पुनर्जन्म (भाग २)

Submitted by ashishcrane on 13 March, 2014 - 07:05

पुनर्जन्म (भाग २)

विचार करता करता आईचं घर कधी आलं हे कळलंच नाही निलूला. विचारात मन खोल गुंतलं की, आपलं बरचसं अंतर ते विचारच कापतात. विचार करतच दाराची बेल वाजवली तिने.
"निलू आली वाटतं. जा जा उघड दार लवकर." बाबा आईला म्हणाले. नातवाला भेटायची घाई त्यांनाही तितकीच होती जितकी आईंना.
दार उघडताच आदुने आपल्या आजीला एकदम जोरात मिठी मारली. खूप दिवसांनी भेटत होता तो आपल्या आजी-आजोबांना. घराच्या भांडणात मुलांची प्रेमं मात्र पोरकी होतात.
'कोण चूक आणि कोण बरोबर' ह्याचं उत्तर संसारात झालेलं नुकसान कधीच भरून काढू शकत नाही.
आजीने आपल्या नातवाचे बरेचसे मुके घेतले.
"सगळे पापा आजीलाच देणार का रे लबाडा?" आजोबा म्हणाले.
"नाही. नाही. असे कसे करेन मी! दोघांसाठीही खूप खूप आणलेयत मी पापा." आजीच्या खांद्यावरून उतरून आदु धावत धावत आजोबांना जाऊन बिलगला.
तिघांच्याही डोळ्यांत पाणी होतं त्याक्षणी. पण ते का रडतायेत हे आदुला कळतच नव्हतं. आदुलाच काय तर, त्या तिघांनाही त्यांच्या रडण्याचे कारण स्पष्ट सांगता आले नसते.
नाती कुणाला नको असतात? सगळ्यांना हवी असतात नाती. पण त्या नात्यासोबत येणारे नियम हे आपल्या सुखाच्या, आपल्या निर्णयांच्या आड येऊ लागले की, नाती नकोशी होऊ वाटू लागतात.

