"नंदा".... नाव उच्चारताच चित्रपट शौकिनांच्या नजरेसमोर तरळतो एक भोळाभाबडा, तजेलदार डोळ्यांचा आणि पाहाणार्याला क्षणात रडविणारा तर दुसर्या क्षणाला हसविणारा एक देखणा चेहरा. अशी एक अभिनेत्री जी नेहमी चर्चेत राहिली ती एका अभिनेत्रीपेक्षाही "छोटी बहीण" या रुपात....बेबी नंदा याच नावाने....वयाच्या ७५ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला असला तरीही तिची आठवण रसिकांच्या हृदयी राहील ती तिच्या सदैव हसर्या नजरेचीच. १९५६ मध्ये पडद्यावर आलेल्या व्ही.शांताराम यांच्या "तुफान और दिया" या चित्रपटापासून सुरू झालेली तिची चित्रपट कारकिर्द नेहमी चर्चेत राहिल्याचे दिसते (हा चित्रपट तिच्या वडिलांना - मा.विनायक याना - पाहता आला नाही, प्रदर्शीत होण्यापूर्वीच विनायकरावांचे निधन झाले होते)....जरी तिने कधीही मधुबाला, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान अशा अभिनेत्र्यांच्या पंगतीतील प्रथम स्थान मिळविले नसले तरीही.... देव आनंद, राज कपूर, शशीकपूर, राजेन्द्रकुमार मनोजकुमार, राजेश खन्ना अशा अभिनेत्यांसमोर ती कधी नायिका म्हणून तर कधी सहनायिका या रुपात चमकली. प्रसाद निर्मिती "छोटी बहन" मुळे तिचे नाव सार्या देशात झाले ते त्यातील प्रमुख भूमिकेमुळे. दुर्दैवाने ती ह्या छोट्या बहिणीचा शिक्का कधीच पुसून काढू शकली नाही. तरीही शशी कपूर आणि राजेश खन्ना यांच्या बरोबरीने केलेले तिचे चित्रपट तिच्या चतुरस्त्र अभिनयाची साक्ष देण्यास पुरेसे आहेत.
मा.विनायक यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराच्या सात मुलांपैकी नंदा सर्वात लहान अपत्य. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर नात्याने अगदी जवळचे असलेले चित्रमहर्षी व्ही.शांताराम यानी नंदाला बालकलाकार म्हणून "तुफान और दिया" मध्ये संधी दिली आणि हा चित्रपट खूपच गाजल्यामुळे नंदाचे नाव सर्वतोमुखी झाले. जरी तिची कारकिर्द तशी आघाडीची अभिनेत्री म्हणून गाजली नसली तरी ती कधीही पिछाडीला पडली नव्हती. जितके चित्रपट मिळाले तितक्यात तिने मनःपूर्वक कामे केल्याचे आढळून येईल. नंदाच्या आठवणी म्हणजे अनेक आठवणींचा गोफ आहे, ज्यात जितके सुख तितके दु:खही. पण सार्वजनिक पातळीवर विचार करताना तिच्या कौटुंबिक आयुष्याविषयी चर्चा करणेही योग्य नाही....कारण खुद्द तिने स्वतः त्या आपल्या खाजगी जीवनावरील पडदा कधी दूर केला नाही.
देव आनंदसमवेत तिने केलेले "कालाबाजार....हम दोनो....तीन देवियां" गाजलेल्या यादीत आले तर शशी कपूरची तर ती लकी हीरॉईन होती...."जब जब फूल खिले" या चित्रपटाने तर उत्पन्नाचे रेकॉर्ड निर्माण केले आणि त्यातील "परदेसियोंसे ना अंखिया मिला ना" आजही कोणत्याही प्रेमी प्रेमिकाचे आवडीचे गीत बनून राहिले आहे. ती दिसलीही होती अतिशय सुंदर या चित्रपटात. राजकपूरसमोर ती "आशिक" मध्ये चमकली तर राजेन्द्रकुमारची "कानून, धूल का फूल" मध्ये, मनोजकुमारच्या "गुमनाम" ने देखील लोकप्रियता मिळविली तर "शोर" मध्ये ती त्याची पत्नी बनली होती. राजेश खन्नाच्या "इत्तेफाक" ने त्याच्या सुपरस्टार पदावर शिक्कामोर्तब केले पण त्याच चित्रपटाची नायिका नंदा एका वेगळ्याच रुपात पुढे आली आणि लक्षातही राहिली. पुढे प्रेम रोग, आहिस्ता-आहिस्ता, मजदूर मध्ये चरित्र अभिनेत्रीच्या रुपातही ती पडद्यावर आली होती.
