कट्यार काळजात घुसली पण ……. एका 'हृदयस्थ' मित्राची आठवण !

Submitted by SureshShinde on 13 March, 2014 - 13:13

ambu1.jpg

सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीची एक सकाळ.

स्थळ - फुले मंडईजवळ, बाबू गेनू चौक, पुणे.

चौकाच्या मध्यभागी एक विशीच्या आसपासचा तरुण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. दोन पोलीस शिपाई आणि दोन वयस्कर पुरुष त्या जखमी तरुणाशेजारी उभे राहून एकमेकांशी काही तरी बोलत होते. त्या पोलिसांनी आजूबाजूला जमा झालेली गर्दी चौकाच्या कडेला ढकलल्यामुळे ती सर्व गर्दी रिंगण करून उभी होती.
एवढ्यातच एकाच गलका झाला.
"अरे, चला हटा, ॲम्बुलन्सला रस्ता द्या."
ॲम्बुलन्सचा नेहमी सारखा परिचित सायरनचा आवाज जवळजवळ येऊ लागला. गर्दीने बाजूला सरकून रस्ता करून दिला आणि एक ॲम्बुलन्स माणसांचे कोंडाळे फोडून जखमी तरुणाजवळ येऊन थांबली. आतील मदतनिसांनी स्ट्रेचर बाहेर ओढून रस्त्यावर ठेवले. पांढरा एप्रन घातलेले एक डॉक्टर त्या जखमी तरुणाशेजारी बसून त्याची तपासणी करू लागले.
"डॉक्टर, त्याच्यावर तलवारीचे वार झाले आहेत. बिचारा रस्त्याने चालला होता. दोन गुंडांच्या टोळीच्या मारामारीमध्ये चुकून हा सापडला आणि बाकी सर्व तर पळून गेले पण हा मात्र गेली दहा पंधरा मिनिटे येथेच पडला आहे. श्वास फक्त चालू आहे, हालचाल मात्र काहीच नाही. खिशातील लायसेन्सवरून घराच्या पत्त्यावर पोलीस गेले आहेत. नातेवाईक येतच असतील. पण काय हो डॉक्टरसाहेब, वाचेल का हो हा ?" शेजारच्या पोलिसाने एका दमात बरीचशी माहिती पुरवली.
तपासणी संपल्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या शिपायांना उद्देशून डॉक्टर म्हणाले," ह्याच्यात अजूनही थोडी धुगधुगी आहे. रक्तस्त्राव खूपच होऊन गेलेला दिसतो आहे. लगेच हॉस्पिटलमध्ये हलविणे महत्वाचे आहे."
डॉक्टरांचे उद्गार ऐकून इतर दोघांनी त्या जखमी माणसाला उचलून पटकन ॲम्बुलन्समध्ये हलविले. सायरन वाजवीत ॲम्बुलन्स ससून हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेली. जणू काहीच झाले नसावे अशा प्रकारे बाबू गेनू चौकातील दैनंदिन व्यवहार पुढे सुरु झाले.

स्थळ - अत्यवस्थ रुग्ण विभाग, ससून हॉस्पिटल,पुणे.

