शोषित योद्ध्या - भाग ३

Submitted by बेफ़िकीर on 25 March, 2014 - 01:54

http://www.maayboli.com/node/48052 - शोषित योद्ध्या - भाग पहिला

http://www.maayboli.com/node/48083 - शोषित योद्ध्या - भाग दुसरा

"मला जन्माला घाला असा मी काय अर्ज केला होता काय? मला जन्माला घातलेत कारण तुम्हाला तुमच्या म्हातारपणची सोय करून ठेवायची होती. पण म्हातारपणी तुम्ही हे असले आडमुठेपणाने, हेकटपणाने वागाल, आमच्याच प्रगतीच्या मार्गात अडथळा बनाल, आम्हालाच बचतीतून पैसे द्यायचा नाहीत आणि सतत आजारी पडाल हे आम्हाला कोठे माहीत होते? आम्ही आमचे आयुष्य जगायचे तरी कधी? अजुन तर आमचे आयुष्य साधे सुरूही झालेले नाही आहे तुमच्यामुळे! त्यामुळे तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवत आहोत. म्हणे आम्ही तुला जन्म दिला आणि तू हे काय करतोयस!"

कित्येक घरांमध्ये आढळणारी ही कहाणी! जन्मदात्या आईबापांचे लोढणे संसारात नको म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांना महत्वच न देणे, त्यांच्या तोंडावर त्यांचा पाणउतारा करणे, अनेक ठिकाणी तर अश्या ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमात पाठवणे हे अगदी आम प्रकार असलेला आपला हा समाज! आई बापांच्या किंवा जो कोण एकटा उरला असेल त्याच्या डोळ्यांचे पाणी आटत नाही. पण मुलाला, सुनेला, मुलीला, जावयाला त्याचे सोयरसुतक नसते. मग त्या आई बापांना आठवते त्या मुलांना जन्म देण्याआधीपासूनच, त्यांचा जन्म होणार ही सुवार्ता समजल्यापासून त्यांच्या संसारात आलेला अवर्णनीय आनंद! प्रसववेदना, तान्ह्या बाळाचे रडणे, पूर्णपणे आपल्यावर विसंबून असणे, रांगणे, उभे राहणे, पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस! आपल्या पुढच्या पिढीला सक्षम बनवेपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील प्रत्येक पायरीला आपण घेतलेला सहभाग, सहन केलेली दु:खे, लढून मिळवलेला आनंद आणि त्यातून मिळणारे जवळपास पारमार्थिक पातळीचे समाधान! पण ह्या सगळ्यावर पाणी फिरवणारी मुले आता तरुण असतात आणि त्यांच्यापुढे आपले काही चालत नसते. मग स्वतःलाच भार झालेले आपले कृश शरीर तितक्याच कृश पायांवर पेलत घरातून निघून अश्या ठिकाणी जायचे जेथे आधीपासूनच अनेक समदु:खी जगत असतात. मग त्यांच्यातलेच एक व्हायचे. वाट बघत राहायची, मुलगा कधी येतो भेटायला!

पण मित्रांनो, ही दुर्दवी कहाणी जगणारे वृद्ध हे निदान जाणते असतात, त्यांनी जग पाहिलेले असते. त्यांच्या डोळ्यासमोर अशी अनेक उदाहरणे आधीपासून असतात. आपलेही असे होऊ शकते व झाल्यास काय करायचे ह्याच्या योजना मनात कुठेतरी निद्रिस्त पातळीवर अस्तित्वात असतात. हे वृद्ध अबोध नसतात. फक्त विकलांग असतात. त्यांचा कणा मोडलेला असतो, पण ह्या कण्यावर त्यांनी जवळपास ऐन भरातले सगळे आयुष्य उपभोगलेलेही असते. त्यांच्या मुलांचे वर्तन समर्थनीय मुळीच नसते, पण बदलत्या काळात निदान हे नागरिक आर्थिक आघाडीवर तरी बर्‍यापैकी स्वतंत्र असतात हे वाईटातील चांगले!

