ग्लिसरीनचे अश्रू …. आणखी एक भेसळनाट्य !

Submitted by SureshShinde on 8 March, 2014 - 15:41

ग्लिसरीनचे अश्रू …. आणखी एक भेसळनाट्य !

panamacanal.jpg

आजपासून बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी मानवनिर्मित यंत्रांनी एक अखेरचा धक्का दिला आणि प्रशांत महासागराचे पाणी ॲटलांन्टीक महासागराच्या पाण्यात मिसळले. मानवनिर्मित जहाजाने प्रथमच पनामा कालवा ओलांडला. खंडप्राय अशा उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या मध्यावर असलेल्या पनामा नगरीमध्ये सन २००६ मध्ये घडलेले हे नाट्य …

२० सप्टेंबर २००६.
स्थळ : कॉन्फ़रन्स रूम, मेट्रोपॉलीटन हॉस्पिटल, पनामा, मध्य अमेरिका.

"मित्रहो, आजची मीटिंग एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली आहे. गेले काही दिवस आपल्या हॉस्पिटलमधील काही घटनांबद्दल मुख्य डॉक्टर आपल्याशी बोलणार आहेत."

"गेल्या काही दिवसात मेडिकल वॉर्ड मध्ये दाखल झालेल्या रुग्णान्विषयी मी बोलत आहे. दरवर्षी आपण जीबी सिंड्रोमचे सरासरी आठ रुग्ण ट्रीट करतो. पण गेल्या केवळ दहा दिवसातच असे दहा रुग्ण दाखल झाले आहेत. यांच्या हातापायांच्या नर्व्हज तर पॅरालायीझ झाल्या आहेतच पण चेहेर्याच्या दोन्ही बाजूच्या नसाही पॅरालायीझ झाल्या आहेत. जीबीएस या आजारात हे जरा रेअरलीच दिसते. दुसरे असे कि या सर्वांच्या किडनीला देखील ईजा झालेली दिसते. काहींना डायलीसीसवर ठेवावे लागले आहे. यातील बरेचश्या रुग्णांना हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेह देखील आहे. आम्ही सर्व प्रयत्न तर करतोच आहे पण तरी परिस्थिती थोडी वेगळीच दिसते आहे. विशेष काळजीची बाब म्हणजे या विचित्र आजाराचे पन्नास टक्के रुग्ण दगावले आहेत. म्हणूनच सल्लामसलतीसाठी आपणा सर्वांना येथे बोलावले आहे. आपल्या सुचन्नांचे स्वागत आहे."
एव्हडे बोलून त्यांनी इतर डॉक्टरांना प्रतिसादाचे आवाहन केले.

काही क्षणांच्या शांततेनंतर हॉस्पिटलचे सिनियर फिजिशियन उभे राहिले,
"मित्रहो, मला तर ही वादळाची पूर्वसूचना दिसते. आजच्या प्रसंगामुळे मला आपल्या हॉस्पिटलमध्ये काही वर्षांपूर्वी उंदरांपासून उद्भवलेल्या 'हंटा व्हायरस' साथीची आठवण झाली. हा नक्कीच एखादा नवीन साथीचा आजार असावा."

पनामा शहराने अनेक साथीचे आजार पहिले होते. शंभर वर्षांपूर्वी पनामातील दहा टक्के लोक मलेरिया आणि पीतज्वराने दगावले होते. एखाद्या नवीन आणि जीवघेण्या आजाराचा केंद्रबिंदू होण्याचा मान मिळण्यासाठी कितीतरी निष्पाप जीवांचा बळी जातो याची पनामातील डॉक्टरांना चांगलीच कल्पना होती.

"आम्ही त्यादृष्टीने या रुग्णांचा अभ्यास केलाय पण पॅरालीसीस करू शकतील असे कोणतेही जंतू सापडत नाहीत. कल्चर्स आणि सिरम टेस्ट्स नेगेटिव्ह आल्यात. सीएसएफ तपासणीमध्ये जीबीएस सारखे पिक्चर दिसत नाही त्यामुळेच नेमके निदान होत नाही. शिवाय साथीच्या रोगाप्रमाणे हा एकापासून दुसर्यालाही होत नाहीये. " एक तरुण डॉक्टर म्हणाले.
"आणखी एक शक्यता,"पनामातील एका प्रमुख हृदयरोग हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर मोट्टा म्हणाले,"काही दिवसांपूर्वी आपली सोशल सिक़्युरिटीने लिसिनोप्रिल नावाचे एक नवे औषध सर्व हाय बीपी च्या रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे आणि हा आजार असलेले बरेच रुग्ण हेच औषध घेत आहेत. कदाचित ह्या औषधाचा हा परिणाम तर नसेल ना ?"