वरील तरुण या विभागामधील कॉटवर झोपवलेला दिसत होता. आजूबाजूला डॉक्टर्स, नर्सेस आणि कक्षसेवकांची गडबड सुरु दिसत होती. एक सलाईन, एक हेम्यक्सील आणि एक 'ओ निगेटिव्ह' रक्ताची अशा तीन बाटल्या आयव्ही द्वारे पेशंटच्या शिरेतून दिल्या जात होत्या. पेशंटचे नातेवाईकही एव्हाना पोहोंचले होते. पेशंटचे नाव होते 'सुनील कावरे'!
पेशंटला तपासणाऱ्या डॉक्टरांपैकी एकाला बाजूला घेऊन पेशंटच्या आईने रडतरडत अतिशय काकूळतीच्या स्वराने विचारले, "डॉक्टरसाहेब, कसा आहे हो माझा सुनील? शुद्धीवर आहे का?मी आई आहे हो त्याची ! त्याला बघता येईल का, प्लीज ?"
बहुतेक तिच्या रडवेल्या आणि आर्जवी चेहेऱ्याकडे पाहून त्या डॉक्टरांनाही गहिंवरून आले असावे.
"आईसाहेब, आत्ताच काहीही सांगता येत नाही. आमचे सर्व प्रयत्न जोरात चालू आहेत. त्याला पोटामध्ये आणि छातीमध्ये भोसकलेले आहे. जखमा खूप खोलवर आहेत. खूप रक्तस्त्राव होऊन गेला आहे. अजून ब्लड प्रेशर लो आहे.तुम्हाला भरभर रक्ताची व्यवस्था करावी लागेल. आम्ही पेशंटला लगेचच ऑपरेशन थिएटरमध्ये हलवीत आहोत. ऑपरेशनच्या संमती पत्रावर सही करून सिस्टरांजवळ जवळ द्या." एवढे सांगून डॉक्टर पुन्हा आत गेले. त्या माउलीने तर मटकन खालीच बसून घेतले. आजूबाजूला सुनीलचे बरेच मित्र उभे होते. त्यांनी आपसात चर्चा केली व त्यातील काही तरुण रक्तपेढीच्या दिशेने धावले.

स्थळ - ऑपरेशन थिएटर.

सुनीलला ऑपरेशन टेबलावर झोपवून पोटाव्यतिरिक्त सर्व शरीर हिरव्या जंतूविरहित कपड्यांनी झाकलेले. डोक्याच्या बाजूला सिनियर भूलतज्ञ डॉक्टर सौ कटारियांनी कृत्रिम श्वासोश्वासाची तयारी चालवली होती. सकाळची वेळ असल्याने डॉ. साने नावाचे मुख्य अनुभवी सर्जनही सुनीलच्या नशिबाने उपलब्ध होते. प्राण नावाच्या नटासारखे दिसणारे डॉ. साने उत्तम शिक्षक असल्यामुळे विध्यार्थी वर्गाचे 'जीव की प्राण' होते. खाली सीएमओमध्ये पेशंट म्यानेज करणारे रेसिडेंट डॉक्टर्सही मदतीसाठी हिरवा गाऊन घालून सर्जनच्या मदतीसाठी तयार झाले होते.
"सर, पेशंटला भूल दिली आहे, आपण आता सुरु करू शकता." डॉ. कटारिया.
"थांक्स डॉक्टर, जरा विचित्रच केस दिसतेय. ह्याला दोन ठिकाणी भोसकलेले दिसतेय. छातीवर आणि पोटावर! योगायोग पहा,रात्रीच 'कट्यार काळजात घुसली' पाहायला गेलो होतो आणि आज खरोखरच असा हा पेशंट! असो. याचे प्रथम पोट उधडून पाहू. सिस्टर, स्कालपेल द्या." एवढे म्हणत डॉ. साने सरांनी पोट उघडले देखील. आत रक्त दिसत होते पण आतले सर्व अवयव ठीक दिसत होते.
"आत काही विशेष नुकसान झालेले दिसत नाही. लिव्हर, स्प्लीन ठीक आहेत. म्हणजेच आपला अंदाज चुकलेला दिसतोय. छातीच्या जखमेमुळेच जास्त रक्तस्त्राव झालेला दिसतोय. नो प्रोब्लेम, वुई विल ओपन द चेस्ट!" उघडलेले पोट हिरव्या टॉवेलने झाकून सरांनी उजव्या बाजूने छातीवर छेद घेतला. छातीची पोकळी रक्ताच्या गाठींनी गच्च भरली होती. छेद घेताच पुन्हा नव्याने रक्त वाहू लागले. आता मात्र डॉ. साने सरांचे हात भरभर काम करू लागले. त्यांनी आपल्या अनुभवाची आणि कौशल्याची शिकस्त करून रक्तस्त्राव आटोक्यात आणला.
"फुफ्फुसामध्ये मोठ्ठा टेअर होता. हा माणूस येथपर्यंत कसा पोचला हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. म्हणतात न देव तारी त्याला कोण मारी." ऑपरेशनमुळे पेशंटची तब्ब्येत सुधारली असल्यामुळे सर खुशीत आले होते. पोट आणि छातीवर टाके घेताना डॉ. साने म्हणाले, "लिसन एव्हरीबडी, हा पेशंट चांगला होऊन घरी गेला तर सर्व टीमला मी पार्टी देणार बरे का"
ही 'पार्टी' म्हणजे "खबरदार, मी माझे सर्जिकल काम उत्तम केले आहे पण या पुढील पोस्ट- ऑपरेटिव्ह काळजीची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. हलगर्जीपणा मला सहन होणार नाही" अशी गर्भित तंबीच होती याची सर्वांना पूर्ण जाणीव होती. तसे आत्तापर्यंत कधीही सानेसरांनी पार्टी दिल्याचे कोणालाच आठवत नव्हते. म्हणजेच सुनील बरा झाल्यास जणू इतिहासच घडणार होता.

