मासिक भविश्य-एप्रिल २०१४

Submitted by पशुपति on 31 March, 2014 - 12:55

राशिभविष्य
एप्रिल २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. जरी दोन्ही राशींची भविष्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध वाटली तरी दोन्हीचा सारासार अर्थ लक्षात घ्यावा. )

मेष : ह्या महिन्याच्या सुरुवातीला मेष राशीच्या सप्तमात शनि-राहू असल्यामुळे थोडीफार कुरबुर वा वादावादी होण्याची शक्यता आहे. ज्यांचा भागीदारीत व्यवसाय आहे अश्यांनी भागीदाराबरोबर सामंजस्याने वागणेच योग्य! आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा महिना बराच चांगला आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि त्याचा मोबदला म्हणून बोनस स्वरुपात आर्थिक प्राप्ती देखील होईल. तृतीयात गुरु असल्यामुळे काही लोकांना लांबच्या प्रवासाचे योग देखील संभवतात. तृतीयातील गुरु आणि लाभातील बुध लेखकांना लिखाण प्रकाशित होण्याच्या दृष्टीने चांगला फायदा करून देतील. त्यामुळे लेखकांनी आपले लिखाण प्रकाशकाकडे स्वीकृतीसाठी पाठवण्यास हरकत नाही. घरगुती बाबतीत सुद्धा हा महिना सुरुवातीला चांगला आहे. घरासंबंधी थोडीफार खरेदी होण्याची शक्यता आहे. मुलांच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे, त्यांच्या परीक्षा, क्लासच्या अॅडमिशन व्यवस्थित पार पडतील. प्रकृतीच्या दृष्टीने ह्या महिन्यात कोणतीच तक्रार राहणार नाही. ह्या राशीतील महिलांना हा महिना विशेष चांगला जाईल असे दिसते.

वृषभ : ह्या राशीतील राशीस्वामी शुक्र दशमात असून मंगळ पंचमात आहे. कलाकारांना हा महिना उत्तम जाईल. पंचमातील मंगळामुळे मैदानी खेळाडूंना देखील हा महिना फायदेशीर राहील. द्वितीयातील गुरु आणि दशमातील शुक्र-बुध, आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने खूप चांगला आहे. १६ एप्रिल नंतर चंद्रभ्रमण छोटे-मोठे प्रवास घडवून आणण्याची बरीच शक्यता आहे. ह्या महिन्यात घरासंबंधी बराच फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना चांगला जाईल. षष्ठातील शनि काही लोकांना प्रकृतीविषयी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यात गृहमंत्र्यांशी वार्तालाप उत्तम राहतील. नोकरीच्या दृष्टीने हा महिना संमिश्र राहील असे दिसते. एकंदरीत महिना संमिश्र राहील.
मिथुन : ह्या महिन्यात गुरु तुमच्या राशीत, राहू पंचमात आणि शुक्र नवमात असल्याने ज्यांना अध्यात्मिक विषयात आवड आहे त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे. रवि दशमात असल्याने व्यवसाय अगर नोकरी व्यवस्थित चालेल. आर्थिक प्राप्ती संमिश्र स्वरुपात राहील. बराचसा खर्च तुमच्या धार्मिक प्रवासासाठी होण्याची शक्यता बरीच आहे. वैवाहिक जोडीदाराशी अत्यंत सलोख्याचे संबंध राहतील....त्यामुळे पुन:श्च मधुचंद्र साजरा करायला हरकत नाही!! मंगळ चतुर्थात आणि तोच षष्ठेश असल्याने उष्णतेचे विकार होण्याची शक्यता बरीच आहे. अष्टम भावाशी देखील संबंध असल्याने पडणे, चालताना पाय मुरगळणे अश्या किरकोळ अपघातांबाबत काळजी घेणे फार जरुरी आहे. १५ एप्रिल नंतर रवि लाभात गेल्याने आर्थिक प्राप्ती वाढण्याची बरीच शक्यता आहे. मुला बाळांच्या संबंधी काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

कर्क : ह्या महिन्यात शनि-राहू चतुर्थात आणि गुरु द्वादश स्थानी असल्याने घरातील कुरबुर बऱ्याच वाढतील. महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. १५ एप्रिल नंतर मात्र परिस्थिती बदलेल आणि व्यवसाय अगर नोकरी मध्ये उत्तम आर्थिक प्राप्तीचे योग आहेत. काहींना लांबचे अगर परदेशी प्रवास घडण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराशी महिन्याच्या सुरुवातीला थोडेफार मतभेद होतील. एकंदरीत १५ एप्रिल पर्यंत नोकरी-व्यवसायाबाबत ताण तणाव जाणवतील. ह्या महिन्यात प्रकृतीच्या थोड्याफार कुरबुर राहतील असे दिसते. तरी प्रकृतीची काळजी घ्यावी, त्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये थोडाफार बदल करावा लागेल.

