पश्चिमरंग २ - द बॅड, एंजल आय, ली व्हान क्लीफ!

Submitted by अतुल ठाकुर on 4 March, 2014 - 06:56

Lee_Van_Cleef_1280077554.jpg

द बॅड म्हणुन काम केलेला “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंजल आय ली व्हान क्लीफ हा माझा अत्यंत आवडता अभिनेता. भिंगातुन सुर्यकिरण एकत्र होऊन कागदाला भोक पडावं तशी आरपार भेदुन जाणारी तीक्ष्ण नजर हे व्हान क्लीफचं बलस्थान. त्यातुन सर्जीयो लिऑनसारखा क्लोजअपवेडा दिगदर्शक मिळाल्यास पाहायलाच नको. सर्जियोने या नजरेचा वापर करुन पडद्यावर अनेकदा जाळ पेटवला आहे. उंचीपुरी देहयष्टी, त्याला सजेसा वेस्टर्नपटातील तो पोशाख. ओठात पाईप पकडुन व्हानक्लीफ पडद्यावर आला की बाकीचे सारे काहीवेळ धुसर वाटु लागतात. त्याचं आगमनच स्क्रीन व्यापुन टाकणारं असतं. हे जणुकाही कमीच म्हणुन की काय त्याचा तो बसकट, काहीसा खर्जातला धडकी बसवणारा आवाज. तो बोलु लागल्यावर तो आवाज आणि ती नजर प्रेक्षकांना खिळवुन टाकते. एकुणच व्यक्तीमत्वाचा प्रभाव जबरदस्त. सर्जिओ लिऑनने "फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर" मध्ये देखिल व्हान क्लीफ च्या या नजरेचा अत्यंत परिणामकारक वापर केला आहेच. मात्र त्याबद्दल स्वतंत्र लिहावे लागेल. कारण ती भुमिका सकारात्मक आहे. "द बॅड" व्हान क्लीफ हा फार वेगळ्या तर्‍हेचा व्हिलन आहे.

व्हान क्लीफच्या “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंट्रीला इनिओ मोरीकोनने असं काही पार्श्वसंगीत वापरलं आहे कि या माणसाच्या येण्याने भयंकर वादळ येणार आहे याची प्रेक्षकाला चाहुल लागावी. त्यानंतरचे दृश्य हे चवीचवीने पाहण्याजोगे. सर्जियोचे टाईट क्लोज अप्स आणि वेस्टर्नपटातील ते रापलेले चेहरे. व्हान क्लीफ घोड्यावरुन उतरतो आणि कॅमेरा त्याच्या चेहर्‍यावर स्थिर होतो. त्यावेळी दिलेलं पार्श्वसंगीत भयंकराच्या आगमनाची वर्दी देणारे आहे. व्हान क्लीफची दारात उभे राहण्याची पद्धत आणि त्यानंतर त्याचे ठामपणाने पावले टाकत येणे फक्त एकच सुचवते की हा माणुस काहितरी ठरवुन आला आहे. घरमालक आपल्या लहान मुलाला जेवणाच्या ताटावरुन उठवतो आणि बायकोला देखिल नजरेनेच आत जायला सांगतो. दुबळ्या प्राण्याला आपला मृत्यु समोर दिसावा त्याप्रमाणे त्याच्या हालचाली सुरु असतात. बराचवेळ कुणीचे काही बोलत नाही. व्हान क्लीफ समोरच्यावर आपली धारदार नजर रोखुन टेबलावरील अन्नाचा समाचार घेऊ लागतो. आणि मग समोरच्याला व्हानक्लीफची ती नजर जणु असह्य होते आणि तो बोलु लागतो. व्हानक्लीफ त्याला मांजराने उंदराला मारण्याआधी खेळवावं तसा खेळवतो. हवी ती माहीती मिळाल्यावर ठार मारतो. त्याच्या मुलालाही सोडत नाही. आणि ज्याच्याकडुन पैसे घेतले त्यालाही ठार मारुन दडवलेल्या संपत्तीच्या मागावर स्वतःच बाहेर पडतो. या दृश्याचं जास्त वर्णन करीत नाही कारण ते प्रत्यक्ष पाहायलाच हवं. व्हान क्लीफचा आवाज, त्याची बोचरी शोधक आणि भेदक नजर, त्याने विद्युतवेगाने केलेल्या हालचाली आणि त्याला साथ आहे तितक्याच तोलाच्या पाश्वसंगीताची. सर्जिओ लिऑनच्या समोर व्हान क्लीफसारखा माणुस आल्यावर काय चमत्कार घडु शकेल याचे प्रात्यक्षिकच या दृश्यात दिसुन येते.