स्थळ - सर्जिकल वार्ड,ससून हॉस्पिटल.

दोनतीन दिवस व रात्री रेसिडेंट डॉक्टरांनी 'रोटा' लाऊन,म्हणजे आळीपाळीने, ड्युटी केल्यानंतर कोठे सुनीलची तब्ब्येत सुधारली. त्यावेळी आजच्या सारखे अतिदक्षता विभागांचे पेव फुटलेले नव्हते. रेसिडेंट डॉक्टर्स आळीपाळीने रात्रंदिवस अक्षरशः 'अलार्म क्लॉक' उशाशी घेऊन पेशंटच्याजवळ झोपत असत. एखादे वेळी मध्यरात्री सरांचा अचानक राउंड होत असे. आणि जर एखादा हलगर्जी करणारा डॉक्टर सापडलाच तर त्याला चांगलाच शाब्दिक मार मिळत असे. "तुमच्या वडिलांची काळजी अशीच घ्याल काय?" या पेक्षा जास्त वेदना चाबकाच्या फटक्याने देखील होत नसाव्यात. याच युनिटमधील मुख्य प्रोफेसर सौ मेहता अशा प्रकारच्या रुग्ण सेवेसाठी फार प्रसिद्ध होत्या. एखाद्या पेशंटची दर्दभरी कहाणी ऐकून त्यांनी आपला खिसा मोकळा करण्याबाबतचे अनेक किस्से ससूनच्या स्टाफने अनुभवले होते. ही पारशी मंडळी तशी खूपच दयाळू आणि दानशूर. मुंबईच्या डॉ. बालिगा नावाच्या एका गुणग्राहक सर्जनची गोष्ट अशीच प्रसिद्ध आहे. नुकत्याच उच्चपदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आपल्या होतकरू पण गरीब विद्ध्यार्थ्याला इंग्लंडला जाण्यासाठी त्यांनी आपल्या कोटातले सर्व पैसे न मागता काढून तर दिलेच पण तो परत आल्यानंतर त्याला जे जे हॉस्पिटल मध्ये मानद प्राध्यापकाची जागाही मिळवून दिली होती. दैवी प्राध्यापकांची हि परंपरा अजूनही चालू आहे. खरोखरच 'दान' देण्याची अशी संधी फक्त आमच्या व्यवसायातच असते. असो. पुढील काही दिवसांतच सुनील बरा होऊन घरी गेला. सुनीलच्या आईने जाताना सर्वांचे साश्रू नयनांनी आभार तर मानलेच पण मंडई-गणपतीचा एक मोठा फोटो वार्डला भेट म्हणूनही दिला.