वहिदा रेहमान, आशा पारेख, हेलेन, जबीन यांच्याशी असलेली मैत्री हा एक खास अध्याय होता तिच्या जीवनात. विशेषतः वहिदाशी तिची असलेली मैत्री तर नंदाच्या जीवनातील एक मोठा ठेवा. आज तिचा मृत्यू झाला पण शनिवारी ती वहिदाच्या घरीच जेवणासाठी गेली होती. आज बीबीसीशी बोलताना वहिदाने ती आठवण सांगितली. त्या दोघींच्या (तसेच आशा पारेख सुद्धा) मैत्रीच्या आठवणीबाबत कधीतरी वहिदा रेहमानच लिहू शकतील. एका मुलाखतीत नंदाने स्पष्ट केले होते की त्या स्वतःच्या जीवनातील काही आठवणींना शब्दात बांधू शकणार नाही, म्हणजेच त्यावर चर्चाही त्याना नको होती. त्या क्षणांची आठवण त्याना असह्य वाटत होती....साहजिकच त्यांच्या जीवनातील तो भाग त्यांच्या दृष्टीने बंदच असणे गरजेचे वाटत होते....योग्यही असेल ते.
आपला अभिनय हेच आपले जीवन मानणार्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत शांत जीवन जगलेल्या या अभिनेत्रीच्या स्मृतीत रसिक राहील.
नंदाने मनमोहन देसाईंशी लग्न
नंदाने मनमोहन देसाईंशी लग्न केले होते ना?
नेमक्या शब्दात छान ओळख करून
नेमक्या शब्दात छान ओळख करून दिलीत .
मस्त आहे लेख मामा.. आत्ताच
मस्त आहे लेख मामा.. आत्ताच फेबुवर वाचुन तिथे लाईकुन आले तर इथे पण आला लेख...
@ रॉबिनहूड.... मनमोहन देसाई
@ रॉबिनहूड....
मनमोहन देसाई यांच्याशी तिचे लग्न ठरले होते....त्या अगोदर दोन वर्षे ते एकमेकांना ओळखत होतेही.... पण लग्नाचा योग काही आला नाही जुळून....दुर्दैवाने म्हणतो. त्या अगोदरच मनमोहन देसाई गेले होते.....त्यानंतर नंदाने तो विषय कधीच छेडला नाही. अखेरपर्यंत ती एकटीच राहिली.
मामा वाईट बातमी. नंदा मला खूप
मामा वाईट बातमी. नंदा मला खूप आवडायची.
रॉबिनहूड, मनमोहन देसाईंशी लग्न ठरले होते, होण्याआधी मनमोहन हे जग सोडून गेले.
मामा लेख अतिशय सुरेख लिहिलात.
मामा लेख अतिशय सुरेख लिहिलात. तुमच्या कोल्हापूरचीच होती ना ती.
मामा, प्रेमरोगमधली तिची आईची
मामा, प्रेमरोगमधली तिची आईची भूमिकापण खूप गाजली.
मामा, लेख आवडला. आत्ताच बातमी
मामा, लेख आवडला.
आत्ताच बातमी आली आणि तुम्ही तपशीलवार लेख लिहून इथे प्रकाशित केलाही याचे कौतुक वाटले.
मामा, मस्त लेख. माझ्या
मामा, मस्त लेख. माझ्या आजोबांना बेबी नंदा खुप आवडायची.
ठहरिये होश में आ लूं तो चले
ठहरिये होश में आ लूं तो चले जाईयेगा.. हे तिचं आणि शशी कपूरचं गाणं अप्रतिम आहे.. हम दोनों मधेही आवडली होती..
छान अभिनेत्री होती ही. शांत, लो प्रोफाईल म्हणता येईल.
छोटासा या क्षणाला साजेसा लेख... वरचं छायाचित्रही सुंदर आहे नेहमीप्रमाणेच..
सुवर्णकाळातले एकेक मोहरे गळून पडायला लागले..
वत्सला.... खरं आहे.....
वत्सला....
