प्रचिती म्हणींची - मराठी भाषा दिवस २०१४ - आशूडी

Submitted by आशूडी on 28 February, 2014 - 08:27

मराठी भाषा दिवसाच्या प्रचिती म्हणींची या उपक्रमाने आजीच्या काही जुन्या म्हणींना उजाळा देते आहे. प्रसंगानुरुप आजी अशी चटचट म्हणी बोलायची की प्रसंगापेक्षा तिची समयसूचकताच जास्त लक्षात राहायची. त्यातलेच हे काही छोटे छोटे प्रसंग :
१. माझी बहीण लहानपणी अतिशय तडतडी होती. अजिबात एका जागी बसून व्यवस्थित जेवेल, खेळेल असं नाही. तिला खाऊ घालताना सगळ्यांच्या नाकी नऊ यायचे. तेव्हा आजी म्हणायची , "भूक नाही खरी अन गमजा करी" .तशीच दिवसभर सतत घरभर नाचत, खेळत राहायची आणि संध्याकाळ होत आली की तिची बॅटरी डाऊन व्हायची. मग ती भूक भूक करायची. दिवेलागणीच्या वेळी खात बसले की आमची आजी चिडायची आणि म्हणायची- "दिव्यात वात अन तोंडात हात!"
**
२. आमच्या आईची एक मामी होती. तिला सगळ्या नातेवाईकांच्या खबरा ठेवायचा फार सोस असे. जिथे तिथे ही पुढे पुढे करुन चौकशा करत असे. आम्हालाही तिच्या भोचकपणाची फार चीड यायची. ती दिसायला एकदम छोटीशी होती पण तिला सर्वांची बित्तंबातमी ठाऊक असे. आजी तिच्याबद्दल बोलताना म्हणे "केसभर गजरा अन गावभर नजरा!"
**
३.आमच्या आजीच्या भावाला दोन मुले होती. दोघे लहानपणी जितके गळ्यात गळे घालून फिरत तितकेच मतभेद मोठे झाल्यावर त्यांच्यात निर्माण झाले. नंतर ते दोघे एकमेकांचे तोंडही बघायला तयार नव्हते. त्यांच्यातील वितुष्टाला "दोघांमधून विस्तू जात नाही" असे म्हणत. आजीचा भाऊ घरी येऊन ही कहाणी सांगू लागला की आजीही गलबलून म्हणे -" काय करणार बाबा, दोन डोळे शेजारी अन भेट नाही संसारी!"
**
४. आजीची ही एक म्हण तर पदोपदी आठवते. जगात सर्वात आवश्यक असे काय असेल जगण्यासाठी? तर अन्न. आणि मनुष्य आयुष्यभर कशाला घाबरतो? तर मृत्यूला. हे सांगणारी एक खूप मोठी गोष्ट आजी सांगत असे जी आम्हाला अतिशय आवडत असे. ज्याचा सारांश सांगते तो असा, की एक तरुण मुलगा घर सोडून पळून जातो. त्याला वाटेत एक साधू भेटतो. साधू त्याला युक्तीच्या चार गोष्टी सांगतो. मग हा मुलगा अनेक संकटांमधून त्या युक्तीच्या गोष्टींच्या जोरावर सहीसलामत सुटतो. शेवटच्या क्षणी मात्र एका मोठ्या संकटात तो सापडतो. मरणोन्मुख होतो. त्याची अन्नान्न दशा होते. तो चांगल्या घरातला असल्याने त्याला लोकांनी टाकलेले शिळेपाके खाववत नाही. तेव्हा त्याला साधूने सांगितलेली (म्हणजेच आमच्या आजीची) शेवटची युक्तीची गोष्ट आठवते. "लक्षात ठेव बेटा, अन्नासारखा लाभ नाही आणि मरणासारखी हानी नाही!" आणि तो मिळेल ते अन्न खाऊन तग धरतो वगैरे वगैरे. या म्हणीचा आमच्या मनावर अजूनही इतका खोल परिणाम आहे की अन्नाचा अपमान कधी करु धजत नाही आणि कुणी केला तर सहनही होत नाही. Happy

**
या उपक्रमामुळे आमच्या आजीच्या म्हणी पुन्हा आठवल्या त्यासाठी संयोजकांना मनापासून धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users