पुढे चित्रपट एखाद्या महाकाव्याचे सर्ग वाचल्याप्रमाणे पुढे सरकतो. सर्जिओच्या वेस्टर्नपटात डोंगर दर्‍या, खुरटी झुडपं, पॅनोरमिक ऐसपैस पसरलेली मैदाने, त्यातुन दौडत असलेले घोडे, त्यावरील रापलेल्या चेहर्‍यांची, फट म्हणता पिस्तुले काढणारी माणसे यांची रेलचेल असते. वेस्टर्न पटाच्या कठोर पार्श्वभुमीवर खलनायकदेखिल तसाच असायला हवा होता आणि व्हान क्लिफने ती जागा घेऊन "एंजल आय" ला अमर करुन टाकले. दडवलेल्या संपत्तीच्या शोधात तो सावजाच्या मागावर निघावं त्याप्रमाणे निघतो. आपल्या सैन्यातील पदाचा दुरुपयोग करायलाही हा मागेपुढे पाहात नाही. अतिशय थंड, हिशेबी आणि आपल्या हेतुबाबत पूर्णपणे नि:शंक असलेला हा एंजल आय खरं म्हणजे प्रेक्षकांना मनातुन आवडुन जातो. त्यानंतरचा अतिशय मह्त्वाचा सीन म्हणजे टुको कढुन माहिती काढणे. इलिया वलाचने टुको, द अग्लीची भुमिका झकासच वठवली आहे. प्रेक्षकांना अतिशय आवडलेली, विनोदाची झाक असलेली ही भुमिका. अशा या टुकोच्या चलाखिला व्हान क्लिफ फसत नाही. त्याच्या कडुन माहिती मिळण्यासाठी ज्या तर्‍हेच्या क्रौर्याची वापर व्हान क्लिफ थंडपणे करतो ते पाहुन अंगावर शहारे येतात. हे एकुणच दृश्य अतिशय हिंसक आहे.

शेवटचा सीन तर चित्रपटाचा कळसच आहे. मात्र त्यातदेखिल बाजी मारुन जाते ती व्हान क्लिफची नजर. क्लिंट इस्टवूड शेवटपर्यंत ज्या थडग्यात संपत्ते दडवलेली आहे त्या थडग्यावरचे नाव उघड करत नाही. बंदुकीच्या जोरावर संपत्ती मिळणार नाही त्यासाठी तिघांना एकमेकांशी लढावे लागेल हे तो दोघांनाही शांतपणे सांगतो. त्यानंतर सुरु होतो तो जिवन मरणाचा लढा. यावेळी मोरीकोनीचे संगीत तीव्र होत जातं आणि व्हान क्लिफची नजरदेखिल. पुढे काय घडतं हे सर्वांना माहितच आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी ते आवर्जुन पाहावं असं आहे. क्लिंट इस्टवूडचा "द गुड" ब्लाँडी, इलिया वलाचचा "द अग्ली" या भावखावु भुमिका आहेत. प्रेक्षक त्या मनापासुन एंजॉय करतातच पण व्हान क्लिफ फ्रेममध्ये आल्याबरोबर प्रेक्षक सावरुन बसतात. कारण हे काम सिरियस आहे, आता काहीतरी घडणार आहे असेच वातावरण तयार होते. व्हानक्लीफचा एंजल आय हा चित्रपटाच्या इतिहासातील वेगळा खलनायक गणला जायला हवा. अत्यंत हिशेबी, थंड डोक्याचा, सावजाच्या मागावर चिकाटीने असलेला, काम साधण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा असा हा खलनायक आहे. हे करताना एक "नो नॉनसेन्स" तर्‍हेचा वाईट माणुस स्क्रीनवर उभा राहतो. आणि विद्युतवेगाने पिस्तुल काढुन अचुक नेम साधण्याची क्षमता असलेल्या या माणसाशी मुकाबला करण्यासाठी त्याच्यासारख्याच नेमबाज अशा दोघांना एकत्र यावं लागतं यातच त्या भुमिकेची ताकद दिसुन येते.

