पुनर्जन्म (भाग १)

Submitted by ashishcrane on 13 March, 2014 - 06:59

पुनर्जन्म (भाग १)

फोनची रिंग वाजली.
"आले आले. जर धीर धरवत नाही या लोकांना!" नीलू आतूनच ओरडली. रोजच्या कामाच्या गडबडीत असा फोन वाजला की, राग येतोच. कारण फोन कुणाचा आहे हे तो उचलल्याशिवाय कळत नाही ना.
कामाच्या गडबडीत विस्कटलेले केस मागे घेत नीलू फोनजवळ आली. फोनच्या जवळ बसलेल्या, खिदळनाऱ्या छोट्या आदुला पाहून तिला अजूनच राग आला.
"तुला काय झालंय रे हसायला कार्ट्या!"
"अगं मम्मा, तुझं 'आले आले' त्या फोनवरच्या माणसाला ऐकायला तरी जाणारय का?"
"हो का? हि अक्कल बरीय तुला. इथे बसलायस तर फोन उचलता नाही का आला? ती अक्कल कशी नाही सुचली तुला?"
निलूच्या बोलण्यावर तिला जीभ दाखवून आदु पळाला.
"जीभ दाखवतोस? बघतेच तुला. थांब."
पण फोनची रिंग लक्षात आल्यावर आदूचा पाठलाग केलाच नाही तिने.
"हेल्लो. कोण बोलतंय?" निलूने विचारले.
"हेल्लो. नीलू. आई बोलतेय."
"आई! तुम्ही आणि फोन? घरी सगळे बरे आहे ना?" निशच्या आईचा म्हणजे तिच्या सासूबाईंचा फोन आहे ह्याचंच आश्चर्य वाटलं निलूला.
"हो गं. घरी सगळं बरंय."
"मग बाबा?"
"तेही मजेत आहेत गं."
"नाही तसे नाही ओ. पण अचानक तुम्ही फोन केलात आणि तेही आमच्या घरी... म्हणून आश्चर्य वाटलं."
"तुमचं घर!"
"नाही तसे म्हणायचे नव्हते मला." निलूने सावरासावर करायचा प्रयत्न केला.
"कळलं गं मला ते. ऐक ना. मी काय म्हणत होते, निश कसा आहे गं? बरा आहे ना तो? काही भांडणं झालीयत का तुमच्यात?"
"भांडणं! नाही. पण असं का विचारताय तुम्ही? तो बराच आहे. काय झालंय? काही बोलला का तुम्हाला तो?"
"नाही. म्हणजे..."
"सांगा ना. काय झालंय?"
"आज घरी आलेला निश. घरी म्हणजे आपल्या घरी. इथे."
"तिथे! असा कसा! सकाळी काहीच नाही बोलला मला तो जाणार त्याबद्दल. काय म्हणाला तो? सॉरी. काय म्हणाले ते?" फोनवर सासू आहे हे ध्यानातच नव्हतं तिच्या.
"तसं काही विशेष नाही. पण... असं करतेस का? इथे येशील दुपारी? भेटून सविस्तर बोलू."
"नक्की काय झालंय आई?"
"अगं, काळजी करण्यासारखं काही नाही गं. बरेच दिवस भेटले नाहीयेय ना आदुला, म्हणून म्हटलं तुला येऊन जा."
"अजून बदलला नाहीत तुम्ही. आहे तश्याच आहात अजून. मनात ठेवणार सगळं."
आई छोटंसं हसली गालात.
"काय मग? येतेयस ना?"
"हो येतेय. पण दुपारी नाही. आताच. थोडी कामं आहेत. ती आवरते आणि निघतेच थोड्या वेळात."
"बरं मग असं कर. दुपारी इथेच थांब जेवायला."
"नको हो आई. उगाच तुम्ही कशाला त्रास करून घेताय?"
"त्रास कसला गं त्यात. नातवाचा त्रास झालाय का कधी आजीला? मला पण भरवूदे की माझ्या नातवाला."
"आज बरी आठवण आली नातवाची? सोडा. मी ठेवते फोन, आटपते आणि निघते लगेच."

आज अचानक आईंचा फोन हे पचवणं सोप्पं नव्हतंच तिच्यासाठी. घर सोडून वेगळे राहायला आल्यापासून जरा बिनसलंच होतं सगळं त्यांच्यात.
"निश आज अचानक तिकडे कसा गेला? गेला तर मला सांगून का नाही गेला? ह्या माणसाचं ना मला काही कळेनासंच झालंय." नीलू मनातल्या मनातच बडबडत होती.