"असू शकेल. या वेळेस आपण सर्व शक्यता गृहीत धरून चाललो आहोत. या आजारावर जास्त प्रकाश टाकण्यासाठी आम्ही संसर्गजन्य रोगांचे तज्ञ आणि प्रसिद्ध निदानपटू डॉक्टर सोसा यांना पाचारण केले आहे व या विचित्र आजाराच्या पेशंटसाठी एक नवा आणि इतर पेशंटपासून दूर असा वार्ड काढण्याचे ठरवले आहे."

यानंतर डॉक्टर सोसा बोलण्यासाठी उभे राहाताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
"मित्रांनो, आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे व त्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी प्रयत्न करीन." पुन्हा टाळ्या .
"मी या आजाराचा, सर्व हयात आणि आणि दगावलेल्या पेशंटच्या केसपेपर्सचा बारकाईने अभ्यास केला आहे. पण आत्ता तरी काहीही क्लू मिळत नाहीये. म्हणून या आजाराशी युद्धपातळीवर लढण्यासाठी आम्ही एक 'वॉर-रूम' तयार केली आहे. सर्व डॉक्टर्स आणि नर्सेसना स्टरायील गाऊन आणि तोंडाला एन-९५ मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. साथ पसरू नये यासाठी नेहेमीचेच प्रतिबंधक उपाय करतोच आहोत. रोज दुपारी बारा वाजता याच ठिकाणी सर्व संबंधीत स्टाफची मीटिंग होणार आहे. शहरामध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे पण साथ प्रतिबंधक पथक त्याची काळजी घेणार आहे. आम्ही ॲटलांटामधील सीडीसी या संसर्गजन्य आजाराच्या शिखरसंस्थेची देखील मदत मागितली आहे. त्यांचे पथक लवकरच येणार आहे. डॉक्टर मोट्टा यांनी सुचवलेल्या लिसिनोप्रिल या औषधाचे नमुने सीडीसी कडे पाठविणार आहोत."
सोसा यांच्या भाषणामुळे वातावरणातील तणाव बराच निवळला होता.
पण येणाऱ्या प्रत्येक दिवशी या आजाराचे पेशंट वाढतच चालले होते. हळू हळू पनामा शहराच्या खेरीज आजूबाजूच्या इतर शहरातदेखील असे रुग्ण दिसू लागले होते. एकमागून एक पेशंट मरत होते आणि त्यांच्या शेजारचे पेशंंट आता आपला नंबर कधी या भीतीने अर्धमेले होत होते. एक महिना उलटला तरी काहीही उपाय सापडत नव्हता.

एके दिवशीची 'वॉररूम' मधील दुपारची मीटिंग !
या आजाराच्या कारणावर प्रकाश टाकेल असा आशेचा किरण दिसला. हार्ट ॲटॅक आलेला एक पेशंट दाखल झाला त्यालाही लिसिनोप्रिल चालू केले होते. दाखल झाला तेंव्हा त्याला गीबीएस सारखी लक्षणे मुळीच नव्हती. पण हॉस्पिटलमध्ये असताना त्याला ती लक्षणे दिसू लागली.
"मित्रहो, हा पेशंट आपल्याला या आजाराचे कारण शोधण्यास नक्कीच मदत करणार आहे. याला येथे आपल्या डोळ्यांदेखत हा आजार झाला आहे. म्हणजे त्याने नक्कीच काही देशी औषध घेतलेले नाही आणि त्याला कोठून संसर्ग देखील झाल्याची शक्यता नाही. मी त्याची कसून चौकशी केली असता मला समजले की लीसिनोप्रील घेतल्यानंतर त्याला खूप खोकला येवू लागला. खोकला येणे हा या औषधाचा साईड इफेक्ट असल्याचे आपणा सर्वांना माहित आहेच. पण खोकल्यासाठी त्याने घेतले एक कफ सायरप ! आणि मित्रहो, माझी खात्री आहे कि या खोकल्याच्या औषधामध्येच काही तरी गोची आहे."

syrup.jpg

इतर डॉक्टरांचा या गोष्टीवर विश्वास बसेना. सीडीसीचे डॉक्टर तेथे होतेच. त्यांनी ताबडतोब त्या कफ सायरपचे नमुने सरकारी विमानाने ॲटलांटाला रवाना केले.

