दु:ख्खाची कावड होते

Submitted by मयुरेश साने on 14 March, 2014 - 01:48

जुळणेही अवघड होते तुटणेही अवघड होते
थोडे सावरल्या वरती थोडिशी पडझड होते

येणार्‍या श्वासांनाही हे कळत असावे बहुदा
येताना परवड होते जाताना परवड होते

आकाश कोणते माझ्या धमन्यांतुन वाहत होते
छाटून टाकलेल्याही पंखांची फडफड होते

इतकीच हमी देतो मी नेत्यांची अन् नात्यांची
मायेच्या ओलाव्याची कोरडीच बडबड होते

माणुस व्हावे की नेता हा विचार छळतो हल्ली
नेता म्हटले की माझ्या छातीतुन धडधड होते

काहीच न सुचते तेव्हा मी तिलाच गिरवत बसतो
घन आठवणींचा फुटतो दु:ख्खाची कावड होते

.......मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकाश कोणते माझ्या धमन्यांतुन वाहत होते
छाटून टाकलेल्याही पंखांची फडफड होते<<< वा

अर्थ तुझ्या मौनाचे मी लावत बसतो तेव्हा - ह्या ओळीत दोन मात्रा कमी ...... आणि......

नेहमीचा निवडून येतो नेहमीची बडबड होते - ह्या ओळीत ३ मात्रा जास्त झाल्या आहेत.

काहीच न सुचते तेव्हा मी तिलाच गिरवत बसतो<<< मस्त ओळ आहे.

बेफ़िकीरजी.. काही सुधारणा केल्यात

आपण मात्रांच निदर्शनास आणुन दिलत त्याबद्दल आभारी आहे

मस्त आहे गजल. मतला, फ़डफ़ड, कावड- छान आहेत शेर Happy

पण शुद्धलेखनाच्या चुका आहेत. त्या मीटरमध्ये बसवण्यासाठी केलेल्या आहेत, की टायपोज आहेत? Uhoh
थोडिशी, धमन्यांतुन, माणुस, छातीतुन, दु:ख्खाची

>> आकाश कोणते माझ्या धमन्यांतुन वाहत होते
छाटून टाकलेल्याही पंखांची फडफड होते
अप्रतिम शेर.
छान आहे गझल.
फक्त दु:ख लिहा हो. : असल्यावर अजून ख ला ख कशाला? Sad