अ‍ॅस्थेटिक अ‍ॅनेस्थेशिया….!

Submitted by चेतन.. on 31 March, 2014 - 02:02

"हम्म... असं आहे तर... " दीर्घ उसासा सोडून डॉक्टर म्हणाले.
"हो ना.. " मी.
"किती दिवसांची रजा काढलीयेस??"
"तशी आठवडाभर आहे अजून.. "
"पुढचा पूर्ण आठवडा??"
"हो.. "
"काहीच अडचण नाही मग… जयंतराव मग आजच आणि लगेचच ऑपेरेशन करून टाकू .."
"काय करायचं मग चेतन??" बाबा म्हणजे जयंतराव.
"च्यायला आजच..??" मी.
"मुहूर्त बघायचाय??" डॉक्टर.
"तसं नाही डॉक्टर... पण..."
"जेव्हढं लवकर होईल तेव्हढं चांगलंच आहे ... "
"पर्यायच नाहीये तर मग आजच फाटू द्या..."
पायाखालची बेल दाबून डॉक्टरांनी त्यांच्या असिस्टंट ला बोलावलं. आणि त्याला सगळी तयारी करायला सांगितली म्हणजे ब्लडप्रेशर, ब्लडटेस्ट, युरीन टेस्ट, ई. सी. जी. वगैरे वगैरे…
"डॉक्टर…. एक विचारू?"
"विचार ना.. "
"आता भूल देणार ना.. "
"नको का द्यायला??" डॉक्टर हसून म्हणाले..
"द्यावी तर लागेलच ना??"
"पूर्ण भूल द्यावी लागेल.. "
"तेव्हढंच फक्त विचारायचं होतं.. "
"ऑपरेशन नंतर फार तर तास भर त्रास होईल... मग नाही फारसा होणार... "
हह… जसं काय पहिल्यांदाच ऑपरेशन होतंय... चांगली आठवडाभर वाट लागणारे... पण काय आता फाटणारच आहे तर फाडा म्हणावं पाहिजे तसं... असा विचार करून मी डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर आलो.
ज्या ज्या म्हणून टेस्ट्स करायच्या होत्या त्या सगळ्या झाल्या. त्यानुसार सगळी तयारी चालू होती. भूलतज्ञ आले कि लगेच ऑपरेशन सुरु करू असं डॉक्टर सांगून गेले…
"आई गं.. ऐक ना.. "
"बोल.. "
"आता पूर्ण भूल द्यायची तर कोठून देतात गं..?"
"माझ्या वेळेस तर पाठीतून दिली होती... पण आता काय पद्धत आहे कल्पना नाही.."
"हम्म…"
"भिती वाटतीये??"
"नाही गं... पण खरं सांगू.??.
"काय??
"खूप उत्सुकता लागून राहिलीये..."
"काहीतरीच.. "
"अगं खरंच... बघ ना… आत्तापर्यंत ऑपरेशन करायच्या आधी मला वेदना होत्या. पण पहिल्यांदाच असं होतंय कि मला ऑपरेशनच्या आधी काहीच नाहीये होत... मी नॉर्मल आहे.... म्हणजे मी ही भूल एन्जॉय करू शकतो.. "
"काहीही... "
"काहीही नाही ... एन्जॉय..."
"करा मग एन्जॉय.. "
मी काही बोलणार एवढ्यात डॉक्टर येउन सांगून गेले कि भूलतज्ञ आलेले आहेत आणि काहीच वेळात ऑपरेशनला घेऊयात..
"चला साहेब... घाबरू नका... आणि हॅप्पी जर्नी..."
"हॅप्पी जर्नी??" जयंतराव..
"सांगते… त्याला आत जाऊ द्या आधी... "
त्यांना टाटा, बाय बाय करून मी आत गेलो. आत सगळी जय्यत तयारी झाली होती. डॉक्टरांचे दोघं तिघं असिस्टंट त्यांना नेमून दिलेलं काम करत होते. तशी टेस्ट्स चालू असतानाच आमची चांगली ओळख झाली होती. मी आत गेल्या गेल्या ते अगदी प्रसन्न हसले. मला ते अगदी कसायानं बकरीकडं बघून हसल्यासारखं वाटलं. मी ही त्यांच्याकडं बघून तेव्हढंच प्रसन्न हसलो. मग ऑपरेशन टेबलवर मला झोपायला सांगितलं. डॉक्टरांनी पुन्हा मला घाबरलायेस का वगैरे विचारलं. मी नाही म्हणालो. ते गुड म्हणाले. उजव्या हाताच्या मनगटावर एक भलीमोठ्ठी एक सुई खुपसलेली होती. आधी तिथे बटरफ्लाय सारखी एक सुई असायची. पण ती सुई तिथे लावताना खूपदा ते आउट व्हायचं आणि पेशंटला पण खूप त्रासदायक होतं म्हणून आता अशी नवीन प्रकारची सुई लावतात. ती एकदा का लावली कि तिथून बर्याचदा इंजेक्शन वगैरे दिलं जातं आणि पेशंटला त्रास होत नाही. तर त्या तिथुन अजून एक भलंमोठ्ठं इंजेक्शन दिलं गेलं.
"भूल दिली??" मी.
"नाही रे… सकाळपासून काही खाल्लं नाहीस ना... म्हणून एनर्जेटिक इंजेक्शन दिलंय.. "
"मला वाटलं भूलच दिली.. "
परत एक लेडीज डॉक्टर आल्या. आणि त्या इंजेक्शन देताना म्हणाल्या.
"आता ही मी भूल देतीये… दोनच मिनिटात तू अगदी शांत झोपशील… मग काही नाही जाणवणार.. अगदी शांत वाटेल... "
"किती वेळ ह्या भूलीचा असर राहतो??"
"साधारण पाऊण तास... "
"व्वा... "
"क्काय...?"
"काही नाही.. " आता त्यांना काय माहित मी किती उत्सुक होतो भूलग्रस्त व्हायला. जसजसं ते इंजेक्शन संपत गेलं तशी माझ्या घश्यात कसलीतरी घाणेरडी आणि कडवट चव उतरत गेली. डॉक्टर म्हणाले कि ती भूल उतरतीये म्हणून… माझ्या डोळ्यावर एक काळी पट्टी ठेवली गेली… मला जरा जरा हलकं हलकं वाटू लागलं.….