"अगं तू का अशी दारात उभी? आत ये ना." बाबांनी विचारलं निलूला.
बऱ्याच दिवसांनी घरी आल्यावर आदु तर खूप खुश होता. तिलाही बरं वाटत होतं. पण मनावर एक दडपणही होतं. भूतकाळ वर्तमानाच्या प्रत्येक क्षणावर घारीसारख्या घिरट्या घालत असतो. सावज दिसलं की, झडप घालते घार. या घराशी बऱ्याच आठवणी जोडलेल्या होत्या तिच्या. प्रत्येक गोष्ट अजूनही तशीच होती. अजूनही त्याच जागेवर होती. पण त्या वस्तू वापरणारी माणसं मात्र वेगळी झाली होती. फ्लॉवरपॉटमधली प्लास्टिकची फुलं अजून एकत्र होती, कारण त्यांना माणसांसारखं भांडल्यावर एकमेकांपासून लांब जाता येत नाही.
"आई."
"काय गं?"
"काय म्हणत होते हे? कशाला आलेले ते इथे?"
"निवांत बोलू गं ते. आधी जेऊन तर घेऊ. मग बोलू."
"हो आजी. खूप भूक लागलीय मला. आज तू भरवायचं आहेस मला. कळलं ना?"
"हो रे बाळा. आज मीच भरवणार आहे तुला."
जेवणात लक्ष नव्हतंच निलूचं. एकाच दिवसात बरंच काही घडलं होतं. पण आजी-आजोबा, आदु खुश होते. निलूची उदासी त्यांच्या नजरेतून सुटली होते असे नाही. पण जेवताना आदुसमोर हा विषय टाळायचा होता.
जेवणं आटोपली.
"आई सांगताय ना?" आदु आपल्या आजोबांसोबत खेळण्यात गुंतलाय हे जाणून निलूने विषय काढला.
"हम्म. सांगते." आईच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.
"अहो आई, रडताय का? प्लीज, अश्या रडू नका."
"रडू दे गं मला. रडणं लपवलं की फक्त गुदमरणं उरतं."
"अहो पण... सांगला का मला काय झालंय ते."
"आज निश आला होता. इतका वेगळा का वागला तो आज माहित नाही. पण, आज मोकळेपणे बोलला."
"काय? काय बोलला?"
"सांगते. मला म्हणाला की, वय वाढलं, माणसं वडीलधारी झाली म्हणजे त्यांचा प्रत्येक निर्णय, त्यांचा प्रत्येक विचार बरोबरच असतो असे नाही ना? वय लहान असलं म्हणजे विचार चुकीचेच असतात असा नियम आहे का? पिढी बदलली की मागण्याही बदलतात. सगळं कळूनही गोष्टी स्वत:च्या हट्टापायी गमावून बसतो माणूस."
"आई, सॉरी हो. निशतर्फे मी माफी मागते तुमची. त्याला तसं म्हणायचं नसेल हो. तुम्ही मनाला लावून घेऊ नका ना. प्लीज."
"अगं तू का सॉरी बोलतेयस. तो आधीच सॉरी बोलून गेलाय मला."
"म्हणजे?"
"ऐक तर पूर्ण. मला म्हणाला, आई तुम्हाला सोडून, हे घर सोडून जायची इच्छा कधी नव्हती माझी. निलुचीही नव्हती. खरंच. पण आपला नवरा आपल्या वाट्यालाच येत नाहीये हे सहन होईल का गं कुठल्याही स्त्रीला? निलुकडे तू स्वतःची सून म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून बघ.
आपलं घर मुळातचं लहान. तू आणि बाबांनी खूप कष्ट करून मला खूप काही दिलंत. विसरलो नाहीये मी ते. तुमच्या उतार वयात तुम्हाला एकटे सोडून जायची इच्छा कधीच नव्हती माझी. खरंच. खूप दिवस ही गोष्ट मनाला लागून राहिली होती माझ्या. पण आता जाण्याआधी बोलणं गरजेचं होतं.
तुला हेच सांगायचं होतं की, माझं तुमच्यावरही तितकंच प्रेम आहे जितकं निलू आणि आदुवर आहे."
आई भरल्या डोळ्यांनी सांगत होती आणि निलू भरल्या डोळ्यांनी ऐकत होती.
"मला म्हणाला, आई तुझे आणि निलूचे घरात झालेले भांडण तुमच्यापुरतं संपत नव्हतं गं. ते मलाही पोखरून टाकत होतं.
पिढी वेगळी मग, मतं सारखी कशी असू शकतील? आधी मी तुम्हा दोघींनाही समजून पाहीलं. कित्येकदा दोघांचीही बाजू ऐकून घेतली. पण दोन्ही बाजू बरोबर वाटणं याहून मोठी शिक्षा नाही कोणत्याही न्यायाधीशासाठी. खूप विचार केला आणि निर्णय घेतला. एकत्र पाहूनही वेगळं असण्यापेक्षा वेगळं राहूनही एकत्र असलेलं बरं."
"आई" दाटून आले होते निलूचे डोळे.
"खरंच गं, पटलं मला त्याचं म्हणणं. स्वतःच्याच सुखाशी लपाछुपी का खेळत असतो आपण? आपल्याला आवडतं ते समोरच्यालाही आवडलंच पाहिजे असं ग्राह्य धरून का चालतो आपण?
समोरची व्यक्ती स्वतंत्र आहे हे का विसरतो आपण? आमचे विचार तुला पाळणे भाग आहे अशी सक्ती करावी आम्ही?"
"आई, हक्क आहे हो तुमचा तो?"
"मनाविरुद्ध बोलू नकोस मिनू? तसं केलंस मी माफ करेन तुला, पण तुझं मन तुला कधीच माफ करणार नाही. माझी काहीच तक्रार नाहीये तुमच्याकडून आता.
चुकलं आमचं. बदलत्या वेळेसोबत बदललं नाही तर वेळ आपल्याला मागेच सोडते." पुढे बोलवलंच नाही त्या आईला.
बाबा बाजूला बसून कधीपासून त्यांचे बोलणे ऐकत होते हे कळलंही नाही त्या दोघींना.
बाबा म्हणाले, " मी ही हेच कित्येकदा समजावण्याचा प्रयत्न केला हिला. निशची हालत कळत होती मला. आजूबाजूची परिस्थिती प्रत्येक आई वडिलांना दिसत असते. मग एकत्रच रहावे, भले भांडणं झाली तरी चालेल हा हट्ट कशाला? जवळ राहून नाती जास्त टिकली जातात असं गैरसमज दूर नको का व्हायला?
म्हणून वेगळे राहण्याचा सल्ला मीच दिला होता निशला."
"काय? तुम्ही? एका शब्दाने बोलला नाहीत तुम्ही मला हे"
"बोलून काय झालं असतं? काय मिळवलं असतं मी त्यातून? अगं, नवरा-बायकोत transparency असावी हे मान्य आहे मला. पण संसार वाचणार असतील,
तर लपवणं जास्त गरजेचं वाटला मला तेव्हा. फक्त मागच्याच पिढीचं चुकतं असं म्हणणं नाहीये माझं.
पण आपली मुलं जर एखादा निर्णय घेत असतील आणि तो आपल्या विरोधातला असेल तर तो निर्णय चुकीचाच आहे असं म्हणून कसं चालेल? सांग बघू?
जर ती पिढी समजून घेत असेल तर आपण आपलं ताठा कमी का करू नये? तुच एक सांग मला."
"...."
"मनं मोडणारा मान हा अपमानापेक्षा तुच्छ नाही का?"
थोडा वेळ शांत झालं सगळं? बऱ्याच वेळाने आईने निलूच्या हातावर हात ठेवले. पण कुणीच काही बोलले नाही. बराच वेळ झाला होता. उशीर केला तर,
रात्रीचं सगळंच टाईमटेबल हललं असतं तिचं. म्हणून आत खेळणाऱ्या आदुला घेऊन निलू जायला निघाली.
जाताना दारात आईने पहिल्यांदाच प्रेमाने हात ठेवला तिच्या कपाळावर. "सांभाळ माझ्या निशूला. सांभाळशील ना?"
तिने फक्त हसून होकार दिला. आज पहिल्यांदाच निलू मनापासून आईंच्या पाया पडली.

