८ मार्च! जागतिक महिला दिन!!

Submitted by dreamgirl on 8 March, 2014 - 00:30

८ मार्च! जागतिक महिला दिन!! [माझ्या थोपू पेजवरून]

जाहीरातदारांनी यात भाजून घेतलेली स्वतःची पोळी... महिलांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देत (!!??!!) कपड्यांच्या, दागिन्यांच्या, फॅशनच्या आयटम्सवर, गृहोपयोगी वस्तूंवर देऊ केलेली भरघोस सूट... महिलांच्या सुरक्षेविषयी उदासिन असलेल्या आणि त्यांच्या कपडे व कॅरॅक्टरवर बेबंद बेछूट आरोपांच्या फैर्‍या झाडणारे आणि एका दिवसापुरते ४९ % मतांचे महत्व जाणून उदोउदो करण्यास सरसावलेले पोटभरू, गल्लाभरू राजकारणी... त्यांच्या पानभरून जाहीराती नी फलक!!

१ दिवसाचा उदोउदो...!! स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या पोस्टसचा पूर... स्त्रियांना भोगाव्या लागणार्‍या व्यथा, अत्याचारांची वांझोटी हळहळ, शेकडोंनी लाईक्स, कमेंट्स, शेअर... तात्पुरती सलामी... !!

पुन्हा पहीले पाढे पंचावन्न!!! दारू पिणार्‍या मुलींचे तथाकथित पोस्ट्स त्यावरील अश्लील कमेंट्स, मुलींचे सौंदर्य, नखरे, स्वभाव, शील, फॅशन, खर्च, अक्कल, कपडे, संस्कृती वै. वै. वर कुत्सीत पोस्ट्स त्यावर भरभरून खडाजंगी कमेंट्स! संस्कृती सांभाळण्याची मक्तेदारी नव्हे जबाबदारी फक्त मुलींचीच कशी असते, ढासळत्या नैतीकतेला, संस्कृतीला मुलीच कशा जबाबदार आहेत हे सिद्ध करण्याची अहमहमिका आणि होणार्‍या अत्याचारांना, वाढत्या तत्सम घटनांना मुलीच (विशेषकरून त्यांचे कपडे!) कशा जबाबदार आहे यावर चर्वीतचर्वण!! गुर्‍हाळ चालूच राहणार... छेडछाड, अत्याचार, बलात्कार, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी... हक्कांची पायमल्ली... वर ज्यांचा या सगळ्याशी काडीमात्रही संबंध नाही अशांची शेरेबाजी आणि फुकटचे सल्ले! पुढच्या जागतिक महिला दिनाच्या तुतार्‍या झडेपर्यंत!

