-दर को गौर से पहचान लीजिये
कहिये तो आसमान को ज़मीन पर उतार लाएं
मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिये

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यूँ है
अब तो हर वक़्त यही बात सताती है हमें

ऐ 'अदा' और सुनाये भी तो क्या हाल अपना
उम्र का लम्बा सफ़र तय किया तनहा हमने

अश्या अशआरांतून शहरयार ती-ती भावना ज्या नजाकतीने मांडतात त्याला तोड नाही. 'तमाम उमर का हिसाब मांगती है जिंदगी' किंवा 'जिंदगी तुझको तो बस ख्वाब में देखा हमने' असे त्यांचे शब्द तर काळजात रुततात.

खय्याम - खय्याम साहेबांनी प्रत्येक गाणं म्हणजे एकेक अध्याय केला आहे. सारंगीचा इतका अप्रतिम वापर फार क्वचितच आढळतो. उमरावची व्यथा व शहरयारच्या शब्दांतल्या आर्ततेला साजेसा आवाज आशा बाईंचाच आहे, हे त्यांच्या चाणाक्षतेने अचूक ताडलं आणि प्रत्येक गाणं म्हणजे २४ कॅरेट सोनं बनलं आहे.

'उमराव जान' इतक्यात तरी पुन्हा पाहायची हिंमत माझ्यात नाही. अजून काही दिवसांनी/ महिन्यांनी जेव्हा ती हिंमत परत येईल तेव्हा मी कदाचित अजून काही लिहू शकीन.
तूर्तास इतकेच.

रेटिंग - __/\__
http://www.ranjeetparadkar.com/2014/04/blog-post_12.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझापण आवडता चित्रपट. आशाची गाणी आणि रेखाची अदाकारी ह्यांचा मस्त मिलाफ होता. सर्व गाणी उत्तमच होती पण माझं विशेष आवडीचं-'जुस्तजू जिसकी थी उसको तो ना पाया हमने, इस बहानेसे मगर देखली दुनिया हमने'.

ह्या गाण्याआधीचा सीनपण छान होता.

मस्तच .
रेखा - तिच्याशिवाय उमराव कुणी साकारू शकलं असतं का ? अवघडच होतं !>+१
अगदी लहानपणीच कोठ्यात आल्यामुळे तेच तिचं विश्व आहे. कोणी एक कवी माणूस तिला गुरूसमान वाटतो, आणि तिची शायरी फुलत जाते. प्रेमिक नवाबाची पत्नी म्ह्णजे हिच्या बरोबरच विकली गेलेली दुसरी मुलगी. पण रुपवान असल्यामुळे ही कोठ्यात जाते तर दुसरी राजघराण्यात दासी व शेवटी नवाबाची पत्नी होते. सर्वात शेवटी आईसुद्धा मुलीला ओळखूनही समाजभयामुळे पाठ फिरवते. दैवगती ! घरी आल्यावर आरशात आपले प्रतिबिंब पाहताना त्याच्यावरची धूळ ती हाताने पुसते. जणू समाजात आपल्या स्थानाची तिला लख्ख जाणीव होते. अतिशय टचिंग आहे.
नवाबाकडून खून झाल्यावर त्याला तेथून जायला सांगणारी व ` जो होगा देखा जायेगा' म्हणणारी खमकी कोठेवाली फार लक्षात राहिली आहे. बहुधा शबाना आझमी च्या आईने ते काम केले आहे.

अमीरन नियतीच्या एका खेळीत कोठीवर पोचली. भूमिकेची अदलाबदल पहिल्याच टप्प्यावर झाली असती तर ती तिच्या प्रियकराची पत्नी बनू शकली असती . पण मग उमराव जानच्या दु:खाचं तळपतं सोनं कवितेच्या शब्दांच्या , नृत्य-पदन्यासाच्या मुशीत ओतलं गेलं नसतं , एका भव्य शोकांतिकेची अभिमानिनी नायिका ती झाली नसती, एक चांगली गृहस्वामिनी झाली असती.