पण एखाद्या अबोध बालकाला त्याच्या पालकांनी जन्म झाल्या झाल्या त्यागले तर? आपल्याला झालेले मूल बलात्कारातूनन झालेले असल्याने समाज त्याच्यासकट आपल्याला स्वीकारणार नाही असे वाटून डिलीव्हरीच्या तिसर्‍याच दिवशी आईने ते मूल देवळात, झाडाखाली किंवा कचर्‍यात फेकले तर? मुलीला लहान वयात लग्नाआधीच दिवस गेले हे समजल्याने घरातून तिला मारहाण करून हाकलून दिलेले असले आणि ती कालांतराने कुठेतरी अशीच प्रसूत झाली आणि तिने ते जिवंत बालक फेकून दिले तर?

मग तर नक्कीच त्या बालकांना हे म्हणण्याचा अधिकार आहे ना? की 'आम्ही काय अर्ज दिला होता का आम्हाला जन्माला घाला म्हणून?'.

बलात्कार आणि कुमारी माता हे कोणत्याही समाजाला लागलेले शाप आदिम आहेत. हवा, पाणी, अन्न, वस्त्र व निवारा ह्या गरजा अर्ध्यामुर्ध्याही भागल्यानंतर जी शारीरिक भूक आठवते तिचे शमन करण्यासाठी त्या त्या समाजात त्या त्या काळी उपलब्ध असलेले वा नसलेले मार्ग कायदेशीरपणे वा बेकायदेशीरपणे चोखाळणे ही सहज प्रवृत्ती प्राचीन काळापासून डोके वर काढतेच. कायदे व त्यांची अंमलबजावणी ह्यांची व्यापकता किंवा अपुरेपणा ह्यावर अवलंबून त्या त्या समाजात ह्या गुन्ह्यांचे प्रमाण घटताना वा वाढताना दिसते. सहसा ह्यात स्त्रीचा बळी जातो. अत्याचारही सहसा स्त्रीवर होतात, निसर्गाच्या रचनेमुळे ह्या अत्याचारांची परिणती, म्हणजे गर्भ राहणे, हेही स्त्रीला सहन करावे लागते. तिला स्वीकारण्यात समाजाला सहसा अडचणच येते, ह्यातही पुरुष तुलनेने किंवा बहुतेकदा सुरक्षित राहतो. प्रायश्चित्तही सहसा स्त्रीलाच घ्यावे लागते व अनेकदा तिच्यापोटी जन्मलेल्या बालकाला!

कितीही जवळच्या माणसाने ओळख करून दिली, तरीही एका परक्यासमोर इतक्या कमी वयात सोसायला लागलेले हे निंद्य आणि लज्जास्पद घटनाक्रम वर्णिण्यास कोणतीही मुलगी तयार होणार नाही. अर्थातच, मला कुमारी माता व बलात्कारिता ह्यांची थेट भेट घेता आली नाही. मात्र अनेक अश्या वेश्यांना भेटलो ज्यांनी त्यांच्यावर झालेल्या बलात्कारांची पूर्ण माहिती दिली. समाजाची एक विकृत गंमत आहे. ज्या स्त्रीला समाजाने लाज सोडायला लावली तिच्यासमोर बसून तिच्याशी संवाद साधायची त्याच समाजाला लाज वाटते. ह्याचे कारण जेव्हा अशी स्त्री बोलते तेव्हा तिचे शब्द आसूडासारखे झोडपतात. मग समोर बसलेला कोणीही असो!

ह्या वेश्यांनी, ज्या पूर्वाश्रमीच्या वेश्या होत्या किंवा आजही शरीर विक्रय करतात, त्यांची त्यांची कहाणी मला सांगितली. एक अबिदा म्हणून तीस वर्षाची मुलगी सध्याही शरीरविक्रय करून जगते. पण स्नेहालयातर्फे योग्य ते वैद्यकीय सहाय्यही घेते.

तिची कहाणी अशीच संतापजनक!