पुढे व्हान क्लिफचे अनेक चित्रपट पाहिले. काही आवडले. मात्र नकारात्मक भुमिकेत मला अतिशय आवडलेला असा हा एकमेव "एंजल आय"च. मला आजही असं वाटतं की व्हान क्लीफच्या प्रतिभेला योग्य न्याय देणार्‍या भूमिका त्याच्या वाट्याला फार कमी आल्या. विधात्याने हॉलिवूडसाठी ली व्हान क्लीफ हे रसायन एकदाच तयार केलं. तसा अभिनेता पुन्हा होणे नाही.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी! नवर्‍याची आवड वेस्टर्न्स. त्यामुळे बरेच उत्कृष्ट पिक्चर पहाता आले. हा त्यापैकीच एक ( गुड, बॅड अ‍ॅण्ड अग्ली) अप्रतीम काम केले आहे व्हान ने. चेहेराच बोलतो. क्लिन्ट इस्टवुड नेहेमीप्रमाणेच ग्रेट होता.

धन्यवाद अतुल, मस्त लेख.:स्मित:

'वेस्टर्न' सिनेमाला प्रचंड उंचीवर नेवून ठेवणारे ' द फास्टेस्ट गन अलाईव्ह', 'रिओ ब्राव्हो','फॉर अ फ्यू मोअर डॉलर्स' व 'द लास्ट ट्रेन फ्रॉम गनहील' असे जे मोजके सिनेमा आहेत , त्यातला हा अग्रेसर सिनेमा. एक छान आठवण जागवल्याबद्दल धन्यवाद.
व्हान क्लिफ हा खरंच डोक्यात भिनून रहाणाराच अभिनेता आहे. मीं प्रथमच एमएस ऑफिसच्या 'पेंट'मधे चित्र काढायचा प्रयत्न करायला लागलों, तेंव्हां माझ्या नकळत जें तथाकथित पोर्ट्रेट तयार झालं, त्यांतून व्हान क्लीफच डोकावतोय हें माझ्या लक्षात आलं-

face3.JPG
या सिनेमात इलिया वलाचच्या 'अग्ली' भूमिकेचा वापर देखील अत्यंत कल्पक आहे; त्या व्यक्तिरेखेमुळे क्लींट ईस्टवूड व व्हान क्लिफच्या भूमिकाना खूपच उठाव मिळाला आहे. अर्थात सिनेमाचा शेवट तर अफलातूनच आहे !

वेस्टर्न सिनेमाची फारशी आवड नसल्याने पाहिला नाही, पण काय सुरेख लिहिलेय, चित्र डोळ्यासमोर उभारले अन मला असल्या सिनेमांची आवड का नाही याची खंत वाटली.

अवांतर - भाऊ, पेटींग फर्स्टक्लास !

मस्त लिहिलंय. असं काही लिहिलेलं वाचलं की परत एकदा सिनेमा बघावासा वाटतो.

व्हान क्लिफच्या नजरेचं वर्णन मात्र अचूक आहे.

माझा अत्यंत आवडता अभिनेता. धन्यवाद अतुल ठाकुर!

कुणी तरी एनिऑ मॉरिकोन वर लेख लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. ८०+ वयाचे मॉरीकोने सध्या अमेरिका दौरयावर आहेत.

फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर मधला मुलीच्या बलात्कारी खुन्याचा बदला घेणारा ली लक्षात राहिला आहे.