अन्या - १५

Submitted by बेफ़िकीर on 10 March, 2014 - 10:24

औदासीन्याचे मळभ दाटून यावे तसे झाले होते. आत्मविश्वासाला तडा गेला होता. नाही नाही त्या शंकाकुशंका मनात येऊ लागल्या होत्या. प्रत्येक माणसाच्या हेतूबाबत आता शंका वाटू लागली होती. शरीरात आजवर खेळत असलेली सकारात्मक उर्जा अचानक नकारात्मक झाल्यासारखी वाटत होती. लवकरच काहीतरी घडेल असे मनात येऊ लागले होते.

काहीही विशेष कारण नसताना अन्या मनातच खचला होता. लाहिरींना हाकलणे, रतनदेवीला मारहाण करून स्वतःपासून व एकंदरच वलयापासून दूर करणे, तावडे पाटील, इग्या, पवार आणि मशालकर ह्यांच्याशी धड कधीच जम बसवता आलेला नसणे, त्यातच नुकतेच पोलिस येऊन धाकदपटशा दाखवून पैसे लाटून गेलेले असणे आणि शेवटी एक मुकी मुलगी अंगावर हात टाकताच जखमी करून पळून गेलेली असणे!

अन्याला ह्या सर्व घटना आता एका कसल्यातरी धाग्याने बांधल्या गेल्यासारख्या वाटत होत्या. मनात त्यालाही वाटत होते की तसे काही नसणार, पण मनच ते, आधी नको ते विचार करणे हेच त्याचे काम आणि कर्तव्य!

आपली माया आणि वलय, श्रीमंती आणि प्रभाव जसजसे वाढले तसतसे आपले शत्रूही वाढले हे अन्याला आता प्रकर्षाने जाणवू लागले होते. आज जनतेसमोर जाण्याचे सर्व कार्यक्रम त्याने रद्द केले होते. नरसूने गावकर्‍यांना 'आज दर्शन होणार नाही' असे स्पष्ट सांगितलेले होते. गावाहून आलेले लोक एक तर निराश होऊन परतत तरी होते किंवा आजचा दिवस वीर गावातच काढून उद्या पुन्हा दर्शनाचा प्रयत्न करावा असा विचार करत होते. संस्कार वर्गही आज भरले नाहीत. जे गावकरी निवासाची स्वच्छता वगैरे करत ते आपली कामे निमूटपणे करत होते.

काय झाले होते ह्याचा अंदाज नरसूलाही येत नव्हता. पहाटेच एक मुकी मुलगी महाराजांना जखमी करून पळून गेली इतके त्याने पाहिले होते. त्याच्या अनुभवी मनाने त्याला कौल दिलेला होता. नक्कीच 'महाराज' ह्या मुखवट्याखाली आपला खरा चेहरा लपवणार्‍या या तरुण पोराने ती मुलगी मुकी आहे हे बघून तिच्यावर हात टाकलेला असणार! त्यात पुन्हा ती मुलगी गेल्या आठच दिवसांपासून गावात दिसू लागली होती आणि आज अचानक पळून गेली होती. तिला पळून जातानाही फारसे कोणी बघितलेले नव्हते हे नरसूला त्याने केलेल्या चौकशीतून समजले होते.

अन्याच्या मनावर ह्याच गोष्टीचा परिणाम झाला होता. एक मुलगी अचानक गावात राहायला येते. ती कोण, कुठली हे कोणीच धड सांगू शकत नाही. ती खाणाखुणा करूनच सगळ्यांशी संवाद करत असते. कोणत्यातरी एका खोलीत कोणालातरी थोडेसे भाडे देऊन ती राहू लागते. तिचा हेतू जणू निवासाची आणि महाराजांची सेवा करणे हाच असावा असे जाणवल्याने तिच्या गावात येण्याला, एकटीच असण्याला, कशालाच कोणाचाच विरोध झालेला नव्हता. तिला निवासात प्रवेशही सहज मिळाला. अगदी महाराजांच्या निकट जाणेही सुलभ झाले तिला! महाराजांनीही खास तिला आठवड्यातून दोनवेळा स्नानाच्या तयारीसाठी यायला सांगितल्याने तर तिच्याबद्दल इतरांना अप्रूपच वाटू लागले. तिला सहाय्य मिळू लागले. थोडेफार महत्व तिलाही मिळू लागले. 'बिचारी मुकी आहे' हे तीन शब्द लोकांमधील चांगुलपणा जागृत करण्यास पुरेसे ठरू लागले.

