पार्किन्सन्ससाठी नृत्योपचार

Submitted by शोभनाताई on 7 April, 2014 - 03:30

पार्किन्सन्स (पीडी) होण्याची कारणे? : माहित नाहीत

पीडी पूर्ण बरा होण्यासाठी उपचार? : अजून तरी नाहीत.पण संशोधन चालू आहे. आशेचा किरण आहे.आणि पूर्ण बरा होत नसला तरी लक्षणावर नियंत्रण आणून चांगले जीवन जगता येते.

अशी प्रश्नोत्तरे पीडीवरील कोणतेही साहित्य वाचले की हमखास आढळतात.आणि हे वास्तव स्विकारताना लक्षणावर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात.त्यांच्या अत्यंत मर्यादित आणि व्यक्तीनिहाय उपयोजितेचा विचार करुनही पीडीनी त्रस्त पेशंटना ते आशेचे किरण वाटतात.

तसे पाहता १९६०मधे लिओडोपा उपचारात आले तोपर्यंत कोणतेही औषध नव्हतेच ना?संशोधकाच्या अथक प्रयत्नातून हे साध्य झाले.पाश्चात्य देशात करोडो डॉलर संशोधनावर खर्च होत आहेत.पण हा संशोधकांचा प्रांत पिडीसह गुणवत्तापुर्ण जिवन जगण्यासाठी.आमची धडपड आमच्या कक्षेतील.ती करताना नृत्योपचाराची गाठ पडली.

११एप्रिल २००८च्या दि टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकात 'Dancing away the Disease' असा लेख जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्य छापून आला होता.त्यात नृत्यप्रेरणाच्या सुचित्रा दाते यांच्या प्रयोगाबद्दल माहिती होती. भरतनाट्यमचा त्या पार्किन्सन्सवर उपचार म्हणुन उपयोग करत होत्या.त्या मोफत शिकवायला तयार असूनही फारसा प्रतिसाद मिळत नाही असे म्हटले होते.कोणत्या वयात काय शिकायचे या सामाजिक बंधनामुळे हे होते असे त्याना वाटत होते.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या श्री.व सौ.शेंडेनी त्यांच्याशी संपर्क साधला.आणि आम्ही काही जणानी त्यांच्या प्रयोगात सामिल व्हायचे ठरवले.त्यानुसार दर शुक्रवारी वर्ग सुरु झाला.दात्ये यांच्या मैत्रिणीच्या नवर्‍याला लहान वयात पीडी झाला.म्हणुन त्यानी याचा अभ्यास केला आणि नृत्योपचार यावर उपयोगी ठरु शकेल असे त्याना वाटले. मैत्रीणीच्या नवर्‍याने यात सह्भाग घेतलाच नाही आम्ही मात्र जाऊ लागलो. शुभार्थींबरोबर(पीडी पेशंट) शुभंकरही(केअरटेकर )सहभागी झाल्यास तुलनेस सोपे जाइल म्हणुन आम्हालाही त्यानी यात सामिल करुन घेतल

त्यानी एक प्रश्नावली तयार केली होती.आम्हा प्रत्येकासाठी एक जेष्ठ विद्यार्थिनी नेमली होती.
नृत्य वर्गात आमच्या नातवंडांच्या वयाच्या मुली असायच्या.आम्ही शिकताना पाहुन त्या कौतुकाने मदत करायच्या.आडाव,मुद्रा,नव्ररसाद्वारे अभिनय असे काही काही शिकत होतो.गुरु पोर्णिमेच्या कार्यक्रमात एक छोटीशी झलकही दाखवली.नृत्योपचारासाठी सातत्य महत्वाचे होते.पण ते होत नव्हते.कोणाच अमेरीकेला जाण,कोणाच डोळ्याच ऑप्रशन, अशा काहीना काही कारणानी क्लास बुडायचा.पण दात्ये मॅडमनी नाद सोडला नाही.त्या स्वतः समुपदेशक आहेत.शुभार्थी आणि शुभंकरांची मानसिकता त्या ओळखत होत्या.त्यांच्यातील समुपदेशक आणि शिक्षिकेने आम्हाला प्रवृत्त करण्यासाठी निरनिराळे प्रयोग केले पण अशा काही अडचणी येत राहिल्या कि आमचे जाणे थांबले.