आईकडे जायची घाई होती म्हणून निलुही पटापट कामं उरकू लागली. इतक्यात दाराची बेल वाजली.
"आता कोण आलंय मरायला?" चिडलीच ती.
दर उघडून पाहिले तर समोर इस्त्रीवाला.
"क्या हे भैया? महिने के बीच में ही बिल मांगने आ गये क्या? भूल गये? या आपका महिना १४ तारीख पेही खतम होता हें?"
"नही. पैसा मांगने नाही आये हम. साहब तो सुबह को ही इस महिने का advance दे के गये."
"advance !!! साहब?"
"हा. जल्दी में थे. में तो यहापे कपडे हें क्या ये पुछने आया था. साहब बोले थे के घर में एकबार जाके आना. इसलिये..."
"नही. कुछ कपडे नही हें."
"अच्छा, ठिक हें फिर. मै चलता हु. "
"भाभीजी, साहब की तो तबियत ठिक हें ना?"
"हा. क्यू? ऐसा क्यू पुछ रहे हो?"
"नही कुछ नही. बस ऐसे हें. मै चलता हु."

पुन्हा गेली ती कामं आवरायला. नीलू अजून निशच्याच विचारात होती.
"काय चाललंय ह्या माणसाचं? विचित्र वागतोय सकाळपासून. काही कळतच नाहीये. शी बाई! आईकडे जाउन काय दिवे लावालेयत, ते देव जाणो."
थोड्या वेळाने पुन्हा बेल वाजली दाराची आणि ती भानावर आली.
दारात पेपरवाला होता. त्याची ही तीच गत. निशने त्यालाही या महिन्याचे पेपरचे बिल advance देऊन टाकले होते पण बिल घ्याला विसरला होता. तेच बिल देऊन पेपरवाला निघून गेला.
आता मात्र निलूला टेन्शन येऊ लागले.
"असं का वागतोय निश? सकाळी ही किती वेगळं वागला माझ्याशी तो"
सकाळचा प्रसंग आठवला तिला.

धुतलेले केस फुसत जेव्हा ती बेडरूममध्ये आली तेव्हा निशने मागून हलकेच मिठीत घेतले होते तिला."
"अरे! बरा आहेस ना? सोड चल. अरे! सोड म्हणते ना! निश, अरे आदु उठेल ना रे!"
"उठू दे मग. हक्काची बायको आहे माझी. दुसऱ्याच्या बायकोला थोडी ना मिठी मारतोय."
"हो का? काय झालंय? आज स्वारी वेगळ्याच मूडमध्ये दिसतेय? लवकर का उठलास."
"असाच. बरीच कामं पेंडिंग आहेत. पण वेळ कमी आहे."
"का? तू कुठे चाललायस? ये प्लीज हा, कुठे पिकनिक बिकनिकचा प्लान नको करूस. आदुच्या अभ्यासाचे खूप वांदे होतात रे आणि तुला तरी सुट्टी मिळणारय का ऑफिसमधून?"
"पिकनिक!!! हाहा. आता एकट्याची पिकनिक. आणि सुट्टीचं काय घेऊन बसलीयस? आता मोठ्ठी सुट्टी मिळणारय. कोण अडवणार मला?
ऑफिसवाले?
जाणाऱ्या माणसाला दरवेळी अडवता नाही येत आणि नियतीनेच निर्णय घेतला असेल तर नाहीच नाही."
"ओ निश महाराज, आज काय सकाळी सकाळी नियती, निर्णय?"
"हेहे. काही नाही. असंच."
"नक्की ना?"
"हो नक्की. लिहून देऊ का बॉन्ड पेपरवर?"
"नको. तितकी मेहरबानी नको. चल जाते मी. डबा बनवू दे मला. तुम्हाला काय? जाल पिकनिकला. आम्हा बायकांना पिकनिकला जातानाही डबा बनवावा लागतो."
हसून नीलू जायला निघाली. इतक्यात निशने तिचा हात धरून तिला जवळ खेचले. तिच्या कपाळावर ओठ टेकवून गप्प राहिला.
"निश. काय झालं?"
"काही नाही. काही झालं तरच मिठी घ्यायचं असा नियम आहे का?"
"नाही रे. पण..." निशने मिठी घट्ट केली होती.
"श्श्श्श्स्श...गप्प. नीलू आय लव यु. नीलू, तू खुश आहेस ना?"
"हम्म." तिच्या डोळ्यात पाणी होते.
"अगं रडतेस काय वेडे! हस बघू. हस म्हणतो ना!"
"ए! ओरडतोस काय रे?"
"हेहे. ओरडत नाहीये मंद. हट्ट करतोय. एक वचन दे, तू कधी रडणार नाहीस. नेहमी हसताना बघायचंय मला तुला. दे वचन." हात पुढे केला त्याने.
इतक्यात बेडवरच्या आदूची चुळबुळ झाली म्हणून दोघांची मिठी सुटली. वचन बाकी राहिलं.

सकाळचा हा प्रसंग आठवून तिच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलंच. अपेक्षित प्रेमापेक्षा अनपेक्षित प्रेमच माणसाला जास्त कावरं बावरं करतं.
पण निशच्या वागण्याचा अर्थ तिला अजूनही कळत नव्हता. अपेक्षेपेक्षा वेगळं वागू लागलं की, ओळखीचं माणूसही अनोळखी वागू लागतं.

