मशरूमवाला ढग

Submitted by सई केसकर on 28 March, 2014 - 02:18

ठकू आज शाळेतून आल्यावर काय काय केलंस?
आधी जेवले, मग नंदा मावशीनी मला झोपायला सांगितलं. पण झोपच येत नव्हती.
मग?
मग ना, आम्ही गच्चीवर गेलो. पतंग उडवायला. पण नंदामावशीला बाबासारखा उंच पतंग उडवताच येत नाही.
हा हा, अगं नंदा मावशी एवढीशी आहे. ती बाबासारखी उंच असती तर तिला पण जमलं असतं.
मग आम्ही दोन काठ्या एकमेकींना जोडल्या. आणि ना, त्या पुढच्या काठीला असं वाकडं काहीतरी लावलं.
काय? आकडा?
हो! आकडाच! मग आम्ही खळदकर आज्जींच्या झाडाच्या कै-या पाडल्या.
ठकू, तुला कितीवेळा सांगितलंय, त्यांना हात लावायचा नाही म्हणून!
अगं आई, पण त्या काही नाही बोलल्या. त्यांनी तर दोन कै-या ठेऊन घेतल्या. आणि मला त्या साखरांबा देणारेत.
अच्छा? मग, पुढे काय केलंत?
मग ना, पाच वाजले म्हणून नंदा मावशीनी झाडांना पाणी घातलं, मी पण माझ्या ब्रुनोला पाणी घातलं. आई ब्रुनोला फ़ुलं कधी येणार?
अगं आता येतीलंच. मोग-याला याच दिवसात येतात.
मग मी आजीसाठी गजरा करू शकीन का?
नाही गं. लहान आहे अजून तुझा ब्रुनो. आत्ता एक दोनच येतील.
मग ना आई, आम्ही चटईवर आकाशाकडे तोंड करून झोपलो. आणि ना ढग बघितले!
अय्या! कित्ती छान! आज ढगात कोण कोण दिसलं ठकूताईला?
आज ना, आधी एक फेरारी दिसली, मग एक मांजर दिसलं. असे कान टवकारलेलं, मग एक ढग तर माहितीये आई, डिट्टो मशरूमसारखा होता, माहितीये!
आणि नंदा मावशीला काय काय दिसलं?
श्या तिला तर सगळीकडे झाडच दिसतं. तिला मशरूमवाला ढग सुद्धा झाडासारखा दिसला. मग मी समजावलं तिला की ही मशरूम आहे. आई कधी कधी पिझ्झा करते तेव्हा तू चिरून देतेस ना, ती मशरूम. मग पटलं तिला. तशी ती समजूतदार आहे.
हो का आज्जीबाई? मला पण ढग बघायचेत गं, तुझ्याबरोबर.
अगं पण त्यासाठी लवकर यावं लगेल. आणि शनिवार-रविवार तर तू सारखी किचनमधेच असतेस काम आहे म्हणून. मग कसे बघणार तू ढग. तू असं करतेस का? तू जॉब सोड आणि ना अर्जुनच्या आईसारखी घरीच थांब. तो घरी जातो ना तेव्हा त्याची आई असते घरी. किती छान ना! मग आपण रोज ढग बघू. खरंच आई, तू जॉब सोडलास तर काय होईल?
तर आपण गरीब राहू.
मग चालेल ना! काही दिवस आपण राहू गरीब गरीब. नाहीतर असं कर आठवड्यातून एक दिवस जाऊच नकोस. तेवढा एक दिवस आपण गरीब राहू.
हा हा! असं थोडी ना असतं. आणि आज तुला अर्जुनची आई छान वाटते, पण नंतर तू मोठी झाल्यावर कदाचित तुलापण जॉब करावासा वाटेल. तुला नाही का टीचर व्हायचंय.
आई जॉब करणं चांगलं की घरी थांबून अर्जुनच्या आईसारखं होणं?
अगं, हे दोन्ही जॉबच आहेत. अर्जुनची आईसुद्धा किती दमत असेल. आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं. चांगलं आणि वाईट असं काहीच नसतं.
मग मी अर्जुनच्या आईसारखी होणार मोठी झाल्यावर. मला घरात राहायला जाम आवडतं. तू उगीच मला शाळेत पाठवतेस.
हो! पण अजून त्याला खूप खूप अवकाश आहे. तोपर्यंत आपण अभ्यास करू हं? मग तू मोठी झालीस की सगळं तूच ठरवायचं!
अजून किती वर्षांनी मी मोठी होणार?
बारा. चल होमवर्क काढ. आणि ट्वेल्व प्लस सिक्स किती ते सांग. Happy

मूळ लेख: http://thhakoo.blogspot.in/2014/03/blog-post_27.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. मला आधी अणूबाँबबद्दल काही असेल असं वाटलं नावावरुन.

व्वा .. मस्तच..

मग चालेल ना! काही दिवस आपण राहू गरीब गरीब. नाहीतर असं कर आठवड्यातून एक दिवस जाऊच नकोस. तेवढा एक दिवस आपण गरीब राहू.>>:) Happy :

Happy

ह्यावरून 'मुलांची आबाळ करून बायकांनी नोकरी करू नये' असं काही मंडळी म्हणतील, म्हणाली आहेत हे इमॅजिन करून, आठवून हसू आलं.

छान Happy

आवडल! ठकु गोड आहे. मुलिने ती प्रि-के ला असताना बाबाला तु ऑफिस मधे गेल्यावर तु सर्कल टाइम करतोस का? अस फार निरागस पणे विचारलेल..

क्यूट Happy
काही दिवस आपण राहू गरीब गरीब.
नाहीतर असं कर आठवड्यातून एक दिवस जाऊच नकोस.
तेवढा एक दिवस आपण गरीब राहू.>>> हे असं मलाही वाटायचं लहानपणी..

मस्त!

Happy
कालच रात्री आमच्या घरी झालेला संवाद
'तुम्हाला नोकरी का लागली?; एकदम डायरेक्ट दणका!
'का लागली म्हणजे? आम्ही खूप अभ्यास केला म्हणून' - त्याची आई 'संस्कार' करायची एक संधी सोडत नाही!
'तसं नाही, म्हणजे तुम्ही घरी रहा दोघेही, मला मावशी बोअर करतात'
'अरे पण त्या तुझी किती काळजी घेतात'
'पण तुम्ही घरी रहा, मग आपण गप्पा मारु'
'पण नोकरी नाही केली तर हॉट व्हील्स घ्यायला पैसे नसतील'
आता मात्र शांतता पसरली आणि तो विचार करतच झोपला!

Pages