​निलू जेव्हा आईकडे गेली होती तेव्हा निश प्रियाला भेटायला गेला होता. एका कॉमन फ्रेंडकडूनच नंबर मिळवला होता त्याने तिचा.
सकाळी ऑफिसमधुन त्याने तिला जेव्हा फोन केला तेव्हा आश्चर्यच वाटलं होतं प्रियाला. निश असा अचानक फोन करेल हे कल्पने पलिकडचंच होतं तिच्यासाठीही.
निशला असं भेटायला जाणं तिला योग्य वाटलं नाही. नकारच दिला होता तिने भेटायला.
पण निश म्हणाला तिला, "शेवटचं भेट एकदा. शेवटचं." हा 'शेवटचं' शब्द लागला तिला खूप.
"अरे निश, पण अशी कशी येऊ मी? लग्न झालंय माझं."
"पियू... सॉरी प्रिया. कळतंय मला तुझं. पण शेवटचं भेट एकदा. शेवटचं."
"शेवटचं! म्हणजे?"
"शेवटचं म्हणजे शेवटचं. प्लीज. येशील?"
रेल्वेस्टेशन वर भेटायचे ठरले. पण भेट छोटीच असेल अशी अट होती प्रियाची. ठरल्याप्रमाणे वेळेवर पोहोचला निश, पण प्रिया लेटच आली.
ज्या क्षणी त्या दोघांची एकमेकांना नजरानजर झाली, तो क्षण विचित्र होता. का कुणास ठाऊक पण निशच्या नजरेला नजर द्यायची हिंमत होत नव्हती तिची.
"आलीस?"
"अरे सॉरी लेट झाला. ऑफिसमधून असं अचानक बाहेर नाही निघता आलं मला."
"Its ok. I can understand."
"Thanks. असो. बोल कशासाठी भेटायला बोलावलंस मला?"
"कशी आहेस?"
"हे विचारायला बोलावलं होतंस?"
"नाही. नक्कीच नाही. शेवटचं एक सांगायचं होतं तुला. त्याशिवाय जाता नाही आलं असतं मला. म्हणून बोलावलं. "
"हे बघ निश, आपल्यात आता काहीच होणं शक्य नाहीये आता, कळलं? तुझं लग्न झालंय आणि माझंही लग्न झालंय आता.
माझं खूप प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर. माझा विचार काढून टाक मनातून. गमावलंस असं म्हणत रडत नको बसूस. "
निश हसला.
"हसायला काय झालं? इतकं कॉमेडी काय बोलले मी?"
"तू माझ्याशी तेव्हा जसं वागलीस त्यानंतरही मी तुझ्या मागे पुन्हा येईन असे वाटले तुला, याचं हसायला आलं मला. मी तुला वेगळंच सांगायला आलो होतो.
खरंतर तू सोडून गेल्यावर मी काहीतरी गमावलंय ह्याच भ्रमात होतो. पण जे आपलं नव्हतंच कधी ते गमावु कसे शकतो आपण? निलूने समजावलं मला हे. निलू..माझी बायको. मी तुला खरंतर thanks म्हणायला आलो होतो."
"thanks !"
"हो, तूला दोष द्यायचा नाहीये मला. तुझ्या त्या वागण्यालाही कारणं नक्कीच असतील तुझ्याकडे. पण तू सोडलं नसतं तर निलू आलीच नसती माझ्या आयुष्यात.
तुला गमावूनही खूप काही कमावलं मी. म्हणून Thank you once again."
प्रिया फक्त हसली गालात.
"I am happy for you Nish. पण.."
"..."
"पण मगाशी तू शेवटचं भेटणं, जाणं असं का म्हणत होतास? कुठे चालला आहेस का?"
निश हसला.
"आता पुन्हा काय झालं तुला हसायला?"
"खुन्याने काळजीने मृताची चौकशी करणं पटलं नाही मला." टोमन्याचा घाव घेऊन तशीच वळली ती...परत कधीच न येण्यासाठी,

