मनाचिये गुंती ………

Submitted by अनघा आपटे on 14 March, 2014 - 00:47

रात्रीचे बारा वाजलेत. उद्या सकाळी लवकर उठायचय …. असं म्हणत गायत्री मोबाईल मधला गजर बदलू जाते, तो सेव्ह करता क्षणीच त्यावर मेसेज झळकतो "This alarm has been set for 5 hours and 30 minutes from now". फक्त साडेपाच तास सुखाची झोप आपल्या हाताशी आहे. झालं! हा मेसेज पाहूनच तिची झोप उडते कदाचित. असे होणार अशी थोडी कल्पना म्हणा किंवा भीती मनात कुठेतरी असतेच.

म्हणूनच उशाशी एखादे पुस्तक असते. जेमतेम ५ तास झोप मिळणार आहे तर आज पुस्तक नको घ्यायला असे म्हणत ती डोळे मिटू पहाते. उद्याचा सारा दिनक्रम एकदा डोळ्यासमोर येतो आणि एकंदरच दिवस फार दगदगीचा असणार खात्री पटते. त्यामुळे आता तरी झोपायला हवे म्हणत ती कूस बदलते.

दुपारी ऑफिस मध्ये एका नको त्या विषयावर उगीचच झालेला वाद हळूच मनात डोकावतो. आता हा इथेच रेंगाळणार! नाही, नको आता हे सारं आठवायला. उगाळून गोष्टींचा कडवटपणा वाढतो उगीचच. पण तरी काय गरज होती कोणी आपल्याला असे काही बोलायची? एकूणच आजचा सारा दिवसच असा होता!

आज सखीचा फोन आला होता, शेवटी ती आणि रोहन घटस्फोट घेणार आहेत. तिच्या बाजूने ती बरोबर असेल, नव्हे आहेच पण आपण एकदा रोहनशी पण बोलायला हवे का?

पण त्याने कुठे या घडामोडींची आपल्याला कल्पना दिली आहे अजून? मग आपण का त्याच्याशी आपणहून या विषयावर बोलायला जावे?

ती कूस बदलून हे विचार झटकण्याचा प्रयत्न करून पाहते. पण ते जमत नाहीच. मग थोड्या वेळाने उठते, किचन मध्ये शिरून ग्लासभर पाणी पिते. पुन्हा जाऊन आडवी होते.

पण खरंतर मुळात तो आपला मित्र आहे, सखी तर मागून आली त्याची बायको म्हणून.

एकदा दोघांशी एकत्रितपणे बोलावे का? मित्र म्हणून इतका हक्क आपल्याला नक्कीच आहे. शेवटी आपण त्या दोघांच्या भल्याचाच विचार करतोय ना?

काहीही काय? तू काय स्वत:ला देव समजतेस का ग ? की उठ सुठ इतरांचा विचार तुझ्या दृष्टीकोनातून करशील आणि तू ज्याला योग्य समजतेस त्यात त्यांचे भले होईल अशीही समजूत बाळगशील?

पण त्यांनी सर्व बाजूनी विचार केलाय का? गंधार चा विचार केलाय का? दोघांच्या आई वडिलांचा? एकमेकांचा?

लहान कुकुली बाळे आहेत का ती? गेली १५ वर्षे एकमेकांसोबत आहेत ते, लग्नाआधीची पाच आणि आता लग्नानंतरची दहा. त्यांच्या भूमिकेत दोघे बरोबरच असतील ना?

पण तरीही, हे असे नको घडायला!

मग काय दोघांनी करावे काय? असेच मनाविरुद्ध एकमेकांसोबत आयुष्य काढावे का?

सखी आज बोलताना म्हणाली, "इतकी वर्षे याच आशेवर आहे मी, की केंव्हातरी गोष्टी बदलतील, पण आता हळूहळू गोष्टी माझ्या हाताबाहेर जात चालल्या आहेत. आजकाल मी माझ्या रोहनवरच्या प्रेमाची खूप मोठी किंमत मोजते आहे असे मला वाटायला लागले आहे, आणि फक्त या प्रेमापोटीच हे सारे इथेच कुठेतरी थांबावे असं मला वाटतंय. व्यसनांपायी रोहन मधला कलाकार विझत चालला आहे, आणि मी काहीही करू शकत नाही हेच माझ्यासाठी इतके त्रासदायक आहे की त्यापायी हा एकमेकांपासून असे दुरावण्याचे काहीच वाटणार नाही."

खरं आहे तिचं म्हणणं, पण तरीही घटस्फोट नको, दुसरा काही तरी मार्ग निघू देत. रोहन सहन नाही करू शकणार सखीचं अशा रितीने त्याच्यापासून वेगळे होणे.

हे त्याला इतके दिवस कळत नाहीये का? सखी इतके दिवस अनेक आघाड्यांवर लढते आहे, रोहनच असं दारूच्या आधीन होणे, त्यापायी त्याने त्याचे गाणे थांबवणे, तिची नोकरी, त्याच्या आईचे आजारपण, गंधारची शाळा, अजून काय कोणी तिच्याकडून अपेक्षा करावी. प्रेमापायी काय काय तिने सोसावे अशी अपेक्षा आहे?

ती पुन्हा उठते, दिवाणखान्यात जाउन सोफ्यावर बसते. घड्याळावर नजर टाकते, रात्रीचे दोन वाजलेत म्हणजे साडेपाच तासातील २ तास संपलेत, अजून फक्त साडेतीन तास आपण झोपू शकतो. पुन्हा ती किचन मध्ये शिरते, बिस्किटांचा डबा उघडून दोन हातात घेते, ग्लासभर पाण्याबरोबर ती घशाखाली उतरवते तेंव्हा तिला आठवते की आज आपण रात्री जेवलोच नाहीये.

आता कदाचित झोप लागेल, सकाळी फ्रेश वाटेल. बोलू या आठवड्यात रोहनशी. उद्या आणि परवा एवढी महत्त्वाची मीटिंग पार पडू देत. प्रोजेक्ट च्या दृष्टीने हे दोन दिवस फार महत्त्वाचे आहेत आणि आपल्या करीअरसाठीपण! आज ऑफिसमधून निघताना सगळी उद्याच्या मिटींगची तयारी करून निघालो म्हणून ठीक, उद्या सकाळी लवकर पोहोचणे जमले नसते कदाचित. मात्र आता झोप लागायला हवीच. ती आडवी होते, शेजारी तिचा नवरा सारंग गाढ झोपेत असतो. ही अजून टक्क जागीच आहे याचा त्याला थांग पत्ताच नसलेला. त्याचे बरे असते, अशी झोप येत नाही असे झाले कि सरळ उठून टेरेसवर पोहोचायचे आणि एकामागून एक सिगारेटी ओढत राहायच्या.

पुन्हा डोळे मिटले जातात, पुन्हा मनात विचारांचा धागा पोहोचतोच. सखीच्या जागी आपण असतो तर? उद्या इतर कोणत्या कारणांनी अशी वेळ आपल्यावर आली तर? कसे सामोरे जाणार आहोत आपण त्या टप्प्याला?

अगं, पण असे का होईल? इतके सारे छान तर चालले आहे ना? घर, गाडी, छानशी नोकरी, शिवाय कोणाची जबाबदारी नाही, कोणालाही हेवा वाटेल असे चालले आहे न? अचानक नाही घडत ग अशा घटना.

हो न! अचानक नाही घडत या गोष्टी, नाराजीचे धागे कधीतरी कुठेतरी खोलवर रुजलेले असतात, जेंव्हा सारे ठीक असते तेंव्हा ठीक असते, पण कदाचित एखादी शुल्लक वाटणारी घटना तळातल्या हा गाळ वर आणते, आणि सारेकाही बदलून जाते. सखी आणि रोहनही अगदी असेच हेवा वाटावा अशी एकमेकांत गुंतलेली जोडी होती ना काही काळापर्यंत. पण आज या वळणावर आहेतच न उभे?

आपण आठवतंय का शेवटचे एकटे घरी कधी राहिलो होतो?

पाच वर्षांपूर्वी जेंव्हा नवरा प्रोजेक्ट च्या कामासाठी सिंगापूरला थोडे दिवस होता, त्या नंतर कधीच नाही.

म्हणजे?? मनातल्या मनात आपण एकटे कसे राहणार आहोत याची कल्पना करायला लागलोय का?

पण आपल्यातही धुसफूस होतेच कधी कधी. शब्दाने शब्द वाढतो, एकमेक दुखावले जातो, काही दिवसांचा अबोला, त्यामुळे येणारी अस्वस्थ शांतता घरात, तसंही घरात तिसरे आहेच कोण बोलायला? गंधारसारखा एखादा आपल्याघरी असता तर? आयुष्य नक्कीच थोडे वेगळे असते.