सर्व महिलांना.......................,
स्वातंत्र्य आणि स्वैराचार या गोष्टी भिन्न आहेत हे कळण्याइतक्या तुम्ही नक्कीच प्रगल्भ आहात.
म्हणूनच तुम्हाला नडणार्‍या, अडणार्‍या, अडवणार्‍या, स्वतःच्या हक्कांपासून वंचीत ठेवणार्‍या, सत्तेच्या खुळचट कल्पनांपायी पदोपदी तुमच्या सत्वाचा, स्वत्वाचा आणि स्वप्नांचा चुराडा करणार्‍या प्रत्येक घटकाला फाट्यावर मारा. शिक्षण, स्वसंरक्षण आणि स्वत:च्या हक्कांबद्दलची जागरूकता ही शस्त्रे सतत परजत ठेवा, हल्लेखोरांचे हल्ले परतवून लावण्यासाठी! सोबत असलेली महिला तुमची प्रतिस्पर्धी नाही. तुमच्यासारखीच आहे, तुमच्यासारख्याच त्याच त्या अडचणींना सामोरी जाते, लढते, थकते, हरते... तिच्या या हरण्यावर तिला दोष देऊन नाउमेद करण्यापेक्षा, तिच्या लढण्याच्या असफल प्रयत्नांवर कुत्सीत हसून शेरे देण्यापेक्षा तिच्या लढाईत तिला मदतीचा हात द्या... तिची नाही, स्वतःची मदत करा! असे जगा की यापुढे बाईच्या जातीला जन्माला आल्याचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही... ना तर तुम्हाला ना तर इतरांना! जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा... पुढील प्रत्येक दिवसासाठी!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महिला दिनाच्या पुरोगामी वगैरे महिलांना शुभेच्छा द्याव्यात की सदिच्छा असा प्रश्न मला पडतो कधी कधी.अंधश्रद्धा निर्मुलन समितीत ’शुभ” शब्दाच एवढ वावडं कि वार्तापत्राच्या जाहिरातीत देखील शुभेच्छा शब्दा ऐवजी सदिच्छा शब्द जाणीवपुर्वक वापरला जातो. जणु काही शुभेच्छा शब्द वापरणारा अंधश्रद्धाळु.
दाभोलकरांनी म्हटले होते जेव्हा पुरुष असे म्हणतो कि मी भीती ने अगदी गर्भगळीत झालो. तेव्हा तू पुरुष आहे तुला कसला आलाय गर्भ? असे आपण म्हणतो का? भाषेतले अनेक शब्दप्रयोगांचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. बाकी शब्द योजना करताना अंनिस वार्तापत्रात शुभेच्छा ऐवजी जाणीवपुर्वक सदिच्छा हा शब्द वापरला जातो. दिवाळी अंका ला दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. असे नाही केले तर आपणच अंधश्रद्धा ठरु कि काय अशी भीती वाटते की काय कोण जाणे. असो या घ्या शुभेच्छा!

<<म्हणूनच तुम्हाला नडणार्‍या, अडणार्‍या, अडवणार्‍या, स्वतःच्या हक्कांपासून वंचीत ठेवणार्‍या, सत्तेच्या खुळचट कल्पनांपायी पदोपदी तुमच्या सत्वाचा, स्वत्वाचा आणि स्वप्नांचा चुराडा करणार्‍या प्रत्येक घटकाला फाट्यावर मारा. >> +१११११ सॉल्लीड ड्रीमगर्ल!

तुलासुद्धा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

सोबत असलेली महिला तुमची प्रतिस्पर्धी नाही. तुमच्यासारखीच आहे, तुमच्यासारख्याच त्याच त्या अडचणींना सामोरी जाते, लढते, थकते, हरते... तिच्या या हरण्यावर तिला दोष देऊन नाउमेद करण्यापेक्षा, तिच्या लढण्याच्या असफल प्रयत्नांवर कुत्सीत हसून शेरे देण्यापेक्षा तिच्या लढाईत तिला मदतीचा हात द्या... तिची नाही, स्वतःची मदत करा! असे जगा की यापुढे बाईच्या जातीला जन्माला आल्याचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही.>>++१११ छान लिहिले आहे.

मस्त ड्रिमगर्ल, एक नंबर.
आपल्या मनातील खर्‍याखुर्‍या महिलादिनाच्या शुभेच्छा

महिलादिनाच्या निमित्ताने, बायकांचे बिनडोक , बालीश , कारस्थानी अतिरंजित चित्रण करणार्‍या अशा सर्व मालिकांचा निषेध !!

महिला दिन आणि त्या निमित्ताने मनात आलेले प्रामाणिक विचार अर्थात मागील वर्षी मांडले होते,पण ते तसे थोडे दुर्लक्षित राहिले. पहा आपणास पटतंय का ?
http://www.maayboli.com/node/41704

डेलिया - Lol

बाकी अधूनमधून एखादे सौम्य विधान करण्याचाही सराव असावा Light 1

=============

स्वप्नसुंदरी - कळकळ पोचली. 'जाहिरातदारांनी...... तात्पुरती सलामी' हे दोन पॅरा मस्त लिहिलेले आहेत.