चौदाव्या वर्षी निकाह झाल्यावर तिला थेट ऊसतोडणीला पाठवले. चौदा वर्षाच्या मुलीला ते काम काय जमणार? काम जमेना म्हणून मारहाण होऊ लागली. पण अबिदा मोठी हुषार होती. चार पाच दिवस मारहाण सहन करून ती एक दिवस उसातच लपून बसली. आतल्याआतच फिरत राहिली. शोधाशोध झाली, पण अबिदा सापडली नाही. अबिदा सकाळपासून रात्रीपर्यंत पाण्याचा घोटही न घेता उसात बसून राहिली. मात्र रात्र झाल्यावर अर्थातच तिची हिंमत ओसरली. आता हिंमतीची जागा भीतीने घेतलेली असली तरीही सकृतदर्शनी तसा कोणताच धोका नसल्याने अबिदा अंग चोरून थंडीत तशीच बसून राहिली. चक्क दुसरा दिवस उजाडला. दुसर्‍याही दिवशी ऊन तापेपर्यंत अबिदा उसातच बसून हुलकावण्या देत राहिली. हे अविश्वसनीय वाटेल, पण आज जे अबिदाला बघतील त्यांचा विश्वास नक्कीच बसेल ह्यावर! दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मात्र अबिदा उसातून अंधारात बाहेर पडली आणि कोणत्यातरी बसमध्ये बसून सातार्‍याला विनातिकीटच पोचली. तेथे गेल्यावर मात्र तिच्या गळ्यात काहीतरी होते ते तिने विकण्याचा प्रयत्न केला. रात्री ही एकटीच मुलगी काय करत आहे ह्याचे आश्चर्य वाटून अर्थातच काही मोकार मंडळी तिच्यावर लक्ष ठेवून बसली. त्यातीलच एकाने रात्रभर तिला आसरा दिला, स्पर्श मात्र केला नाही. दुसर्‍या दिवशी तो तिला घेऊन अहमदनगरच्या रेड लाईट एरियात आला. तेथे त्याने तिला विकून टाकले. तेथे भजी पाव खाऊन अबिदा तीन दिवस मजेत राहिली. येथे काय चालते ह्या वास्तवापासून अनभिज्ञ असलेल्या अबिदाला चौथ्या दिवशी मात्र फार मोठा धक्का बसला. तिला एका ग्राहकाबरोबर एका खोलीत पाठवण्यात आले. तोवर निरोध वापराबाबत जागृती झालेली असल्याने त्या ग्राहकानेच तिला निरोध लावून देण्याची सूचना केली. घाबरलेली अबिदा खोलीतून पळून पुन्हा कुंटणखान्याच्या मावशीकडे आली. त्या दिवशी तिला सांभाळून घेतले गेले. मात्र दोनच दिवसांनी त्याच गिर्‍हाइकाबरोबर तिला पुन्हा खोलीत पाठवण्यात आले. ह्यावेळी मात्र तिच्यावर बलात्कार झाला. अनेक दिवस तो माणूस येतच राहिला. अबिदाला दिवस गेले आणि कालांतराने ती प्रसूत झाल्यावर तिचे मूल तिथेच ठेवून तिची पाठवणी नाशिकला करण्यात आली. तिथे तिची विक्री झाली आणि तिथून नंतर पुढे मुंबईलाही तिची विक्री झाली. एखाद्या कमोडिटीप्रमाणे हस्तांतरीत होता होता अबिदाला एक यार भेटला आणि त्याच्यासोबत पळून ती पुन्हा नगरला आली तोवर त्या मुलाचा काहीही अतापता राहिलेला नव्हता. मात्र तपास केल्यानंतर समजले की एका संस्थेने त्याला नीट पाळलेले आहे. मग त्याच संस्थेत अबिदाही येऊ जाऊ लागली. आता तिचा तो यार तिच्याशी लग्न करणार आहे. माझ्याकडे त्या दोघांचाही एक हासरा फोटो आहे. दु:खाचे अनेक खंदक पार करून त्या दोघांनी स्वतःसाठी सुखाची एक छोटीशी गढी उभारायचा प्रयत्न केलेला आहे. आता अबिदा लवकरच व्यवसाय सोडणार आहे. अल्लाह करो आणि त्यांची स्वप्ने पुरी होवोत.

मात्र ते बालक? ते बालक एका संस्थेने सांभाळले म्हणून जिवंत राहिले. आणि मुख्य म्हणजे ते बालक आईपासून वेगळे केलेले होते ते भलत्याच लोकांनी!

