कोयना एक्सप्रेस

Submitted by पराग१२२६३ on 15 March, 2014 - 14:23

बऱ्याच वर्षांनंतर कोल्हापूरहून पुण्यासाठी येण्यासाठी मी कोयना एक्सप्रेसचा पर्याय निवडला. कोल्हापूर-पुणे असो की पुण्याहून आणखी कोठेही जाणे असो रेल्वे हा माझा कायमच पहिला पर्याय असतो. अलीकडे मात्र कोल्हापूरहून पुण्याला येण्यासाठी कोल्हापूर-निजामुद्दीन, कोल्हापूर-अहमदाबाद अशा गाड्यांनी येणे-जाणे होत होते. म्हणूनच १४ मार्च २०१४ रोजी मात्र मुद्दाम कोयना एक्सप्रेस निवडली. निजामुद्दीन आणि अहमदाबादच्या गाड्या सुरू होईपर्यंत हिच गाडी माझी पहिली पसंती असे. कारण कोयनाचा दिवसाचा प्रवास आहे.
१४ मार्चला कोयना पकडण्यासाठी सकाळी पावणेआठ वाजता कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकावर पोहचलो. नेहमीप्रमाणे पहिल्या फलाटावर कोयना उभी होती. आदल्याच दिवशी आरक्षण केले होते. पूर्वी या गाडीला कोल्हापूरच्या प्रवाशांची फारशी पसंती नसे. कारण ही गाडी खूप वेळ घेत असे. त्यावेळीही मी या गाडीने नियमित प्रवास करत असे. त्यावेळी आरक्षण करून प्रवास केला की, सर्वजण आश्चर्यचकीत होत असत, ते याचमुळे. पुढे रेल्वेच्या प्रवासीभाड्यात बरीच वर्षे वाढ केली गेली नाही. दुसरीकडे बसचे भाडे दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. दरम्यानच्या काळात कोल्हापूर-पुणे मार्गावरील रेल्वेच्या सिग्नलिंग यंत्रणेतही सुधारणा झाली आहे. जुन्या सेमाफोर सिग्नलिंगची जागा इलेक्ट्रॉनिक सिग्नलिंगने घेतली आहे. या मार्गाचे काँक्रीट स्लीपर्सचे कामही पूर्ण झाले आहे. नवी इंजिनेही आली आहेत. परिणामी कोयना एक्सप्रेसचा प्रवासही सव्वातासाने कमी झाला आहे. बस आणि रेल्वेच्या भाड्यातील मोठ्या फरकामुळे या गाडीचे प्रवासीही बरेच वाढले आहेत, अगदी कोल्हापूरपर्यंत.
१४ मार्चला कोयना एक्सप्रेस कोल्हापूरहून ठीक ७.५५ वाजता सुटली. कृष्णराजपुरम शेडच्या डब्ल्यू.डी.पी.-४बी क्र. ४००१६ या इंजिनाने आमच्या गाडीच्या अश्वाची भूमिका बजावली. वलिवडे, रुकडी येथील थांबे घेत हातकणंगल्यात आल्यावर काही क्षणांत तुडुंब भरलेल्या ५१४४१ सातारा कोल्हापूर पॅसेंजरचे क्रॉसिंग झाले. पुढे मजल-दरमजल करत मिरजेत कोयना २ मिनिटे उशीरा पोहचली. त्यावेळी आमच्या गाडीसाठी पुण्याची दोन डब्ल्यूडीजी-३ए इंजिने जोडलेली एक मालगाडी (बीसीएन डब्यांची) थांबवून ठेवली होती. आमची गाडी पहिल्या फलाटावर येताच ती निघाली, कदाचित कोल्हापूरकडे किंवा बेळगावकडे. मिरजेत आधीचे बरेच जण उतरले, काहीच चढले. तशी गाडी रिकामी होती. अजून परीक्षा सुरू आहेत ना. मिरज म्हटल्यावर गाडीत एकदम इडली-वडा, चहा, वडापाववाल्यांचीही झुंबड उडाली. मिरजेत अपेक्षेपेक्षा जास्त वेळ (वीस मिनिटे) थांबल्यावर कोयना पुढच्या प्रवासासाठी निघाली. त्यानंतर या गाडीतून नियमित अप-डाऊन करत चहा, वडापाव, पाणी, बिस्कीटं विकणाऱ्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या.