यावर उपाय म्हणून त्यानी एक सिडी तयार केली आहे ती पाहून तुम्ही घरीही नृत्यावर आधारित व्यायाम करु शकता.शिवाय प्रत्येक शनिवारी नृत्यवर्गात सामील होऊ शकता.इतराना यासाठी शुल्क असते पण पार्किन्सन्स शुभार्थीना मात्र मोफत प्रवेश आहे काही शुभार्थी सामीलही झाले आहेत.आमचा प्रयोग अर्धवट राहिला तरी.जितके दिवस सहभाग होता त्यातही फायदे जाणवले

११ एप्रिल २०१०च्या स्मरणिकेत. ह्यानी आपला नृत्यविषयक अनुभव 'पार्किन्सन्सने मला नाचविले'.या लेखात दिला. ते लिहितात,"पार्किन्सनने चेहरा भावविहिन होतो असे सांगितले जाते प्रत्यक्षात अनुभवलेही.चेहर्‍याचे स्नायु ताठ झाल्याने हे होते.मी बोलणारा कमी.पण माझा राग,आनंद, कौतुक, कंटाळा हे चेहर्‍यावरुन समजायचे.पीडीमुळे हे बंद झाले होते.नृत्यामधल्या नवरसाच्या अभिनयाने आणि व्यायामाने चेहर्‍यावरची ताठरता कमी होऊ शकते, आता न बोलता माझा राग बायकोला समजतो.आणि आवडले नाही म्हणून नाराजी किंवा आवडल्या बद्दलचे कौतुक इतराना समजू शकते.वेगवेगळ्या हालचाली आणि त्यांचे बदलते वेग यांची सांगड घालणे आता जमायला लागले.मुद्रांच्या सरावामुळे वेगवेगळ्या हालचाली सुलभ होत आहेत."

नृत्य वर्गात येणार्‍या इतरानाही तोल सांभाळणे,हालचाली सुलभ होणे असे फायदे झाले.

दुसरा नृत्योपचार प्रयोग ऋषिकेश पवार आणि मैथिली भुपटकर हे करत आहेत.त्याची सुरुवात रामचंद्र करमरकर यांच्या धडपडीतुन झाली.२९ एप्रिल २०१० रोजी पुण्याच्या अर्काईव्हज थिएटर मध्ये ऋषिकेश सेंटर फॉर कंटेंपररी डान्स आणि मॅक्स मुल्लर भवन यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्यावरील 'व्हाय डान्स फॉर पार्किन्सन्स' नावाची १५/२० मिनीटाची एक जर्मन फिल्म दाखवण्यात आली.कार्यक्रमाची जाहिरात वाचून आशा रेवणकर आणि करमरकर हा कार्यक्रम पाहण्यास गेले होते.सर्व तरुण, वृद्ध,स्त्री, पुरुष पीडी रुग्ण संगिताच्या तालावर कोणतीही लाज न बाळगता नाचताहेत.हे पाहून करमरकर खुपच प्रभावित झाले.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभासदाना ही फिल्म दाखवायचीच यासाठी त्यानी आटापिटा केला.याची परिणती म्हणुन ३० मे २०१० रोजी मंडळाच्या सभासदांसाठी ही फिल्म पुना हॉस्पिटलच्या आडिटोरियमध्ये दाखवण्यात आली.पाश्च्यात्य.संगीता ऐवजी भारतीय संगीतावर आधारित प्रयोग करता येइल का? असा विचार झाला.

ऋषिकेशच्या मनात २००४ मधे लंडनला असल्यापासुन हि कल्पना घोळत होती.रोहिणी भाटे यांच्याकडे तो कथक शिकला होता.नंतर तो कंटेंपररी डान्सकडे वळला. Palucca Schule Dresden, Germany यांच्या टिचर्स ट्रेनींग प्रोग्रॅममध्ये बोलवला गेलेला तो पहिला गेस्ट स्टुडंट होता.त्यानी जगभर प्रवास केला आणि आता भारतात येउन पुण्यात 'ऋषिकेश सेंटर फॉर कंटेंपररी डान्स'या संस्थेची निर्मिती केली. एका नृत्यविषयक मासिकात त्यानी मार्क मोरीस डान्स कंपनी आणि त्यांच्या पीडी रुग्णावरील डान्सविषयक प्रयोगाबद्दल वाचले होते..प्रयोग करु इच्छिणारा आणि प्रयोगात सह्भागी होऊ इच्छिणारे यांची गाठ ६ वर्षानी पडत होती.एक नव्या प्रायोगिक प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवली गेली