=============

फाट्यावर मारणे - हा वाक्प्रचार योजणार्‍या सर्वांनाच उद्देशून एक प्रश्न विचारायचा आहे. फाट्यावर मारणे ह्या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ तो वाक्प्रचार वापरणार्‍या सर्वांना माहीत आहे का? ती एक अश्लील शिवीगाळ आहे ह्याची कल्पना आहे का? तो वाक्प्रचार असा केव्हाही, कोठेही पब्लिक फोरमवर वापरणे हे चांगले दिसत नाही हे ज्ञात आहे का? त्याचा वापर अज्ञानातून होत आहे की खरोखरच असे शब्दप्रयोग करण्याबाबत आपली सांस्कृतीक भूमिका आता लेचीपेची झालेली आहे??

>>>>सोबत असलेली महिला तुमची प्रतिस्पर्धी नाही. <<
>>>>स्वातंत्र्य आणि स्वैराचार या गोष्टी भिन्न आहेत हे कळण्याइतक्या तुम्ही नक्कीच प्रगल्भ आहात<<<
ह्या वाक्यांसाठी +१

बेफी,
नक्की कसला त्रास झाला? (प्रामाणिकपणे विचारतेय). एक स्त्री ह्या शब्दाचा (फाट्यावर मारा) वापर करतेय म्हणून की खरोखर शब्द वाईट आहे तो उच्चारू नये ह्या करता? की सांस्कृतीक गळचेपी होतेय आणि तीही एका स्त्री कडून ह्या साठी?

खरेच समजवता का? वाटल्यास 'अर्थांचा बीबी' वर लिहा ह्याचा अर्थ. इथे फक्त शुभेच्छा द्या. Happy

खरे तर ह्या शब्दाचा वापर न करता की वर्तवणूक तशी असती काहींची. माझ्यापुरता समजलेला अर्थ, दुर्लक्ष करा इतकाच आहे तेव्हा तो वापरण्यात कसली आली भिती.

सॉरी, ड्रीमगर्ल विषयांतर झाले. सर्व महिंलास शुभेच्छा!

ओह ओ, एक मिनिट, महिलेनी हा शब्द वापरणे ह्याचा 'अधिक' त्रास वगैरे मुळीच झालेला नाही. त्रास ह्याचा झाला आहे की आजवर जो वाक्प्रचार 'प्रतिसादांपुरता' सर्रास आढळत असे तो आता 'मूळ लेखातही' दिसू लागला आहे. (मूळ लेखनांत - काल्पनिक कथा काव्यलेखन वगैरे सोडून - मी हा वाक्प्रचार प्रथमच पाहिला).

कृपयाच, माझ्या प्रतिसादाला 'महिलाविरोधी' वगैरे रंग लावला जाऊ नये अशी विनंती आहे.

इथे फक्त शुभेच्छा द्या<<<

झंपी, मला 'एक दिवस महिला दिन म्हणून साजरा करणे' वगैरे प्रकार अतिशय खोटे वाटतात व त्यामागे माझे ब्रिंगिंग अप असू शकेल. त्यामुळे येथे शुभेच्छा देणे व येथे 'फक्त शुभेच्छा देणे' हे दुर्दैवाने मला खोटे वागल्यासारखे वाटेल म्हणून देत नाही आहे. व्यक्तीगत पातळीवर एक ओळखीची व्यक्ती / महिला म्हणून स्वप्नसुंदरी, तुम्ही अश्या प्रत्येकीला शुभेच्छा देणे योग्य वाटेल.

असेच मातृदिन, पितृदिन, बालदिन वगैरे मला खोटेच वाटतात. Sad

त्या त्या दिवसापुरते कौतुक केल्यासारखे वाटते.

>>>>कृपयाच, माझ्या प्रतिसादाला 'महिलाविरोधी' वगैरे रंग लावला जाऊ नये अशी विनंती आहे.<<<

अहो नाही हो. मी लिहिलं आहे की, प्रामाणिकपणे विचारतेय म्हणून. उगाच कशाला अंदाज लावायचा आणि तुम्हाला कोर्टात खेचायचं आजच्या दिवशी. हा दिवस चुकीच्या कारणासाठी तुमच्या लक्षात राहिला नको.
आणि आजच्या दिवशी एका पुरुषाचा जीव घेण्यात(असले आरोप करून) काय अर्थय? Proud

१. काल एका मैत्रिणीच्या ऑफिसमधे महिला दिनानिमित्त ऑफिसवाल्यांनी बेकिंग क्लास ठेवला होता. तिच्या ऑफिसमधल्या सर्व महिलांना बेकिंगमधे इंटरेस्ट असेलच हे गृहितक यामागे.
२. व्हॉटसॅपवर एक इमेज फिरत होती महिला दिनाच्या शुभेच्छा देणारी ज्यात एक लहान मुलगी बाळ, ४ वर्षाची चिमखडी, १२-१३ वर्षांची टिनेजर, विशीतली मुलगी, प्रेग्नंट मुलगी, बाळाला खेळवणारी आई, ३५ शी ची बाई, ५०शीची बाई अश्या स्टेजेस दाखवल्या होत्या. बाईच्या आयुष्याच्या स्टेजेस दाखवताना मातृत्व ही अनिवार्य गोष्ट आहे? मातृत्वाशिवाय बाई नाहीच?
३. बाकी अनेक शुभेच्छा मेसेजेसमधे ग्रिटींग कार्डस, दागिने, शरीरसजावटीच्या वस्तू आणि तत्सम 'पॅम्परिंग' म्हणता येईल असं काय काय होतं. या अश्या वस्तू दिल्या/ विकत घेतल्या की बायांचे समाधान झाले?

सगळा एक दिवसाच्या कौतुकाचा खेळ. मानसिकता तिथली तिथेच.

आजही २० - २५ वयोगटातली मुलगी तोंड उघडून आपल्याला आयुष्याकडून काय हवंय याबद्दल स्वतःच्या जन्मदात्या आईवडिलांशी मोकळेपणाने बोलू शकेल हे शहरांमधेही अजून दुर्मिळच आहे.
आता १८ वर्षांच्या असलेल्या माझ्या भाचीला आत्मविश्वास असणे, निडर, कणखर असणे म्हणजे 'मुलासारखे आहे. मुलगी म्हणून तू कमी आहेस!' असे सांगणारे/ सुचवणारे पदोपदी भेटले, भेटतात.
आजही माझ्या विद्यार्थिनी रोज कलिनाला विद्यापीठात पोचताना कुर्ल्याच्या ब्रिजवरून येताना 'कितना संभालेंगे. बॅक तो पब्लिक प्रॉपर्टी है. जैसेतैसे फ्रंट संभालके आते है!' असं दुर्दैवी हसत सांगतात.
घरातल्या गोष्टींबद्दल सांगितले गेल्याने, बाहेरून आल्या आल्या बायकोने हातात गरम गरम चहा आणि खाणे न आणून दिल्याने स्वतःला अगतिक समजणारे नवरे पैशाला पासरीभर आहेत आणि त्यांना पाठिंबा देणारे अजून पासरीभर.
स्त्रीभृणहत्या.... आकडेवारी आणि ह्याच्या मागची मानसिकता भयंकर आहे.
बलात्कार, स्त्रियांवरचे अत्याचार यामधे स्त्रियांचीच चूक असते असे पक्के मानणारे लोक जिथेतिथे भेटत असतातच.

कसला डोंबलाचा महिला दिन......

नीधप | 9 March, 2014 - 10:54 नवीन <<<

वास्तव व पटण्यासारखा तसेच नकारात्मक अभिप्राय!

तुमच्यामते गेल्या वीस एक वर्षात काही घटकांची मानसिकता सुधारण्याची, चांगली होण्याची प्रक्रिया सुरू (झाली) आहे काय? तसे असल्यास काही प्रमाणात असे उपक्रम, एकुण अवेअरनेस क्रिएशन ह्याला काही गुण द्याल का?

मला वाटते की ही प्रक्रिया प्रचंड हळू व प्रखर विरोधाचा सामना करत, पण सुरू असणार! कदाचित असा दिवस कधीच येणार नाही जेव्हा सर्व महिला सुरक्षित, सुखी असतील पण कधीतरी मोठ्या प्रमाणावर तसे होणे तरी शक्य आहे असे वाटते.

कालपरवाच युरोपची बातमी वाचली की स्त्रियांची सर्वाधिक हॅरॅसमेंट तेथे होते. म्हणजे विकास, शिक्षण ह्याच्याशीही त्याचे नाते जोडणे संयुक्तिक नाही.

सरतेशेवटी जर सगळेच संस्कार आणि मानसिकतेपाशी येत असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसणे तुमच्या आमच्या हयातीत तरी शक्य नसावे.

नकारात्मक किंवा निराशावादी प्रतिसाद म्हणत असाल तर हो आहे तसा पण काय करणार आजूबाजूला असेच दिसतेय.

तुमच्यामते गेल्या वीस एक वर्षात काही घटकांची मानसिकता सुधारण्याची, चांगली होण्याची प्रक्रिया सुरू (झाली) आहे काय? <<<
वरवर जे दिसतं त्यातून हो म्हणावसं वाटतं पण साशंकता भरपूर आहे.

तसे असल्यास काही प्रमाणात असे उपक्रम, एकुण अवेअरनेस क्रिएशन ह्याला काही गुण द्याल का? <<<
एक प्रयत्न या पातळीवर नक्की गुण देईन. कुठल्या प्रयत्नांतून वेगळेवेगळे किंवा एकत्रित फलित काय ह्याची आपल्याला गणितंही मांडता येणार नाहीत. ते काळच ठरवेल.

>>> मला वाटते की ही प्रक्रिया प्रचंड हळू व प्रखर विरोधाचा सामना करत, पण सुरू असणार! कदाचित असा दिवस कधीच येणार नाही जेव्हा सर्व महिला सुरक्षित, सुखी असतील पण कधीतरी मोठ्या प्रमाणावर तसे होणे तरी शक्य आहे असे वाटते. <<
सर्व महिला सुरक्षित सुखी ही आयडियाच युटोपियन आहे. सर्व महिलांनी सुरक्षित सुखी असण्यासाठी सर्व समाज सुरक्षित आणि सुखी असायला हवा. सर्व समाज सुरक्षित व सुखी म्हणजे पसायदानातली मागणी झाली 'जो जे वांछिल तो ते लाहो!'. हे प्रत्यक्षात येणं अशक्य आहे.
मोठ्याप्रमाणावर होणे शक्य आहे या तुमच्या खात्रीबद्दल तुमचे अभिनंदन. मलाही कधीतरी अशी खात्री वाटावी अशी आशा करेन मी. सध्या साशंकच आहे.

>> कालपरवाच युरोपची बातमी वाचली की स्त्रियांची सर्वाधिक हॅरॅसमेंट तेथे होते. म्हणजे विकास, शिक्षण ह्याच्याशीही त्याचे नाते जोडणे संयुक्तिक नाही. <<
अर्थातच.

>> सरतेशेवटी जर सगळेच संस्कार आणि मानसिकतेपाशी येत असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसणे तुमच्या आमच्या हयातीत तरी शक्य नसावे. <<
नाहीच. आधीच्या ५०-६० वर्षातल्या बदलांचा वेग ध्यानात घेतला तर पुढे जाऊन आपल्या हयातीत कुठपर्यंत बदल घडू शकतील याचा अंदाज येऊ शकतो. पण अंदाजच. खात्रीशीररित्या तेवढे बदल होतीलच असे नाही म्हणता येत.

तस्मात प्रयत्न करत रहाणे यापलिकडे पर्याय नाही.