सांगलीत आल्यावर आमच्या प्रवासातील तिसरे क्रॉसिंग झाले. कोयना पहिल्या फलाटावर थांबल्यावर २३ डब्यांची १६५०७ जोधपूर-बेंगळुरु सिटी जं. एक्सप्रेस कृष्णराजपुरमच्या डब्ल्यूडीपी-४बीच्या साथीने तिसऱ्या फलाटावर आली आणि आमची कोयना सुटली. आता इथून पुढे कोयना खरोखरच एक्सप्रेसप्रमाणे धावणार होती. कारण सकाळची गाडी असल्याने कोल्हापूर ते सांगलीदरम्यान ती सगळ्याच स्टेशनवर थांबते. दोन थांब्यांनंतर ताकारीला आल्यावर तेथे ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसला लाईन क्लिअर नसल्यामुळे थांबवून ठेवल्याचे दिसले. एकाच मिनिटामध्ये दोन्ही गाड्या तेथून विरुध्द दिशेने सुटल्या. कराडला येईपर्यंत पुन्हा कोयना पाच मिनिटे लेट होती.
कराडनंतर मसूर येथे कोयना एक्सप्रेससाठी एक इंजिन (डब्ल्यूडीजी-४ क्र. १२०५६) आणि एक मालगाडी (बीसीएन डब्यांची पुण्याच्या दोन डब्ल्यूडीजी-४ इंजिनांसहीत) थांबवून ठेवण्यात आली होती. आम्ही तेथे फलाटावर येताच एकट्या इंजिनाला मिरजेच्या दिशेने लाईन क्लिअर मिळाली. दरम्यानच्या काळात मी रेल्वेच्या खानपान सेवकाची वाट पाहू लागलो. या गाडीला पँट्री कार नसली तरी पूर्वी साताऱ्याच्या आधी तो सेवक जेवणाच्या ऑर्डर घेत असे आणि वाठारला प्रवाशांना जेवण पुरविले जात असे. ही सेवा आता बंद झाल्याचे यंदा लक्षात आले. मात्र कराड-सातारा दरम्यान येणारा वयस्कर भेळवालाही दिसला. मी आयुष्यातील एकट्याने केलेला पहिला प्रवास कोयना एक्सप्रेसनेच केला होता. तेव्हापासून गेली वीस वर्षे हा विक्रेता या गाडीत येत आहे. तसा आणखी एक जण साताऱ्याचे कंदी पेढे घेऊ येतो, तोही असा पूर्वीपासूनचा लक्षात राहिलेला विक्रेता.
दरम्यानच्या काळात तपासनीस (चेकर) प्रवाशांची तिकिटे तपासत काही जणांकडून अतिरिक्त रक्कम घेत होता. माझ्या पुढे बसलेल्यांचे तिकीट तपासून त्यांच्याकडूनही साठ रुपयांची मागणी केली. त्यावेळी त्या प्रवाशांना शंका आली म्हणून त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्याने सांगितले की, संगणक यंत्रणेतील त्रुटींमुळे ठराविक दिवशी आरक्षित केलेल्या तिकिटांचे शुल्क कमी आकारले गेले आहे. ही त्रुटी लक्षात आल्यावर उर्वरित फरक आरक्षण चार्टवर दर्शवण्यात आला असून चेकर फरक गोळा करत आहे. त्याची रितसर पावतीही तो देत होता. चेकरबाबत शंका आल्याने त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचा रोख चेकरच्या लक्षात तो वैतागून म्हणाला की, जादा पैसे मागायचेच असते तर मी पाचशेही मागितले असते, साठ रुपयेच कशाला मागीन.