स्थळ - सुनीलचे घर, पार्वती पायथा.

हॉस्पिटलमधून घरी येऊन पंधरा दिवस कसे निघून गेले ते सुनीलला कळले देखील नाही. मनमिळावू स्वभावामुळे त्याचा मित्र परिवार खूप मोठा होता. रोज अनेक मित्र भेटायला येत असत. एका लहान खोलीत एका लोखंडी कॉटवर त्याचा दिवसभर मुक्काम असे. नेहेमीप्रमाणे त्याही दिवशी अनेक मित्रांनी त्याच्या घरी गप्पा मारण्यासाठी हजेरी लावली होती. त्यातच एक जणाने सांगितलेल्या एका विनोदी किस्श्यावर सर्वजण हसून हसून बेजार झाले. हसताहसता एकमेकांच्या अंगावरही रेलले, अगदी सुनिलच्याही! पण सुनीलला मात्र हे हसणे मानवले नाही. त्याला खोकल्याची उबळ आली आणि उलटी होईल असे वाटले, नाही उलटी झालीच - रक्ताची ! हे भीतीदायक चित्र पाहून सर्व मित्रमंडळी हादरली. आतल्या खोलीतून आईदेखील बाहेर आली. सगळ्यांनी मिळून सुनीलला उचलून रिक्षात घातले आणि पळविले हॉस्पिटलकडे !

स्थळ - हरजीवन हॉस्पिटल,सारसबाग.