पुढील चोवीस तासांत नेमकी ही मीटिंग चालू असतानाच डॉ . सोसांचा ब्ल्याकबेरी खणाणला, सीडीसीचा अहवालाबाबत फोन आला होता आणि गेले दोन महिने चाललेल्या नाटयाचे कारण अखेर सापडले होते !
"मित्रहो, ह्या कफ सायरपमध्ये आहे भेसळ , डाय इथीलीन ग्लायकॉल ची !"

हा आजार असलेल्या सर्व रुगांनी हे सायरप प्राशन केले होते पण त्याचे महत्व त्यांच्या अथवा डॉक्टरांच्याही लक्ष्यात आले नव्हते.

DEG2.jpg

डाय इथीलीन ग्लायकॉल हे अतिशय विषारी रसायन आहे. पाण्यापेक्षा थोडेसे घट्ट पण पाण्यात मिसळणारे, रंगविहीन, वास नसलेले हे DEG चवीला गोड असते. दिसायला आणि चवीला ते ग्लिसरीनसारखेच असते पण ग्लिसरीनपेक्षा खूपच स्वस्त आणि त्यामुळेच ग्लिसरीनमध्ये याची भेसळ करतात. आत्तापर्यंत अशा भेसळीच्या पंधरा घटनांची नोंद आहे. पैकी दोन तर भारतात, एक बंगला देशामध्ये, एक हैतीमध्ये, एक चीनमध्ये आणि बाकी जगात इतरत्र ठिकाणी. भारतात १९८६ साली घडलेली जे जे हॉस्पिटल दुर्घटना, ज्यात चौदा पेशंट दगावले होते, तर आपण विसरू शकत नाही. मेंदूतील सूज कमी करण्यासाठी आणि डोळ्यातील प्रेशर कमी करण्यासाठी ग्लीसरॉल म्हणजेच ग्लिसरीन हे औषध पिण्यासाठी दिल्यानंतर किडनीचे काम थांबून ही माणसे दगावली होती. आधुनिक रामशास्री शोभावेत असे श्री जस्टीस बक्तावर लेंटीन यांने या प्रसंगाची चौकशी केली होती आणि भेसळयुक्त औषधांची खरेदी करताना योग्य खबरदारी न घेतलेल्या सरकारी यंत्रणेला दोषी ठरवले होते. अर्थात 'आदर्श' सरकारने लेंटीन अहवाल बासनात गुंडाळून ठेवला ही गोष्ट वेगळी ! बंगला देशात तर पॅरासिटामॉल या तापाच्या भेसळयुक्त सायरपमुळे हजारो बालके मृत्युमुखी पडली. ऑस्ट्रियामध्ये गोड वाईन मध्ये गोडवा आणण्यासाठी DEG वापरल्याचे लक्ष्यात आल्यामुळे तीन कोटी बाटल्या पुन्हा मागवल्या गेल्या. त्यांचा पुढे पेट्रोलसारखा वापर केला गेला. २००८ मध्ये चीनी बनावटीच्या स्वस्त टूथपेस्ट मध्ये देखील DEG सापडल्यामुळे जगभरातून परत पाठवण्यात आल्या.

पनामामध्ये साठ हजार कफ सायरपच्या बाटल्या जप्त केल्या गेल्या पण कितीतरी लोकांनी आणि बाळांनी वापरल्या होत्या आणि किती दगावले याचा हिशेब लावणे कठीण होते. एकशे एकोणीस जण हॉस्पिटलमध्ये आले होते पैकी अठ्याहत्तर जण दगावले. उरलेल्या अनेक जणांना कायमचे अधूपण आले.