कोरेगावलाही एका मालगाडीचे क्रॉसिंग झाले. आम्ही येताच तीही मिरजेच्या दिशेने निघून गेली. या सर्व घडामोडींमध्ये कोयना साताऱ्यात १२ मिनिटे उशीरा आली आणि निघाली. त्यानंतर लगेचच जरंडेश्वरला गाडीचा वेग कमी झाला आणि गाडी लूप लाईनवर गेली आणि थांबली. तेव्हा लक्षात आले की, निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेसचे क्रॉसिंग होणार आहे. ती गाडी पुण्याच्या डब्ल्यूडीएम-३ए सोबत धडधडत निघून गेली. मात्र या क्रॉसिंगमध्ये १५ मिनिटे गाडी लेट झाली. वाठारला आमची वाट पाहत उभी असलेली ५१४०९ पुणे-कोल्हापूर पॅसेंजर आम्ही येताच सुटली.
वाठारनंतर या प्रवासातील एक रोमहर्षक भाग आला. अवघड वळणांचा घाट आला होता. वाठार, आदर्की आणि सालपा या स्थानकांदरम्यान हा घाट असून तेथे दोन बोगदे आहेत. पहिला बोगदा ओलांडल्याबरोबर लगेचच आदर्कीच्या डिस्टंट सिग्नलकडे माझे लक्ष गेले. डबल-यलो म्हणजे आदर्कीत गाडी थांबणार आहे किंवा लूप लाईनवरून पुढे जाणार आहे हा त्याचा अर्थ. मला वाटले कदाचित मालगाडी येणार असल्याने आम्हाला तेथे थांबावे लागणार आहे. वाठार आणि आदर्की स्थानकांच्या दरम्यान असलेल्या डोंगररांगांना प्रचंड मोठा वळसा घालत गाडी आदर्की स्थानकात शिरली. या डोंगररांगा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील खंबाटकी घाटाचाच एक भाग आहेत. आदर्कीत लक्षात आले की, कोयनेसाठी मुख्य मार्गावर एक ट्रॅक मशीन आणि दोन डब्ल्यूडीजी-४ इंजिने डिटेन करण्यात आली होती. त्यामुळे लूप लाईनवरून आम्ही परत मेन लाईनवर येत कोयना परत बोगद्यात शिरली. या बोगद्यातच यू-टर्न घेत ती पुढचा प्रवास करू लागली. त्यानंतर मी एका विक्रेत्याकडून कांदा भजी घेतली. मला ती आवडलीही. भूक लागली होतीच, पण असा प्रवास एन्जॉय करत असताना भूकेकडे लक्ष गेले नव्हते.
जेजुरीत सात मिनिटे उशीर झालेल्या आमच्या कोयनेला पुण्याहून काँक्रीट स्लीपर्स घेऊन आलेली एक मालगाडी भेटली. तेथून निघाल्यावर मुंबईहून कोल्हापूरला निघालेली आमची भगिनी कोयना एक्सप्रेस आम्हाला दौंडजमध्ये क्रॉस झाली. तोपर्यंत रोज अप-डाऊन करणारे विक्रेतेही नाहीसे झाले होते. कारण आता त्यांना जेजुरीतून परतीसाठी डाऊन कोयना पकडायची होती. थोड्याच वेळात या प्रवासातील आणखी एक रोमांचक भाग आला – शिंदवणे घाट. वेडीवाकडे वळणे घेत, छोट्या-मोठ्या पुलांवरून, बोगद्यांमधून वाट काढत कोयना पुण्याकडे निघाली होती. शिंदवणे स्थानकात चार डब्ल्यूडीजी-४ इंजिने आमच्याला वाट मोकळी करून देण्यासाठी लूप लाईनवर डीटेन करण्यात आली होती. हे स्थानक पार करताच कोयनेने आणखी वेग घेतला. आळंदीला ५१४१० कोल्हापूर-पुणे पॅसेंजरचे प्रवासातले शेवटचे क्रॉसिंग झाले. तिला ओलांडत आमची कोयना एक्सप्रेस पुण्यात १० मिनिटे आधी १५.३० वाजता फलाट क्र. पाचवर थांबली. त्यावेळी ११००८ पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस फलाट क्र. चारवरून सुटण्याच्या तयारीतच होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही Happy

