आपण जरा बोलूयात का ?

Submitted by मी भक्ती on 3 March, 2014 - 02:58

आपण जरा बोलूयात का ?
एकमेकांशी ही स्पर्धा जरा वेळ थांबूयात का ?
ही स्पर्धा ना तुझी - माझी
ही स्पर्धा आहे इर्षेची
नकळत साचलेल्या अभिमानाची...

ही इर्षा हा अभिमान जरा
बाजूला ठेवूयात का ?
कधी तरी हात धरला होता,
तसाच हात पुन्हा धरुयात का ?
हात हातात होते
स्वप्नं डोळ्यात होते...
स्वप्नांमागे धावताना हात सुटल्याचे भानच नव्हते

एकमेकांसोबत बोलतांना
कधी शब्द मूके व्हायचे...
अव्यक्त होऊन सुद्धा
आपले हितगूज चालायचे...
हितगूज नाही पण
जरा व्यक्त होऊयात का ?
हरवलेले शब्द पुन्हा एकदा शोधूयात का...

तुझा - माझा दुरावा...
आपल्याला जाणवत नाही ...
आपल्यातला अबोला
कधीच खटकत नाही...
पण आपल्या पाखरासाठी जरा जगूयात का ?
आपण जरा बोलूयात का ?

- भक्ती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

sunder