सवयी

Submitted by मयुरा on 8 March, 2014 - 06:26

परवा आम्हा मैत्रिणींची नेहमीच्याच विषयावर जोरदार चर्चा रंगली होती. विषय होता मुलांच्या सवयींचा. मुद्दा होता मुलांना वाचनाची, कामाची, टीव्ही कमी बघण्याची सवय लावायची कशी हा. सगळ्यांना त्या सवयी लावणं जरा अशक्यच वाटत होतं. कारण सर्वांच्या मते आजकालची मुलं प्रचंड बडबडी, चळवळी, टीव्हीला चिकटून बसणारी, सारखी प्रश्‍न विचारणारी. हे जरी खरं असलं तरी मुलांना या सवयी लावणं अशक्य नाही. अर्थात मुलांची वयं सवयी लावण्याइतकी लहान असावीत हे मात्र लक्षात घ्यायला हवं. इथे मला आठवले ते कधी काळी मुलांना याच सवयी लावण्यासाठी केलेले प्रयोग. जे प्रचंड यशस्वी झाले होते. त्या मुलांना वाचनाची सवय तर लागली होतीच पण चक्क ते टीव्ही देखील कमीच बघायला लागले होते. अर्थात यासाठी त्यांच्या पालकांना काही बंधनं पाळायला लागली होती. मुलांना काही सवयी लावायच्या तर त्या आधी आपल्याला नको का लागायला? तर मुलांच्या सवयींसाठी असेच काही समविचारी पालक एकत्र आले. सुदैवाने ते सगळे पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमी, टीव्ही गरजेपुरताच बघणारे होते. या सवयी त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. त्यादिवशी एक ठरलं आणि त्याची त्या घरांमध्ये अंमलबजावणी सुरु झाली. आजकाल घरातले जनरली संध्याकाळी उशिराच एकत्र असतात. तीच वेळ निवडली गेली. आईवडिलांनी घरात जाहिर केलं, रोज रात्री ९ ते १० हा त्यांचा वाचनाचा तास असणार होता. तो एक तास घरातला टीव्ही बंद रहाणार होता. त्यावेळेत मुलांनी त्यांच्याशी काहीच बोलायचं नाही. त्यावेळेत मुलांनी काय करावं हे त्यांचं त्यांनी ठरवायचं होतं. फक्त बोलायचं नाही हे पक्कं ठरलं होतं. झालं त्या घरांमध्ये वाचनाचा तास सुरु झाला. आईवडिल पुस्तकं, वर्तमानपत्र घेऊन बसू लागले. आधी मुलांना आपण कोणाशी काही बोलायचं नाही हे खरंच वाटेना. मनाला पटेना. त्यामुळे पहिले दोन-तीन दिवस त्यांनी आईवडिलांशी बोलायचा प्रयत्न करुन पाहिला. त्यांच्या भोवती बागडून पाहिलं. चुळबूळ करुन पाहिली. पण आईवडिल फार पक्के निघाले. ते बोललेच नाहीत. काही दिवसानंतर दृश्यात एक बदल झाला होता. टेबलवरची अचानक मुलांना आवडतील अशी पुस्तक दिसायला लागली. रंगीबेरंगी चित्रांची, मोठमोठ्या अक्षरांची. मुलांनी तिकडे दुर्लक्ष केलं खरं पण तो एक तास घालवायचा कसा याचं उत्तर काही त्यांना सापडलं नाही. काही दिवसांनी मुलांनी तो एक तास वेळ घालवायचा म्हणून नाईलाजाने का होईना पण त्यातलं एक एक पुस्तक चाळून पहायला सुरुवात केली. इथेच आईवडिलांनी पहिली पायरी जिंकली होती. पण ते त्यांनी चेहर्‍यावर कधीच दिसू दिलं नाही. नाईलाजाने का होईना पण मुलं आधी पुस्तक चाळायला शिकली...नंतर कधीतरी चाळता चाळता वाचायला शिकली. गप्पांमधून हळूच त्यांची आवड जाणून घेतली गेली. तशी पुस्तक जाणीवपूर्वक तिथे ठेवली गेली. मग काय विचारता मैत्रिणींनो, त्या घरांमधला तो वाचनाचा तास हळूहळू सर्व कुटूंबाचा वाचनाचा तास झाला. बिछान्यात जाईपर्यंत जी मुलं टीव्ही बघायची त्यांच्या बिछान्याभोवती पुस्तकं दिसायला लागली. मुलांवर वाचनाचा संस्कार करण्यात ती सगळी पालक मंडळी यशस्वी झाली. मुलं मोठी होत गेली, भलेही वाचनाचे विषय बदलले, ई पुस्तके आली पण वाचनाची सवय कायमच राहिली.