मस्त लिहीले आहे. आवडले डीटेल वर्णन. कोयना आता एक दीड तास कमी लावते कोल्हापूर-पुणे मधे हे माहीत नव्हते. क्रॉसिंग च्या गाड्या, कोणती इंजिने इ वर्णने अस्सल "रेल फॅन्स" साठी कायमच इंटरेस्टिंग असतात.

त्याभागाची माहिती लहानपणी कोळशाच्या इंजिनाच्या सह्याद्रीने दोनदा केलेल्या प्रवासाइतपतच आहे. ते ही दोन्ही वेळेस रात्री.

शिंदवणे घाटाचा सध्याचा ट्रॅक हा अनेक वर्षांपूर्वी कदाचित एखादा जुना रूट बदलून केलेला आहे काय? शिंदवणे गावाजवळच्या डोंगरात काही बोगद्यांसारख्या गुहा दिसतात. त्या बघितल्या की पूर्वी येथे एखादा रेल्वे रूट असावा असे नेहमी वाटायचे. त्या गावात मी काही वेळा गेलेलो आहे. पण रेल्वे त्या गावाच्या किती जवळून जाते लक्षात नाही.

नीरा, किर्लोस्करवाडी ई स्टेशनांबद्दल वर्णन दिसले नाही. तेथे थांबत नाही काय?

खूपच आवडले. इतक्या तपशीलवार माहितीमुळे हा लेख म्हणजे एक महत्त्वाचा दस्त-ऐवज बनला आहे. जुन्या काळच्या फ्रंटिअर मेलच्या प्रवासाचे वर्णन वाचले आहे. ते वाचताना आपणही त्या काळात शिरून गाडीबरोबर धावतो आहोत असे वाटते. गाडीतले विक्रेते, अन्नपदार्थ, भेळ, गाडी 'साय्डिंग'ला जाणे,वाटेत ओलांडून गेलेल्या आणि थांबून राहिलेल्या गाड्यांची/इंजिनांची वर्णने यामुळे रेल वे च्या प्रचंड जाळ्याचा आवाका लक्षात येतो. भारतातल्या १६ एप्रिल १८५३ रोजी धावलेल्या पहिल्यावहिल्या रेल गाडीचे वर्णन आज जितके रोचक ,रोमांचक आणि मनोरंजक वाटते, तितकेच हेही आणखी काही दशकांनंतर वाटेल. या लेखाचे माहितीमूल्य मोठे आहे. यात थोडी भर म्हणजे प्रत्येक स्थानकाची आणि तिथल्या प्रवाश्यांची खासियत, खिडकीतून दिसणारा टापू, ओझरती दिसलेली फळे-फुले-पिके, काही भांडणाचे अथवा सौहार्दाचे प्रसंग अशा काही गोष्टींची भर पडली तर हे एक पर्फेक्ट डॉक्युमेंटेशन होईल. आपल्या मराठीमध्ये अशा स्थानिक आणि तपशीलवार प्रवासवर्णनांची वानवा आहे .विकास आणि सामाजिक बदल यांची माहिती पुढच्या पिढ्याम्पर्यंत पोचवायची तर अशी डॉक्युमेंटेशन्स आवश्यक आहेत.
फार पूर्वी एक इंग्लिश कविता वाचली होती. त्यात ब्रिटनमधल्या जुन्या काळच्या रेल प्रवासाचे वर्णन होते. 'ईच इज् अ ग्लिम्प्स अँड गॉन फॉर एवर' ही त्यातली शेवटची ओळ लक्षात राहिली आहे.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. कोयना नीरा, किर्लोस्करवाडी अशा स्थानकांवर थांबते. पण तेथे फारसे वेगळे काही घडले नाही म्हणून त्यांचा उल्लेख वर्णनात आलेला नाही. हां, नीऱ्याला एक बदल निश्चित जाणवला - एकही अंजीरवाला दिसला नाही. शिंदवणे आणि आदर्की घाटात जुन्या मीटरगेजचे काही अवशेष आजही स्पष्टपणे दिसतात.