सिंह : ह्या महिन्याच्या सुरुवातीला राशीस्वामी रवि अष्टमात आणि शुक्र, बुध सप्तमात असल्याने काहींना वारसा हक्काने अथवा अचानक धन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. जी तरुण मंडळी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात नोकरी मिळण्याची बरीच शक्यता आहे. काही लेखकांनाही हा काळ चांगला आहे, त्यांनी त्यांचे लेखन प्रकाशकाकडे पाठवायला हरकत नाही. ज्यांचा व्यवसाय घरगुती सामान विकण्यासंबंधी आहे त्यांना बरीच प्राप्ती घडून येईल. मुला बाळांच्या दृष्टीने देखील हा महिना समाधान कारक आहे. १५ एप्रिल नंतर दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रकृती सर्व साधारणपणे चांगली राहील. जुनी दुखणी डोके वर काढूनही तितकासा त्रास होणार नाही. सप्तमात शुक्र व तृतीयात राहू आणि द्वितीयात मंगळ ह्यामुळे जोडीदाराशी काही वेळा सलोख्याचे राहतील तर काही वेळा वाद होण्याची शक्यता आहे. पण एकंदरीत संबंध सलोख्याचे राहतील.

कन्या : ह्या राशीला मंगळ प्रथम भावात आणि गुरु दशम भावात असल्याने नोकरी अगर व्यवसायासाठी उत्तम काळ आहे. मंगळ वक्री असल्याने कदाचित मंगळ मार्गी होण्याची वाट पहावी लागेल. तसेच राहू पण कन्या राशीत आणि रवि सप्तमात आहे त्यामुळे व्यावसायिक लोकांना सुद्धा हा काळ चांगला जाईल. हे सर्व जरी चांगले असले तरीही प्रत्येकाला त्याच्या एकादश भावाप्रमाणेच प्राप्ती होईल. द्वितीय भावातील शनि देखील आर्थिक प्राप्तीला वेग देईल आणि वरील गोष्टींना पुष्टी देईल. तृतीयेश मंगळच असल्याने नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होईल असे दर्शवत आहे. चतुर्थाचा स्वामी गुरु, तो दशमात, मंगळ प्रथमात आणि रवि सप्तमात त्यामुळे रिअल इस्टेट एजंटस् साठी हा काळ उत्तम आहे. इतरांच्या बाबतीत गृह सजावट, घरासंबंधी खरेदी असे बरेच चांगले योग आहेत. पंचमेश शनि आहे त्यामुळे ज्यांचा शेअर संबंधी व्यवसाय आहे, त्यांना हा महिना फायदेशीर आहे. तसेच मुला-बाळांसंबंधी पण महिना चांगला आहे. षष्ठामध्ये बुध आणि शुक्र हे दोन ग्रह असून त्यापैकी शुक्रासंबंधी काही लोकांना त्रास होईल, उदा. पित्त, जळजळ, अपचन इ. पित्त प्रकृतीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. वैवाहिक जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. एकंदरीत उत्तम महिना!!

तूळ : तूळ राशीत शनि महाराज सध्या वक्री आहेत. शनि लग्नी, गुरु नवमात आणि बुध पंचमात त्यामुळे अध्यात्मिक आवड असणारी व्यक्तींना हा काळ खूप चांगला जाईल. तुळेचा स्वामी शुक्र चतुर्थात असून मंगळ द्वादश भावात आहे. त्यामुळे एखादा लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्र अष्टमेश पण आहे. त्यामुळे घरातील वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. मुलांच्या दृष्टीने मात्र हा महिना समाधान कारक आहे. षष्ठातील रवि हा प्रकृती चांगली ठेवण्यास मदतच करील. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होऊ शकतील अगर जोडीदार परगावी जाण्याची शक्यता आहे. नोकरी संबंधी मात्र चिंता नसावी ....“ऑल इज वेल”!!! आर्थिक दृष्ट्याध कोणत्याही स्वरुपाची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी.

वृश्चिक : वृश्चिक राशीचा राशीस्वामी लाभ स्थानी आहे. गुरु अष्टमात आहे. त्यामुळे आकस्मिक धन प्राप्ती होण्याची बरीच शक्यता आहे. तृतीय स्थानातील शुक्र आणि लाभातील मंगळ हा योग सुद्धा तृतीय स्थानासंबंधी फळे उत्तम देईल असे वाटते. नातेवाईकांशी गाठी-भेटी होतील. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना मंगळ वक्री असल्याने विलंबाने यश मिळेल. बुध चतुर्थात आणि गुरु अष्टमात हा योग वाहन चालकांसाठी तितकासा चांगला नाही. त्यामुळे वाहन सावधानतेने चालवावे. मुलांच्या दृष्टीने हा महिना समाधान कारक राहील. षष्ठेश मंगळ दशमात असल्याने आर्थिक प्राप्तीविषयी काळजी करण्याचे कारण नाही. वैवाहिक जोडीदाराशी काही बाबतीत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सामोपचाराचे धोरण बाळगावे. काहींच्या बाबतीत नोकरी बदलण्याचे देखील योग आहेत.