आणि आज अचानक ती पळून गेली. अन्या विचार करत होता. ती कोण असावी. कुठे पळून गेली असावी? एखादीच्या अब्रूवर हात टाकल्यावर प्रतिकार करण्यासाठी तिने आरडाओरडा करणे, पळून जाण्याचा प्रयत्न करणे, हातातील एखादी वस्तू फेकून मारणे हे शक्य आहे. पण ह्या मुलीने अगदी जणू ठरल्याप्रमाणे कोणत्यातरी गुप्तपणे बाळगलेल्या शस्त्राचा ऐन क्षणी घातक वार केला होता. ह्यामागे तिचा काहीतरी दृढ निश्चय असावा असे वाटत होते. योजना असावी असे जाणवत होते.

आता ती काय करेल? आता पुन्हा पोलिस आले तर ह्यावेळी किती रक्कम चारावी लागेल? आपली अब्रू सांभाळणे जमेल का? त्या मुलीला कोणी मुद्दाम पाठवले असेल का? असेल तर कोणी? लाहिरी, रतन, इग्या की पवार? की तावडे पाटील? पण तावडे पाटलाचे बिबट पालन केंद्राचे काम तर आपण करून दिले. मग तो असा का वागेल?

हे सगळे नेमके काय चाललेले आहे? आपल्याला एकाचवेळी खूप चांगले वागावेसे वाटत असतानाच अचानक अशी एखादी मुलगी उपभोगण्याची इच्छा का होत आहे? नरसू तर कोणाला सामील नसेल?

मन पोखरले जात होते. कुठेतरी लहानपणचा अन्या, जो अजूनही मनात दडलेला होता, जो घाबरट होता व चोर होता, तो आतून सांगत होता. पळून जा! हे एवढे मोठे राज्य पेलणे तुझ्या ताकदीचे काम नाही. लोक तुला काय मानतात आणि तू प्रत्यक्षात काय आहेस!

पण पळून जायचे कुठे? इतरत्र गेल्यावर खायचे काय? येथील किती रक्कम आणि दागदागिने बरोबर नेता येतील? ते सांभाळायचे कसे? ठेवायचे कसे? कोणी 'हेच ते पळालेले महाराज' म्हणून ओळखले तर काय करायचे? आता सुटकेच मार्गच नाही का? स्त्रीपासून, धनापासून आणि खोट्या प्रतिष्ठेपासून हळूहळू दूर व्हायला शिकायला हवे का? रतन आता काय करत असेल? तिला आपण का एक प्रकारच्या नजर कैदेत ठेवले आहे? तिच्यावर आपण खरे प्रेम केले आणि तिने फसवले म्हणून? तिला परत जवळ करावे का? आपले हे साम्राज्य पेलण्याची शक्ती आपल्या एकट्याच्या मेंदूत नसली तर रतनच्या मेंदूचा वापर जोडीला घ्यावा का? ती तो आनंदाने करू देईल का? तिला काय काय हवे असेल? पुढे कधीतरी ती डाव साधेल का? सूड उगवेल का? आपल्यापेक्षा स्वतःच मोठी बनून बसेल का?

विचारात गढलेल्या अन्याने शेवटी न राहवून दत्ताचा जप सुरू केला. मन सांगत होते की एक मुकी मुलगी येऊन जखमी करून पळून गेली म्हणून काही फार बिघडलेले नाही. गावकरी अजूनही तुला तितकाच मोठा मानतात. पण मनच हेही सांगत होते की आपल्या विरुद्ध जायला आणि आपला पर्दाफाश करायला तयार असणारे काही घटक समाजात निर्माण झालेले असावेत. ते त्यांची योजना आखत असावेत. आपण एक पाऊल पुढे नसलो तर फेकले जाऊ!

अन्याला अचानक काहीतरी आठवले. ती गोष्ट आठवल्यावर अन्या अचानक ताठरून बसला. मग उभा राहिला. विचारांमध्येच आतल्या खोलीत ताडताड चालत येरझार्‍या घालू लागला.