प्रियाला भेटून झाल्यावर हलके वाटत होते त्याला. तिथून निघताच निशने आपल्या सर्व खास मित्रांशी फोनवर गप्पा मारल्या. वेळ नव्हता भेटायला. बरीचशी कामं कमी वेळात संपवायची होती त्याला.
निलू घरी आली तेव्हा निश घरीच होता. तीही खूप घाईने आत आली. खूप प्रश्न होते तिच्या मनात. सगळ्यांची उत्तरं हवी होती तिला आणि उत्तरं फक्त निशकडे होती.
बेडरूममध्ये पोचली तेव्हा बेडवर सगळ्या फाईल्स काढून ठेवल्या होत्या निशने. LIC च्या फाईल्स, बँकची पासबुक, बाकीच्या investment च्या फाईल्स, इ.
"अरे, निश काय चाललंय हे?"
"सगळ्या फाईल्स दाखवून ठेवतोय तुला. पुन्हा मग पुढे तुझी तारांबळ उडायला नको ना म्हणून."
"का? तू कुठे चाललायस?"
"हि बघ. हि LIC ची फाईल, हि बँकची पासबुक्स."
"निश, विषय टाळू नकोस. सकाळीही तुझं तेच चाललं होतं. सांग ना रे!"
"कुठे नाही गं वेडे."
"निश, तुला शप्पथ आहे माझी. बघ शप्पथ तोडलीस तर मरेन मी."
"निलू.." खेकसला तो तिच्या अंगावर आणि खेचून मिठीत घेतलं त्याने.
"सांग ना रे काय झालंय? तू कुठे चाललंयस? निशू प्लीज. "
"..."
"डोळ्यांत पाणी का तुझ्या? निश."
"निलू जास्त वेळ नाहीये गं माझ्याकडे. मरण जवळ आहे माझ्या."
"निश, काहीतरी बोलू नकोस वेड्यासारखं. नाहीतरी कधीच बोलणार नाही मी तुझ्याशी."
"आताच बोलून घे वेडे, नाहीतर उद्या फोटोशी गप्पा मारताना फोटोतून उत्तरं नाही देणारय मी तुझ्या प्रश्नाची."
"निश खरंच नाही बोलणार मी तुझ्याशी. काहीतरीच काय बोलतोस तू! मला खूप भीती वाटतेय. काय झालंय तुला?"
"सकाळ पासून मला एकच वाटतंय की, मी आज मरणारय. काहीतरी वाईट होणारय आज रात्री. आतून एकदम खोल वाटतंय मला. जाणवतंय मला की, मी आज मरणारय."
हे ऐकून ती घट्ट बिलगली त्याला.
"काही होणार नाहीये तुला, कुठेही नाही जाणारय तू मला सोडून. मी जाऊच देणार नाहीये तुला."
"असं कुणी अडवून जाणारा थांबतो का कधी?"
"म्हणूनच चाललं होतं ना हे फाईल्सचं? काही होणार नाहीये तुला." पुन्हा बिलगली ती त्याला.
बरीच समजूत काढली त्याने तिची. पण ती काही समजून घायला तयारच नव्हती. संध्याकाळ तशीच गेली. या गोंधळात प्रियाचा विषय तिच्या डोक्यातून पूर्णपणे गेला होता. रात्रीच्या जेवणापर्यंत निश बरीच कामं उरकत होता. ह्याला फोन कर, त्याला फोन कर, ह्याचा हिशोब, त्याचं बिल. ते पाहून निलू अजून जास्त घाबरत होती. रात्री जेवताना खूप हसत खेळत जेवला तो. पण निलू किंचितही हसायला तयार नव्हती.

