life@mindcrest.com भाग 2

Submitted by चेतन.. on 11 March, 2014 - 07:06

च्यायला…वैतागच्चे राव आता … .. फ़ोर्मल शूज, सॉक्स घालावे लागणार.. इन शर्ट करावा लागणार.. पण त्याला फ़ोर्मल्स असावे लागतात.. EXL मध्ये भारी होतं. काहीही घाला, कसंही घाला.. इंटरव्यू ला काय कॉलेजचाच युनिफॉर्म घालून गेलो होतो.. पण आता रोज नाही बरं दिसणार, तेच घालून जाणं. आता उगाच खर्च. दहा रुपयांची जिन्नस दोन रुपयात जरी मिळत असली तरीही काहीही गरज नाहीये म्हणून आपण टाळायचो आपण. पण आता?… उठल्या उठल्या स्वानंदचं डोकं ह्याच विचारांनी भणभणलेलं असतानाच मोबाईल वाजला…
"काय चालूये रे.. "
"काही नाही.. बोल.. आत्ताच उठलोय.. "
"तुझ्याकडे चांगले कपडे आहे का आता?" आई.
"आ..हे ..त तसे…"
"तसे नाहीत.. चांगले आहेत का?"
"...."
"मला माहीत आहे तुझ्याकडे नसणारेत कारण जो काही हिशोब दिलायेस त्यात कपड्यांवरचा खर्च दिसत नाहीये"
"अगं नाही काही गरज... बघेन मी काहीतरी"
"काय बघणारेस?"
"कपड्यांचं"
"बघू बिघू काही नको .. आत्ता बाहेर जा आणि चांगले कपडे घे"
"हो"
"नुसतं हो नाही.. बाहेर पड… तुझ्या अकाउंट ला किती पैसे भरू??"
"काहीतरी काय आई... तू काही पैसे बिसे पाठवू नकोस. मी बघतो इकडे काहीतरी."
"मला माहितीये तू काही कपडे घेत नसतोस.."
"घेतो गं बाई, वाटल्यास घरी आल्यावर दाखवतो"
"कधी येणार आहेस?"
"पुढच्या महिन्यात"
"म्हणजे ह्या महिन्यात काही तू कपडे घेत नसतोस"
"चल मी ठेवतो…. उगं बोर करायलीस. "
"मी पैसे पाठवतीये.."
"तू पाठव आणि बघ मी काढतो का ते… "
"असं का करतोयेस??"
"सांगितलं ना घेतो म्हणून… विश्वास ठेव.. आता ठेवतोय मी.. बाय" असं म्हणून स्वानंदनं फोन ठेवला. कुठून पैसे पाठवणार होती हि बाई देव जाणे. कसातरी हा महिना काढू आणि घेऊ पुढच्या पगारात कपडे, असा विचार करून साहेब आन्हिकं उरकायला गेले.

____________________________________________________________________________

स्वानंदचं हॉस्टेल…एक ग्रंथ होईल भलामोठा.. शुक्रवार पेठेतली सहा मजली कुसुमाई संकुलची इमारत, त्यातले वरचे तीन मजले हॉस्टेलसाठी आणि सहाव्या मजल्यावर ह्याची रूम. लिफ्ट होती पण बंद पडलेली, तीही एका वर्षापासून. सहाव्या मजल्यावर एकूण अकरा जणं. स्वानंदच्या मित्राचंच हॉस्टेल असल्याकारणानं सगळ्या गोष्टी त्यालाच विचारून व्हायच्या. एकंदरीत भाव खूप मिळायचा... तर अकरापैकी चार सी ए ची तयारी करणारे, दोन इंजिनीअर, दोघं मॉल मध्ये काम करणारे, एक हॉस्पिटल मधला लॅब टेक्नीशिअन, एक सुशिक्षित बेकार आणि स्वानंद. सेलिब्रेशन म्हणजे काय तर खालून दोन लिटर चं आईसक्रीम आणायचं आणि सगळ्यांनी मिळून खायचं, गाणी म्हणायची, नाचायचं… काही जणांची इच्छा असायची दारू प्यायची. पण साधा सिगारेटचा वास सुद्धा सहन नं होणाऱ्या स्वानंदचा स्वाभाविकच त्याला विरोध असायचा. आणि म्हणून तश्या पार्ट्या होस्टेलवर तो चालू द्यायचा नाही. नाराज असायचे काही जण पण तोंडावर काही कोणी बोलायचं नाही कारण स्वानंद होता म्हणून रात्री बेरात्री हॉस्टेल मध्ये यायला कोणी अडवायचं नाही.
