गुढी पाडवा-आठवण एका सृजनशील कुंभाराची !

Submitted by किंकर on 31 March, 2014 - 12:18

आज गुढी पाडवा. जय नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शक १९३६ या वर्षारंभी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा !

ब्रह्मदेवानी निर्मिलेल्या सृष्टीच्या प्रारंभ दिनाची नोंद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र यांनी रावणावर विजय मिळवून वनवास संपवून अयोध्या नगरीत प्रवेश केला तो हा दिवस.

भारतीय संस्कृतीस कालगणना चंद्र सूर्य यांचे परिभ्रमण यांचे अचूक ज्ञान खूप पूर्वीपासून आहे. दिन दर्शिका, शून्य यांची जगाला देणगी हे आपल्या भारतीयांचे कर्तृत्व.
अशा अनेक कथा असल्या तरी आजच्या दिवसाशी जोडलेली शालिवाहन याची कथा मला सर्वाधिक भावते.

शालिवाहन नावाच्या कुंभाराने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यात प्राण भरले. या सैनिकांच्या मदतीने शकांचा पराभव केला तो दिवस म्हणजे आजचा गुढी पाडवा !

आता या घटनेची सत्यता शास्त्रीय आधारावर पडताळून पाहण्याची गरज जरासुद्धा वाटत नाही. कारण शालिवाहन हा कुंभार नव्हता तो होता सृजनशील नवनिर्मितीचा जनक.
त्याने मातीच्या सैनिकाच्या मूर्तीत प्राण भरले,म्हणजे ओल्या माती प्रमाणे स्वतःची ओळख नसलेल्या अनेकांना अस्मितेची जाण करून दिली. ,सत्वा'ची ओळख पटवून दिली.ज्यामुळे त्या सैनिकात रणनीती ची निर्मिती झाली. आणि त्यामुळे त्यांनी शकांचा पराभव केला.

थोडक्यात काय तर ओल्या मातीत कोणताही आकार घेण्याची क्षमता असते,फक्त गरज असते वेळेवर त्यावरून कलात्मक बोटे फिरण्याची.हि बोटे कधी कुरवाळीत काम करतात तर कधी जरुरी प्रमाणे ताडतात. आणि त्याची जाण असलेला सृजन कलाकार म्हणजे कुंभार.
शालिवाहन हा असा सृजनशील कुंभार होता. त्याने प्राण फुंकून जिवंत केले ते सहा हजार सैनिक हा प्रातिनिधिक आकडा आहे.सैनिकांना त्यांच्या कार्याची कर्तुत्वाची जाणीव करून दिली. त्याने असे अनेक कार्यकर्ते तयार केले.

ज्यांना स्वतःची ओळख नव्हती ती त्यांना मिळवून दिली. ज्या मधून त्या सैनिकांनी आपल्या देशसेवेची कार्याची गुढी उभारली. आणि या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्या दिवसापासून सुरु झालेली कालगणना शालिवाहनाच्या नावाने ओळखली जाते.

शालिवाहनाने जे काम केले त्याची अल्पशी पोहच म्हणून काळ गणनेस त्याचे नाव दिले गेले. कामातून त्याने जी स्वतःची ओळख निर्मिली तीच खरी गुढी उभारणी.त्यामुळेच गेली जवळ जवळ दोन हजार वर्षे या दिवशी आपण गुढी पाडवा शालीवाहनाच्या
नावे साजरा करीत आहोत.
आता वेळ आली आहे प्रत्येकाने कुंभार होण्याची, अगदी सहा हजार नाही पण किमान स्वतःला ओळखून सत्वाचा आकार घेत काही नव निर्मिती करण्याची. सत असत मधील फरक ओळखून योग्य बाजूने निर्णय घेण्याची.जर हे मनापासून करता आले तर त्यातून उभी राहणारी गुढी अशी काही उंची गाठेल कि तेच खरे स्वर्गारोहण ठरेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंकर,

अतिशय समयोचित लेख आहे. शेवटून तिसरं वाक्य अगदी मनापासून पटलं.