एखाद्याला सांगावं कि तुझ्याकडं पाउण तास आहे. आणि त्याला जे काही करायचंय, जिथं कुठं जायचंय तिथं जाण्याची मुभा असावी. मग अश्या वेळेस ती व्यक्ती काय करेल?? ते सगळं मला करावं वाटत होतं. मला एक वेळेची चौकट आखून दिल्यासारखी वाटत होती. आणि त्या चौकटीत सर्व काही करायची परवानगी दिली होती पण फक्त पाऊण तासच.… "जा…. चेतन जा…. जीले अपनी जिंदगी"…. सारखंच काहीतरी…

जशी जशी ती भूल चढत गेली तसा तसा मी अजूनच मोकळा होत गेलो. आणि माझ्याही नकळत एका वेगळ्याच विश्वात जाऊन पोहोचलो. पुढे खूप सुंदर निसर्ग होता. मी पुढे जाणार एवढ्यात माझ्या पायाखालचं काहीतरी हलल्यासारखं वाटलं. मी खाली बघितलं तर तिथे काळजात धडकी भरावी एव्हढी एक भलीमोठी विहीर होती आणि त्या विहिरीवरच्या झुलत्या पुलावर मी उभा होतो. त्या विहिरीतून फक्त गरम वाफा येत होत्या. खरंतर मला उत्तम पोहायला येतं तरीही मी खूप घाबरलो. पलीकडे जायचं असेल तर ती विहीर ओलांडणे भागंच होतं. कसातरी त्या हलत्या पुलावरून मी पलीकडे पोहोचलो. खरंतर मी स्वप्नातच होतो. पण त्या स्वप्नातसुद्धा मला स्वप्नवत वाटत होतं. समोर एक भलामोठ्ठा हिरवागार डोंगर होता. त्या डोंगराच्या अगदी मध्यापर्यंत विरळ विरळ असे ढग उतरले होते. आजूबाजूला अगदी व्यवस्थित मेन्टेन केलेली हिरवळ होती. अगदी जवळून एक ओढा झुळझुळत होता. मी खाली बसलो. आणि हात आता पाण्यात घालणार एवढ्यात कुठूनतरी एक हलकीशी कळ आली. मी अगदी हलके डोळे उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न करत अगदी क्षीण कण्हलो… "आई गं.." काहीतरी आत घुसत होतं. कुणीतरी माझ्या कपाळावर अगदी अलगद हात ठेवला. आणि म्हणाले … "काळजी करू नकोस… झोप...". वेदना संपली. मी परत पूर्ण डोळे मिटले...