तर स्वाभाविकच आता पगार वाढणार म्हणून रात्री सगळे जमले. आणि गोंधळ सुरु झाला.
"आज कि अमूल बटरस्कॉच स्वानंदकी तरफसे"
"अगर खाली स्कॉच मिलती तो…… " कोणीतरी पुटपुटलं.
"क्क्काय???"स्वानंद
सगळे शांत...
"अरे छोड नां……. "
सगळ्यांनी हातातल्या आईसक्रीमच्या वाट्या उंचावल्या.
"चीअर्स……."
"काय बाबा आता मजाय तुझी.. "
"दोस्त.. अब बडा आदमी हो गया है" आता सगळ्यांपेक्षा स्वानंदचाच पगार जास्त होणार होता.
"आता कसलं काम करणार बे तू" सलीम (मॉल वाला)
"काहिच कल्पना नाही रे..कळेल ट्रेनिंगनंतर..बघू... उद्यापासून अंदाज येईल " स्वानंद
"EXL चा पसारा झाला का रे आवरून?"
"हो ना... आज दिवसभर तिकडेच होतो.. "
"हे एक बरं झालं भाऊ.. रात्रीची झोप मिळेल…… आपल्यालापण... कारण घुबड आता माणसात येतंय" प्रमोद (ढोला इंजिनीअर)
"घ्या.. कुणाचं काय तर कुणाचं काय.. सगळ्यात जास्त वेळा तर दार मीच उघडायचो.. " अमोल (हडकुळा इंजिनीअर)
"अरे पण माझी झोपमोड व्ह्यायची ना.. "
"आणि दुपारपर्यंत तंगड्या वर करून काय XXXXX करतोस काय.. आणि तीही एव्हढा वेळ??? "
"गप बस अमल्या लई मारीन.." बाह्या सरसावत प्रमोद.
"तुला दुसरं काय येतं "
हे ऐकून प्रमोद त्याच्या अंगावर जाणार तेवढ्यात सगळ्यांनी त्याला अडवलं.
"अरे जाऊ दे ना.. उद्या भांडा पोटभरून.. आज नको"
"आता वेळेवरच होईल सगळं. कोणाची झोपमोड नाही होणार." स्वानंद
एवढ्यात..
"यारा तेरी यारी को ………मैने तो खुदा माना…आआआआ" भसाड्या आवाजात सलीमनं सुरु केलं.
"याद करेगी दुनिया... आआआआआ.... तेरा मेरा अफसाना…." सगळे भसाडे कोरस मध्ये.
गाण्याचं कसं असतं माहितीये? जेंव्हा कोणी एक जण भसाड्या आवाजात गाणं बोम्बलत असतं ना.. ते नाही आपण ऐकू शकत. पण तेच गाणं तश्याच आवाजात जर भसाड्यांचा ग्रूप म्हणत असेल तर ते खरंच सही वाटतं..
"अरे कौन कम्बख्त बर्दाश्त करने के लिये आईसक्रीम खाता है... हाईईईई" दिलजले प्रदीप..
"हम तो खाते है कि ये सेलिब्रेट कर सखे…लेकिन ये कम्बख्त गर्मि…
"तुझ्या तर आता बास करतो कि नाही… म्हणत प्रमोद त्याच्या उरावर…
"हिच्या आयचं पिदाडं… जिथं बघावं तिथं दारू.... "
"अबे... काश मै तुम्हे बता सकता…"
"तू काहीच बताऊ नको…. शांत बस"
"लोग केहते है…."
"तू हरामी है… "म्हणत त्यांचं धुणं सुरु झालं.
दोघेही तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने मनोरंजनाची पूर्ण हमी… आणि त्यांच्या दोघात कोणी पडतही नाही.. कारण ते परवडतही नाही... एवढा सामना रंगात आला असतानाच..
"बरं एक सांगा.. आपल्याला आईसक्रीम खायचंय कि शेक प्यायचाय?" हावरट मनीष मध्येच पचकला..