धनु : धनु राशीचा गुरु सप्तमात असून राहू लाभात आणि शुक्र तृतीयात, या ग्रहस्थिती मुळे ज्यांचा व्यवसाय बहुतांशी लोक संपर्काशी संबंधित आहे, अश्यांना हा महिना अतिशय उत्तम जाणार असे दिसते. द्वितीयेश शनि देखील लाभात आहे. त्यामुळे सप्तमातील गुरु आणि लाभातील शनि आर्थिक दृष्ट्या. भरपूर लाभदायक आहे. तृतीयातील शुक्र आणि दशमातील मंगळ ह्यामुळे व्यवसाय किंवा ऑफिसच्या संदर्भात काही लोकांना प्रवास घडतील. पंचमातील केतू मुला बाळांची प्रगती समाधान कारक ठेवेल. षष्ठेश शुक्रामुळे अनेक लोकांना सर्दी-खोकला अश्या स्वरुपाचे आजार होतील. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वाहने जपून चालवावीत. नवमेश रवि १५ एप्रिलच्या सुमारास मेष राशीत गेल्यावर समाधान आणि शांततेचा काळ लाभेल. तसेच काही लोकांच्या बाबतीत नोकरी अगर व्यवसायासंबंधी विशेष घटना घडण्याचे योग १५ एप्रिल नंतर आहेत. वैवाहिक जोडीदाराबरोबर ही सलोख्याचे आणि सामंजस्याचे संबंध राहतील.
मकर : मकरेचा शनि दशमात आणि गुरु षष्ठात आहे, त्यामुळे व्यवसायात आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने उत्तम योग आहे. द्वितीय स्थानातील शुक्र धार्मिक प्रवास घडवून आणेल. द्वितीयेतील बुध देखील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने उत्तम आहे. तृतीयेतील रवि विशेष घडामोडी दाखवत नसला तरी काहींच्या बाबत नातेवाईकांवर खर्च होण्याची शक्यता आहे. ज्यांच्या परीक्षा एप्रिलमध्ये आहे, अश्या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तम जातील. मुलांच्या दृष्टीने पालकांना विशेष काळजी करण्याचे कारण नाही. साधारणपणे महिना चांगला जाईल. द्वितीय आणि षष्ठ स्थानांचा एकमेकांशी योग प्रबळ आहे, त्यामुळे काहींच्या बाबतीत मनासारख्या आर्थिक तरतुदी उत्तम होतील. पण द्वितीय स्थान मारक स्थान असल्याने आणि षष्ठ स्थान आजाराचे स्थान असल्याने प्रकृतीची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. वैवाहिक जोडीदाराशी संबंध सर्वसाधारण राहतील. काही व्यक्तींना लॉटरी किंवा तत्सम अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ : शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह कुंभ राशीतच आहेत. गुरु पंचमात असल्याने ह्या वेळी तुम्ही मुलांकडे जातीने लक्ष द्याल असे दिसते. कुंभ राशीला आर्थिक प्राप्तीच्या बाबतीत हा महिना साधारण राहील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महिना समाधान कारक राहील. उत्तम प्रगती होईल. प्रकृती व आरोग्य साधारणपणे चांगले राहील. काही छोट्या-मोठ्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे, मात्र कोणत्याच आजाराला तोंड द्यावे लागणार नाही. गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. वैवाहिक जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. ह्या महिन्यात प्रवासाचे फारसे योग दिसत नाहीत. मात्र, पंचम आणि नवम ह्या स्थानी गुरु आणि शनि असल्याने अध्यात्मिक प्रगतीसाठी हा महिना उत्तम आहे. दशमेश मंगळ हा तेवढा बलवान नाही, त्यामुळे नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांनी ह्या महिन्यात व्यवहार जपून करावेत. लाभेश गुरु देखील फारसा उत्साहवर्धक नाही. एकूणच आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे जरुरीचे आहे.

मीन : मीन राशीत सध्या रवि विराजमान आहे. त्यामुळे काही मंडळी नोकरीच्या निमित्ताने अगर बदलीच्या निमित्ताने घरापासून दूर राहाण्याची शक्यता आहे. द्वितीय स्थानातील केतू आणि सप्तमातील मंगळ आर्थिक बाबतीत परिस्थिती “जैसे थे” ठेवेल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही लोकांना प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांना हा महिना थोडाफार तणावपूर्ण जाईल. प्रकृती बाबत सावधानता बाळगणे जरुरीचे आहे. गृह सौख्याच्या दृष्टीने मीन राशीला महिना सर्वसाधारण जाईल. अष्टमातील शनि आणि चतुर्थातील गुरु आणि मीन रास ह्यांचा योग शारीरिक इजा होण्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे सुचवतो. शिवाय, वाहन चालवण्याच्या दृष्टीने देखील सावधानता बाळगणे जरुरीचे आहे. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारण राहील. लाभेश शनि अष्टमात आणि गुरु चतुर्थात हा योग तेवढासा बलवान नाही, तरी व्यवहार सावधानतेने करावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users