>> आता वेळ आली आहे प्रत्येकाने कुंभार होण्याची, अगदी सहा हजार नाही पण किमान स्वतःला ओळखून सत्वाचा
>> आकार घेत काही नव निर्मिती करण्याची.

हे वाक्य आपणांस लागू पडतं याची आठवण झाली! Happy कारण इथे आहे :

>> आतापर्यंत झालेले काम बदलल्याने, जर त्याचा फायदा समाजाला अधिक होणार असेल, तर पुनश्च श्री गणेशा
>> करावा लागला तरी चालेल, पण हे खडतर काम पूर्ण करयचे ठरवले.

आता माझी रिक्षा : http://www.maayboli.com/node/31387#comment-1790402

धन्यवाद! आणि हो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

आ.न.,
-गा.पै.

दुसर्‍या महायुध्दात ( बहुतेक जर्मन सैन्याने ) मोटर कार्स वर रणगाड्यांच्या आकाराचे पॅनल्स लाऊन त्यांच्या शत्रुराष्ट्राला चकीत केले होते. अश्या डमी रणगाड्यांची संख्या हजारोंनी होती.

हजारो सैनीक युध्दाला सज्ज आहेत असे लांबुन पहाणार्‍या शत्रुला वाटणार. एखाद्या वेळी शत्रु ही तयारी पाहुन पळ ही काढणार. ही युध्दनिती आहे. प्रत्यक्षात मातीच्या पुतळ्यात प्राण फुंकायची कल्पना हा कल्पनाविलास असावा.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

आता वेळ आली आहे प्रत्येकाने कुंभार होण्याची, अगदी सहा हजार नाही पण किमान स्वतःला ओळखून सत्वाचा आकार घेत काही नव निर्मिती करण्याची. सत असत मधील फरक ओळखून योग्य बाजूने निर्णय घेण्याची.>>>> अग्दी खरंय ....
सुंदर लेख ....

छान लेख! (नेहमीप्रमाणे). Happy
किंकर, तुम्हाला, आणि तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

तुमच्या भावना पोचल्या. त्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये.

फक्त वरती नमूद केलेली शालिवाहन नामक राजाची कथा ही पूर्णपणे दंतकथा आहे एवढंच सांगावंसं वाटतं. शालिवाहन नामक कुठलाच राजा कधीच अस्तित्वात नव्हता. सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं. राहिता राहिली एकच खरी गोष्ट की त्यांचा सर्वात बलाढ्य राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने नहपान नामक क्षहरात कुलाच्या अतिशय पराक्रमी शक राजाचा निर्णायक पराभव केला आणि ते राजकुल कायमसाठी संपवलं. मात्र या युद्धाचाही निश्चित असा संबंध शक संवत्सराशी नाही. एकूण पुरावे बघता शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे (शिवाजीच्या राज्याभिषेक शकासारखं) असं दिसतं. या कुलाने गुजरात आणि माळवा प्रांतामधे अनेक वर्षं राज्य केल्यामुळे तेच आसपासच्या प्रदेशांमधे प्रचलित झालं. त्यामुळे त्याचा उल्लेख शक-काल असा केला जाऊ लागला आणि हळूहळू शक हाच शब्द कालगणनावाचक म्हणून रूढ झाला.

आता शक बाहेरचे आक्रमक होते वगैरेही तितकंसं खरं नाही. ते मध्य आशियातून काही शतके आधी आले असावेत असं पुरावे दर्शवतात. पण शक-क्षत्रप आणि सातवाहनांची राज्ये शेजारी शेजारी होती आणि त्यांच्यात व्यापारीमार्गाच्या नियंत्रणासाठी वगैरे कायमच चुरस होती आणि लढाया होत असत. त्यामुळे परकीय आक्रमकांचा पराभव करण्यासाठी गौतमीपुत्राने ती लढाई केली या म्हणण्यात तथ्य नाही. तसेच कार्दमक कुलाशी सातवाहनांचे सोयरिकीचे संबंध होते. त्यांच्या एका राजकन्येशी वासिष्ठीपुत्र पुळुमावि या राजाचे लग्न झालेले होते. याउपर सातवाहनांनी कार्दमकांकडूनही पराभवाचे पाणी चाखले होतेच. या सगळ्या 'जिओपोलिटिकल' कारणासाठी झालेल्या स्थानिक महत्वाच्या लढाया होत्या हे लक्षात घेतलं पाहिजे.