पुन्हा सकाळचीच वेळ. डॉ. मनोहर शेठ उर्फ बाबा ओपीडी मध्ये पेशंट तपासत होते. रिक्षाचा आवाज आल्यामुळे त्यांनी खिडकीतून बाहेर पहिले. सुनीलला त्याच्या दोन मित्रांनी धरून त्याला आत आणत होते. सुनीलचा शर्ट रक्ताने माखलेला दिसत होता. बाबांच्या अनुभवी डोळ्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची लगेच कल्पना आली.
बाबांनी आयाबाईंना सूचना दिली, "सुलोचनाबाई, इमर्जन्सी केस आलेली दिसते आहे. पेशंटला लगेच थिएटरमध्ये घ्या" आणि ते स्वतः लगेच थिएटरकडे पळाले. शहराच्या त्या भागामध्ये डॉ. शेठ आणि त्यांचे हरजीवन हॉस्पिटल अशा इमर्जन्सिमध्ये उत्तम ट्रीटमेंटकरता प्रसिद्ध होते, नव्हे आहेत. हरजीवन म्हणजे बाबांच्या वडिलांचे नाव ! कोकणामधील महाडमध्ये सेवाभावी डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते !
कावरे कुटुम्बियांकरता आजचा प्रसंग म्हणजे महिन्यापूर्वी ससूनमध्ये घडलेल्या प्रसंगाची पुनरावृत्तीच जणू चालू होती, पात्रे तीच फक्त जागा बदलली होती. थोड्याच वेळात बाबा थिएटरमधून बाहेर आले.
" कावरेताई, मुळीच चिंता करू नका. बहुतेक जठरामध्ये म्हणजे पोटात रक्तस्त्राव झालेला दिसतो आहे. आता ब्लीडींग थांबलेले आहे. तब्बेत उत्तम आहे. बहुतेक जठराला सूज असेल किंवा अल्सर देखील असेल. रक्त देण्याची आवश्यकता आत्ता तरी वाटत नाही पण त्याला 'अंडर ऑब्झर्वेशन' ठेवले पाहिजे." बाबांचे हे बोलणे ऐकून बाहेर उभ्या सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. पेशंटला 'टागामेट'चे इंजेक्शन देऊन बाबा दुसरे पेशंट तपासण्याच्या कामाला लागले. संध्याकाळपर्यंत पुन्हा काहीच घडले नाही.
संध्याकाळी बाबा पेशंट तपासून नातेवाईकांना म्हणाले, "तशी सुनीलची तब्ब्येत आता स्टेबल आहे. पण ब्लीडींग कशाने झाले ते समजत नाही. छातीचा एक्सरे पण ठीक आहे. अल्सर असेल तर पुन्हा ब्लीडींग होऊ शकेल. मला वाटते की पोटामध्य दुर्बीण घालून पाहिलेले उत्तम. 'ब्लीडींग अल्सर' असल्यास सर्जरीहि लागू शकते." आईवडिलांच्या छातीत पुन्हा एकदा धस्स झाले.
"बाबा, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ती तपासणी करण्यास आमची काहीही हरकत नाही" त्यांनी एकसुरात सांगितले.
दुसऱ्याच सकाळी इंडोस्कोपी झाली. "आत काहीही 'सोर्स ऑफ ब्लीडींग' दिसत नाही. सर्व काही ठीक आहे." स्कोपी करणाऱ्या डॉक्टरांनी अभिप्राय दिला. आता पुढे काय?
कर्मधर्मसंयोगाने मी माझा एक पेशंट पाहण्यासाठी त्यावेळी नेमकाच 'हरजीवन'मध्ये पोचलो होतो. त्यानिमित्ताने माझी आणि बाबांची गाठ पडल्यानंतर ते मला म्हणाले, "डॉक्टर शिंदे, एक इन्टरेस्टिंग केस आली आहे. बघाल का? मला तर ब्लीडींगचे कारण दिसत नाही.पण पेशंटचे नातेवाईक माझे नेहेमीचे पेशंट आहेत त्यामुळे मला अजिबात रिस्क घ्यावयाची नाही. "
"ठीक आहे!" असे म्हणून मी सुनीलच्या खोलीमध्ये पोचलो.
खोलीमध्ये सुनील कॉटवर बसला होता व त्याची आई शेजारी उभी होती.
"मी डॉ. शिंदे! बाबांनी सांगितल्यावरून मी यांना तपासण्यासाठी आलो आहे." मी माझा परिचय दिला.
"डॉक्टर, मी आता हॉस्पिटलला खूप कंटाळलो आहे. मी आता पूर्ण बरा आहे. मला आता तपासणी वगैरे काही नको. मला घरी जायचे आहे."
बाजूला उभी असलेली त्याची आई पुढे आली आणि म्हणाली," याचे काही ऐकू नका. तुम्हाला जे काय तपासायचे ते तपासून घ्या. उगीच घरी जाऊन परत त्रास व्हायला नको."
" सुनील, प्लीज शर्ट काढ बरे." मी म्हणालो.
तो शर्ट काढेपर्यंत मी त्याच्या आईकडून त्याच्या आजाराची इत्यंभूत माहिती घेतली, अगदी बाबू गेनू चौकापासून ते येथे येईपर्यंत !
झोपलेल्या सुनीलच्या तपासणीमध्ये काही विशेष नवीन तर दिसत नव्हते.मात्र एक नवीन गोष्ट माझ्या लक्षात आली होती. त्याच्या छातीवर उजव्या बाजूला निपलजवळ एका लहान लिंबाएवढी सूज किंवा गाठ दिसत होती. प्रथमदर्शनी ते टेंगुळ म्हणजे चरबीची गाठ असावी असे मला वाटले.
खात्री करण्यासाठी मी त्याच्या आईला विचारले, " ही गाठ याच्या जन्मापासून आहे कि काय?"
"छे हो, डॉक्टर, मी हि गाठ तर प्रथमच पाहत आहे." सुनीलची आई म्हणाली.
इतक वेळ आमचे संभाषण ऐकणाऱ्या सुनीलने आता बोलण्यास सुरुवात केली, " डॉक्टर, ही गाठ मी ससूनमधून घरी आल्यानंतरच माझ्या लक्ष्यात आली आहे. ती हळूहळू वाढत आहे असे मला वाटते."
"मी येथे दाबल्यानंतर तेथे दुखते का?"मी विचारले.
मी ती गाठ दाबण्यासाठी पुढे केलेला माझा हात आपल्या हाताने पकडून सुनील म्हणाल," डॉक्टर, जरा हळू दाबा बरे का. काल हसताना एक मित्र माझ्या अंगावर रेलला आणि त्यानंतर ही गांठ दाबली गेली कि काय पण तेंव्हापासून ती गांठ जरा दुखते आहे."
"आणि त्यानंतरच त्याला रक्ताची उलटी झाली" आईने पुस्ती जोडली.
हे सर्व ऐकून माझे विचारचक्र सुरु झाले. मी या सर्व घटना आणि तपासण्या यांची जुळवाजुळव करून सुनीलच्या आजाराचे चित्र मनामध्ये पुन्हा तयार करीत होतो.
बाबांशी चर्चा करतो असे सांगून मी खोलीतून बाहेर पडलो.