Srd,
जगभरात रेलफॅन नावाची एक जमात आहे. रेल्वेवर जीवापाड प्रेम करणारी. रेलफॅनांकडूनच असे लेख लिहिले जातात. Happy

पराग,
मराठीत रेलफॅनिंग करणारं कोणी असेल, याची कल्पना नव्हती. कृपया अजून लेख येऊ द्या. Happy

पराग१२००१ आणि चिनूक्स ,रेलफैन या संदर्भात हा लेख मी वाचलाच नाही आणि प्रवासाचे अनुभव फक्त या कोयनेलाच येणार नाहीत .त्यांनी जी एंजिनाची नावे दिली ती मग योग्यच आहेत .
आपल्याकडे साडेचार आणि सहा हजार अश्वशक्तींची डिझेल एंजिने वापरतात .आदर्कि वाल्हा धोंडसचा कमी चढाचा असला तरी घाटच आहे आणि एकच एंजिन एकोणिस डबे खेचते .तसेच बंगळुरू ची उद्यान गाडीला हिंदूपूरचा घाट लागतो .

पूर्णा ते रतलाम मिटर गेजचे ब्रॉडगेज न करण्याचे एक कारण म्हणजे ही मिटरगेज एंजिने टाकावी लागतील .

माथेरानच्या मिनीट्रेन (नैरो गेज)चे एंजिन सातशेपन्नास अश्वशक्तीचे आहे .

१)आपल्याकडे कोणत्या रेल्वे परिमंडळात एंजिनांची विविधता आहे ?
२)एंजिनचा कोणता नंबर संदर्भासाठी घ्यावा आणि त्याची तुलना कोणत्या वेबसाईटवर मिळेल ?
३)विंटेज कार आणि विमानाचे स्पॉटिंगपेक्षा हा छंद जमण्यासारखा आहे .
४)जर्मनीत दोघा भावांनी बनवलेल्या रे म्युझियममध्ये जगातल्या पाच सहा स्टेच्या गाड्यांच्या खऱ्या प्रतिकृती आहेत .पंधराशे गाड्या धावतात .(टिव्हीवर अर्धातासाची फिल्म पाहिली आहे .)
५)फोटोसह एखादा लेख टाका मग आम्हीपण गाडीत झोपा काढणार नाही एंजिने पाहू .

उत्तम वर्णन. बालपणीचे दिवस आठवले!

माझ्या आईचे माहेर चिक्कोडी. मावशी निरा आणी पुण्याला आम्ही मुम्बै ला. आम्ही सगळे मिरज वरुन कोयना पकडत असु. त्याकाळी कोयना मिरज पर्यन्त जात असे.
गाडीत आम्ही भरपुर धमाल करत असु.

अर्र निरेला एकही अंजीरवाला नाही, फारच वाईट.
मिरजेला इडली-वडा चटणी अजून द्रोणात मिळते का?

ह्या मार्गावरच्या प्रत्येक स्थानकावर थांबायचे असेल तर कोल्हापूर पुणे पॅसेंजरसारखी उत्तम गाडी नाही. मी कॉलेजात असताना बहुतेकवेळा ह्याच गाडीने प्रवास केलेला आहे. पुण्याहून सकाळी ६-७ ला निघाली की दुपारी चार-पाचला मिरजेत पोचते. प्रत्येक स्थानकावर मनसोक्त थांबते, अगदी कधी कधी मालगाडीला सुद्धा सायडींग देते Happy तिकीट मात्र रु. ३६ असे.