ऋषिकेशनी संचेती हॉस्पिटलशी संपर्क साधुन त्यांच्या फिजिओथेरपि डिपार्टमेंटच्या सह्कार्याने त्यांच्याच हॉलमध्ये ऑगस्ट १०ला वर्ग सुरु केला. आठवड्यातुन दोन वेळा एकूण तीन महिने असा पायलट कार्यक्रम ठरविला.याचे निष्कर्ष पाहून पुढे प्रयोग चालू ठेवायचा असे ठरले भरताच्या नाट्यशास्त्रावर आधारित भारतीय शास्त्रीय नृत्यशैली,आधुनिक पाश्चात्य नृत्यशैली,समकालीन पाश्चात्य नृत्यनाट्य चळवळ,यांचा मिलाफ करुन आराखडा तयार केला होता.

पहिल्या दिवशी ८/१० जण हजर होते पण प्रत्यक्ष वर्गात ५ जणानीच सहभाग घेतला.प्रयोगाच्या दृष्टीने तीन महिने सह्भागी झालेले तीनच होते.संचेती हॉस्पीटल शुभार्थीना दूर पडत असल्याने संख्या कमी असावी.पण नाउमेद न होता ऋषिकेशनी सहाय्यक मैथिली भुपटकर हिच्या सहकार्याने वर्ग चालू ठेवला.

ऋषिकेशप्रमाणेच मैथिलीलाही या प्रयोगात रस होता.मैथिलीला १५ वर्षाचा भरतनाट्यातला अनुभव होता.ऋषिकेशकडे २वर्षे कंटेंपररी डान्स शिकली होती याशिवाय न्युयार्क येथील 'मार्क मोरीस डान्स कंपनी'येथे तिने' Dance For PD' Teachers Training course पूर्ण केला होता.

प्रयोग .सुरु झाल्यावर.विविध लक्षणानुसार १ ते १० श्रेणी देउन जगण्याची गुणवत्ता तपासणारे तक्ते तयार केले होते.संचेती हॉस्पिटल मधिल डॉक्टरांची यावर देखरेख होती.संचेती हॉस्पिटलच्या न्युरॉलॉजी डिपार्ट्मेंटचे प्रमुख डॉक्टर राजस देशपांडे यांचाही पाठिंबा होता.त्यांच्या मते हालचालींचा पॅटर्न बदलाला की डोपॅमिन निर्मितिला मदत होते.नृत्यात लय, ठेका या आधारे हे अधिक सहज होत. पीडी रुग्णांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि नैराश्य जाण्यास हे उपयोगी पडत.संचेती इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉक्टर पराग संचेती म्हणाले "This therapy works as physical rehabilitation ....this combination of treatment,rehabilitation,&dance is fantastic concept"

निरीक्षणे नोंदवण्यात येत होती.प्रयोग सुरु होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर होणारे फरक पाह्ण्यात आले.न्युरॉलॉजिस्ट आणि आर्थोपेडिक डॉक्टरांच्या दृष्टीनेही ते आश्चर्यकारक होते.

प्रयोगात सह्भागी शुभार्थिंच्या स्नायुंच्या हालचालीची मर्यादा वाढली;
हालचालीच्या गतीवरील नियंत्रण सुधारले
जमिनीवरील हालचालीच्यावेळी तोल सांभाळण्यात सुधरणा झाली,
नृत्यातील हालचालीचा क्रम लक्षात ठेवण्यात सुधारणा.झाली.
बोलण्यातील स्पष्टपणा आणि आवाजाच्या पातळीत वाढ झाली.
एका पेशंटचा औषधाचा डोस २५%नी कमी झाला.
ऋषिकेशच्या दृष्टीने नृत्याची उपचार म्हणून परीणामकारकता सिद्ध झाली होती.