कशा रितीने घेऊ आपण उद्या अशी वेळ आलीच तर? चिडू, भांडू, वाद घालू, प्रेमाने त्याला समजावू की शांतपणे "ठीक आहे, कुठे सही करू?" असे विचारू?

मधे एकदा विराजने दिलेला सल्ला आठवतो? नक्की काय समजू मी?

प्लीज प्लीज ,आत्ता ते विचार नकोत ना. आत्ता मला फक्त आणि फक्त एका चांगल्या झोपेची गरज आहे. देवा प्लीज हे सारे विचार थांबू देत. असे म्हणत ती उशीजवळचा मोबाईल हातात घेते, वेळ पाहते. साडेतीन वाजलेत. दिवस रात्र सारी आपली कशी घड्याळाशी जोडलेली.... म्हणत पुन्हा एकदा झोपायचा प्रयत्न करते. साईड टेबल वरून बामची बाटली घेऊन बामचे एक बोट कपाळावर फिरवते, वेंकटेश स्तोत्र मनातल्या मनात म्हणू लागते.
वेंकटेशो वसुदेवो प्रद्युम्नो मितविक्रम; पासून सुरु होऊन रमानाथो महीभर्ता पर्यंत पोचून गाडी थांबते आणि विचार चक्र पुन्हा कसे आणि कधी चालू होते ते तिलाही कळत नाही.

मध्यंतरी नवरा थोडा नाराज होता, या वेळी त्याची सलग २ वर्षाकरिता असलेली ऑनसाईट ची संधी हुकली तेंव्हा. एक दिवस संध्याकाळी सोबत विराजला त्याच्या परम मित्राला घेऊनच आला होता. विराज ला भविष्य पहाता येते, आपला विश्वास नाही पण याचा आहे. बराच वेळ दोघेजण याच विषयावर बोलत राहिले. सोबत दारू होतीच. आपले काही काम नाही तिथे असे समजून आपण किचन मधील कामे संपवत राहिलो.

काही वेळाने विराज बर्फ घेण्याच्या निमित्ताने आत आला, म्हणाला "गायत्री, मी आत्ता सारंग सोबत तुझीही पत्रिका पहिली, मला माहित आहे तुझा विश्वास नाही या साऱ्यांवर. सारंगचा प्रश्न ओन साईट चा आज न उद्या सुटेलच. पण मला तुला एक सल्ला आवर्जून द्यायचा आहे तो म्हणजे "रिलेशन्स जप" हे ऐकून एक सेकंद हादरलोच आपण मनोमन. पण तितक्यात सारंग आत आला आणि विराजने विषय बदलला आपणही तो विचार बाजूला सारला.

असे का केले असेल त्याने? आपल्यालाच का ???? हाच सल्ला त्याने सारंगला दिला असेल का? आपला ज्योतिष, भविष्य पाहणे यावर विश्वास नाही हे माहित असूनही मलाच का असे सांगितले असेल? सारंगच्या मनातही असे काही विचार येत असतील का? ज्यामुळे विराज असे म्हणाला?कधीतरी सारंगशी बोलले पाहिजे यावर.

पण आत्ता झोपले पाहिजे, म्हणत ती पुन्हा दुसऱ्या कुशीवर वळते.

तिच्या या हालचालीने जागा होत सारंगने झोपेतच विचारले, "उद्या सकाळी लवकर जायचंय न तुला? झोपली नाहीस का अजून?"

"नाही रे, काय करू, झोपच येत नाहीये"

"येईल येईल शांतपणे डोळे मीट बरं" असे म्हणत झोपेतच एका हाताने तो तिला कपाळावर थोपटू लागतो.

त्याचा हा आश्वासक स्पर्श जाणवताच, उगीचच इतके नको ते विचार मनात का घोंगावत होते असा काही आपल्या बाबतीत होणार नाहीये असा विचार मनात येउन एक हलकेसे स्मित चेहऱ्यावर पसरून निद्रेच्या आधीन ती केंव्हा आणि कशी होते ते तिलाही कळत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख ...

असुरक्शित भावना.. प्रश्नाची उत्तरे मिळत नसली की होणारी तत्गमग... आणि ममग आआस्वस्तaमस्त जुळुन आलय...