"??????????????"
"अरे, नालायकांनो पटपट खावा आता असं ना तसं शेकच प्यावा लागणारे"
असं म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या नजरा त्या परातीत जिथे आईसक्रीम ठेवलं होतं तिकडे.
"अरारारारारा काय झालंय भाऊ... कव्हर तरंगतंय.. शेकमध्ये"
"विदाउट नखरे एव्हरीवन इट इट मस्ट" सुशिक्षित बेकार
एकदा का घर सोडलं कि सगळ्यात आधी घाव बसतो तो जिभेवर. अन्नाला चव असते, ते चविष्ट असतं, वरणात डाळ नावाचा प्रकार घालतात, सोडा फक्त धुण्यातच वापरावा, पोळीला तेल लावतात. हरभरा हे घोड्याचे अन्न आहे.. ह्या तत्सम गोष्टी कालबाह्य होऊन जातात. आणि अश्या जिभेला... जर… कधी ... चुकून…चुकून... चांगलं... मिळालं... तर काय होतं ह्याचा प्रत्यय कुसुमाई संकुलच्या सहाव्या मजल्यावर येत होता. कव्हर चा कागद खाता येत नव्हता म्हणून वाचला.. आणि परात साबण लावूनही एवढी स्वच्छ निघाली नसती.
........
सगळा कार्यक्रम उरकून आपापल्या कॉट वर सगळ्यांनी उड्या मारल्या. आता सहा महिन्याचा दिवस रात्रीत परिवर्तीत होणार होता आणि रात्र दिवसात. आता रात्र हि खरीखुरी रात्र असणार होती आणि दिवस हा खराखुरा दिवस. पण शरीराला लागलेल्या सवयीचं काय??. खूप प्रयत्नानंतरही झोप येत नव्हती म्हणून स्वानंद गच्चीवर गेला. डोक्यातून EXL हटत नव्हतं..
आता लॉग आउट च्या तयारीत असतील सगळे.. लॉकर मधून मोबाईल घ्यायला झुंबड उडाली असेल.. नुकत्याच झालेल्या पावसानं सारा ड्रॉप एरिया ओला ओला झाला असेल... ड्रॉप एरियात आता कॅब ची घरघर सुरु झाली असेल.. सगळे सगळ्यांचा निरोप घेत असतील... भागुबाईचा सामुहिक चेष्टेचा कार्यक्रम एव्हाना सुरूही झाला असेल.. पम्यानं आजही काहीतरी गोंधळ घालून ठेवला असेल... नेहमीप्रमाणे अजितराव आपला झालेला अपमान खाली मान घालून सांगत असतील... चंद्याच्या हडपसरच्या "त्या" व्हेरी व्हेरी स्पेशल गाडीभोवती प्रदक्षिणा चालू असतील. योग्या बासरी वाजवत बसला असेल आणि त्याच्या कॅब मधले मेम्बर त्याच्या नावानं ठणाणा करत असतील, आणि तोही हसत हसत निर्लज्जपणे डुलत येत असेल..… आता गाड्या निघाल्या असतील…लगेच काहीतरी आठवल्यानं स्वानंद नं पटकन मोबाईल चेक केला… अरे आज दिवसभरातून सबाचा एकही मेसेज नाही…. विसरली असेल…जाऊ दे... असा विचार करून स्वानंद रूममध्ये आला. उद्याच जॉईन व्हायचंय, आता झोपावंच लागेल असं ठरवून त्यांनं डोळे मिटले कि... मोबाईलवर मेसेज चा टोन वाजला…
आणि सबाचाच मेसेज …"दिवसभर ठरवलं मेसेज नाही करायचा पण आता नाही रहावलं... तुझ्याच भाषेत 'लई घाण मिस केलं तुला'.... अजून झोपला नसशीलच.. झोप आता good night... :)"
"ह्म्म्म्म same 2 u" असा रिप्लाय करून साहेब अगदी समाधानानं झोपेच्या आधीन झाले..
.
.
.
.
.
.
.
त्याच दिवशीचा उगवणारा सुर्य आणि माईंडक्रेस्टचा पहिला दिवस दोघंही स्वानंदची खूप आतुरतेनं वाट बघत होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users