काळा घोडा

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 27 March, 2014 - 07:25

आधी Dark Horse ही काय संकल्पना आहे ते ठाऊक नसणार्‍यांकरिता:- घोड्यांच्या शर्यती प्रेक्षक दुरून पाहत असता त्यांना काही घोडे विजयाच्या टप्प्यात आल्यासारखे आढळतात. त्यांच्यापैकीच एखादा विजयी होणार यावर ते अंदाज बांधून पैजदेखील घेतात. असे चर्चेत असणारे किमान पाच सहा घोडे असतात आणि बहुतेकवेळा त्यापैकीच एखादा विजयी होतो. कधी कधी मात्र या चर्चेत नसणारा एखादा घोडा विजयी होतो. हा घोडा अचानक कुठून येतो? सुरुवातीपासून तो कधीच पहिल्या पाचात नसताना अचानक एकदम मागून पुढे येतो का? तर तसे नाही. तो सुरुवातीपासूनच पहिल्या पाच सहांमध्ये असतो परंतु तो गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा असल्याने इतर उजळ रंगाच्या घोड्यांकडे जसे प्रेक्षकांचे लक्ष असते तसे याच्याकडे नसते. हीच ती डार्क हॉर्स संकल्पना.

सध्या २०१४ च्या लोकसभा निवडणूकांचा हंगाम आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. त्यांच्यापैकी एखादा पंतप्रधान होऊ शकतो हे खरेच परंतु त्यांच्याव्यतिरिक्त देखील एखादा उमेदवार अचानक पंतप्रधानपदी आरूढ होणे शक्य आहे. गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहिला तर १९९६ मध्ये १३ दिवस, १९९८ मध्ये १३ महिने आणि १९९९ मध्ये साडेचार वर्षे पंतप्रधान पदावर राहिलेले अटलबिहारी वाजपेयी यांचा अपवाद वगळता इतर सर्वच उमेदवार ( पी. वी. नरसिंह राव, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल व मनमोहन सिंह दोन्ही वेळा) हे अगदी अनपेक्षित रीत्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहेत.

यावेळीही नरेन्द्र मोदी, राहूल गांधी, नितीशकुमार ही नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. मायावती, मुलायमसिंह आणि ममता बॅनर्जी यांचीही या पदाविषयीची आकांक्षा जाहीर आहेच. शरद पवार स्वत: नाही म्हणत असले तरी त्यांच्या वतीने त्यांच्या पक्षातील नेत्यांप्रमाणेच नाना पाटेकरांसारखे अभिनेतेही आग्रही आहेत. मनमोहन सिंह काही बोलत नसले तरी त्यांना स्वत:ला पुन्हा एक टर्म करायची इच्छा आहेच (खरे तर त्यांना इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंचाही विक्रम मोडायचाय). अरविंद केजरीवालना राज्य पातळीवर लॉटरी लागली होतीच तशीच आता पुन्हा राष्ट्रीय पातळीवर लागेल अशी अपेक्षा असणारच. दिग्विजय सिंह पुन्हा पुन्हा सुषमा स्वराज यांचे नाव घेत आहेत. जयललिता या प्रादेशिक नेत्या असल्या तरीही देवेगौडांप्रमाणेच त्यांनाही तिसर्‍या आघाडीत सामील होऊन पंतप्रधान होण्यास वाव आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असा कोणी नेता आहे का की जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला डार्क हॉर्स ठरू शकेल? अर्थातच माध्यमांनी त्याचे नाव पंतप्रधान पदाचा संभाव्य उमेदवार म्हणून झळकवले असेल तर तो शर्यतीत तर राहील परंतु डार्क हॉर्स ठरू शकणार नाही.

तेव्हा ज्याच्या नावाची पंतप्रधान पदाकरिता अद्याप चर्चा झालेली नाही असा माझ्या मते संभाव्य उमेदवार म्हणजे राजनाथ सिंह. या निवडणूकांवर अगदी सुरुवातीपासून लक्ष दिले असता असे आढळून येते की, नरेन्द्र मोदी यांना भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून विनाअट आणि विनातक्रार सर्वशक्तीनिशी पाठिंबा देणारी पहिली व्यक्ती म्हणजे राजनाथसिंह. नरेन्द्र मोदींना अडवाणी, स्वराज, अशा अनेक दिग्गजांचा सुरुवातीपासून प्रचंड प्रमाणात विरोध होता. हा विरोध मोडून काढत तगडा पाठिंबा राजनाथ सिंह यांनीच दिला. राजकारणात, युद्धात, व्यापारात (आणि प्रेम सोडून इतर सर्वच प्रकरणांत) कोणीच कोणाकरिता काहीच फुकट करीत नाही. मग राजनाथसिंहानी मोदींकरिता अचानक एवढे सर्व का करावे? तर माझा अंदाज असा की, मोदीच्या नावावर त्यांनी गुजरातेत केलेल्या विकासाच्या बळावर जनतेकडे मते मागावी, भरघोस जागा मिळवाव्यात आणि भाजपला विजयाच्या समीप आणून उभे करावे. जर भाजपला पाठिंब्याकरिता काही जागांची गरज पडलीच तर इतर पक्षांचा पाठिंबा मिळविताना पुन्हा नरेन्द्र मोदींची आक्रमक हिन्दुत्ववादी ही प्रतिमा प्रसारमाध्यमांद्वारे ठळक करावी म्हणजे नरेन्द्र मोदींचा पर्याय बाजुला पडून इतर नेत्यांची नावे विचारात येतील परंतु यातही मोदींच्या पसंतीचा उमेदवार म्हणून स्वत:ची वर्णी लावून घ्यावी. तसेच जर भाजपला संपूर्ण बहूमत मिळाले तर मोदींच्या जीवाला धोका आहे असे सांगून त्यांच्या सुरक्षिततेकरिता त्यांच्याऐवजी आपणच पदावर आरुढ व्हावे असा काहीसा या भाजपाध्यक्षांचा डाव असू शकतो. २००४ मध्ये संपुआला बहुमत मिळूनही सुषमा स्वराज आदींच्या जोरदार विरोधामुळे सोनिया गांधी पंतप्रधान न होता आकस्मिक रीत्या मनमोहन सिंह पंतप्रधान झाले होते त्या प्रसंगाशी साधर्म्य राखत यावेळी राजनाथ सिंह यांना पंतप्रधान बनणे शक्य आहे.