काय म्हणावं या नियतीला आणि तिच्या अघोरी खेळांना !

खूप रसपूर्ण रसग्रहण रसप ! अजून लिहा अशाच क्लासिक्सवरती.

मस्त लिहिलय.

हिंदी चित्रपटाने 'चित्रपट संगीत' खूप सुरुवातीपासून आत्मसात केले. दिग्गज कलाकारांनी - गीतकार, संगितकार, गायक - यांनी अगदी अविस्मरणीय ठरतील अशी गाणी केली आहेत. पण ते 'चित्रपट संगीत' आहे याचा प्रत्यय फार कमी वेळा आला. बहुतेक वेळा गाणे सादर करणार्‍या पडद्यावरच्या चेहर्‍याला ते गाणे अजीबात पेलता यायचे नाही. कधी ते गाणे चित्रपटाला ठिगळ लावल्यासारखे दिसायचे - ते चित्रपटाशी कधीच एकरूप व्हायचे नाही. या दोन निकषांतून तावून सुलाखून निघालेच तर ते गाणे चाऊन चोथा झालेल्या प्रेमप्रसंगात किंवा प्रेमभंगाच्या प्रसंगात यायचे - त्यामुळे त्याची value addition बरीच कमी व्हायची. यांच्या पलीकडे जी गाणी आहेत ती अगदी मोजकीच आहेत. आणि एखाद्या चित्रपटातील सगळीच गाणी अशी नितांत सुंदर आंइ चपखल आहेत असे चित्रपट अगदीच विरळा आहेत - उमराव जान त्यातला एक.

पाकिजा आणि उमराव जान दोघीही प्रेक्षकांना घायाळ करतात - त्यांच्या धारधार व्यथेने. पण पाकिजा संपता संपता आपल्या जखमेवर मलम लाऊन जातो, आशादायक शेवटाचे. पण उमराव जान मात्र आपल्याला तसंच तडफडत ठेवतो.

आणि जाताजाता - पाकिजाला रडीयल म्हटल्याबद्दल तीव्र निषेध! Happy

रसप, मस्त लिहिलय. Happy

पाकिजा आणि उमराव जान दोघीही प्रेक्षकांना घायाळ करतात - त्यांच्या धारधार व्यथेने. पण पाकिजा संपता संपता आपल्या जखमेवर मलम लाऊन जातो, आशादायक शेवटाचे. पण उमराव जान मात्र आपल्याला तसंच तडफडत ठेवतो. >>>>>>मस्तच माधव. Happy

आणि जाताजाता - पाकिजाला रडीयल म्हटल्याबद्दल तीव्र निषेध! >>>>माधव, +१ Happy

तूलना अगदीच गैरलागू आहे पण ऐश्वर्याचा पण उमराव जान आला होता. मी बघितला आहे तो. ती छान दिसलीय, उत्तम नाचलीय... पण बाकी गाण्यांपासून अभिनयापर्यंत सगळाच आनंद होता. त्यात शबाना आझमीने कोठेवालीची भुमिका केली होती.

छान लिहीले आहे ..

मी आधी पाहिला आहे की नाही लक्षात नाही पण बघायला हवा परत ..

>> 'पाकिजा'सारखी सदैव रडीयल

Lol

मीना कुमारी चे पिक्चर मी फार पहिले नाहीयेत पण जे काही बघितलंय त्यावरून ती कशी काय आवडते लोकांनां असाच प्रश्न पडतो नेहेमी .. Wink

मीना कुमारी चे पिक्चर मी फार पहिले नाहीयेत पण जे काही बघितलंय त्यावरून ती कशी काय आवडते लोकांनां असाच प्रश्न पडतो नेहेमी>>>>>>>>>>>>>> मला ही Happy

वा, काय सुरेख लिहिलं आहेस, अतिशय आवडलं. काही प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर रेंगाळून गेले... रेखासाठी शब्द नाहीतच.