१९८३ साली मी, नणंद आम्ही दोघी १९ वर्षाच्या व साबा, साबू असा चौघांनी हा प्रवास केला होता. सांगली परेन्त.
स्टेशन्स खूप मजेशीर आहेत. आणि मिरजेस उतरलो. मिरज गावाचा संगीताशी जवळचा संबंध अस ल्याने उगीचच जास्त आपुलकी वाट्ते. त्यात सांगली सासर!

शिवरात्रीचे दिवस होते. ज्यांना भेटायला गेलो होतो त्या बाईंनी - चुलत साबा साक्षात अन्नपूर्णा. हाताला चव आणि कोंड्याचा मांडा करण्याची हातोटी - उपासाला काय करू असे विचारल्यावर मी बिनधास्त साबुदाण्याचे थालिपीट असे सांगितले. आता माहेरी एका मुलास एक थालिपीट लावणे वेगळे आणि इथे सात आठ लोकांसाठी बनवणे !! , पण माउलीने एक गॅस व एक स्टो वापरून मोठ्या तव्यावर अशी अप्रतीम थालिपीठे बनवली. उपास साजरा झाला.

घरी आजेसासुबाई, तिसरीतला दीर आणि साडी नेसायला शिकव म्हणून मागे लागणारी एक नणंद. कामचोर मधला जयाप्रदाचा नाच शिकव म्हणणारी दुसरी नणंद, बारक्या भावाला शाळे साठे तयार करणारी थोरली नणंद असा मस्त गॄप होता. आम्हाला दोघींना साड्या घेतल्या. साबा खूपच वर्षांनी आईला भेटत होते म्हणून त्यांच्या पहाटे उठून चहा बरोबर गप्पा होत. दोन दिवस राहून आम्ही कोयनेनेच परतलो. ,गाडीत भेळ घेतली होती ते अजून आठवते. साबा साबू बरोबर आहेत म्हणून नीट सुने सारखे राहायचे हे माझ्या डोक्यातही आले नाही
लहान पणी पुणे मुंबई प्रवास एंजॉय करत असू तसाच हा ही केला.

परवाच शिवरात्र झाली तेव्हा त्या थालिपीठांची याद आली होती. आज हा लेख वाचला. एकदा परत कोयनेने
प्रवास केला पाहिजे. दीर आता संसारी बाबा झाला आहे. त्याला काहीतरी करून घातले पाहिजे. माई घाट,
गणपतीचे देउळ, बागेतला गणपती, हे सर्व फोटो बद्ध केले पाहिजे.

रेल फॅन बद्दल अगदी अगदी. ती धक धक मनाशी जोडली गेली आहे परवा एकदा दुपारी लोकलची वाट बघत असताना अ चानक ७०३१ डाउन मुंबई हैद्राबाद गाडी धाड धाड गेली. तेव्हा तर मला अत्यानंदाने रडूच आले.
जीवनाची दिशा बदलणारे अनेक प्रवास ह्या गाडीने केले आहेत.

पराग१२००१ खुप मस्त झाले आहे वर्णन.
मी पण पक्का रेलफॅन. अगदी लहानपणापासून!
अगदी फिरायला जायचे आणि रेल्वे पाहात बसायचे.
रेल्वेचा दोन रुळांच्या जोडणी मुळे येणारा तालबद्ध आवाजही आवडतो.
हल्ली हा आवाज येत नाही किंवा कमी येतो कारण त्यांना वेल्ड केले जाते.
हीरा +१

इतरही प्रतिसाद आवडले आहेत.
मलाही कल्पना नव्हती माबोवर इतके रेलफॅन्स असतील याची! Happy

डब्ल्यू.डी.पी.-४बी हे जनरल मोटर्सचे पण भारतात बनलेले इंजिन आहे.
याची ड्रायव्हर कॅबीन एसी होती पण कुण्या बाबूने ते सगळे एसी उतरवायला लावले म्हणे!

इंजिनांच्या माहितीसाठी हे पाहा
http://en.wikipedia.org/wiki/Locomotives_of_India

येथे अजून डिझेल इंजिनांची माहिती आहे.
http://www.irfca.org/faq/faq-loco2d.html

ही इएमडी ची साईट
http://www.emdiesels.com/emdweb/international/india_emd.jsp

रेल्वे ने इंजिनांची नवीन म्हणून दिलेली जुनीच माहिती येथे
http://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?id=0,1,304,36...