आता मी अगदीच वेगळ्या आणि अनोळखी गावातल्या एका चौकात उभा होतो. अगदी रखरखाट होता सगळीकडं कि जो मी आधी कधीच पहिला नव्हता. मी गोंधळून गेलो. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. चौक होता पण दुकानंही थोडीथोडकीच. झाडतर नावाला पण दिसत नव्हतं. एका पानपट्टीच्या दुकानावर थोडीफार गर्दी दिसली. मी तिथे गेलो. एक जराशी वृद्ध व्यक्ती खाली बसून बिडी ओढत होती. मी त्यांना विचारलं कि इथे एक डोंगर होता, झाडं होती. ओढा होता आणि आता तर काहीच दिसत नाहीये… एका ठार वेड्याकडे बघतात तसं त्यानं माझ्याकडं बघितलं. आजूबाजूचे माझ्याकडे बघून हसायला लागले. तो तो मी अजून गोंधळात गेलो.. मला काहीच कळत नव्हतं. काही वेळापूर्वीचं जग आणि आत्ताचं जग ह्यात जमीन अस्मानाचं अंतर होतं. असं कसं शक्यंय? काहीतरी घोळ होतोय. आता कोणाला विचारू अश्या विचारात असतानाच कोणीतरी माझ्या गालाला थोपटल्यासारखं केलं. मी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच कानाशी कोणीतरी पुटपुटलं … "जीभ बाहेर काढ"… मी काढली... तेच कोणीतरी "ठीके.. ठीके" म्हणालं. मी पुन्हा डोळे मिटले...

आता माझ्यासामोर एक अतिसुंदर बाग होती. एकाच उंचीची कितीतरी अशोकाची झाडं होती. वाटेच्या दोन्हीबाजूंना पिवळीधमक फुले फुलली होती. निरभ्र आकाश, आणि त्या आकाशात बरेच पक्षी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. मला खूप हायसं वाटलं. आजूबाजूला कोणी दिसतंय का?? हे बघत मी चालत होतो. मी एकटाच होतो. आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी बराच वेळ त्या बागेत हिंडत राहिलो. एक वेळ आली कि मला जाणवलं... आपल्याला आता निघायला हवं. आपल्याला दिलेली वेळ संपत आलीये. आणि अश्या विचारात असतानाच त्या बागेच्या एक वळणावर मला कोणीतरी उभं असलेलं दिसलं. मी जवळ गेलो. तर कोणीतरी एक मुलगी पाठमोरी उभी होती. मी आवाज दिला. एक नाही दोन नाही. मी परत आवाज दिला. काहीच प्रतिसाद नाही. मी थोडा अजून जवळ गेलो. ती तेव्हढीच लांब गेली. मला अंदाज आलाच.… ती "ती" तर नसेल??… बहुतेक ती "तीच" होती. मग ती वळून बघत का नाहीये? प्रतिसाद का देत नाहीये. प्रत्यक्षात नाही पण निदान स्वप्नात तरी… मी परत आवाज देत राहिलो … ती तेव्हढीच लांब जात राहिली. मी तडफडून तिला म्हणालो कि माझ्याकडे खूप वेळ नाहीये… मी इथे परत नाही येणार... येउच शकणार नाहीये... फक्त एकदाच वळून बघ.… प्लीज… डोळ्यात पाणी आणून मी तिला विनवत राहिलो.. तरी तिनं काही वळून नाही बघितलं. आता कोणीतरी मला मागे खेचू लागलं. मी म्हणालो कि मला अजून थोडाच वेळ द्या. ती एकटीच आहे इथे… तिला असं एकटं सोडून मी कसं जाऊ?? मी जोरानं हिसके देऊ लागलो. पण माझी शक्ती अपुरी पडली. तिला ओरडून म्हणालो इथेही निराशाच केलीस…
...
आता डोळ्यासमोरून ती अख्खी बाग जात होती… त्यानंतर ते रखरखीत गाव…. नंतर तो डोंगर…आणि शेवटी त्या सुरुवातीच्या विहिरीच्या झुलत्या पुलावर डगमगत उभा राहिलो. अचानक तो पूल मधूनच तुटला … आणि मी त्या उकळत्या पाण्यात पडलो…
.
.
.
जेंव्हा भूल उतरून मी माझे डोळे उघडले तेंव्हा वेदनेचा आगडोंब उसळला होता….!

(स्वानुभवावर आधारीत…. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परान्तु मिहि गेले आहे ह्या अनुभावतुन एकदा भुल दिलि कि त्यानन्तर भुल उतर्ल्यवर=जाग येते स्वाप्न
कुथे दिसातात

द इमपॉसिबल या चित्रपटात अशाच एका अनुभवाचे अत्यंत सुंदर चित्रण आहे.>>चित्रपट राहून गेलाय बघायचा. पण आता नक्कीच बघेन.
सर्वांचे आभार…