ऋषिकेशने नोव्हेंबर २०१० मध्ये आश्विनी लॉज येथे याबाबतच्या अनुभवावर आधारित व्याख्यान दिले.या प्रयोगाची डाक्युमेंटरीही तयार केली.होती ती दाखवली.
सह्भागी सदस्यानी आपले अनुभव सांगितले.त्यांच्या चेहर्‍यावरील भाव, हालचालीतील आत्मविश्वास हा जास्त बोलका निष्कर्श होता.आश्विनी दोडवाड आणि विलास जोशी या सहभागी शुभार्थीनी आपल्या भावना स्मरणिकेतील लेखातुन व्यक्त केल्या ६२ वर्षाच्या ५/६ वर्षे पीडी असलेल्या विलास जोशिंचि ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती.आत्मविश्वास वाढला. ते परत स्कुटर चालऊ लागले.चेहर्‍यावर तरतरी आली.बोलण्यात कमालीची सुधारणा झाली.त्यामुळे बोलताना वाटणारा संकोच दूर झाला.व्याधीचा विसर पडला."डान्स क्लासला संचेती हॉस्पीटलला गेलेल्यावेळी ओळखीचे कोणी भेटले तर विचारीत कोणाला भेटायला आला तर मला सांगावे लागे मीच पेशंट आहे असे सांगितल्यावर त्याना आश्चर्य वाटे." अस मोठ्या अभिमानाने त्यानी नमूद केल.

आश्विनी ताईंचा अनुभव ही इतराना नृत्याची प्रेरणा देणारा होता.सुरुवातीला अवघडलेपणा होता.आपल्याला नृत्य करताना पाहून कोणी हसत तर नाही ना?असा संकोचही होता सरावाने दोन्ही कमी झाले.स्नायुंची ताठरता कमी झाली,चेहर्‍यावरचे गेलेले हावभाव परत आले.चालताना तोल सांभाळला जाऊ लागला बोलण्यातला अडखळलेपणा जाऊन सुसंगतपणा आला.हस्ताक्षर पहिल्यासारखे झाले.एकुणात निरोगी व्यक्तीप्रमाणे वर्तन झाले.सहभागिंचा अनुभव पाहून.अनेकाना प्रयोगात सहभागी व्हायला हवे होते असे वाटले

ऋषीकेशची हा प्रयोग पुढे चालू ठेवण्याची आणि शुभार्थीना मोफत मार्गदर्शन करण्याची तयारी होती होती.योग्य अशा जागेची व्यवस्था मंडळाने करावयाची होती.एरंडवणा भागात राहणार्‍या अरुण जोग आणि सुमन जोग या सदस्यानी आपली जागा देऊ केली.एक एप्रिल २०११ पासुन आठवड्यातून तिन दिवस सकाळी ९ते१० यावेळात मार्गदर्शन सुरु झाले.१२ ते १५ शुभार्थी उपस्थित असतात.

४/५ महिन्याच्या सरावानंतर नृत्यवर्गाचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले.ऋशिकेशच्या कन्टेंपररी डान्स शोमध्ये ते दाखवले गेले.सह्भागी शुभार्थींची मनोगतेही त्यात आहेत.त्यानंतर नंदादिप हॉस्पीटलमध्ये मित्रमंडळाच्या कार्यक्रमात,११एप्रिलच्या पार्किन्सन्सडेला अशी प्रात्यक्षिके होतच राहीली. सह्भागींचा उत्साह वाढवत राहिली आणि इतर शुभार्थीना सकारात्मक उर्जा देत राहिली.जोशी आणि दोडवाड यांच्याप्रमाणेच इतरनाही फायदे झाले.

प्रज्ञा जोशी आणि मधुकर देशपांडे यानी लेखातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.४५व्या वर्षीच पीडी झालेली प्रज्ञा म्हणते 'नृत्योपचार उपक्रमामुळे माझ्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला.हालचाल बोलणे चालणे अशा प्रत्येक गोष्टीत गूणात्मक फरक झाला.शरिराचा ताठरपणा कमीकमी होत गेला.घरकामात स्वयंपाकात व्यवस्थितपणा आला.तिसर्‍या मजल्यावरील माझ्या फ्लॅटमध्ये मी सामान घेउन एकटी चढू उतरु लागले.पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यात बसमधे एकटी जाऊ लागले.मानसिकतेत सकारात्मक बदल झाला सर्वच शुभार्थीना सांगितलेल्या हालचाली लगेच जमतात असे नाही.पण मैथीली आणि ऋषिकेश न चिडता न कंटाळता पुनःपुन्हा हालचाली दाखऊन करुन घेतात.असे तरुण हसतमुख प्रेमळ .नृत्य शिक्षक मिळाले आम्ही भाग्यवान आहोत."