DEG1.jpg

एफडीए आणि न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने आपापल्या परीने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. असे लक्ष्यात आले की ज्या ग्लिसरीनचा वापर हे सायरप तयार करण्यासाठी केला होता त्याच्या ड्रमवर TD Glycerine ९९.९% असे लिहिले होते पण त्यात २३%DEG होते. हे ड्रम स्पेनमधून खरेदी केले गेले होते. त्यांनीही ते दुसर्या ट्रेडरकडून खरेदी केले होते व स्वतःचे लेबल लावले होते. असे आणखी दोन ट्रेडर्सची मालिका शोधल्यानंतर या भेसळयुक्त ग्लिसरीनचा मूळ स्त्रोत चीनमधील टायक्सिंग ग्लिसरीन फॅक्टरी हा असल्याचे कळाले . मिस्टर व्यांग नावाचा माणूस ही कंपनी चालवीत होता. त्याने जास्त फायदा मिळवण्यासाठी केमिस्ट्रीची पुस्तके वाचून समान गुणधर्म असलेले असे DEG भेसळ करण्यास योग्य समजून वापरले होते. पण त्याने ड्रमवर TD glycerine असे लिहिले होते. TD ( tee die ) याचा चीनी भाषेतील अर्थ आहे - substitute.
म्हणजे सारांश काय कि हा अर्थ जर अगोदर कळला असता तर हा अनर्थ टळला असता का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद डॉक्टर नेहमीप्रमाणेच सुंदर कथा .
औषधं खरेदी करताना ( डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेली किंवा ओव्हर द काऊंटर) काय काळजी घ्यावी , अदर दॅन एक्सपायरी डेट किंवा अशी काही भेसळ होणारी / होऊ शकणारी केमिकल्सची लिस्ट आहे का ?

छान लेख! DEG lab मध्ये काम करताना वापरले आहे पण त्याचे हे परिणाम माहिती नव्हते. ह्या सगळ्या भेसळीचा स्रोत नेहमी चीन कसा असतो?!

उत्तम लेख.
ग्लिसरीन पण महाग असते का ? टाटा ऑईल मिल मधे साबणाच्या उत्पादनात बाय प्रॉडक्ट म्हणून ते मिळत असे.

@श्री:<<<औषधं खरेदी करताना ( डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेली किंवा ओव्हर द काऊंटर) काय काळजी घ्यावी , अदर दॅन एक्सपायरी डेट किंवा अशी काही भेसळ होणारी / होऊ शकणारी केमिकल्सची लिस्ट आहे का ?>>> येथे भारतामध्ये बर्याच वेळा केमिस्ट ही कंपनी बंद झाली आहे असे सांगून आपल्या जवळची substitute औषधे देतात. अशी औषधे substandard असू शकतात. आपल्या डॉक्टरांना दाखवून घेणे उत्तम. एक्सपायरी डेट उलटून गेलेली औषधे केमिस्ट देवू शकत नाही पण औषध कंपन्यांचे पुरवठादार लेबल बदलून आणि कमी किमतीमध्ये कच्चा माल पुरवू शकतात. अशी उदाहरणे आहेत. म्हणून खात्रीशीर कंपनीचे औषध घेणे उत्तम. काही कंपन्या होलोग्राम अथवा बार कोड छापून ग्राहकाला योग्य दर्जाचे औषध मिळते आहे याची खात्री करतात.

@जिज्ञासा :<<<ह्या सगळ्या भेसळीचा स्रोत नेहमी चीन कसा असतो?!>>>हा खरोखर मिलियन डॉलर प्रश्न आहे. पण भेसळ करणारे सर्वत्र आहेत. कदाचित अरब देशात अशांचे हातपाय तोडत असल्यामुळे ते नसावेत. लोकांच्या जीवाशी खेळणार्यांना अशीच जबर शिक्षा असेल तरच भेसळ होणार नाही.

@दिनेश:<<<ग्लिसरीन पण महाग असते का ?>>>DEG च्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त किंमत असते. प्राणिज अथवा वनस्पतीज फॅट्स वापरून ग्लिसरीन तयार करतात. चरबी आणि सोडा एकत्र उकळल्यानंतर साबण आणि ग्लिसरीन तयार होतात. हे चित्र आपले स्मरण ताजे करील.

soap.PNG

मस्त लेख!