दुपारभर हे असेच चालू राहिले. कोण न कोण येताच होते. दुधवाला भैयाही येउन गेला. निलू अक्षरश: कंटाळली होती. शेवटी सगळं आटपून निशला फोन करायचा निर्णय घेतलाच तिने.
पण इतक्यात पुन्हा फोन वाजला.

"हेल्लो. कोण?"
"निश."
"निश. तू! शंभर वर्ष आयुष्य आहे तुला."
"हेहे १०० वर्ष? नक्कीच नाहीये तितकं आयुष्य."
"म्हणजे?"
"काही नाही. पण तू माझी आठवण का काढत होतीस?"
"अरे काय घोळ घालून ठेवल्यास तू सकाळपासून. सगळ्यांना बिलचे पैसे advance का देऊन ठेवलेयस? आणि हो. आईकडे का गेलेलास?"
"तुला कोण बोललं? आई बोलली? फोन आलेला तिचा? काय म्हणाली?
"ते सोड. तू का गेलेलास तिथे? सांग ना.
"काहीतरी सांगायला गेलो होतो तिला. तुला काही बोलली का ती?"
"दुपारी भेटायला ये म्हणाली."
"अच्छा. जा मग."
"ऐक न."
"काय?"
"मी फोन हे सांगायला केला होता की, मी आज प्रियाला भेटायला जातोय." अडखळत बोलला तो.
"प्रियाला? निश. लग्न झालाय आपलं न तू पुन्हा तिला भेटायला जातोयस? वेड लागलंय का तुला?"
"निलू निलू, ऐक. शांत हो तू आधी. हो मी जातोय तिला भेटायला. पण मला तुझ्यापासून लपवायचं नव्हते. हे बघ माझं फक्त तुझ्यावरचं प्रेम आहे. Believe me. पण..."
"पण काय? सांग नाहीतर वेडी होईन मी."
"पण काही उरलेले हिशोब सोडवायचे आहेत मला."
"प्लीज."
"निश."
"निलू. खरंच काही नाही होणार विश्वास ठेव माझ्यावर. उशीर होत असेल तुला. मलाही निघायचं. चल ठेवतो."

आता मात्र निलूचं डोकं गरगरू लागलं होतं.
"का आली हि प्रिया पुन्हा माझ्या संसारात? ह्या देवाला पाहवत नाहीये का माझं सुख?"

पुन्हा वाजला फोन.
"निघालीस का गं?"
"हो आई. निघतेच आहे."
"ठिकय. वाट पाहतेय मी. या लवकर."
"हो. आलेच."
आता मात्र तिला निघावंच लागलं. स्वतःला आणि आदुला तयार करून ती सासरी जायला निघाली. गाडीतही तिच्या मनात तेच विचार चालले होते. आपला संसार विस्कटणार तर नाही ना हि भीती होती.

"प्रिया, कुणीतरी स्वतःच्या प्रार्थनेत आपल्यासाठी वाईट मागावं असं काम कधीच करू नये माणसाने. तू निशला सोडलंस ना तेव्हा मनोमनी thanks म्हणाले होते तुला मी. तू सोडलंस म्हणून मिळाला निश मला. पण आज... श्या... आज खूप वाईट निघतंय तोंडातून तुझ्याबद्दल."
"मम्मा, आज मी आजीकडून भरवून घेणार. यप्पी."
"ह्म्म्म. घे भरवून."
आदुमुळे तिच्या विचारात अडथळा आला. पण थोडा वेळ गेला अन पुन्हा तेच येऊ लागलं तिच्या मनात. काही विचारांना जितकं लांब ढकलावं, ते आपला तितकाच पाठलाग करतात.

"निशच्या मनात अजूनही प्रियाबद्दल काही असेल का? नाही. नसेल तसं काही. उगाच वेड्यासारखा विचार करतेय मी. पण एकेकाळी निशचं तिच्यावर खूप प्रेम होतं ह्याला नकार कसा देऊ मी? त्याच्या त्या नाजूक क्षणी मी त्याला सावरलं म्हणून मी त्याला मिळवू शकले. पण..."
इतक्या वर्षानंतरही 'प्रिया' या नावाच्या एका उच्चाराने तिचं अख्खं आयुष्य ढवळून निघालं होतं. काही वादळं कधीच क्षमत नसतात, ती फक्त स्वतःची वाट बदलतात. पण आयुष्याच्या कुठल्या न कुठल्या वळणावर तीच वादळं पुन्हा भेटतात.. पुन्हा उध्वस्त करण्यासाठी.

"निश आणि मी खरंच कधी एक होऊ शकलोय का? मग याचा अर्थ, निशने 'एक तडजोड' म्हणून माझा स्वीकार केला होता का?
कोण म्हणतं की, माणसाला आयुष्यात फक्त नकारच पचवावे लागतात?
माणसाला आयुष्यात फक्त नकारच नाही तर कधीकधी होकारही पचवावे लागतात."

-- आशिष राणे

(पुनर्जन्म भाग २ http://www.maayboli.com/node/48095
येथे वाचा.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users