बाटली- सोडालेमनची

Submitted by bnlele on 18 March, 2014 - 23:30

आमचे कुटंब बर्‍यापैकी मोठ; सगळ्यात मोठा भाऊ आणि त्याचा परिवार त्याच्या प्रकाशकाच्या व्यवसायामुळे विदर्भात स्थाईक होता. पण, बाकीचे आम्ही चार भाऊ आणि तीन बहिणी आई-वडिलांसोबत जबलपूरला एकत्र रहात होतो.
वडील सुप्रसिद्ध गणिततज्ञ आणि शिक्षणशास्त्रि होते. सदैव शिक्षण आणि समाजकार्यात गुंतलेले असायचे. व्यासंगी पण कुठलही व्यसन नव्हत. अगदी सुपारीची सुद्धा चीड होती. घरात धाक आणि समाजात दरारा जबरदस्त. सर्व थरातील प्रतिष्ठित आणि सामान्य व्यक्ति त्यांचा सल्ला किंवा मदत घेण्यासाठी घरिपण भेटीला यायचे. गोलबाजारातल्या एका प्रशस्त घरात आमचे वास्तव्य होते. भेटीला येणारी सर्व मंडळी घराबाहेर सुमारे अर्धा फर्लांग दूरच्या म्युनिसिपालटीच्या नळावर खुळखुळून चुळा भरून मगच यायची. अगदी कमिश्नर,कलेक्टर, न्यायाधीश सुद्धा आवर्जून ती शिस्त पाळायचे. एकदा ब्रिटिश राजवटीतले गव्हर्नर लॉर्ड ट्वायनम देखिल सपत्निक
त्यांच्या भेटीला आल्याच दृष्य डोळ्यासमोर आहे.
आई मात्र सदैव घरकामात किंवा आलागेल्याची बडदास्त अशा कामात दडलेली म्हणून त्या धाक-दरार्‍यातून सूट मिळण्याचा
पर्याय आम्हा भावांना क्वचित मिळायचा; बहिणींना त्याची आवश्यकताच नव्ह्ती. आई फक्त सातवी उत्तीर्ण होती. तिनीच मुळाक्षर हात
धरून गिरवून शिकविल्याच आठवत. पण शिक्षाशास्त्रि वडिलांनी तिला पुढे का शिकवल नाही हे कोड आजवरही सुटल नाही. .
सोडालेमनच्या निळ्या बाटलीत कंठाशी काचेची गोळी आतल्या द्रवात दडविलेला गॅस रोखून असते तद्वत ! असो.
मोठ्या कुटुंबाच्या गरजा देखिल अनेक आणि भरपूर; वर्षाची बेगमी करून ठेवण्याची प्रथा होती. धान्य,चिंचा,डाळी,गूळ, तूप, लाकुडफाटा वगैरे सर्व निवडून व्यवस्थित भरलेले हवे. उन्हाळ्याच्या दोन महिन्याच्या सुट्टित आम्हा भावंडांना या कामावर जुंपवून ठेवलेल असायच. स्वैपाकघराला लागून मोठ कोठीघर होत.त्यात तीन्ही भींतीलगत दोन-दोन मण साठ्याच्या गॅल्व्हनाईझ्ड शीट्सच्या कोठ्या ओळीनी खाली पाटांवर उभ्या आणि वर भिंतीला रुंद-लांबलचक फळ्या त्याच धर्तिचे चॉकोनी पाच-दहा शेराच्ये डबे होते. ते सर्व स्वछ करून उन्हात तापवून त्यात निवडलेल धान्य वगैरे रचायच. फोडलेली चिंच एका चिनिमातीच्या माठासारख्या हंडीत भरायची ही शिस्त.
उन्हाळ्यात झोपण्याची व्यवस्था म्हणजे घरा समोरील पटांगणात ओळीनी खाटां. आतल्या घडवंचिवर रचलेल्या गाद्या,
उषा,पलंगपोस,चादरी आणून अंथरूणं घालायची; मग, बासांच्या कैचीत गुंडाळलेल्या मच्छरदाण्या लावायच्या त्या आधि अंगणात पाणी शिंपून घ्याव लागे. सकाळी पाच-सहाला वडिल हातातल्या काठीनी ढोसाळून उठवायचे. स्वतः नित्यकर्म आटोपून बाहेर जाण्याच्या तयारीत असता आम्हाला फर्मान सोडायचे--
"चला उठा,अंथरूण-पांघरुण आवरून प्यायच-वापरायच पाणी भरा ! उशीर नको, ऊन तापण्या आधि झाल पाहिजे"
पाणी भरण एक तासाची सांघिक कसरत होती. नळाला पाणी नसायचच. पटांगणाला लागून असलेल्या मोठ्या विहिरीच घ्याव लागे.