खरं आहे..... योगायोग सांगायचाच झाला तर वहिदा रेहमान, नंदा, हेलेन आणि साधना यांचा अलिकडील काळातील एक फोटा मला गुगलवर पाह्यला मिळाला होता....त्यावेळी का कोण जाणे असे वाटले होते की या चौघींच्या मैत्रीवर काही लिहावे का...? पण नंतर लक्षात आले की नंदानेच त्या मैत्रीविषयी जाहीरपणे काही बोलण्यास नकार दिला होती. कलाकार जरी ते असले तरीही काही गोष्टीतील त्यांचे खाजगीपण आपणही जपले पाहिजे हे आपल्याला पटेल....मग तो विषय राहिला बाजूला. अर्थात नंदाची कारकिर्दही अगदी लख्खपणे माझ्यासमोर होतीच....ती आज तिच्या जाण्यामुळे नजरेसमोर आली, जी लागलीच शब्दबद्ध केली...इतकेच.
अन्जू....होय. कोल्हापूरचीच ती....आजही शाहुपूरी भागात त्यांचे (म्हणजे मास्टर विनायक यांचे) टुमदार असे घर आहे..... लोकल बस सर्व्हिसचा "विनायक बंगला" या नावाने फेमस असा बस स्टॉप आजही अस्तित्वात आहे इथे.
सई.... मिलिअन्स ऑफ
सई....
मिलिअन्स ऑफ थॅन्क्स.....हे गाणे सदोदित माझ्या मनी गुंजत असते....जब जब फूल खिले पेक्षाही.... या गाण्यातील शशी कपूरची सहजता...खट्याळपणा....आणि नंदाचे "मला समजते हं सारे...चोरा" असा भाव आणणारी अदाकारी....सारेच अगदी आपुलकीच्या पडद्यातील भाव.
इथल्या रसिकांसाठी यू ट्यूबची ही लिंक..... रफी आणि सुमन कल्याणपूर
http://youtu.be/XG87I3smQL8
<<खुद्द तिने स्वतः त्या
<<खुद्द तिने स्वतः त्या आपल्या खाजगी जीवनावरील पडदा कधी दूर केला नाही<< उत्कृष्ठ लेख .
ठहरिये होश में आ लूं तो चले
ठहरिये होश में आ लूं तो चले जाईयेगा.. हे तिचं आणि शशी कपूरचं गाणं अप्रतिम आहे. >>>> येस्स .....
मामा - सुरेख शब्दांकन - चांगला आढावा घेतलात तिच्या कारकिर्दीचा ...
सुंदर लेख, समयोचित
सुंदर लेख, समयोचित श्रद्धांजली !
"जब जब फूल खिले" हा माझा आवडता चित्रपट, त्याची गाणी एव्हरग्रीन !
मला नंदा म्हंटले की 'ये समा,
मला नंदा म्हंटले की 'ये समा, समा है ये प्यार का, किसिके इंतजार का, दिल ना चुराले कही मेरा, मौसम बहार का' हेच गाणं आठवत.
श्रद्धांजली.
सुंदर लेख मामा..
सुंदर लेख मामा..
अप्रतीम लेख मामा! आधी वाटले
अप्रतीम लेख मामा! आधी वाटले सहज लिहीलय,.(आधी लेख पूर्ण वाचला नव्हता) पण प्रतीक्रिया आधी झर्कन वाचल्यावर लक्षात आले की नन्दा आता नाहीये.:अरेरे:
लहानपणी जेव्हा हिन्दी सिनेमे आईबरोबर बघत असे तेव्हा पहिला आठवणारा हिन्दी सिनेमा पारसमणी आणी दुसरा हा छोटी बहेन. खूप वाईट वाटले होते तो सिनेमा पहाताना. कारण त्यात ती अपघातात दृष्टी गमावुन बसते, मग तिला खूप अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागते. का कोण जाणे, पण तोच सिनेमा कायम लक्षात राहीला, आणी नन्दा पण. किती छान आणी सुटसुटीत आपलेसे वाटणारे नाव.
सई खरच खूप धन्यवाद.:स्मित: हे माझे अतीशय आवडते गाणे.
नन्दाला विनम्र श्रद्धान्जली.
छान लेख! अभिनेत्री नंदाला
छान लेख!
अभिनेत्री नंदाला भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रद्धांजली. फक्त इत्तेफाक
श्रद्धांजली.
फक्त इत्तेफाक पाहीलाय. बाकी गाणी पाहीलीत नंदा यांची.