फक्त तो गौतमीपुत्राचा विजय मात्र खरंचच पश्चिम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आठवणींमधे पक्का रुजला. त्याविषयी अनेक दंतकथेची पुटं चढली. शिवाय आपण दिवाळीत जो किल्ला करतो शिवाजीची आठवण म्हणून, ती प्रथा खरंतर शालिवाहनाने मातीचे पुतळे लहानपणी केले त्याची आठवण म्हणून अस्तित्वात आली असं जुनी ब्रिटीश गॅझेटीअर्स नोंद करतात. त्याची शिवाजीशी असलेली असोसिएशन नंतरची आहे.
शिवाय शालिवाहन राजाच्या आणखीही काही कथा/दंतकथा महाराष्ट्रात प्रचलित आहेतच

किंकर, तुमची माहिती चूक आहे हे दर्शवण्याचा खटाटोप म्हणून ही पोस्ट नव्हे, तर यानिमित्ताने शालिवाहन शकामागची ऐतिहासिक तथ्ये सर्वांपर्यंत पोचावीत म्हणून लिहिले.

सर्वांना नवीन शक संवत्सराच्या शुभेच्छा Happy

शालिवाहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे.त्यावेळी जनता चैतन्यहीन, पौरूषहीन (षंढ) आणि पराक्रमहीन झाली होती. त्यामुळे शत्रूसमोर तिचा अजिबात टिकाव लागत नव्हता. मातीपासून निर्माण केलेले सैन्य विजयश्री कसे मिळवून देऊ शकते? पण शालिवाहनाने त्या चैतन्यहीन जनतेमध्येही चैतन्यांचा संचार
केला. पौरूष्य आणि पराक्रम ह्यांना जागविले आणि त्यामुळेच अखेर बलाढ्य शत्रूही पराजीत झाला.

लोकहो,

>> शालिवाहन नामक कुठलाच राजा कधीच अस्तित्वात नव्हता.

विकिवर वेगळी माहिती मिळते.

>> Sir A Cunningham, The first Director-General Of Archaeological Survey of India, Credit the
>> legendary King of Punjab Shalivahan of Bhati Dynasty for starting the Saka era to
>> commemorate his victory over Sakas, in archaeological survey report of 1864.

हे संवत इंडोनेशियामध्येही काही काळ वापरात होतं. तसेच फ़िलिपाईन्समधील सर्वात जुन्या अशा लागुना ताम्रपटावर हेच संवत आढळून येतं (Inscribed on it is the Saka era date of the year Siyaka 822 ...). त्यामुळे शालिवाहन नामक राजा अस्तित्वात नव्हता हे कितपत खरं धरावं असा प्रश्न पडला आहे.

आ.न.,
-गा.पै.

गापै, विकिपेडियावर चुकीची माहिती आहे. मी त्याच काळाविषयी (आद्य ऐतिहासिक महाराष्ट्र) संशोधन करते आणि या विषयावर अद्ययावत काम करणार्‍यांविषयी, त्यांच्या कामाविषयी माहिती आहे. म्हणून अधिकाराने वरील पोस्ट लिहिली आहे.
आमच्या विषयात जसेजसे नवे पुरावे मिळत जातात तशीतशी जुनी गृहितके बदलत रहातात. कनिंगहॅम हा कितीही श्रेष्ठ पुरातत्वज्ञ असला तरीही त्याची खूपशी मते आता ग्राह्य धरली जात नाहीत.

तस्मात, विकिपेडियावर प्रत्येक वेळी भरवसा ठेवू नये.

वरदा,

>> विकिपेडियावर चुकीची माहिती आहे.

तसं असल्यास ती माहीती बदलली पाहिजे. Happy किंबहुना तुम्ही ती बदलावी असं सुचवेन.