"डॉ.शेठ सर, या मुलाच्या छातीवर जी गाठ आहे तिची तपासणी करावी असे मला वाटते." मी म्हणालो.
"पण एक्सरे तर ठीक आहे" डॉ. शेठ उद्गारले.
"सर,सुनीलच्या छातीचा सिटी स्क्यान करून पाहू या." मी सुचविले.
त्यावेळी पुण्यातील रुबीमध्ये सिटी स्क्यानची सोय नुकतीच उपलब्ध झाली होती.
दुपारीच सुनीलचा सिटी स्क्यान झाला. संध्याकाळी मला बाबांचा फोन आला.
"डॉक्टर शिंदे, व्हेरी बिग सरप्राईज ! ह्या पेशंटच्या छातीवर जी गाठ आहे ती गाठ नाही तर हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला निर्माण झालेला फुगा आहे. बरे झाले तुझ्या लक्षात ती गाठ आली आणि आपल्याला सिटी स्क्यान करण्याची बुद्धी झाली ते! सुरेश, हे निदान केल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन ! "

एखाद्या रक्तवाहिनीला इजा झाल्यानंतर ती कमकुवत होते आणि हळूहळू सायकलच्या ट्यूबमध्ये हवेचा दाब वाढल्यानंतर तिला जसा फुगा येतो तसा फुगवटा रक्तवाहिनीला येतो. तो फुटण्याची शक्यता असते. सुनीलच्या बाबतीमध्ये नेमके असेच घडले होते. फुफ्फुसाच्या शुद्ध रक्तवाहिनीमध्ये जास्त प्रेशर नसल्यामुळेच काल सुनीलची रक्तवाहिनी लिक होवूनही रक्तस्त्राव आपोआप थांबला होता. अर्थात आता सुनीलला तातडीने शस्त्रक्रिया करून तो फुगा आलेला भाग दुरुस्त करावा लागणार होता, ते हि पुन्हा लिक होण्याच्या अगोदर ! हे ऑपरेशन खूपच रिस्की होते. पुण्यामध्ये अशा प्रकारची सर्जरी क्वचितच होत असे. अशा सर्जरीला खूप चांगल्या टीमवर्क व पोस्ट- ऑपरेटिव्ह केअरची गरज असते. मुंबई मध्ये अशा प्रकारची सर्जरी रुटीनली होत होती.

"बाबा, याची तर सर्जरी तांतडीने करावी लागणार आहे. मला वाटते त्यांनी मुंबईला जावे."
"तुझ्या परिचयाचे कोणी सर्जन मुंबईमध्ये आहेत का ज्यांना रेफरन्स देता येईल. शिवाय मुंबईचा खर्च त्यांना परवडेल का याचाही विचार लारावा लागेल."
माझ्या डोळ्यापुढे एकच नाव उभे राहिले - बायपास सर्जरीकरिता प्रसिद्ध असलेले कार्डीओ व्हास्कुलर सर्जन - डॉ. नीतू मांडके !

mandkeNitu.jpgस्थळ - मांडके वाडा, ज्ञान प्रबोधिनी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.