सरकारी कचेरीत धूळ खात पडणाऱ्या फायलींच्या गठ्ठ्याप्रमाणे जपलेल्या अनेक 'पीड पराईं'च्या ढिगाऱ्यात>>> हे अफलातून आहे, हे खरंच अगदी असंच असतं! वाचल्यावर 'युरेका' झालं मला...

चेहऱ्यावर गोंदवलेलं सत्य आरसा बदलल्याने जात नसतं>>> !!!

'रडीयल' परफेक्ट आहे.

सगळे प्रतिसादही आवडलेत. विषयच तशा आत्मियतेचा आहे. जीयो Happy

सशल, अनिष्का,

>> मीना कुमारी चे पिक्चर मी फार पहिले नाहीयेत पण जे काही बघितलंय त्यावरून ती कशी काय आवडते लोकांनां असाच प्रश्न पडतो नेहेमी <<

मलादेखिल !
पण असो. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. (लिहावा म्हणतो !)

छान रसग्रहण!
चित्रपटातल्या गुलाम मुस्तफा खान यांच्या रागमालेविषयीही वाचायला आवडलं असतं. आमच्या अंघोळीच्या वेळेला कितीतरी पारायंण झाली या रागमालेची!!
दोन ओळी गात राग उमगत गेले.

खय्याम यानी गुलाम मुस्तफा खान यांना मनात धरून रागमाला बनवली. गुलाम मुस्तफा खान यानी शिक्षक आणि शाहिदा खान आणि रुना प्रसाद यानी विद्यार्थीनी अशी ती रागमाला गाईली. रागमाला गाता गाता मुली वयाने वाढत जातात आणि त्याप्रमाणे त्यांचे कथ्थक चे शिक्षणही , असे दाखवले आहे-

सुंदर रागमाला आहे. सुरुवात आलापीने आणि उस्ताद जींच्या 'अल्ला, अल्ला!' या ईश्वर्-चिंतनाने होते -

"प्रथम धर ध्यान दिनेश,
ब्रम्हा, विष्णु, महेश " - राग भैरव

"अब मोरी नैय्या पार करो तुम,
हज़रत निज़ामुद्दीन औलिया " - तोडी

" सगुन विचार आयो बमना,
कब पिया आये मोरे मंदिरव" - राग बहुदा केदार

"बिराज में धूम मचायो कान्हा,
कैसे कर जाऊं अपने धाम " - राग काफी

" दर्शन दो शंकर महादेव,
महादेव तिहारे दरश बिना,
मोहे कल न परत घरी पल छिन दिन" - राग यमन ( यमन्-कल्याण)

" पकरत बैयाँ मोरी बनवारी,
चुरियाँ करक दई सारी अनारी " - राग मालकंस

आणि सरत शेवटी -
“ बांसुरी बाज रही धुन मधुर कन्हैय्या की,
खेलन जावत होरी " - राग भैरवी

रसप ,खूप सुंदर वर्णन केल आहे आपण ...इस अंदाज से आपने बया किया है ये कि हम हैरान है कि अंदाझे बया खुब है आपका या जालीम उमराव कि अदा है ...! ‘उमरावजान कणाकणा ने सौंदर्य टिपलेला सिनेमा आहे ...संगीत , शायरी , रेखा , कथा ,नवाबी थाट ...सगळच अप्रतिम आणि विलक्षण देखण ...रेखाच्या प्रत्येक अदाची ...तिच्या नजरेची ,तिच्या नृत्याची .तिच्या आवाजातील शायरीची बातच काही और ...तुमच लिखाण वाचताना ते अगदी वेळोवेळी जाणवलं ...तुम्ही उमराव ला शब्दात पुन्हा उभ केल ..!

@सुलू,
मला ते अगदीच अनावश्यक वाटलं. मला उमराव जानची व्यथा मांडायची होती. त्या कथनात ही रागमाला अगदीच अप्रस्तुत वाटली असती. लेखाचा गोष्टीवेल्हाळपणा वाढला असता, ते वेगळंच.