विहिरीच पाणी उपसायला मालकांनी ढुकोई नावाच उपकरण लावलेल होत. निमुळत्या आकाराचा २५-३० फूट लांबीचा ओंडका विहिरी लगत एका फलक्रम वर-खालि-वर करता यावा असा लावलेला होता. निमुळत्या टोकाला जाड दोर होता;अन्‌ दोराच्या दुसर्‍या टोकाला बादली बांधून पाणी उपसायच. ओंडक्याच निमुळत टोक विहिरीच्या मध्यात आकाशाकडे तोफेच्या नळकांड्या सारख डागलेल दिसायच. दोराच दुसर टोक विहिरीच्या काठाला वार्‍यावर हेलावून गुदगुल्या करेल इतक लोंबलेल. विहिरीच्या व्यासावर, दोन ओंडके अडिच-तीनफुट अंतरावर स्थिर-समांतर राहतील अशी रुंद फळी ठोकून ठेवलेले होते. दोराला बादली बांधून त्या आधारे ओंडक्यावरून चालत जाऊन मध्य भागी त्या फळीवर ऊभे राहून पाणी उपसायच आणि काठाला लावलेल्या पन्हाळीतून बादली ओतायची.
पाणी उपसायच काम माझ, आणि, इतर सर्वांनी हंडे, बादल्या भरून न्हाणीघरातले दोन ड्रम,बंब लहान-मोठ्या बादल्या-तपेली अंदाजे शंभर पावलांवर न हेंडकाळता नेऊन भरायाची. प्रत्येकाला सुमारे दहा फेर्‍या वापरण्याचा साठा करायला, आणि नंतर, चार फेर्‍या पिण्याचे पाणी भरायला लागायच्या. पिण्याच पणी लठ्याच्या जाड कापडाच्या दुहेरी घडीतून गाळून घ्यायचा नेम होता आणि त्यावर आईची देखरेख असायची. एव्हाना परत आलेले वडील घरातील खोल्यांच्या "फरशीवर सांडलेल पाणी पुसा"ची आठवण द्यायचे.
जलभरण चालू असताना आम्ही भाऊ वेळ काढून आंघोळ पण करून मोकळे व्हायचो, न्याहरी रेंगाळत , गप्पा करत खायला मिळावी म्हणून.पण तशी संधि नेहमीच मिळत नसे. सरते शेवटी वडिलांचा तपासणीचा हुकुम - लहान-मोठी सर्वे भांडी भरली कि नाही बघा नीट. त्यावर धाकटा मिस्किल भाउ म्हणायचा --- "चुळा भरून घ्यारे सगळे" आणि हसु पिकायचे.
रणरणत्या उन्हात बाहेर कुठे जाण अशक्य. जेवणानंतर झोप - पण तीही कधी कठिण वडिलांच्या योजनेत सांघिक कांमांची मोठी यादी असायचीच.वर्षाचा गहू,तांदूळ, डाळी सर्वांनी मधल्या हॉलमधे बसून निवडायचे,दोन दिवस ऊन दाखवून डब्यात भरायचे; उन्हात चादरीवर ठेवलेल धान्य चिमण्या-पारव्यांपासून वाचवण्यासाठी पाळीपाळीनी थोड्या आडोस्याला पण गरम झोताचा मारा सहन करत बसायच. मात्र, हॉलमधे एका चौरस टेबला खाली पितळी फॅन ठेवून टेबलाभोवति ओल कापड गूडाळून थोडा गारवा करण्याची आमची शक्कल बर्‍यापैकी उपयोगी होती.
भिंतिलगत पंगत लावून, प्रत्येका सोबत धान्य निवडायला ताटं,सूप तर चिंचा फोडण्यासाठी पाटा,उलटा खल किंवा फरशीचा तुकडा, आणि छेनी-हतोडा सारखे उपकरण ठेवायच, ग्रुहौद्योगाच वर्कशॉप दोन तास अस चालायच.
वडील आणि आम्ही मुल उघडबंब बसून अधुनमधुन बोलत किंवा वडिलांनी विचारलेल्या मौखिक गणितांच उत्तर द्यायचा परिपाठ होता. वडिल काम करताना स्वतःच्या पाठीवर ओल्या टॉवेलचा फटका मारून घाम पुसून घेत;वार्‍यावर वाळलेला टॉवेल त्यांना पाण्यात पिळून द्यावा लागे. घामानी भिजलेल्या त्या टॉवेलचा वास - कल्पना सुद्धा असह्य !
मधेच केव्हातरी दोनदोन बैलगाड्या लाकूडफाट्यानी गच्च भरलेल्या अंगणात ओतलेल्या दिसायच्या-- वर्षाच्या सरपणाचा साठा !