तालुक्याच्या गावी असताना एक जीप त्याने पाहिलेली होती. त्या जीपमधून आलेली माणसे भक्त वाटत नव्हती. त्यातील एक माणूस त्याची सांधेदुखी किंवा काहीतरी बरे व्हावे म्हणून आपल्याला काठीने वार करायला प्रवृत्त करत होता. त्याच्यावर एक दोन वार करूनही तो हे म्हणेना की आता बरे वाटत आहे तेव्हा आपल्या ध्यानात आले होते की तो इग्या किंवा पवारने पेरलेला माणूस नसून आपला पर्दाफाश करू पाहणारा कोणी असावा. मग चिडून आपण एक सणसणीत तडाखा त्याच्या पाठीवर मारल्यावर तो वेदनांनी कळवळत पडला होता. मग त्याचे सहकारी धावत आले होते व त्यांनी त्याला जीपमध्ये बसवले होते व जाताना कोणीतरी म्हणाला होता की 'तू कसला महाराज, लवकरच तुझे बिंग फोडणार आहे मी'!

हे आत्ताच का आठवले आपल्याला? का?

बरोबर! ती माणसे शहरी वाटत होती. आणि ही मुकी मुलगी? आपल्या अंगावरून हात फिरवताना त्या पहाटेच्या अंधूक प्रकाशात एकदोनदाच आपल्याला दिसले होते. की तिच्या एका हातावर मेंदी होती. चांगली बारीक नक्षीकाम असलेली मेंदी! गावातल्या बायकांच्या हातावर दिसतो तसला नुसता लाल गोळा नव्हता जाडाभरडा! त्याच हाताच्या पाचही बोटांची नखे लालचुटुक रंगवलेली होती. ती पाचही नखे चांगली वाढवलेलीही होती. एक ग्रामीण, तीही मुकी असलेली मुलगी इतकी नेटकी कशी? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे......

...... ती कोण होती, कुठली होती, हे कोणालाच कसे माहीत नाही गावात?

ह्याचा अर्थ इतकाच, की आपल्या बदनामीची योजना अतिशय व्यवस्थित आकाराला येत आहे. त्या योजनेने स्वतःचा प्रताप दाखवण्याआधीच...... आपण आपला प्रताप दाखवायला हवा...... त्या योजनेतील हवाच काढून घ्यायला हवी!

अन्याने बाहेरच्या दिशेने बघत जोरदार हाक मारली......

"नरसू???"

नरसू धावत आत आला. हात जोडून मान खाली घालत म्हणाला......

"जी"

"हमारी जोभी बेसहारा बहने इस गाँवमे है, उनके वास्ते एक केंद्र स्थापन होगा! आजही! माता रतनदेवी उसकी प्रमुख होगी! सुकन्याताईके शुभहस्ते उद्घाटन होगा! और याद है परसो पुलिसवाले आये थे?"

"जी जी"

"वोह बागवान साहब जो है उनके हाथोंसे हमारी बहनोंको चीजे बाटी जायेगी"

"जी"

"और सुनो...... ये सब आज...... मतलब आजही होना है"

चक्रावलेला नरसू गावाकडे धावत सुटला. सुकन्याताईंच्या वाड्यावर वर्दी देऊन वाटेतल्या गावकर्‍यांमध्ये बेभानपणे दवंडी पिटल्यासारखा ओरडत नरसू बागेतल्या घराकडे धावत सुटला होता. बागेतल्या घरात वास्तव्य होते माता रतनदेवींचे! जर अनेक महिन्यांनी ह्या दोन शक्ती पुन्हा एकत्र झाल्या असत्या आणि तेही इतक्या शुभकार्याच्या निमित्ताने...... आणि तेही सरकारदरबारच्या उपस्थितीत...... तर कोणाची हिम्मत होती तिन्मुर्ती दत्ताच्या अवताराची बदनामी करण्याची!