तिचा सुनिल दत्तसोबतचा कोणता
तिचा सुनिल दत्तसोबतचा कोणता चित्रपट? 'बहुत उदास हूं'वाला? त्यात ती अपंग असते तो... मी पाहिलेला नाही पण बाबांनी त्याची गोष्ट सांगितली होती म्हणुन माहितीये.
सई.... तू "आज और कल" बद्दल
सई....
तू "आज और कल" बद्दल बोलत आहेस. पु.ल.देशपांडे यांच्या "सुंदर मी होणार" या नाटकावर आधारित वसंत जोगळेकर यांचा हा चित्रपट.
खुप छान लेख अशोकजी, नंदाचे
खुप छान लेख अशोकजी, नंदाचे राजेश खन्नाबरोबरचे 'द ट्रेन' आणि 'जोरुका गुलाम' हे चित्रपटपण छान चालले. द ट्रेन मधले 'गुलाबी आंखे जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया' हे गाणे बघताना खरेच तिचे डोळे गुलाबी आहेत का ते निरखून पहिल्याचे आठवले.
श्रद्धांजली.
मला पण नंदा म्हणलं की
मला पण नंदा म्हणलं की शिकार्यावर एकटीच ये समां गाणारी धुंद प्रेमिका आठवते. फार लहान वयात हे गाणं पाहिलं आणि गाणं आणी ती दोन्ही आवडलंच.
सुची आणि दक्षिणा.... तुम्ही
सुची आणि दक्षिणा....
तुम्ही निवडलेले तीनही चित्रपट मी पाहिले आहे. हे आणि अन्यही चित्रपट पाहाताना एक गोष्ट पक्की जाणवते की, नंदाने या सार्या चित्रपटात अंडरस्कोअर पद्धतीने आपले रोल्स अदा केले आहेत. कुठल्याही चित्रपटात ती नायकाला वरचढ दाखविली गेली नाही....हा तिच्या व्यक्तिमत्वातील दोष होता की नायकांचा अरेरावीपण असे हा काही संशोधनाचा विषय नव्हे. मीनाकुमारी वैजयंतीमाला वहिदा रेहमान ह्या नायिका आपल्या भूमिकांबद्दल सक्षम असायच्या....त्यानाही चित्रपटात तितकेच महत्व जितके नायकाला...वैजयंतीमालाचे तर कित्येक चित्रपट असेही होते की त्याना जवळपास नायिकाप्रधानच म्हटले गेले. नंदाने मिळालेल्या भूमिका निभावल्या इतके मात्र म्हणता येईल.
मामा.. सुंदर लेख! मी तर फक्त
मामा.. सुंदर लेख!
मी तर फक्त गाणी बघितली आहेत.. चित्रपट माहित नाहीत
श्रद्धांजली..
अशोक., खूप छान, समयोचित लेख.
अशोक., खूप छान, समयोचित लेख. नंदा, आवडती अभिनेत्री. 'आपको दिलमें...' खूप वर्षांनी बघितले. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण सोज्वळता वाटायची.
वा, नेहमीसारखेच छान लिहिलेत
वा, नेहमीसारखेच छान लिहिलेत मामा, अभ्यासपूर्ण, उत्कंठावर्धक आणि तरीही अतिशय संयमित
शुगोल....धन्यवाद.... तरीही एक
शुगोल....धन्यवाद....
तरीही एक दुरुस्ती सुचवावी वाटते. भाभी की चुडिया या चित्रपटातील ते गाणे मीना कुमारी यांच्यावर चित्रीत झाले आहे. त्यात सीमा होती...नंदा नाही. नंदावर अशाच रितीचे एक गाणे आहे ते "प्रभू तेरो नाम...." हम दोनो चित्रपटात.
लिंक : http://youtu.be/bKv5xfmVRO8
अशोक, धन्यवाद! संपादित केलाय.
अशोक, धन्यवाद! संपादित केलाय. माझा 'भाभी' व 'भाभीकी चुडियाँ' यात गोंधळ झाला. नंदा 'भाभी' नावाच्या सिनेमात आहेत. त्यातील आवडते गाणे...
http://www.youtube.com/watch?v=HyUP1NwVj4U
आज और कल चित्रपटातलं हे गाणं देखील खूप आवडतं आहे...
http://www.youtube.com/watch?v=M1l52x3wXYw
Pages