http://at-least-i-think-so.blogspot.in/2014/03/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजप ला पुर्ण बहुमत मिळणे अशक्यप्राय गोष्ट वाटते. मोदी पंतप्रधान व्हावेत असे भाजप मधल्याच किती लोकांना वाटतं ? तेही अशक्यप्राय जरी भाजप कडॅ जास्त जागा आल्यातरी. एकच गोष्ट फिक्स आहे ती म्हणजे त्रिशंकु लोकसभा. आणि ती किती त्रिशंकु ( किती अस्थिर) आहे त्यावर पुढील निवडणुका.
त्यामुळे पंतप्रधान हा अबसोल्युटली डार्क हॉर्स. कदाचित त्यांचे नाव वरच्या लिस्टीत नसेलही. Happy

अजुन एक राहुल गांधी आणि मनमोहनसिंग या दोघांना त्या पदात काही इंटरेस्ट असेल असे वाटत नाही.

<< त्यामुळे पंतप्रधान हा अबसोल्युटली डार्क हॉर्स. कदाचित त्यांचे नाव वरच्या लिस्टीत नसेलही. >>

निश्चितच! ज्याचे नाव चर्चेत नाही त्यालाच तर डार्क हॉर्स म्हणतात. तेव्हा चर्चेत अजून नावे येऊ द्या.

अजुन एक राहुल गांधी आणि मनमोहनसिंग या दोघांना त्या पदात काही इंटरेस्ट असेल असे वाटत नाही.>> +१

मागे माबोवरच कोणितरी म्हटल्याप्रमाणे UPA ला तेवढ्या जागा मिळाल्या तर सुशीलकुमार शिंदेंची लॉटरी लागू शकते

लेख आवडला. पण कोणालाही स्पष्ट बहुमत मिळेल असं वाटत नाही. तिसर्‍या आघाडीचा कोणीही सोम्या गोम्या आयत्या वेळीथोड्या काळासाठी पंतप्रधान होऊ शकेल!

धन्यवाद mandard, साती, मनीष आणि ज्योति_कामत.

@ ज्योति_कामत

<< तिसर्‍या आघाडीचा कोणीही सोम्या गोम्या आयत्या वेळीथोड्या काळासाठी पंतप्रधान होऊ शकेल! >>

हो पण ह्या डार्क हॉर्सचे नाव सूचवा की..

अगदी सहा महिन्यापूर्वी पर्यंत मलाही मोदी पीएम न होता ऐनवेळी भाजप पक्षाचे पितामह आडवाणी यांना पुढे करेल असे वाटत होते मात्र आता मोदी पीएम होतील अशी शक्यता वाढली आहे.ऐनवेळी मोदींना डावलले तर कार्यकर्त्यांचे मोराल डाऊन होईल. त्यामुळे अगदी बहुमताची जुळवाजुळव करताना मोदिन्चा अडसर झाला तरी भाजप सहजासहजी मोदिन्चा दावा झुगारणार नाही. तरीही अगदीच वेळ आली तर आडवाणी, राजनाथ सिंग, रमण सिंग किंवा अगदी मनोहर पर्रीकर आले तरी आश्चर्य वाटायला नको. यापैकी कुणीही पीएम झाले तरी ते पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील याची शक्यता कमी आहे. मोदी आणि त्यांचा गट शिवराज चौहान, सुषमा स्वराज, जेटली यांच्या नावाला विरोध करेल.मात्र पुढचा पंतप्रधान एनडीएचाच होईल हि शक्यता सर्वाधिक आहे. मोदी हेच सर्वात मजबूत दावेदार आहेत.
बाकी तिसर्या आघाडीकडून नवीन पटनाईक,जयललिता ही नावे येवू शकतात.जयललिता यांना डाव्यांनी अनेकदा समर्थन दिले आहे.ममता बाईना डावे पक्ष तर मुलायमना मायावती/लालू आणि खुद्द सोनिया मान्यता देणार नाहीत म्हणून या दोघांची शक्यता कमी आहे.नवीन पटनाईक आणि जयललिता त्यांच्या त्यांच्या राज्यात मजबूत स्थितीत असल्याने त्यांचे चांगल्या संख्येने खासदार निवडून येवू शकतात.ही बाब नितीशना लागू होत नाही म्हणून त्यांचे पण नाव घेतले नाही.बिहारमध्ये जेडीयु ला जोरात फटका बसेल असे सगळे सर्वे सांगत आहेत.