मधुकर देशपांडे तर ८० वर्षांचे आहेत. त्यांचा तोल जात होता त्यामुळे आत्मविश्वास कमी झाला.होता कोणीतरी सोबत लागायची वाहन लागायचे.पण आता ते एकटे घरापासून चालत क्लासला येतात.

या सर्वांच्यात झालेल्या सुधारणांमध्ये नृत्याचा उपचार म्हणुन फायदा आहेच शिवाय ऋशिकेश आणि मैथिलीच्या प्रेम जिहाळ्याचाहही वाटा खुप मोठा आह

तीन वर्षे उलटून गेली तरी आजही हे मार्गदर्शन चालु आहे.अरुण जोग स्वतः शुभार्थी असल्याने प्रयोगात सामील ही झाले.मध्यंतरी त्यांचे दु:खद निधन झाले. सुमन जोग काही दिवसासाठी अमेरीकेला गेल्या पण नृत्यवर्गासाठी जोगांचे घर खुलेच आहे.

७/८ विद्यार्थी आले तर याशिवाय इतर कडेही वर्ग घेण्याची तयारी ऋषिकेशने दाखवली त्यानुसार भांडारकर रोडला मधुकर देशपांडे याच्या कडेही वर्ग चालु झाला होता.प्रज्ञा जोशी आणि विलास जोशी दोन्हीकडेही जात इतका त्याना नृत्यवर्ग आवडतो पण संख्या कमी असल्याने तो बंद करावा लागला. अजुनही पुण्याच्या इतर भागात वर्ग सुरु करण्याची ऋशिकेशची तयारी आहे.आजची तरुण पिढी बेजबाबदार आहे म्हणार्‍याना ऋषिकेशची ही कृती चपराक देणारी आहे.

शिकणारे शुभार्थी आणि शिकवणारे शिक्षक यांचा आता एक खास परीवार झाला तिळगुळ सामारंभ नातवंडांचे वाढदिवस्,गाडी घेणे ( जोशीनी आता नॅनो घेतली आहे आणि ती चालवायलाहही शिकले.),नातवाचा आगमन असे सोहाळे साजरे होत असतात.सहली आयोजित केल्या जातात..गुरुपोर्णिमा मैथिलिच्या लग्नाची पार्टी अशा विशेष कार्यक्रमाना आम्हालाही बोलवले जाते.

ऋषिकेशला पीडीशी दोन हात करणारे शुभार्थी पाहून प्रेरणा मिळते तर मैथिली म्हणते मला मिळालेल्या आनंदाची मोजदाद करता येणार नाही.असा हा समसमा संयोग.

या सगळ्या प्रयोगातुन साध्य काय झाल?
संशोधनाच्या क्षेत्राच्या दृष्टीने हे नगण्य असेल पण मित्रमंडळाच्या दृष्टीने खुप साध्य झाल. सर्वात महत्वाच म्हणजे पीडी झाला आता संपल सगळ अस हतबल झालेल्या शुभंकर शुभार्थीचा आशावाद जागृत झाला. जगण्याची नवी प्रेरणा मिळाली. नविन सामिल होणार्‍या शुभार्थीना आता हेच शुभार्थी धीर देतात.

१३ एप्रिल २०१४ला मित्रमंडळ पार्किन्सन्सदिनानिमित्त मेळावा आयोजित करत आहे. आमचे शुभार्थी त्यावेळी आपली कला दाखवणार आहेत.

प्रमुख पाहुणे व वक्ते : न्यूरो सर्जन डॉक्टर सुनील पंड्या

वेळ : दुपारी ४ते ६.३०

स्थळ : लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायणपेठ, पुणे

सर्वाना सस्नेह निमंत्रण.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभनाताई....