येथे काही इंजिनांचे संकलन दिसेल
http://railinindia.tripod.com/rail2.html

पराग,

मस्त वर्णन. १००८ डेक्कन एक्स्प्रेस ची ११००८ झाली हे माहित नाही म्हणजे मी खूपच दिवसात प्रवास केला नाहीये. अरे सगळ्या गाड्यांचे नंबर लिहिलेस कोयानेचाच राहिलाय (का माझ्या नजरेतून चुकलाय) १०३० आता ११०३० झाला असेल ना?
मस्त परत एकदा रेल्वे टाईम टेबल घेऊन तासंतास बसावसं वाटतंय. कुठल्या नव्या लोकल वाढवल्यात, संध्याकाळची डेक्कनच्या पुढची अंबरनाथ अजूनही दादर-ठाणे आणि ठाण्याला २ नंबरला काढतात का? आणि थ्रू ट्रेन चे वेळापत्रक. सकाळी लवकर उठून रिझर्वेशन काउंटर, एकाच स्लीप वर onward / return तिकीट काढता येते हे जनतेला न समजणे, मुंबईचा कोटा संपला असेल तर हुशारीने तिकीट काढणे, नंतर संगणकावर बुकिंग वेगवेगळ्या पद्धतीने साईड लोअर टाळण्याचा प्रयत्न, नेहेमी कोणाच्यातरी विनंतीने अप्पर वर झोपणे, रात्री गाडी थांबली की कुठलं स्टेशन आहे हे समजलेच पाहिजे त्यामुळे चष्मा झोपताना जवळ ठेवणे, धडपडत उठून खाली उतरून स्टेशनचं नाव बघणे. खिशात पैसे ठेवायची ऐपत आल्यावार उगाच कोणी तरी सांगितलय म्हणून भलत्या स्टेशन वर फ्लेवर्ड मिल्क पिणे. किंवा पुरीभाजी खाणे, भुसावळला इतकी बेक्कार मिळाली तरी वर्णन अप्रतिम थाटात करणे. ४५ औन्शाताला डबल पिवळा/ पांढरा हे शब्द वाचून पण _गहिवरून_ आलं. लगे रहो.

निनाद धन्यवाद .काल एक विकीहाउचा लेख वाचून सुरूवात केली .बाकीचे वाचणार आहे .सर्वात जास्ती प्रकार (भारतात ,महाराष्ट्रात) अकोला इथे दिसत असावेत ?

maaybolilaa jhaalaMy taree kaay? devanaagareetoon lihitaacha yet naahee. aaNi he aleekaDe rojachamcha jhaalaMy.koNee kaahee saaMgel kaay?

पराग, मस्त लेख. अजुन येऊ द्या. Happy

अवांतरः
हिरा, Cookies डिलीट करून पहा. मलासुद्धा हाच प्रॉब्लेम येत होता. आता येत नाही. Happy

अरे वा मस्तच वर्णन
या सगळ्या वर्णानातून सांगली - पुणे केलेला कोयनेचा प्रवास आठवला
त्यावेळी या रुटवर इतके क्रॉसींग नसायचे मात्र नेहेमी कोयना लेट्च व्हायची विशेषतः मुंबै - मिरज - कोल्हापूर येणारी कोयना हमखास १ - २ तास लेट यायची
एकदा मी माझ्या आत्याबरोबर पुण्याहून - मुंबईला कोयनेने गेलो होतो . पुण्यात कोयनेला ३-४ जनरल डबे लावले जायचे. गाडी यायच्या आधीच आम्ही त्या डब्यात जाउन बसलो होतो आणि कोयना पुण्यात आल्यावर इलेक्ट्रिक इंजिनासह ते डबे सुरवातीच्या बाजूला जोडले गेले. खुप इन्जॉय केला तो प्रवास त्यावेळेला जनरल मधेही आजच्यासारखी गर्दी नसायची