सकाळी पाणी भरून झाल कि आम्ही दोघ भाऊ ओंडकी चिरायला युद्धपातळीवर सज्ज. चोरीला जाण्याची भिति म्हणून. कुर्‍हाड, मोठ्ठी छेनी- हतोडा,लोखंडी बार अशी दमदार हत्यार पारजून! स्वैपाकघरातील चुलिसाठी, न्हाणीघरातील बंबासाठी वेगवेगळ्या आकारात चिरायची. इतर भावंडांनी वाहून एका खोलीवजा जागेत रचून ठेवायची - पण त्या पूर्वी ओल येऊ नये म्हाणून फरशीवर मोठी ओण्डकी अंथरून त्यावर. गरम पाण्यासाठी
बंब, भुश्याची शेगडी, असे पर्याय वापरात म्हणून दगडीकोळसा,भूसा यांचा साठाही त्याच जागी रचण्याचे अवधान आवश्यक होते.
कामाची सक्ति असली तरि ती शिक्षा वाटायची नाही. कंटाळा आला तर झाब्बु किंवा सत्तिलावणीचे डाव., भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा,
थंडगार आमरसाच्या अम्रर्याद वाट्या असे अनेकविध पर्याय असायचे. या सर्वाला प्रेमाचा जाड थर जास्त सुखाचा होता.
लेमनच्या बाटलीतली बूच गोळी किंचित हलली -- गेले ते दिन गेले !
अशाच शिस्तीत वडिलांनी आम्हा मुलांना बाजारमास्तर घडवल. शरातल्या घाऊक बाजारातून गहू,तांदूळ, डाळी, तेल पारखून बरण्या-पोती सायकलवर लादून - प्रसंगी सायकल हातानी रेटून पाई घरी याव लागे. लाज नव्हे याचा आभिमान वाटायचा आम्हाला
कारण ओळखी-अनोळखी कौतुकच करायचे.
एकदा भर दुपारच्या रणरणत्या उन्हात सायकलवर हॅंडलला मोठ्या बरण्या,कॅरियरवर दहापंधरा शेर धान्य घेऊन घरच्या वाटेवर
असता घसा खूप कोरडा झाला होता. "चमन सोडा" अशी पाटी दिसली. दुकानात गिर्‍हाइकांची तुंबळ होतीच. कोरड जरा जास्तच जाणवू लागली. सायकलवर बसल्य्बसल्या खिसा तपासला. विजारीच्या खोल कोपर्‍यात पिवळ दोन आण्याच एकमेव नाण सापडल.
त्या काळि सोडालेमन दोन आण्यालाच मिळत असे.त्या आनंदाच शब्दांकन अशक्य आहे.
दुकानाच्या डवीकडे काउंटर वर रंगिबेरंगी पेयांच्या मोठ्या बाटल्य रचलेल्या - एक सुखद आकर्षक आमंत्रण पण मागे उभ्या मालकाच्या भेदक-चौफेर तीक्ष्ण नजरेच कवच टोचणार होत.. दोन-तीन पायर्‍यांवर टेबल-खुर्च्यांची वेटोळी गिर्हाइकांनी अडवलेली.
पेयांच्या बाटल्यांचा फसफसाट आणि पोर्‍यांचा सुळसुळाट दिसत होता. उजवीकडे सायकल ठेवायला लोखंडी स्टँड प्ण होता.
हातात दोन आण्याच नाण दाखवून पोर्‍याला इशारा केला. सायकलवर सामान असल्यामुळे मनात आल सीटवर बसल्यबसल्या लेमन
घ्याव. पोर्‍यानी नाण घेतल आणि मालकाचा कायदा -- बसलेल्या गिर्‍हाइकालाच पेय देण्याचा असल्याच सांगितल.
नाइलाजास्तव सायकल स्टँडला लावली आणि सोईच्या खुर्चित बसलो.स्टँडवर अजून सायकलींची काढघाल बेचैन करीत होती.
थंडगार लेमनचा आस्वाद आणि तुशार मनाला सांत्वन देणारा. काळजी आणि समाधान - दोन द्रवांच अद्भुत मिश्रण !
घाईनी लेमन संपवून सायकल कडे वळलो. तेव्हढ्यात एक पोर्‍या माझा हात धरून लेमनचे पैसे द्या म्हणून थैमान घालू लागला.
आधिच दिलेत यावर त्याचा विश्वास बसेना. अजून देईन म्हटल तर खिस्यात होते कुठे? काऊंटर मालक नुसता बघत होता आणि तो पोर्‍या पिंगा घालत होता. बसलेले गिर्‍हाईक बघ्याच्याच्च भूमिकेत. अचानक ज्या मुलानी माझी पिवळी दुअन्नी घेतली होती त्यानी पैसे मिळाल्याची ग्वाही दिली आणि माझी सुटका झाली.
भरलेल्या सोडालेमनच्या बाटलीची बूच-गोळी खाली दाबली गेली आणि आठवणीं फेसाळून बाहेर पडल्या. आयुष्याच्या उतरणीवर क्षणिक सावली मिळाल्याच अपूर्व समाधान !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users