असाच शिरस्ता मुलांना कामाची सवय लावण्यासाठी वापरला गेला. मुलं काही कामच करत नाहीत असं किती सहज म्हणतो ना आपण. पण मला सांगा, मुलांना कामाची सवय लावायची जबाबदारी आपलीच नाही का? आठवा बरं बहुतेक घरातलं दृश्य. आई काम करत असताना लहान मुलं मध्ये मध्ये करतात तेव्हा वैतागून आईच त्यांना कामातून बाजूला काढते आणि एकतर टीव्हीसमोर बसवते किंवा खेळायला पाठवते. मोठ्या माणसांनाच आपल्या कामात मुलांची लुडबूड नको असते. त्या सगळ्यांनी पहिल्यांदा एक ठरवलं की मुलांना लुडबूड करुच द्यायची. त्याला लुडबूड न म्हणता मदत म्हणायचं. मदतीला नकळत शिस्त लावायची. यासाठी त्यांच्या बालसुलभ उत्साहाचा पुर्ण वापर करुन घ्यायचा आणि जमेल तितक्या कामांमध्ये त्यांना सहभागी करुन घ्यायचं. अर्थात हे सारं मुलांच्या कलाने, त्यांच्या सोयीने घ्यायचं असतं हे कोणी सांगायची गरज नव्हती. ठरल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी त्या सगळ्या घरांमध्ये धमाल झाली. मुलांना पाण्यात खेळायला आवडतं हे लक्षात घेऊन त्यांना खुर्च्या धुवायचं आणि पुसायचं काम दिलं गेलं. मुलांनी ते एन्जॉय केल्याचं लक्षात आल्यानंतर कामाच्या स्वरुपात बदल झाला. प्रत्येकाने दर रविवारी आपल्या शाळेचा गणवेश, हातरुमाल, पायमोजे आणि दप्तर आपणच धुवायचे, आपला टिफिन, पाण्याची बाटली आपणच स्वच्छ करायची असं ठरलं. एरवी पाण्यात खेळताना ओरडणारी आई स्वत:हून कपडे धुवायला सांगत असल्याने मुलंही खुश झाली. पुढच्या रविवारी त्यांनीच आईला या कामाची आठवण करुन दिली. हा सिलसिला प्रत्येक कामात अवलंबला गेला. शक्य त्या सर्व कामांमध्ये मुलांना सहभागी करुन घेतलं गेलं. ते करता करता एक पथ्य सगळ्यांनी निष्ठेनं पाळलं. ते म्हणजे काम करता करता मुलं चुकली तर त्यांना कोणीच रागावलं-ओरडलं नाही. हळूहळू त्यांना ते काम उत्तमपणे करायला त्यांच्या नकळत शिकवलं गेलं. आईने भाजी चिरतांना मुलांना फोडणी टाकायला लावली, शेवटची पोळी मुलांना करायला लावली, खुप घाई झाली असं दाखवून कोथिंबीर देखील निवडायला लावली. भाजी निवडणे हा त्या घरांमधला सार्वजनिक कार्यक्रम व्हायला लागला. आपले डबे आपणच भरायचे हा अलिखित नियम झाला. रात्री झोपतांनाच आई तिचे दुसर्‍या दिवशी घालायचे कपडे एका ठिकाणी काढून ठेऊ लागली. त्याचवेळी मुलांनी देखील त्यांचे गणवेश एका ठिकाणी काढून ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे सकाळचा ओरडा टळला. असं करत एकदम नाही पण हळूहळू का होईना मुलं काम करायला शिकली. त्यांच्यावर कामाचा संस्कार झाला.
असेच प्रयोग आपण देखील करुन बघायला काय हरकत आहे? एक मात्र नक्की बरं का. आपल्याला आपली मुलं जशी हवी असतात ना तसं आपण आधी बनायचं असतं. म्हणजे बघा, त्यांनी वाचावं असं तुम्हाला वाटत असेल तर आधी तुम्ही वाचायला हवं. त्यांनी खेळावं असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना मैदानावर घेऊन जायला हवं. त्यांच्या खेळात रस घ्यायला हवा. मुलांनी कोणाशी ओरडून बोलू नये असे वाटत असेल तर तुम्हाला त्यांच्याशी हळूवार आणि शांत स्वरात बोलता यायला हवं. त्यांनी टीव्हीवर डिस्कव्हरी चॅनल जास्त वेळ बघावा असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर त्या चॅनलवरचे कार्यक्रम एन्जॉय करायला हवेत. त्यांनी टीव्ही कमी वेळ बघावा असं वाटत असेल तर आधी तुम्ही तो बंद करायला हवा. तुम्हाला सांगते, या सगळ्या घरातली मुलं टीव्ही देखील कमी बघायला शिकली पण त्यासाठी पालकांना आपला पवित्रा थोडासा बदलावा लागला. त्याविषयी नंतर कधीतरी..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी पटल्...माझी मुलगी २ वर्षाची आहे..तिला मी रोज झोपयच्या अगोदर अर्धा तास पुस्तक घेउन बसते..तिलाच विचारते काय वाचायच्..तिच पुस्तक निवड्ते....अजुन तरी कार्टून बघतेय्...अजुन ५-६ महिन्यात टी व्ही च नसेल घरात्...बघु काय होतय ते..