नितूचा आणि माझा परिचय ६४ साली ज्ञान प्रबोधिनी मध्ये झाला. तो प्रबोधिनीचा एक हुशार आणि खेळाचे मैदान गाजवणारा पिळदार शरीरयष्टीचा विध्यार्थी ! तो माझ्या एक वर्ष पुढे होता. नंतर योगायोगाने दोघेही बी जे मेडिकलला पुन्हा भेटलो. नीतू मांडके म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ! कॉलेजच्या निवडणुकीत तो आयसीएसआर तर मी डिबेट सेक्रेटरी म्हणून निवडून आलो होतो. पिळदार आणि टोकदार मिशांमुळे संपूर्ण मेडिकल कॉलेज मध्ये मांडके आणि शहापूरकर हे दोघे 'मुछगुंडे' म्हणून ओळखले जात. त्या वेळी अशी अनेक डॉक्टरांना टोपण नावे असत. छपरी केळकर, डालडा जोशी, घाशीराम आगाशे तसेच नितूला 'फतऱ्या मांडके' म्हणत असत. मला आठवते की क्रिकेटवीर 'फतरी' वक्तृत्व स्पर्धेत देखील ढाल मिळवून आला होता. एम.एस. झाल्यानंतर त्याला अमेरिकेमध्ये जागतिक कीर्तीचे कार्डीओ व्हास्कुलर सर्जन डॉ. डेंटन कुली यांच्या बरोबर पुढील शिक्षणाची संधी मिळाली, अर्थातच नितूने या संधीचे सोने केले. आलाबामा युनिव्हरसिटीमधून भारतामध्ये परत येताना वळणदार अक्षरामध्ये मला लिहिलेले त्याचे पत्र मी खूप वर्षे जपून ठेवले होते. त्यात माझ्या पत्नी आणि मुलांची आस्थेने चौकशी करायला तो विसरला नव्हता.
मुंबईमध्ये परत आल्यानंतर आपल्या कौशल्यामुळे लवकरच त्याची कीर्ती संपूर्ण देशभर पसरली.

"बाबा, मुंबईमधील डॉ. नीतू मांडके यांना मी ओळखतो. त्यांना मी चिट्ठी देवू शकतो आणि फोनही करीन." मी डॉ शेठांना म्हणालो.
डॉ.शेठांनी परिस्थितीचे गांभीर्य सुनीलच्या नातेवाईकांना समजावून सांगितले आणि ती सर्व मंडळी लगोलगच मुंबईला रवाना झाले.

स्थळ - सर्जरी विभाग, जसलोक हॉस्पिटल, मुंबई.

डॉ. नीतू मांडके आपल्या सेक्रेटरीस पत्र डिक्टेट करीत होते,
" प्रिय सुरेश, तू पेशंटचे निदान करून अगदी वेळेवर पाठविल्याबद्दल प्रथम तुझे अभिनंदन !
सुनीलची सर्जरी उत्तम पार पडली. नो कोम्लीकेशन्स ! पण त्याचे उजवे फुफ्फुस पूर्ण काढावे लागले. उरलेल्या एका फुफ्फुसावर तो उत्तम आयुष्य जगेल याची मला खात्री आहे. दुसरे असे की या माणसाकडून मी एक नवा पैसा देखील फी घेतलेली नाही. पुअर गाय ! शिवाय 'गरिबी' म्हणजे काय हे आपल्याखेरीज आणखी कोणाला समजणार? असो. मुंबई आलास तर भेट. घरातील सर्वांना नमस्कार सांगणे. धन्यवाद! - नीतू."