किती निरपराध बळी... त्या चिनी उत्पादकावर काय कारवाई झाली?
या लेखानिमित्त पुन्हा एकदा माझ्यासारख्या सामान्याला औषधे आणि अन्नपदार्थांवरील रिसर्चेस किती गरजेचे असतात हे चांगलेच कळते.

@गजानन :<<<त्या चिनी उत्पादकावर काय कारवाई झाली?>>>मिस्टर वांग हा एक शिंपी होता. पण 'एका रात्रीमध्ये किर्लोस्कर' होण्याचे स्वप्न उराशी होते. म्हणून केमिकल ट्रेडिंगमध्ये शिरला. औषधात सायरपसाठी वापरले जाणारे मेडीसीनल ग्रेड ग्लिसरीनमध्ये इंडस्ट्रीयल ग्रेड ग्लिसरीन मिसळले. स्वतः पिवून पहिले आणि मग विकण्यास सुरुवात केली. नंतर केमिस्ट्रीची पुस्तके वाचून असेच सायरप DEG असल्याचे कळले आणि मग ते मिसळण्यास सुरुवात केली. हे मिश्रण त्याने पिवून पहिले नाही. जाहिरात आणि अधिकारी वर्गांची संधान साधून त्याने हे भेसळयुक्त ग्लिसरीन चक्क सरकारी केमिकल फ़्यक्टरींना विकले. त्यांनी स्वतःचे लेबल लावून पुढे विकले. तपासले कोणीच नाही पण तसे प्रमाणपत्र मात्र दिले. पनामाप्रमाणेच चीनमध्ये देखील अनेक माणसे या औषध भेसळीमुळे दगावली व त्यामुळे सरकारवर राजकीय दबाव निर्माण झाला. वांगला अटक झाली पण पुढे काय झाले ते माहित नाही. बाकी इतर सरकारी एजन्सीजना अंतर्गत चौकशी करून दोषमुक्त करण्यात आले कारण काय तर त्यांना मेडिसीनल ट्रेडिंगची परवानगी नव्हती ! कायद्यातील पळवाटा ! मुंबईमधील जेजे विषबाधा प्रकरणातील दोषीनांदेखील असेच अंतर्गत चौकशी करून पुन्हा कामावर घेण्यात आले. एकंदरीत ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही ते सुटले तरी चालेल पण ज्यांनी प्रत्यक्ष भेसळ केली आहे त्यांना केवळ मामुली शिक्षा करून इतरांना जरब कशी बसणार ? मानवतावादाचा थोडा जास्तच पुळका असलेल्या समाजसुधारकांना दुर्दैवाने हे समजत नाही.

हा लेखदेखील अतिशय माहितीपूर्ण व सुरेख पद्धतीने मांडलेला ....

अवांतर -
हा आजार असलेल्या सर्व रुगांनी हे सायरप प्रश्न केले होते पण त्याचे महत्व त्यांच्या अथवा डॉक्टरांच्याही लक्ष्यात आले नव्हते. >>>>> रुग्णांनी हे सायरप प्राशन केले होते - असे पाहिजे ना डॉ. साहेब ??

@शशांक : <<< हा आजार असलेल्या सर्व रुगांनी हे सायरप प्रश्न केले होते पण त्याचे महत्व त्यांच्या अथवा डॉक्टरांच्याही लक्ष्यात आले नव्हते. >>>>> रुग्णांनी हे सायरप प्राशन केले होते - असे पाहिजे ना >>>'मुद्राराक्षसाची डुलकी' लक्ष्यात आणून दिल्याबद्दल आभार. दुरुस्ती केली आहे.

तुमची प्रत्येक वैद्यकिय शोधकथा अंगावर येणारी असते. आता ती तयारी ठेऊनच वाचली जाते. ही कथाही तशीच महत्वपुर्ण आणि माहितीपुर्ण. आणि तुम्ही भाषा फार छान वापरता.

Thanks, Dr.shinde for give us important information. we will wait for new information. Take care, Good bye.

Take care, Good bye.
<<
OMG!

That sounds sinister....