निलू कामं आटपून स्वतःच्या बेडरूममधे आली. तोवर निशने आदुला झोपवलं होतं. निलू आली. आतून घाबरलेली, कावरीबावरी. तिचा चेहरा पाहून काय करावे हे निशला समजतच नव्हते. मृत्यूचा अनुभव नसतो कुणालाच.
"निलू."
"..."
"बस इथे."
मुकाट्याने ती त्याच्या बाजूला बेडवर बसली.
"इतक्या लांब नाही. जवळ बस माझ्या. मांडीवर डोकं ठेऊ तुझ्या?" तिने होकार द्यायच्या आधीच त्याने तिच्या मांडीवर डोके टेकवले. बराच वेळ रोकून ठेवलेला डोळ्यातलं पाणी आता मात्र रोकता नाही आलं तिला.
"अगं रडतेस काय अशी वेडे. सकाळी काय म्हणालो मी तुला? हसताना बघायचंय मला तुला नेहमी. मी जाताना तरी तुझा हसरा चेहरा घेऊन जाऊ दे मला सोबत."
ते ऐकून तीचा धीर अजून खचला. काळजीने त्याला छातीशी धरलं तिने.
"असं नको रे बोलूस. प्लीज. सहन नाही होत मला. प्लीज. काही नाही होणारय तुला."
"खूप जगायचं होतं मला निलू, तुझ्यासोबत आयुष्य काढायचं होतं. आज मी प्रियाला भेटून काय सांगितलं माहितीय?"
"..."
"thanks म्हणालो तिला. तिला म्हणालो की, तू सोडलं नसतं तर निलू आलीच नसती माझ्या आयुष्यात. तुला गमावूनही खूप काही कमावलं मी. Thank you . खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर निलू,"
"निशू"
"पण निलू हा मृत्यू? मृत्यू कधीच कोणावर दया करत नसतो. पण अजून सांगू? मृत्यूपेक्षा जास्त आतुरतेने आपली वाट कुणीच पहात नसतं.
मृत्यूएवढं अबोल प्रेम जगात कुणीच करत नाही आपल्यावर. त्याच्या प्रेमात इतकी ताकद असते की, आपण नकळत त्याच्याकडे खेचले जातो...मग आपल्या मनाची परवानगी असो वा नसो."
कितीतरी वेळ तो असाच बोलत होता. निलूचं एक मन हरलं होतं आणि दुसरं मन किंचाळून सांगत होतं की, "काहीच नाही होणारय माझ्या निशला."
निश बोलायचा, गप्प व्हायचा. पुन्हा बोलायचा.

"निलू, तुला माहितीय? माणूस खूप अफाट असतो. आपलं आयुष्य ना असं खूप छोट्याछोट्या गोष्टींमध्ये divide झालेलं असतं. दिवसभरात मी काय काय केलं असेन याचा अंदाजही नाही तुला. आईची माफी मागितली. आयुष्यातल्या खूप जवळच्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारून घेतल्या. आदुच्या पुढच्या शिक्षणाची पुढची पैश्याची सगळी सोय करून ठेवली. "

बरंच काही बोलला तो. बोलता बोलता झोपला. तसाच निलूच्या मांडीवर. निलू मात्र रात्रभर त्याच्याकडे पाहत होती. निशचं बोलणं खरं झालं तर! ही भीती कित्येकदा येऊन गेली तिच्या मनात.

पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला होता. जाग आली तेव्हा उजाडलं होतं. निश अजूनही तसाच झोपला होता तिच्या मांडीवर. लाज वाटत होती पण भीतभीत तिने निशच्या नाकाजवळ हात धरला.
त्याचा श्वास अजूनही चालू होता, तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला. आता कुठे सकाळ झाल्यासारखं वाटू लागलं तिला. मायेने हात फिरवला तिने त्याच्या केसांमधून,
तिच्या त्या स्पर्शाने जाग आली निशला. जाग आल्यावर आपण जिवंत आहोत ह्या गोष्टीवर त्याचा त्यालाच विश्वास बसत नव्हता.त्याच खुशीत, त्याच आवेगाने त्याने निलूला मिठी घेतले.

"जिवंत आहे मी निलू, Yes yes. बघ, बघ मला काहीच नाही झालंय. बघ."
"...." तिच्या डोळ्यांत फक्त पाणी होते.
"निलू बघ. मरणाच्या भीतीने बऱ्याचश्या अपूर्ण राहिलेलेया गोष्टी पूर्ण केल्यात मी. नवीन आयुष्य मिळालंय मला आज. पुनर्जन्म असाच असतो का गं? या ही जन्मी साथ देशील ना मला?"
ती फक्त बिलगली त्याला.

आनंद होता खोलीत,
प्रेम होतं ओंझळीत,
सगळं नाही देत नियती,
पण तरीही बरंच उरतं झोळीत.

-- आशिष राणे
(पुनर्जन्म भाग १ http://www.maayboli.com/node/48095 येथे वाचा.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

प्राण अगदी कंठाशी आला होता वाचतांना. छान >>+१

मुळात त्याला अस वाटलच का की मी उद्या मरणार आहे...... ते कळालं नाही... + १

मुळात त्याला अस वाटलच का की मी उद्या मरणार आहे...... ते कळालं नाही>>>

लेखक देतीलच उत्तर पण मला वाटत त्यानी कल्पना करून पाहिली आज आयुष्याचा शेवटचा दिवस असेल तर आपण (म्हणजे त्याने) काय करायला हवे. कुठले सल आहेत, कुणाची देणी आहेत वगैरे...

कल्पना मला आवड्ली

कथा जरा जास्त मोठी झाली आहे आणि तरीही तुम्ही सर्वांनी ती वाचली त्याबद्दल धन्यवाद.

"Live every day like your last day of your life " Happy ++1

"मुळात त्याला अस वाटलंच का की मी उद्या मरणार आहे...... ते कळालं नाही"

कथेतली "उद्या मरण आहे" ही एक कल्पना नसून हे असे माझ्यासोबत झालेले आहे.
फरक फक्त इतकाच की, मी 'उद्या मारणार आहे' आहे असे न वाटता एका दुपारी मला 'आज खूप काहीतरी वाईट होणार आहे माझ्यासोबत' असे वाटू लागले होते. का? मलाही माहित नाही.
कथेत लिहिलंय तसे सगळे मी केले असे नाही, कारण माझं लग्न नाही झालंय अजून.
Happy
पण मी त्या संध्याकाळी काही ठराविक लोकांना फोन करून मनातले बोलून घेतले होते.
पण जे वाटत होते, ते कुणाला बोलून दाखवले नव्हते.
त्या दिवशी काही झालंच नाही वाईट. (म्हणून मी आज जिवंत आहे Happy )

आयुष्य किती unpredictable आहे याची जाणीव झाली.

आज आताचा क्षण शेवटचा असू शकतो आणि वाटूनही आपण ते टाळू शकत नाही.
आता आपण जाणार, मग अश्या क्षणी आपल्या आयुष्यातल्या गोष्टींचा क्रम लावणे सोप्पे नसते.
क्रम लावला जरी, तरी थोड्या वेळाने तो आपला आपल्यालाच पटेल असेही नाही.

नात्यांचा क्रम लावताच येत नाही.
ज्या नात्यांचा क्रम लावता येतो, अश्या नात्यांना 'नातं' न म्हणता 'ओळख' असे नाव द्या.

नात्यांचा क्रम लावताच येत नाही. ज्या नात्यांचा क्रम लावता येतो, अश्या नात्यांना 'नातं' न म्हणता 'ओळख' असे नाव द्या.>> व्वाह... काय बोललात. अगदि भिडलं आतपर्यंत.