या विषयाविषयी तुम्ही जे लिहिता ते माहितीपोटी तर मी वाचत असतोच शिवाय तुमच्या लिखाणाचाही मला मोह पडत असल्याने त्या शैलीच्या अनुभूतीसाठी एकदा नव्हे तर दोन वेळा हा लेख वाचला. विलास जोशी यानी नृत्योपचारातून स्कूटर चालविण्याइतपत प्रगती केल्याचे पाहून मलाही हुरुप आला आहे. माझ्या मेंदूच्या ऑपरेशननंतर जी काही कलमे मला लावली डॉक्टरांनी त्यात मी होंडा पॅशन ही गाडी चालवायची नाही असे एक त्यात आहे. बरा तर झालोच आहे मी ऑपरेशनमधून तरीही गोळ्यांच्या डोसामुळे अधूनमधून केव्हातरी तोल गेल्याची भावना येतेच...कदाचित तो विचार मनी ठेवून होंडा चालवू नये अशी सक्त सूचना केला असावी न्यूरॉलॉजिस्ट यानी. पण पीडी पेशंट जर इतकी प्रगती करत असेल तर तुलनेने मी स्वतःला इतका वेगळा का समजत आहे ? असा विचार आती मनी रुंजी घालत आहे.

नृत्योपचाराचे सविस्तर वर्णन तुम्ही केले आहेच. याच्या जोडीला "जलविहार" (पोहणे नव्हे)....अ‍ॅक्वेटिक एक्झरसाईझ बेनेफिटसही पीडी पेशंटसाठी खूप उपयुक्त होतात....कारण यात पाय घसरून पडण्याची शक्यता अजिबात नसते....असे वाचल्याचे मला स्मरते....अर्थात हा उपचार प्रकार काहीसा खर्चिक असण्याची शक्यता नाकारता येणार नाही...कदाचित तुमच्या वाचनात या अ‍ॅक्वेटिक बेनेफिट्सबाबत माहिती आली असेलच.

१३ एप्रिल २०१४ला मित्रमंडळ पार्किन्सन्सदिनानिमित्त मेळाव्याची बातमी अतुल ठाकुर यांच्याकडून समजली आहेच. मेळाव्याला हार्दिक शुभेच्छा.

बाप रे चुकिचा संदेश गेला माझ्या लिखाणातून.पिडीच्याही सर्व पेशन्टना डॉक्टर परवानगी देत नाहित गाडी चालवायला. हे व्यक्तीनिहायच राहील.विलास जोशी आत्मविश्वास गमावल्याने गाडी चालवत नव्हते.आणि न्यूरॉलॉजिस्टचे ऐकणे उत्तम.
तुमच्या नेहमीप्रमाणेच अभ्यासपुर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तोल जाण्यावर ट्रेडमिलचा प्रयोग संचेती हॉस्पीटल्मध्ये झाला.इथही सर्व पेशन्टना यात सह्भागी केल गेल नाही फिजिओथेरपिस्टनी तपासून कोणाला याचा उपयोग होइल ठरवल.आनि प्रत्येकाला त्यांच्यादेखरेखीखाली शिकवल गेल.

शोभनाताई,
आपण उत्तम 'पथदर्शक' अनुभव सांगितले आहेत. आपले शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे. त्याची रिपेअर आणि रीजेनेरेट करण्याची क्षमता अपरिमित आहे. फक्त अथक प्रयत्न मात्र करणे आवश्यक आहे व त्यासाठी अशा नवीन रेसिपींचा आणि थेरपींचा चांगला उपयोग होईलच !
श्री अशोकराव यांनी सुचवल्याप्रमाणे पाण्याखालील व्यायाम देखील पर्याय आहे. दोन दिवसांपूर्वी नायगारा येथील एका हॉटेलमध्ये एका ९४ वर्षे वयाच्या स्त्रीची गाठ पडली. तलावामध्ये व्यायाम करण्यासाठी आली होती ! दीर्घायुष्याचे रहस्य काय तर म्हणाली, 'पाण्यातील व्यायाम' आणि पार्किंग लॉट मधून गाडी काढून सुसाट वेगाने पळाली देखील !
आपल्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा !

धन्यवाद डॉक्टर तुमच्याकडुन काय किंवा अशोक पाटलांकडून काय,सतत नविन शिकायला मिळत.तुमच्यातला जागल्या किती सजग आहे.तुमची लोकशिक्षणाची तळमळ किती तीव्र आहे.अमेरिका दर्शन करतानाही ती काम थांबवत नाही. म्हणूनच मायबोलीकर तुमच्यावर फिदा आहेत.सत्संग यापेक्षा वेगळा काय असतो.

शोभनाताई, अतिशय सकारात्मक आणि नेहमीप्रमाणे उत्तम मांडलेला लेख आहे.. शुभार्थींचे कौतुक वाटले खुप. आणि तुम्हा सगळ्या शुभंकरांची तळमळ तर कोणत्याही कामासाठी घेण्यासारखी आहे.

डॉक्टरकाकांनी सांगितलेले उदाहरण टेरिफिकच Happy

हरपेन सइ धन्यवाद.कार्यक्रमाची माहिती सर्वाना व्हावी त्यांच्या ओळखीतले कोणी पीडी पेशंट असतील तर त्यांच्यापर्यंत पोचावी यासाठी धडपड असते.मायबोलीकारांपर्यंत माहिती पोचवली की हे सांगायचीही गरज लागत नाही.

शोभनाताई, पुण्यामध्ये माझ्या जवळच्या एका नातेवाईकांना पार्किन्सन्स डेव्हलप होतोय. त्यांच्या मुलीला तुमचे लेख वाचायला देईन.

तुमची तळमळ अगदी पोहोचतेय Happy

खूप तळमळीने लिहिलाय लेख. खरंतर पार्किन्सन या आजाराबद्द्ल लोकांमधे फारशी माहिती नाही; आणि हार्टअ‍ॅटॅक, पॅरॅलिसिस, कॅन्सर अशा आजारांबद्दल जेवढी वृत्तपत्रांमधून माहिती मिळते तेवढी सहजपणे या आजाराबद्दल मिळत नाही. त्यामुळे यांवरचे उपचार काय असू शकतात, किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे या विषयी तुम्ही जे लिहिताय ते खूपच मौलिक आहे. असेच अजून लेख लिहावेत ही विनंती.

आश्विनी के
pmmp.anubandh.org

या लिन्क्वर पार्किन्सन्स मित्रमंडळाची वेबसाईट आहे.ती पण पहा.त्यात संपर्कासाठी पत्ता फोन सर्वच आहे.
आपले मायबोलीकर अतुल ठाकुरनी तयार केले.मायबोलीचा असाही उपयोग होतो.

शोभनाताई तुमच्या अदम्य ऊर्जेला, आशावादाला पुन:पुन: प्रणाम आणि शुभेच्छा.
पीडितांसाठी खूप उपयुक्त माहिती.

शोभनाताई, किती सहज आणी सुंदर रीतीने लिहितेस . खरंच या आजाराबद्दल खूपच कमी नॉलेज असल्याने

त्याच्याबद्दल समजून घेणं आवश्यक आहे. अश्या प्रकारचे लेख अवेअरनेस क्रिएट करतात.

डॉक्टर शिंदे यांनी सांगितलेले उदाहरण सुपर्ब आहे..

दक्षिणा स्वाती धन्यवाद!
ऋशिकेशनी फोटो पाठवले ते टाकले आहेत.दुसर्‍या फोटोत नृत्य शिकवणारा ऋशिकेश आणि प्रज्ञा जोशी..लेखात तिचा उल्लेख आहे.

शोभनाताई, अतिशय सकारात्मक आणि नेहमीप्रमाणे उत्तम मांडलेला लेख आहे.. शुभार्थींचे कौतुक वाटले खुप. आणि तुम्हा सगळ्या शुभंकरांची तळमळ तर कोणत्याही कामासाठी घेण्यासारखी आहे.

डॉक्टरकाकांनी सांगितलेले उदाहरण टेरिफिकच >>>>>> +१००००......

शोभनाताई, या लेखाबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा!

पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या उप्क्रमाबद्दल मी जेजे लिहिते ते तुम्ही सर्व आवर्जून वाचता त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
नृत्योपचारावर ॠषीकेशने केलेल्या डॉक्युमेंटरीची लिन्क देत आहे.
Video Link -
https://www.youtube.com/watch?v=VGTAzpihZcY
कृपया पहावी.