अमोल केळकर
( कोयनेचा प्रवासी)
मला इथे भेटा

छान लिहिलंय... पुण्यापुढच्या स्टेशनची नावं कधीच ऐकली - वाचली नव्हती. इतकं तपशीलवार लिहिलंय की ट्रेनमधे बसण्याची जागा आरक्षित केलेली असूनही लोकं दारात का उभे राहत असावेत याचा आपोआप उलगडा झाला. Happy

कोयना एक्सप्रेस Happy
माझ्यासाठी बालपणीच्या सुखाच्या, सुट्टीच्या काळाची आठवण मनात ताजी ठेवणारा एक महत्त्वाचा दुवा.
सुट्टीत किर्लोस्करवाडीला मामाकडे जायचो ते कोयना एक्सप्रेसनंच. तेव्हा दिवसभराचा प्रवास, सर्व स्टेशनांवर थांबणारी गाडी - याचं काहीही वाटायचं नाही.
अंधार पडण्याच्या आधीपर्यंतचा प्रवास मजेत व्हायचा. अंधार पडल्यावर मात्र शेवटचा अर्धा-पाऊण तास प्रचंड कंटाळा यायचा.
ठाण्यातून तेव्हा ९:२० की ९:३० ला सुटायची, संध्याकाळी सातच्या सुमारास कि.वाडी. (ठाण्यात परत रहायला आल्यावर कधीतरी स्टेशनवर असताना कोयना आली. अजूनही ठाण्यातलं तिचं टायमिंग साडेनवाच्या आसपासचंच आहे हे कळल्यावर भयंकर आनंद झाला होता. :खोखो:)
परततानाही साधारण याच वेळा. ९-१० वाजता कि.वाडीला चढायचं, संध्याकाळी सात-साडेसातला ठाण्यात.

दहावीची परिक्षा संपल्यावर प्रथमच मी या गाडीनं एकटी मामाकडे गेले होते. रिझर्वेशन वगैरे काहीही नव्हतं. आईनं एका बॅगेसकट लेडीज डब्यात मला ढकललं. मी बॅग पलिकडच्या दाराजवळ उभी ठेवली आणि त्यावरच बसले. संध्याकाळी ४-५ वाजेपर्यंत तिथेच बसलेले होते. मग एका काकी/मावशीनं मला "आत जागा आहे, जा की तिकडं" करून हाकललं होतं. Lol

एकदा कोयनाच्या प्रथम वर्ग चेअर कारमधून प्रवास केला होता. पण जनरल डब्यातली मजा इथे नव्हती. पण तेव्हाची एक गंमतीशीर आठवण आहे....
कसं कोण जाणे, पण त्यादिवशी घरातून निघताना आईनं सामानाबरोबर आपल्या पर्समधे मेंदीचे दोन कोन घेतले होते. पुण्याला जेवण वगैरे उरकल्यावर तिनं हळूच ते बाहेर काढले. मी आणि बहिणीनं एक-एक कोन घेऊन आपापल्या हातांवर मेंदी काढायला सुरूवात केली. आमच्या मागे काही रांगा टाकून दोन परदेशी गोरे प्रवासी बसलेले होते. त्यांनी ते पाहिलं आणि ते आपल्या जागा सोडून आमच्या मागच्या सीटसवर येऊन बसले. दोन सीटसच्या मधल्या फटीतून वाकून वाकून ते आम्ही काय करतोय ते बराच वेळ पाहत होते. देशाभिमान जागृत झाल्यामुळे मला तेव्हा फार्फार वाटलं होतं, की त्यांना मेंदीबद्दल माहिती सांगावी, पण शाळकरी वय आणि भाषा या दोन्हींपाशी गाडं अडलं Proud

प्रौढ वयात पुन्हा कधी जर तो प्रवास केला असता, तर मी देखील लेखात लिहिलेत तसे सर्व डिटेल्स टिपले असते. Happy