अंकूर : लढाई अस्तित्वाची

Submitted by प्राजु on 7 March, 2014 - 08:22

अंकूर : लढाई अस्तित्वाची
स्त्री ही विश्वकारिणी आहे. समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी पुढची पिढी जन्माला घालायची असेल तर स्त्री शिवाय पर्याय नाही.. हे कितीही कटू असलं तरी सत्य आहे. कटू अशासाठी म्हंटलं की, सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजात मुलगी जन्माला येणं ही काही चांगली बाब मानली नाही जात. स्त्रीला जन्मच नाकारला जातोय!

आई हवी, बायको हवी... पण मुलगी नको! का? हीच मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी समाजातल्या अनेक स्तरांवर अनेक प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. लोक जागृती करण्याचे काम बर्‍याच सेवाभावी संस्था करत आहेत. पण तरीही या सुधारीत समाजात स्त्री भ्रूण हत्या ही एक गंभीर समस्या आहे. कारण मुलगा वंशाचा दिव आणि मुलगी??

तीही वंशवेलच आहे ना!

आजही महाराष्ट्रात रोज कित्येक स्त्री गर्भांना जन्म नाकारला जातोय. गेल्या १० वर्षात अंदाजे ४,६८,६८० मुलींना जन्मालाच येऊ दिले नाही. याला जबाबदार कोण? सामाजिक मानसिकता की, यंत्रणा?
मुलगी मारणे म्हणजे एका आईला गमावणे आहे. कारण दिवा प्रज्वलीत करण्यासाठी ज्योत असावीच लागते. या लढ्यात आपणही सहभागी होऊया.

यासाठीच.. गुणी संगीतकार चिंतामणी सोहोनी यांनी अंकूर या गाण्याची निर्मिती केली आहे. कवयित्री- गझलकार प्राजक्ता पटवर्धन यांच्या लेखणीतून या गाण्याचे शब्द उतरले आहेत. संगीत संयोजन अमित पाध्ये यांचे आहे आणि तुमच्या आमच्या सारख्याच याच समजात वावरणार्‍या गोड गळ्याच्या मुली आणि बायका अश्या ४० जणींनी आपल्या आर्त आवाजात या गाण्याला गायन केले आहे. या दुसर्‍या तिसर्‍या कोणी नसून आपल्याच घरातल्या माता, बहिणी आहेत.. कारण हे गाणे म्हणजे एका सर्वसामान्य स्त्रीचा तिच्या अस्तित्वासाठीचा, तिच्या जन्म घेण्याच्या हक्काचा लढा आहे.. या गाण्यातून प्रेरणा घेउन १० जरी स्त्री भ्रूण हत्या रोखल्या गेल्या.. तर तेच या गाण्याचे यश म्हणावे लागेल.

https://www.youtube.com/watch?v=ZlDsd6zBagY&feature=youtu.be

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users