भारतीय घराचे स्फ़ुट..

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

माणसाच्या मुलभुत गरजांमधे तशा सर्वच गरजा धडपड करुनच प्राप्त होतात. अन्न वस्त्राची बरोबरी करण्या इतपत सक्षम होणार्‍या कित्येकांना घर उभे करण्यासाठी मात्र तपातूनच जावे लागते. उभ्या आयुष्यात कित्येकांचे हे स्वप्न साकार देखील होत नाही. कित्येक घरांची नावे 'स्वप्न - साकार', 'श्रम - साफ़ल्य' ठेवलेली असतात. ती वाचली की वाटते, तसे घर होणे हे बहुतेकांचे एक फ़ार मोठे स्वप्न साकार होण्यासारखे आहे आणि आयुष्यभराच्या श्रमाची साफ़ल्यता त्यात आहे. 'भाड्याचे घर अन् खाली कर' अशी एक म्हण मराठी भाषेत प्रचलित आहे. अशी बेघर होण्याची वेळ येऊ नये म्हणून पै पै जोडून मनुष्य आपले बिर्‍हाड उभारतो. जिथे भाड्याचे घर दोन तीन खोल्यांचे असते तिथे हक्काचे घर म्हणजे एक पसाभर नाहणीची जागा किंवा ह्या उलट जिथे टिचभर खोलीत अर्धाउप्पर संसार पार पडलेला असतो तिथे हक्काचा बंगला तयार होतो. मात्र घर झाल्याचे सुख फ़ार असे वेगळे नसते. घर बदलताना किंवा साधे आठेक दिवस बाहेर जाताना कुटुंबवत्सल स्त्री आधी पणती तेवत ठेवून मगच घराला कुलुप लावते. बालपणी, एखाद दोन वर्ष राहून बदली झाली की सरकारी घर सोडून जाणारे संसारीक जोडपे ज्या जागेनी आपल्याला निवारा दिला तिचे आभार पणती लावून, त्या जागेवर माथे टेकवून मानत असत. घराचे आभार मानण्याची ही पद्धत मनात घर निर्माण करुनच गेली.

ईथल्या Jurong Bird Park मधे एक सोनपिवळा पक्षी आहे. मादी नरासाठी एक सुरेल गाणे म्हणते. ती म्हणते, आधी तू घर बांध मग मी तुझी प्रेयसी होऊन तुझ्याकडे येईन. त्यामुळे नर पक्षी आधी घरटे विणतो मग त्याला मादीप्रेम लाभते. ही अट मनुष्यजातीत असती तर पुरुषांना म्हातारपणच जवळ आले असते आपली राणी मिळवण्यासाठी. अर्थ चित्रपटातील पुजा नावाचे पात्र, शेवटपर्यंत तिला तिचे घर लाभत नाही. जिथे चित्रपट संपतो तिथे तिला तिची योग्य वाट जरी मिळालेली असते पण घर नाही. इजाजत मधील मायाचा, ती घर सोडून गेल्यावरही, घरातील सर्व गोष्टींवरचा तिचा स्पर्श कायम असल्यासारखा घरातील स्त्रीला वाटत राहतो. अखेरीस ते घर अनाथ रिक्त होऊन दोघींचेही होत नाही. इंदिरा संतांच्या एका कवितेत गळणार्‍या घराला, घरातील होती नव्हती भांडी अपुरी पडतात आणि अशा वेळी पावसावरचा कवयित्रीचा लटका राग एक सुंदर पाऊसगीत घेऊनच येतो. इथे झाडांची फ़ुले, फ़ांद्या, पाने तोडायला बंदी आहे. तरीही दिवाळीच्या दिवशी सर्वांसमक्ष मी आंब्याच्या चार डहाळ्या टाचेवर उंच उड्या मारून तोडल्याच. कोण बघत आहे आणि कोण काय म्हणेल मला ह्याची तमा नव्हती. घरी पोचल्यावर एक सुस्कारा टाकला. सुतळी घेतली आणि सर्व दारांना तोरण बांधले. आंब्याची कोवळी कोवळी आणि लांब लांब पाने वार्‍याच्या झुळकेने उडताना त्यांचा मधुर गंध घरात दरवळला आणि क्षणात एक चैत्यन्याची लहर माझ्या देहात पसरली.

जवळच्या परिसरातील चिनी वातावरण बघुन माझे लक्ष मी जेंव्हा घरातल्याच वस्तुंवर वळवतो तेंव्हा हरेक वस्तू रूप - रंग - गंधाला अस्सल भारतीय असावी असे मला मनापासून वाटते. म्हणून घरात, श्रीगणेशाची ज्वालामुखीच्या काळ्याकभिन्न आणि सछिद्र पाषाणूतून घडवलेली एक मुर्ती मी प्रवेशदाराशीच ठेवली आहे. एकदा मुर्तीला वाहीलेल्या फ़ुलापानांचे निर्माल्य गोळा करताना सुपारी, विड्याची पाने, अक्षता, वाळलेली दुर्वा, जास्वंदाचे फ़ुल खूप काही गोळा केले पण ती कोरी करकरीत मुर्ती बघवेना मग ते सर्व निर्माल्य तसेच तिथे राहू दिले. त्यातून केवढा तरी भारतीयपणा प्रकट होतो हे तेंव्हा मला कळले. एकदा वृषालीकडे मी नाटकाच्या तालमिला गेलो. चिनी आणि पाश्चिमात्त्य वस्तुनी मढवलेले ते घर मला बघवेना. इतक्यातच स्वैपाकघरात कांद्याचे शिंकडे मी बघितले आणि चेहर्‍यावर आपलेपणा झळकला. तेंव्हापासून माझ्याही घरात मी कांद्याचे शिंकडे आणण्याचा विचार करतो आहे. तेवढाच घराचा भारतीयपणा वाढेल. कुठल्याशा तरी नाटकाच्या नेपथ्यात सर्व फ़ुलदाण्या फ़ुलांसहीत भारतीय वाटत नव्हत्या. इतक्यात कुठून तरी खरीखुरी झेंडूची फ़ुले मिळाली आणि ती फ़ुले फ़ुलदाणीत ठेवताच सर्व नेपथ्याचा चेहरामोहरा जणू बदलून गेल्यासारखा वाटला.

नाही म्हणता म्हणता मी युरपच्या प्रवासात बर्‍याच वस्तू विकत घेतल्या. त्या वस्तू माझ्या घरात सुशोभित दिसतील अशी त्यावेळी एक भावना होती. पण शेवटी मी त्या सर्व वस्तू घरी अकोल्याला घेऊन गेलो. त्या वस्तू इतक्या नाजूकसाजूक आणि कोमलमुलायम होत्या की त्या भारतात आणताना पावलापरिस मला त्यांची काळजी वाटायची. त्या फ़ुटतील तडकतील तर नाही ना. एकदाचे घरी पोचल्यानंतर एकेक वस्तू मी बाहेर काढली आणि दुसर्‍याच दिवशी एक भले मोठे कपाट तयार करायला टाकले. आज ते कपाट परदेशातील वस्तूंनी खच्चून भरलेले आहे. पण मला मात्र माझे घर भारतीय वस्तूंनी नुसते भरलेलेच नाही तर भारतीयपणाने भारलेले देखील हवे आहे!

विषय: 
प्रकार: