http://www.youtube.com/watch?v=WY-mCvBuSMA
हिन्दी चित्रपटात समर्पणाचा भाव असलेल्या गाण्यांची कमतरता नाही. तिने त्याच्यासाठी गायिलेले गाणे, त्याने तिच्यासाठी गायिलेले गाणे आणि दोघांनी एकमेकांसाठी गायिलेले गाणे. अतिशय सुरेल गाणी आहेत. प्रेमाने ओतप्रोत, चिंब भिजलेली. अगदी चटकन आठवणारं गाणं म्हणजे लता मन्नाडेचं "तुम गगन के चंद्रमा हो मै धरा की धुल हूं". मात्र येथे मी "साथी" चित्रपटातल्या "मेरे जीवन साथी, कली थी मै तो प्यासी, तुने देखा हुई खिलके बहार" या सुरेल गाण्याचा विचार करीत आहे. हे गाणे मला अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण वाटले. मजरुहची ही रचना म्हणजे प्रियकराच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेल्या, एका समर्पित प्रेमाची कहाणी सांगणार्या हृदयातुन आलेला आवाज आहे. दोनच ओळी देण्याचा मोह मात्र आवरत नाहीय.
तुझको मै सजना, बिंदिया का प्यार दूं
चुनरी के रंगसे घरको सवांर दूं
जुल्फों का गजरा नैनों का काजल
तेरे नजराने है तुझपे ही वार दूं
समर्पणाची भावना याहुन काय वेगळी असु शकते? शब्दातुन इतकी तीव्रता तर मनातुन काय असेल?
नौशादने अगदी वेगळ्या प्रकारचं संगीत या गीतासाठी दिलंय. एरवी हिन्दुस्तानी बाजाचं संगीत देणार्या नौशादने पाश्चात्य थाटाचा चांगल्यापकी येथे उपयोग केला आहे. चाल अशी सुरेख बांधली आहे कि प्रियकराच्या खांद्यावर मस्तक विसावुन त्याच्याशी प्रेमाच्या गुजगोष्टी करणारी प्रेयसीच समोर यावी. आणि त्यातच लताचा आवाज. काळीज कापत जाणारा आवाज म्हणजे काय याचाच अनुभव यावा अशा तर्हेने हे गाणे लताने गायिलेले आहे. लताचे स्वर समर्पणाच्या भावनेला अगदी टोकावर नेले आहे. लता आवाजातुन अभिनय करते असे मला नेहेमी वाटते. बहुधा पडद्यावर तिच्या आवाजात गाणार्या अभिनेत्रीला फारसा अभिनय करण्याची गरजच भासु नये इतका जबरदस्त अभिनय लताच्या आवाजात असतो. आणि हे गाणं त्याचं उत्तम उदाहरण आहे. "तुने देखा हुई खिलके बहार" या ओळी पुन्हा पुन्हा ऐकाव्यात. आपल्या दैवताला शरण गेल्याची भावना. सारे काही तुच, सारे काही तुझेच. माझे काही नाही...
यानंतर हे गाणे आणखि मोहक बनवले आहे त्यातल्या कलाकारांच्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने. सीमी गरेवालला यश का मिळालं नाही ही हिन्दी चित्रपटसृष्टीतल्या अनेक गोष्टींपकी एक आणखि अतर्क्य गोष्ट. माझी हि एक अत्यंत आवडती अभिनेत्री. मोठा अंबाडा घालुन, त्यावर फुले माळुन साडीत सीमी सुरेख दिसते. अतिशय निरागस, प्रियकराच्या प्रेमाने सुखावलेली, सर्वांसमोर गाताना काहीशी संकोचलेली प्रेयसी सीमीने छानच उभी केली आहे. मध्येच गाताना उदासवाणे बसलेल्या राजेंद्रकुमारला त्याचे जिच्यावर प्रेम आहे ती वैजयंतीमाला दिसते आणि त्याचा चेहरा क्षणभरासाठी खुलतो. अतिशय परिणामकारक अशा या दृश्याचं यश दिग्दर्शकाचंच आहे. क्षणभरासाठी आलेली वैजयंतीमाला श्वास जड करुन जाते. इतकी सुंदर दिसते.
राजेंद्रकुमारबद्दल कुणी काहीही म्हणो आपल्याला हा जुबीली कुमार आवडतो. मुळात मला या काळाबद्दल असाध्य आणि कट्टर असा हळवेपणा वाटत आसल्याने मी कुणालाही अगदी भारतभुषण, प्रदिपकुमार यांनादेखिल पॉप्युलर फॅशनप्रमाणे ठोकळा वगैरे म्हणु शकत नाही. मला ही सारी माणसे आवडतात कारण यांनी माझे आयुष्य समृद्ध केलं आहे. या गाण्यात हँडसम दिसणारा राजेंद्रकुमार उदासवाणा बसला आहे. बहुधा काहीतरी गैरसमजामुळे सीमीला त्याचे आपल्यावर प्रेम आहे असं वाटत असावं. याच्या मनात मात्र वैजयंतीमालाच असते, ही द्वीधा मनस्थीती त्याने परिणामकारकरित्या दाखवली आहे.
चपखल शब्द, सुरेल संगीतरचना, लताचा समर्पीत भावनेची अनुभुती देणारा स्वर आणि कलाकारांचीही तितकीच सुरेल साथ या सार्यांमुळे एका परिपूर्ण गाण्याचा अनुभव "मेरे जीवन साथी" ऐकताना मिळतो.
अतुल ठाकुर
समर्पणाचाच विषय निघाला आहे
समर्पणाचाच विषय निघाला आहे तर, लताबाईंचं हे गाणं सर्वप्रथम यावं - माझ्या मते...
अतुल जुन्या काळात
अतुल जुन्या काळात नेलत.वैजयंतीमलाच नृत्य नसलेला बहुतेक पहिलाचा सिनेमा.सिनेमा संपल्यावर सिम्मिच जास्त लक्षात राहते.
राज यांच्याशी सहमत.सकाळिसकाळि 'आप् की नजरोने' ऐकल आणी पाहिल.मस्त वाटल.धन्यवाद राज.
शोभनाताई..... फार आनंद झाला
शोभनाताई.....
फार आनंद झाला तुमचा प्रतिसाद वाचून. वैजयंतीमाला या अभिनेत्रीची चित्रपटासाठी निवड केली म्हणजे दिग्दर्शकाने नृत्यासाठी कथानकात स्थळ शोधलेच पाहिजे असा जणू काही अलिखित नियमच बनला होता. तरीही दिग्दर्शक सी.व्ही.श्रीधर यानी कटाक्षाने तो मोह टाळला होता हे नमूद केले पाहिजे. अर्थात "नजराना....दिल एक मंदिर" या सारखी निवडक निर्मिती केलेल्या श्रीधर यांचा निर्णय योग्यच असणार....शिवाय सीमी या आणखीन् एका गुणी अभिनेत्रीलाही नायिकेइतकेच महत्त्व दिले गेल्याचे हा चित्रपट सांगतो.
[मला खात्री आहे की लेखक अतुल ठाकुर यानाही शोभनाताई यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीने हा लेख वाचून सुंदर प्रतिक्रिया दिल्याचे पाहून आनंद झाला असणार.]
अशोकराव, तुम्ही आणि
अशोकराव, तुम्ही आणि शोभनाताईंसारख्या जेष्ठ व्यक्तींच्या प्रतिसादाने निश्चितच आनंद होतो आणि लिहायला हुरुपदेखिल येतो
अतुल.... मी तर तुमच्या
अतुल....
मी तर तुमच्या लेखनाचा निस्सिम चाहता आहेच....उत्सुकतेने वाचत असतो.....पण आज मला जो सुखद आनंदाचा अनुभव आला तो शोभनाताईनी वैजयंतीमालाच्या नृत्याची आठवण काढली म्हणून....त्यातही "साथी" जवळपास ४५ वर्षापूर्वीचा चित्रपट...असे असूनही त्यानी सिमीच जास्त लक्षात राहते हा जो शेरा दिला आहे त्याबद्दल त्याना सलाम करावासा वाटतो.....सिमीने नायक राजेन्द्रकुमार आणि नायिका वैजयंतीमाला याना एकत्र आणून शेवटी त्यांच्या अंगणातून कायमचे निघून जाणे हा प्रसंग खूप भावनाप्रधान होता....तिच्यावरच श्रीधर यानी चित्रपटाचा शेवट केल्याचे दिसत्ये.
अतिशय सुंदर गाणे आणि तितकाच
अतिशय सुंदर गाणे आणि तितकाच मस्त लेख.. गाणे वाचल्यावर चटकन क्लिक झाले नाही, पण पाहिल्यावर लगेच लक्षात आले की याआधी अनेकदा ऐकलेय हे. यातली अजुन दोन गाणीही पाहिलीत. तीही तितकीच सुंदर आहेत. ये कौन आया मध्ये सिमी किती गोड दिसते.. मै तो प्यार से... हेही मस्त आहे. मेरा प्यार भी तु है... हे मला वाटते यातले सर्वाधिक लोकप्रिय गाणे असेल.
सीमी गरेवालला यश का मिळालं नाही ही हिन्दी चित्रपटसृष्टीतल्या अनेक गोष्टींपकी एक आणखि अतर्क्य गोष्ट
सिमी दिसायला गोड होती, पण तिच्या अभिनयक्षमतेला मर्यादा होत्या. अर्थात आज पाहताना तेव्हाच्या ब-याच नटनट्यांच्या अभिनयमर्यादा लक्षात येतात, तेव्हा कदाचित आल्या नसतील. पण माझ्या मते तिच्यातला एक मोठा दोष म्हणजे ती कायम परिटघडीत असल्यासारखी वाटायची. नेहमी नीटनेटकी, टिपटॉप, दुकानात उभ्या असलेल्या मॅने॑क्विनसारखी. थोडीशी टच मी नॉट वाटणारी. त्यामुळे हिरो-हिरोईनबद्दल जी एक आपुलकी वाटायची तशी तिच्याबद्दल कधी वाटली नाही.
मला ती सगळ्यात जास्त दो बुंद पानी मध्ये आवडलेली. हा चित्रपट नेटवर शोधायला हवा. दुरदर्शनवर एकदाच दाखवलेला. खुप आवडलेला तेव्हा.
राजेंद्रकुमारबद्दल कुणी काहीही म्हणो आपल्याला हा जुबीली कुमार आवडतो. मुळात मला या काळाबद्दल असाध्य आणि कट्टर असा हळवेपणा वाटत आसल्याने मी कुणालाही अगदी भारतभुषण, प्रदिपकुमार यांनादेखिल पॉप्युलर फॅशनप्रमाणे ठोकळा वगैरे म्हणु शकत नाही. मला ही सारी माणसे आवडतात कारण यांनी माझे आयुष्य समृद्ध केलं आहे. + १००
मलाही हिंदी चित्रपटसृष्टीतला का काळ खुप आवडतो. या काळातले बरेचसे हिरो ठोकळे होते हे आता परत वळून पाहताना जाणवते. पण त्यामुळे त्यांचे काहीच बिघडले नव्हते. त्या कालखंडात ते अगदी फिट बसत होते.
या काळातले बरेचसे हिरो ठोकळे
या काळातले बरेचसे हिरो ठोकळे होते हे आता परत वळून पाहताना जाणवते. पण त्यामुळे त्यांचे काहीच बिघडले नव्हते. त्या कालखंडात ते अगदी फिट बसत होते.<< साधना +१००००
अतुलजी, सुंदर लिहिलय तुम्ही त्या गाण्याबद्दल. माझंही आवडतं गाणं.
सिमीचे फिचर्स आणि राहणीमान ही रॉयल होते. पण ती जरा आखडु वाटायची.
परंतु या गाण्यात ती खुपच निरागस दिसते.
खुप आवडतं गाणं.. छान लिहिले
खुप आवडतं गाणं.. छान लिहिले आहे.
मी कधी पडद्यावर बघितले नाही पण का कुणास ठाऊक सिम्मीची कल्पना नाही केली या गाण्यासाठी.
अमरदीप मधे पण वैजयंतीमालाचा नाच नव्हता ना. ( त्यात रागिणी, पद्मिनी आणि देव आनंद पण होते. आणि एका गाण्यात चक्क देव आनंद नाचलाय या दोघींबरोबर.. जाली लो दिम ताना. ) बाकीची गाणी, देख हमे आवाज न देना, मेरे मन का बावरा पंछी, दिल कि दुनिया बसाके सावरीया... !
अतुल तुमची सर्व गाणी इथे मराठीत आणा ना ! तिथले अनेक लेखही सुंदर आहेत. भाषांतराची मदत आमच्यापैकी काही जण करतील.
दिनेश.... "ज्युवेल थीफ",
दिनेश....
"ज्युवेल थीफ", "आम्रपाली" वा "कठपुतली" या धर्तीची शास्त्रोक्त पद्धतीची नृत्ये "अमरदीप" मध्ये नक्कीच नव्हती तिच्यासाठी....पण "देख हमे आवाज न देना" या गाण्याच्यावेळी वैजयंतीमालाच्या सार्या अदाकारा तिने मुक्त नृत्यातूनच व्यक्त केल्याचे दिसते.....अर्थात पद्मिनी आणि रागिणीने ती कमतरता भरून काढली होतीच.
गाणे खरच छान आहे, लेख पण
गाणे खरच छान आहे, लेख पण मस्त.
साधनाने सिम्मीबद्दल अगदी अगदी अचूक लिहीलेय. ती थोडिशी वरवर अभिनय करणारी वाटायची. खरे तर हाथ की सफाई मध्ये मला खूप आवडली होती. आपल्याला कधी कधी एखाद्याबद्दल असे का वाटते देव जाणे पण वाटते खरे. खरे तर त्या व्यक्तीवर तसा अन्याय पण आपण नकळत करतो.
राजेन्द्र कुमार, प्रदिपकुमार आणी भारत भुषण या ठोकळ्यान्चे नशीब हिर्यासारखे होते. त्यान्चा तो काळ, त्या वेळचे गीतकार, सन्गीतकार, लेखक, दिग्दर्शक, को स्टार, व्हिलन हे सगळे बावनकशीच होते.
नौशाद, शकील बदायुनी, वसन्त देसाई सारखे लिजेन्डस ज्याना मिळाले ते हे नशीबवान.
अतुलजी, पुन्हा एकदा सुंदर
अतुलजी, पुन्हा एकदा सुंदर गाण्याची आठवण आणि सुरेख लेख.

शोभनाताई, अशोकमामा, साधना, दिनेशदा, रश्मी मस्त प्रतिसाद.
मै तो प्यार से... हेही मस्त आहे. मेरा प्यार भी तु है... हे मला वाटते यातले सर्वाधिक लोकप्रिय गाणे असेल. >>>>>साधना +१.
सुरूवातीला "मेरा प्यार भी तु है...." गाण्यात मुकेशसोबत मला लता मंगेशकरचाच आवाज वाटायचा.
साधनाजी, दोन बुंद पानीची आठवण
साधनाजी,
दोन बुंद पानीची आठवण छान काढलीत. ते गाणं आणि त्यात डोक्यावर घागर घेऊन चालणारी सीमी अजुनही दिसते...पितल की मेरी घागरी... मला वाटतं त्यात जलाल आगा आणि किरण कुमार होते.
मी आर्या
सिमीचे फिचर्स आणि राहणीमान ही रॉयल होते...अगदी सहमत
दिनेशजी धन्यवाद
रश्मिजी,
त्या वेळचे गीतकार, सन्गीतकार, लेखक, दिग्दर्शक, को स्टार, व्हिलन हे सगळे बावनकशीच होते....अगदी खरे आहे.
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार
छान रसग्रहण. गाणं नौशादचे आहे
छान रसग्रहण. गाणं नौशादचे आहे हे माहित नव्हते. या पिक्चरमधली इतर गाणी जास्त पॉप्युलर आहेत पण मला हेच जास्त आवडते. इतर समर्पणाच्या गाण्यात स्वतःकडे कमीपणा घेतलेला असतो जनरली. यात असं नाही.
पण मध्येच येणारी वैजयंतीमाला खाऊन टाकते सिमीला. प्रचंड गोड दिसते आणि तिच्या डोळ्यात प्रेम दिसतं. दोघींची देहबोली सिमिलर आहे पण वैजयंतीमालाची जास्त ग्रेसफुल वाटते. कदाचित मोठे बोलके डोळे आणि भरतनाट्यममधली एक्स्प्रेशन्स याच्यावर वैजयंतीमालाने बाजी मारली आहे. तिच्या वाट्याला ज्या 2 ओळी आल्यात त्यात 'खिल के' शब्दावर लताने अप्रतिम हरकत घेतली आहे.