बातमी ऐकून माता रतनदेवीच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहिले. आपली नजरकैद संपली, अन्याने आपल्याला माफ केले व जवळही केले आणि पूर्वीप्रमाणेच महत्वही देऊ केले हे बघून कधी एकदा अन्याला भेटतीय असे रतनला होऊन गेले. अन्यासाठी तिने एका बड्या असामीचा मर्डर केलेला होता. काही प्रमाणात आज अन्याने परतफेड केली होती.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बागवान साहेबांच्या तीन गाड्यांचा ताफा वीर गावात प्रवेशला तेव्हा निवासावर नुकत्याच एक झालेल्या दोन असामान्य शक्ती, माता रतनदेवी व अवलिया बाबा, ह्यांच्या दर्शनाला गावकर्‍यांची रीघ लागली होती.

===========================

एडामट्टी मणी आयुष्यात प्रथमच इतकी घाबरलेली होती. नुकतीच सूर्याची किरणे पृथ्वीला स्पर्श करू लागली तेव्हा ती अब्रू वाचवत निवासातून बाहेर धावली होती. उघड होते, जर गावकर्‍यांनी तिला तसे धावताना पाहिले असते तर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तिला स्थानबद्ध केले असते. जे तिला मुळीच नको होते. त्यामुळे कोणाच्याही नजरेस न पडता जर गावाबाहेर निसटायचे असेल तर अरण्याकडची वाट धरण्याला पर्यायच नव्हता. आणि ती वाट हॉरिबल होती. गर्द झाडी, दिवसाढवळ्या जमीनीवर पुरेसा उजेड पोचणार नाही अशी अवस्था! नाही नाही ते किडे आणि सरपटणारे प्राणी! चित्रविचित्र आवाज! मधेच चढण, मधेच उतार! दिशाच विसरली जावी असा भुलभुलैय्या! काटेकुटे! खरबरीत पाने आणि फांद्या अंगाला बोचत आहेत. मधेच गावातले आवाज जवळ आल्यासारखे तर मधेच लांब गेल्यासारखे वाटत आहेत. पूर्वी चुकूनसुद्धा एखादा मनुष्य येथे पोचला असेल असे वाटू नये असे ते अरण्य! तेही गावाला इतके लागून! बराच वेळ ती धडपडत चालतच होती. एक मात्र नक्की, इकडे तिचा शोध कोणीही घेणार नव्हते आणि चुकून कोणाला ते सुचलेच तरीही ती सापडणे जवळपास अशक्यच होते. तिच्याजवळ अजूनही दोन धारदार लहान पाती, एका पुडीत थोडी साखर, थोडे पैसे आणि एक दोर होता. त्यातच अरण्यातूनच तिने एक बर्‍यापैकी काठीसारखी फांदी आधाराला आणि हल्ला झालाच तर प्रतिकाराला म्हणून जवळ घेतलेली होती. बाकी सगळे सामान झोपडीतच राहिले होते. मात्र त्या सामानात तिची खरी ओळख पटेल असे काहीही तिने आणलेलेच नव्हते.

पाण्याचा थेंबही मिळालेला नसताना एडामट्टी मणी सलग अडीच तास चालत, रखडत किंवा धावत होती. ज्या अर्थी अजूनही कोणताच मुलुख नजरेत आलेला नव्हता त्या अर्थी आपण चुकलो तरी आहोत किंवा गोल गोल फिरत आहोत हे तिला समजले. तिने घड्याळात पाहण्यासाठी हात उचलला आणि तिला आठवले की ग्रामीण भासावे म्हणून आपण घड्याळ आणलेलेच नव्हते.