आज या गोष्टीला पंचवीस वर्षे होऊन गेली तरी नितूच्या मैत्रीचा आणि आठवणींचा सुगंध अजूनही दरवळतो आहे. सुनीलची तब्ब्येत आजही धडधाकट आहे पण जेव्हा कधी तो भेटतो तेंव्हा प्रथम आठवतो माझा अष्टपैलू 'हृदयस्थ' मित्र - डॉ. नीतू मांडके !

∞∞∞∞∞∞∞

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक इंटरेस्टिंग किस्सा. Happy
कोणताही आव न आणता इतरांना माहिती कशी द्यावी याची अतिशय सुरेख जाण तुमच्या लेखांतून दिसते, डॉक्टर. Happy

अजून एक जबरदस्त लेख!
डॉ. नीतू मांडके आणी त्यांच्यासारखी विचारसरणी असलेल्या सर्वच डॉक्टरांना कडक सलाम!!!

व्वा फार छान लेख.

तुमचा नवीन लेख आला की हातातलं काम सोडून वाचला जातो. >> हे अगदी खरय. मायबोलीवर लेख दिसताक्षणीच वाचला जातो.

तुम्ही जबरी लिहिता डॉक्टर..

डॉ. शहापूरकर म्हणजे मराठवाड्यातले व नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यायलात प्रोफेसर व फोरेन्सिक मेडिसिनचे एक्स्पर्ट का? मिरज मेडिकलला ५-६ वर्षे होते बहुतेक

सर्व प्रतिसाद देणाऱ्या मित्रांचे आभार !

@टण्या : डॉक्टर शहापूरकर हे सर्जन आहेत व बहुधा गडहिङ्गलज येथे असतात.

@जिज्ञासा: मी प्रबोधिनीच्या दुसर्या ब्यचचा विद्यार्थी.

मस्तच लेख.

डॉक्टर शहापूरकर >> कोल्हापूरमध्ये एक डॉ. प्रकाश शहापूरकर आहेत. काही वर्षापूर्वी ते एका सहकारी साखर कारखान्याचे (बहुतेक राजाराम किंवा गडहिंग्लज) संचालक की अध्यक्षही होते. हेच का ते?

angavar kata aala vachatanaa....kharach khup prabhavi lekh.

डॉक. साहेब!
हा लेख पण तुमच्या बाकी लेखांसारखाच उत्कृष्ट!!
डॉ. नीतु मांडकेंची मुलाखत पाहिली होती मी लहान असताना..त्यांनी बर्‍याच गरजु पेशंटचे मोफत उपचार केलेत असं कुठेतरी वाचल्याचं आठवतय..त्यांच्या नावावर १०००० कार्डियाक सर्जरीज आहेत, बाळासाहेबांची सर्जरी पण त्यांनीच केली होती...
इतक्या लोकांची ह्रुदयं बरी करुन देणार्या देवदुताला ह्रुदयाच्या धक्क्याने जग सोडावं लागलं हे पण खुप मोठ दुर्दैव.. Sad

डॉ. नीतू मांडकेना प्रत्यक्ष भेटले आहे, मामांच्या बायपासच्या वेळेला. अतिशय उमदे व्यक्तिमत्व. खुप मदत केली त्यांनी.
इतक्या लोकांची ह्रुदयं बरी करुन देणार्या देवदुताला ह्रुदयाच्या धक्क्याने जग सोडावं लागलं हे पण खुप मोठ दुर्दैव.. >>+१

"सर्व शरीर हिरव्या जंतूरहित कपड्यांनी झाकलेले">>
हे वाक्य वाचुन आलेली एक शंका..
जंतूरहित बरोबर की जंतूविरहित बरोबर..
मला हे कधिच समजल नाही, मी पहिले समजायचो की
जंतूविरहित > जंतू नसलेले
जंतूरहित> जंतू असलेले..
बहुतेक हे चुक आहे, व्याकरण जाणकारांनी खुलासा करावा..

Pages