ज्या बालकांना आईच सोडून जाते ती? तीन दिवसांची मुलगी, महिन्याचा मुलगा, पंधरा दिवसांची मुलगी! त्यांना काय समजणार की आपण जिवंत आहोत म्हणजे काय? आपण का आहोत? आपले काय होऊ शकेल? कुत्री मांजरीसुद्धा ज्यांच्या नरडीचा घोट केव्हाही घेतील अशी ही बालके जेव्हा केव्हा कोणाला सापडतात तेव्हा ते लोक त्यांना स्नेहालयात आणून सोडतात. स्नेहालय त्या बालकाबाबत एक, म्हणजे एक प्रश्नही विचारत नाही. त्या बालकाची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्याला सुरक्षित वातावरणात हालवले जाते. उपचार केले जातात. अन्न पुरवले जाते. त्या बालकाचा तेथील परिचारिका, इतर स्टाफ, संस्थेचे पदाधिकारी ह्या सर्वांनाच लळा लागतो. मग एक दोन वर्षांनी वयोगटानुसार व न्यायिक प्रक्रियेनुसार इच्छुक मातापित्यांना ते बालक दत्तक म्हणून दिले जाते. ही दत्तक देण्याची प्रक्रिया संपूर्णपणे कायदेशीरच आहे असे नसून त्या दांपत्याच्या सर्व क्षमतांचा बारकाईने अभ्यास स्वतः श्री गिरीश कुलकर्णी करतात. मनाचे समाधान झाल्याखेरीज संस्थेतील बालक कोणाही अप्रिचित हातांत सोपवले जात नाही.

त्या बालकाचा इतिहास सांगितला जाऊ शकतो. म्हणजे कोठे मिळाले, मिळाले तेव्हा केवढे होते, काय उपचार केले वगैरे! मात्र त्याची जन्मकहाणी माहीत असली तरीही सांगितली जात नाही. ही गुप्तता पाळणे अत्यावश्यक आहे.

ही बालके कोण असतात?

बरेचदा बलात्कारातून जन्माला आलेली, अनेकदा लग्नाचे किंवा नोकरीचे आमीष दाखवून केलेल्या संभोगातून जन्माला आलेली तर काही वेळा असफल प्रेमाची परिणती शरीरसंबंधात होऊन जन्माला आलेली! ह्या बालकांच्या आगमनाच्या वार्तेवर पेढे वाटले जात नाहीत, सूतक पाळले जाते. ज्या आईच्या गर्भात ती असतात त्या आईची काळजी घेतली जात नाही, तिला मारहाण करून हाकलून दिले जाते व पुन्हा स्वीकारले जाणार नाही अशी धमकी दिली जाते.

ह्या शोषित योद्ध्या आणि त्यांची शोषित योद्धे असलेली ही बालके समाजाच्या सर्वांगीण विकासाचे दावे करणार्‍या आपल्या नेत्यांपुढे, कायद्यांपुढे, अंमलबजावणीपुढे आणि एकुणच तथाकथित नैतिकतेपुढे एक ठळक प्रश्नचिन्ह निर्माण करतात.

ही बालके गोंडस असतात, त्यांचाही तितकाच लळा लागू शकतो जितका आपल्याला आपल्या मुलांचा लागतो. त्यांच्याही डोळ्यात मायेची निरागस तहान असते. फक्त त्यांचे हक्काचे आईबाप नसतात. 'जगवलंत तर आम्हीसुद्धा जगू' असे म्हणत असतात ही बालके!

हा लेख येथेच संपवत आहे.

पुढील लेखात आमीर खानने स्नेहालयाला केलेल्या मदतीचा आढावा व इतर काही फॅक्ट्स बघूयात!

===========

-'बेफिकीर'!

IMG_0361.JPGIMG_0364.JPGIMG_0366.JPGIMG_0367.JPGIMG_0368.JPGIMG_0369.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या घट्ना पेपरमधे त्रयस्थपणे वाचणे निराळे नि प्रत्यक्ष
तुम्ही अनुभवलेले लिखाण या लेखमालेतून वाचत रहाणे निराळे !!
फार फार अस्वस्थ वाट्त रहातं हे सारं नुसत वाचूनसुध्दा Sad

फार फार अस्वस्थ वाट्त रहातं हे सारं नुसत वाचूनसुध्दा Sad +१
ते शेवटुन दुसर्या फोटोतील बाळ कित्ती गोड आहे.

बेफी,......... शब्दच नाहीत. स्नेहालयाला सलाम्.. माबो सद्स्य वर्गणी काधुन काही मदत करता आली तर..