आयुष्यात प्रथमच, एडामट्टी मणीला आपला निर्णय चुकीचा वाटत होता. जेथून बाहेर पडण्याचा रस्ता माहीत नाही, जेथे अन्नाचा कणही नाही की पाणी नाही, जेथे सर्रास बिबट्यांचा वापर असल्याचे माहीत आहे आणि जेथे आपल्याकडे प्रतिकार करायला काहीही नाही आहे तेथे आपण असायलाच नको होते हे तिला जाणवले. ह्या परिस्थितीत आपण आहोत कारण आपण जगावेगळा निर्णय घेऊन ह्या नाही त्या कार्यात पडलो. आज एक तर अब्रू गेली असती आणि ती वाचवण्यासाठी धावलो तर आता जीव जायची वेळ येणार आहे. बिबटे नरभक्षक नसतात किंवा उगाचच माणसावर हल्ला करत नाहीत हे कुठेतरी वाचलेले वाक्य तिला आत्ता आठवत असले तरी ते अतिशय कुचकामी वाटत होते तिला! एखादा बिबटा पुस्तकातल्या माहितीनुसारच वागायला काय कायदे थोडीच पाळणार आहे? आणि भीती फक्त बिबट्यापासूनच आहे असे तरी कुठे आहे? कोल्हे आहेत, रानटी कुत्रे आहेत, साप असतीलच! ह्या भागाची व्यवस्थित माहिती न घेता आपण आलो आहोत हेही तिला आठवले. मनावर अधिकच निराशा पसरली आणि एडामट्टी मणी एका दगडावर थकून बसली. तिने आजूबाजूला नजर टाकली. नजर जिकडे जाईल तिकडे उंचच उंच झाडे, त्यांना लगडलेल्या घट्ट रानटी वेली. कसेही उगवलेले उंच गवत आणि कुठेतरी उंच झाडांच्या शेंड्यापाशी पानांमधून येणार्‍या प्रकाशाच्या तिरीपा! जिवंतपणाचे काहीही इतर लक्षण नाही. निर्मनुष्यता व्यापून उरलेली! कुठूनतरी काहीतरी जमीनीवरून सळसळत गेले तशी मणी अंग चोरून टवकारून बघत बसली. काय होते कोण जाणे! अजून प्रत्यक्ष तरी कोणतेही जनावर सामोरे आलेले नव्हते. पण आता कसलीही खात्री देता येत नव्हती.

मणीला जाणीव झाली की आपल्याला मरणाची तहान आणि जबरदस्त भूकही लागलेली आहे. थोडी साखर तोंडात टाकत ती पाणी मिळते का हे शोधायला निघाली. एखाद्या गावात पोचलो की सोपान उदयला पोचायचे आणि राजीनामा टाकून मोकळे व्हायचे हे तिने ठरवून टाकलेले होते. हवीत कशाला ही असली कामे? कोणी सांगितलेत हे उपद्व्याप? आता तर वातावरणही जरा गरम झाल्याने तहान अधिकच जाणवत होती. घसा कोरडा पडत चालला होता. नीत चालता येत नव्हते. आणि ही सगळी परिस्थिती भल्या सकाळीच झालेली होती. असेच हळूहळू आपण चालत चालत थकलो तर अंधार पडेपर्यंत आपण अक्षरशः कुठेतरी कोसळून पडलेले असू असे तिला वाटले.

एडामट्टी मणीच्या डोळ्यात पाणी आले. लहानपणी ती केव्हातरी रडली असेल आणि आई गेली तेव्हा रडली असेल, त्यानंतर आजच! अगतिक झाल्याने, असहाय्य झाल्याने! शौर्याची कमतरता नव्हती. पण शौर्य गाजवण्याची संधी तर दिसायला हवी? कुठे जायचे, कुठल्या दिशेला, किती वेळ, किती अंतर आणि...... आणि का??????

अगदी पहिल्यांदाच हा निराशावादी प्रश्न तिच्या मनात आला. 'का'! त्या आधीचे सर्व प्रश्न 'सुटका होण्यासाठी' ह्या उत्तराकडे नेणारे होते. पण 'का' हा प्रश्न मनानेच मनाला विचारणे ही हार मान्य केल्याची पावती होती.

गालांवर वाळलेल्या सरी पुसायचेही कष्ट न घेता मणी पुन्हा एका ठिकाणी बसली. आणि बसल्यावर तो निराळाच विचार तिच्या मनाला पोखरू लागला. जी अब्रू वचवण्यासाठी आपण धावत निघालो, त्या अब्रूवर आत्ता कोणी घाला घातला तर आपण काय करणार आहोत? ह्यापेक्षा सुरक्षित तर आपण गावातच असतो की?