आजच्या अफगाणिस्थानापासून ते आजच्या फिलीपाईन्सपर्यंत विस्तृत प्रदेशात एक संवत चालू होता (बहुधा वेगवेगळ्या कालखंडात). त्याचं मूळ एखाद्या काल्पनिक घटनेत असण्याची शक्यता धूसर आहे. किंवा शकविजयाची घटना खरी असली तरी शालिवाहन काल्पनिक असू शकेल. अर्थात अस्तित्वाचा ठाम पुरावा मिळाल्यावर नंतरच विधान करावे, हेही तितकेच खरे.

आ.न.,
-गा.पै.

उत्तर भारतात विक्रम संवत, गुप्तांचा राज्यारोहण संवत वगैरे कालगणनाही चालू होत्या. आग्नेय आशियाचे दक्षिण भारताशी संबंध अस्ल्याने काही प्रदेशांमधे शकसंवत वापरले गेले, पण सगळ्या आग्नेय आशियात ती कालगणना लागू नव्हती. अफगाणिस्तान, बॅक्ट्रिया भागांमधेही तिथल्या स्थानिक राजांची कालगणना अस्तित्वात होतीच.

मुख्यत: शकसंवत हे गुजरात-माळवा प्रांतापासून पूर्ण दक्षिण भारत अशा व्याप्तीमधे वापरले जाणारे संवत आहे. उत्तर भारतात विक्रम संवत सहसा वापरले जाते. पूर्व भारतात आणखी वेगळी कालगणना वापरली जाते.

>> तसं असल्यास ती माहीती बदलली पाहिजे. Happy किंबहुना तुम्ही ती बदलावी असं सुचवेन

Happy

>> आमच्या विषयात जसेजसे नवे पुरावे मिळत जातात तशीतशी जुनी गृहितके बदलत रहातात

Happy

वरदा आपल्या माहितीबदल आभारी आहे. तुम्ही अशी माहिती देत जावा.

- "आमच्या विषयात जसेजसे नवे पुरावे मिळत जातात तशीतशी जुनी गृहितके बदलत रहातात. " आणि म्हणूनच येथेही विवादास जागा असावी असे वाटते.
- "आता शक बाहेरचे आक्रमक होते वगैरेही तितकंसं खरं नाही." मग खरं काय आहे?

पूर्वी तीर्थक्षेत्रीचे पंडित नोंदी करत होते .काशी ,पैठण ,उज्जैन इकडे .ती धर्मसत्ता असल्यामुळे राजसत्तेचा अधिकार चालत नसावा .वारंवार नवीन सार्वभौम (?)राजा आपला शक लादेल तर ते बदलणे पंडितांना नोंदी करतांना अडचणीचे होत असेल .ज्या राजाने यांच्याशी विचार ,वाद करून कालगणना ठरवली असेल तीच दीर्घकाळ पुरावा म्हणून राहिली .मग तो राजा कितीही लहान असला तरी त्याचेच नाव टिकले असेल . अथवा एखाद्या राजाचा वारस लहान मुलगा असेल त्याचा अमात्य कोणी राज्यकारभार पाहात असतांना त्याने हा उद्योग केला असेल .पुढे तो मुलगा मोठा राजा झालाही नसेल .त्यामुळे मोठ्या राजकुलातील राजांची नावे धुंडाळून उपयोग नाही .ब्रिटिशांचे हातपण या पोथ्यांपर्यँत पोहोचू शकले नाहीत त्यामुळे त्यांचे निष्कर्ष खरे मानता येत नाही .
दोन हजार वर्षाँपूर्वी वसंतसंपात बिंदू मेष राशीत होता त्याचाही काही संबंध आहे का ?

आजच्या अफगाणिस्थानापासून ते आजच्या फिलीपाईन्सपर्यंत विस्तृत प्रदेशात एक संवत चालू होता>> Lol विठूकान्हची आठवण आली

रुपाली,प्रज्ञा ,सुसुकु,srd,आगाऊ ,भारती,- सर्वांना धन्यवाद !

किंकर, तुम्हाला आणि इथे सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दीक शुभकामना.

सुंदर लेख. नवीन माहिती मिळाली.