वरील उदा. माझ्या लहानपणाच्या काळातली वाटतात, ऑलमोस्ट (कपडे धुवायला आमच्याकडे नेहमीच बाई होती.) आजकालची मुलं आईवडिलांशी बरोबरी बर्‍याच वरच्या लेव्हलची करू शकतात. एका लिमिटच्या पुढे मुलांना आईवडिलांशी बरोबरी करू देऊ नये.

माझ पिल्लू अजून खुपच लहान आहे. (१० महिने). पण भविष्यात हा प्रयोग करायला नक्की आवडेल. (त्या निमित्ताने नवरोबाला पण शिस्त लागेल.. Wink )

लेख आवडला. प्रयोग करुन बघायला नक्की आवडेल. >>++१११
आमच्याकडे पन तेच आहे ...वाचन खुपच कमि आहे...मुलासाठि हे करुन पाहिले पाहिजे. ( मलाच सांगतो तुच वाच मि एकतो.)

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.
शोनू कुकू आणि सृष्टी तुम्हाला आपल्या लहानग्यांशी दोस्ती करण्याची एक सोपी युक्ती सांगते. अनेकदा पिल्लं रात्री झोपतांना गोष्ट सांग म्हणतात. रोज कोणती गोष्ट सांगणार? हा प्रश्‍न अनेकदा पडतो. मुलांना आपल्या लहानपणाच्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या फार आवडतात. फक्त त्या रंगवून सांगता आल्या पाहिजेत. एखाद्या दिवशी आता तु काहीतरी सांग असं म्हटलं की ती पण बोलू लागतात. आमची पिल्लं आता पिल्लोबा झालीत तरी मधून मधून गोष्टींचा कार्यक्रम पार पडतोच.
तुम्ही मुलीला विचारता हे मस्तच. लहान मुलांसाठी लहानच गोष्टी वाचायच्या. अगदी १०-१२ ओळींच्या बनवायच्या. आज माझी पाळी...उद्या तुझी पाळी...असं म्हणून पहायचं. थोडंसं मनवायचं. मुलं पण त्याच गोष्टी पण मस्त भाषेत सांगतात. किंवा तसा प्रयत्न करतात.
एक मात्र नक्की हं. यासाठी आपला पेशन्स आणि टॉलरन्स दोन्हींचाही कस लागतो.
मी काही नवीन सांगितलं असं नव्हे. आपल्यापैकी कोणी ना कोणी हा प्रयत्न नक्की करत असणार.