केवळ साडे तीन तासांत वेड लागायची वेळ आली होती. गुडघ्यात डोके खुपसून कितीतरी वेळ ती हमसून हमसून रडली. मग तिचे तिलाच कळले. आपण रडून काहीच होणार नाही आहे. तिने जबरदस्तीने मनात ते विचार आणले. की आपल्या ह्या पळण्याला तो नालायक महाराज जबाबदार आहे. त्याचा बुरखा फाडायलाच हवा आहे. ते कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय आपण फुकट मरण्यात अर्थच नाही.

निग्रह! निग्रह करून ती उठली. कोणत्यातरी एका दिशेने सतत चालत राहिल्यावर तरी अरण्य संपेलच ना? काय सगळी पृथ्वी व्यापून थोडीच राहिले आहे हे अरण्य?

आता तिने दोन्ही हातात काठीसारख्या फांद्या घेतल्या. जमेल तशी तरातरा एकाच दिशेने जाऊ लागली. तहान आणि भूक ह्याचा विचारही न करता एखादी वेडी कशी बेभान चालते तशी चालू लागली.

खूप वेळ! खूपच वेळ झाला होता. पावले मोजूनही ती असंख्यवेळा संख्या चुकलेली होती. अंगातले कपडे आता कसल्याच कामाचे वाटत नव्हते. ना लज्जारक्षणाच्या ना सुरक्षिततेच्या! आणि शेवटी तो क्षण आला.

एक आवाज! खूप लांबून! एखादा गलका असावा तसा! मानवी आवाज! तिला खरे वाटेना! खरे तर तिला ह्या क्षणी असे वाटत होते की कशाला आला हा मानवी आवाजाचा व्यत्यय मध्येच? चांगली चालणार होते की मी मरेपर्यंत? वेड लागायच्या त्या मनोवस्थेतच ती त्या आवाजाच्या दिशेने धावू लागली. ठेचकाळली, पडली, ओरडली, पण जात राहिली. आणि पंधरा वीस मिनिटांनी जेव्हा कोठेतरी लांबवर दहा वीस पागोटी दिसली तेव्हा पहिल्यांदाच जिवाच्या आकांताने तिने आक्रोश केला.

"मला धरा हो.... उचला मला"

त्या गलक्यातही दोन तीन पागोटी तिच्या दिशेला वळलेली तिला दिसली आणि तिने धीर आणि शुद्ध सोडली.

काय झाले ते माहीत नाही. पण जणू कित्येक युगांनी डोळे उघडत असावेत तसे तिला तिचे डोळे जड वाटत होते. कसेबसे डोळे उघडले तेव्हा सर्वत्र अंधार होता. गावातले दिवे मात्र भरपूर प्रकाश देत होते. घसा आता कोरडा वाटत नव्हता. अंगावरचे कपडेही बदललेले दिसत होते. शरीराला चक्क आराम वाटत होता. अचानक डोळ्यांसमोर अनेक चेहरे चेहरे आले. सगळे चेहरे तिला निरखत होते. तिला ती घुसमट सहन होईना! तिने त्यांना हातांनीच बाजूला केले. तरी ते बाजूला होईनात! शेवटी ती किंचाळली......

"बाजूला व्हा...... व्हा बाजूला"

दचकून सगळे चेहरे मागे हटले...... अचानक ते चेहरे एकमेकांकडे बघू लागले...... त्या चेहर्‍यांवर एकाचवेळी प्रचंड आनंदाच्या लाटा फुटल्या जणू...... सगळे चेहरे बायकांचेच होते....... गलबल करत ते चेहरे त्या खोलीबाहेर धावले आणि कोणत्यातरी बाईने खच्चून ओरडत बाहेरच्या जगाला वर्दी दिली......

"सुकन्या ताय, म्हाराजांच्या किरपेनं ती मुकी बोलाया लागली गणं! तिन्मुर्ती दत्ताचा...... इजय असो"

===============

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mastach...

एक नंबर बेभरवशाचे आहात तुम्ही
काय काढ्चाल आणी काय वळन द्यायला लावचाल कळत नाही
त्या अन्याला धड हिरो ही बनु देत नाही ना व्हिलन बनु देताय
बाकि कथा एकदम मस्त

आठ दिवस रोज अन्या चा नविन भाग आला का नाही याची वाट पाहुन आता कळ्तय की तब्बल पाच दिवसांची गणतीच करायची नाही
हा धडधडीत अन्याय आहे