जळक्या बोटांच्या मुलीच्या वहीची मायक्रो-गोष्ट

Submitted by मार्क.ट्वेन on 25 February, 2014 - 03:55

जळक्या बोटांची मुलगी धावतपळत बागेत येते.
आज आपल्याला उशीर तर झाला नाही ना, अशी शंका तिच्या मनात चुकचुकते आहे.
घाईघाईने ती इकडून तिकडे पळणारी मुलं, संथपणे एकेक पाऊल टाकत चाललेले आजीआजोबा, एकमेकांच्या हातात हात घालून रमतगमत फिरणारी जोडपी, या सगळ्यांमधून वाट काढत बागेच्या पश्चिम टोकाकडे येते.
तो अजून त्याच्या नेहमीच्या बाकावर बसला आहे. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडतो.
त्याचा डोळा चुकवून ती हळूहळू तिच्या नेहमीच्या बाकावर, त्याला सहज दिसणार नाही पण त्याच्यावर लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी जाऊन बसते.
मावळत चाललेल्या सूर्याकडे एकटक बघत तो बसलेला आहे.

अचानक तो उठून उभा राहतो. जळक्या बोटांची मुलगी सावध होते.
हातातल्या कागदाकडे तो एकवार, डोळे मिटत चाललेल्या जवळच्या नातेवाईकाकडे बघावं तसा पाहून घेतो आणि गवत, काटक्या गोळा करून छोटीशी चिता रचतो. जळक्या बोटांच्या मुलीची छाती धडधडू लागते.
गवत पेटवून देऊन तो आपल्या हातातला कागद त्या चितेवर ठेवतो आणि सर्रकन वळून, झपाझप निघून जातो. तो दृष्टीआड होईपर्यंत ती थांबते आणि आगीच्या दिशेने धाव घेते.

आगीत हात घालून तो कागद अलगदपणे बाहेर काढते. भाजून भाजून सालटी निघालेल्या, वण आलेल्या तिच्या बोटांना आणखी दोन चटके सरसरून बसतात.
ती हळूहळू फुंकरी मारून कागद विझवायचा प्रयत्न करते. पण कागद काळाठिक्कर पडला आहे.
ती कागदावरची अक्षरं वाचायचा प्रयत्न करते. आज बरीच अक्षरं वाचता येताहेत हे पाहून ती आनंदित होते. पण कागदावर जागोजागी भोकं पडली आहेत. काहीकाही भोकांच्या कडा अजूनही लालभडक आहेत. त्यांच्यातून धुराच्या बारीक रेषा निघत आहेत.

ती अगदी अलगदपणे तो कागद हातात धरून परत निघते. रस्त्यावरची गर्दी, धक्के, मधूनच भस्सकन येणारा वारा, या सगळ्यापासून प्राणपणाने त्या कागदाला जपत ती घराकडे जात आहे.

पण आजचा दिवस नेहमीसारखा नाही.
तिला कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं सारखं वाटत आहे.
ती एकदोनदा मागेही वळून बघते. पण गर्दीत तिला नेमकं कोणी दिसत नाही.

घरी येताच ती आपल्या खोलीत जाऊन तो कागद टेबलावर ठेवते आणि खणातून एक वही बाहेर काढते. मग ती तो काळाकुट्ट कागद मागेपुढे करून त्याच्यावर काळ्याच रंगात चमकणारी अक्षरं वाचते आणि एक-एक अक्षर लावत कागदावरची कविता वहीत उतरवून काढायचा प्रयत्न करते. जमेल तेवढी अक्षरं लावायचा ती प्रयत्न करते. काही अक्षरं ती उरलेल्या शब्दावरून ओळखते. काहीकाही ठिकाणी मात्र तिला ते जमत नाही. काही ठिकाणी तर अख्खा शब्दच गायब झाला आहे. त्या सर्व ठिकाणी ती तेवढी जागा रिकामी सोडून देते.

एका ओळीत 'दु:ख दे' असेल की 'दुवा दे' असेल याचा ती बराच वेळ विचार करते. मग मधलं अक्षर मोकळं सोडून देते.

संपूर्ण कविता लिहून झाल्यावर ती मागच्या पानांवरच्या कविता चाळत बसते. ती वही शेकडो कवितांनी भरून गेली आहे. पण बहुतेक कवितांमध्ये काही ना काही गायब आहे. तिची वही जायबंदी सैनिकांच्या एखाद्या इस्पितळासारखी झाली आहे. कुणाची दोन-तीनच अक्षरं तुटली आहेत, तर कुणाचे सात-आठ शब्द. काहीकाही कवितांच्या तर अख्ख्या ओळीच्याओळी तुटल्या आहेत.

अचानक तिला खिडकीतून कोणीतरी आपल्याकडे टक लावून बघतं आहे असं वाटतं. ती दचकून वही खाडकन मिटते आणि खिडकीजवळ जाऊन बघते. कोणी दिसत नाही, पण खिडकीच्या काचेवर कोणाचा तरी उमटलेला श्वास हळूहळू विरून जाताना तिला दिसतो.

वही खणात टाकून जळक्या बोटांची मुलगी दिवा मालवते. मग बिछान्यात जाऊन पडते आणि आजची कविता मनातल्या मनात म्हणत झोपून जाते.

*

*

*

खिडकीच्या तावदानातून आत घुसून सूर्य जळक्या बोटांच्या मुलीला आपल्या किरणांनी ढुशा देतो. ती उंउं करत कुशीवर वळते. मग तो तिच्या चेहर्‍यावर एक जोरदार झोत टाकून तिला उठवतो. ती बिछान्यात उठून डोळे चोळत बसते. मग अचानक तिला काहीतरी आठवतं. 'दुःख दे' असं म्हणत ती आपल्या टेबलाकडे जाते आणि खण उघडून वही बाहेर...

...जळक्या बोटांची मुलगी वेडीपिशी झाली आहे.

तिची वही गायब झाली आहे.

'इथेच खणात तर ठेवली होती वही'

वेड्यासारखी ती घरभर वही शोधत फिरते. घरातलं सगळं सामान-सुमान उलटं-पालटं करत फिरते. कपाटं रिकामी करून शोध-शोध शोधते. तिथे काही मिळणार नाही हे माहीत असूनही. तिला पक्कं आठवत होतं. काल रात्रीच तर वही टेबलाच्या खणात ठेवून ती झोपली होती. नेहमीसारखीच. नेहमी खणातच तर असते वही. पण मग वही गेली कुठे?
शेवटी चिरडीस येऊन ती अगदी टेबलं, कपाटं हलवून त्यांच्या मागे बघते. गाद्यागिद्या ओढून काढून खाली बघते. अगदी त्यांच्या अभ्र्यांच्या आतसुद्धा शोधते. पण वही कुठे सापडत नाही.
वैतागून, संतापून ती त्या सगळ्या पसार्‍यामध्ये बसून केस उपटत, स्वतःच्या नशीबाला बोल लावत रडत बसते.
मध्येच चिडून ती हातात येईल ती वस्तू आदळते, आपटते, इकडे-तिकडे फेकून देते.
ती खात नाही, पित नाही, घराबाहेर पडत नाही. अगदी घरातलं कुणीतरी माणूस गेल्यासारखी बसून राहते.
अख्खा दिवस सुतकात गेला आहे.
जळक्या बोटांची मुलगी दिवसभर मख्खपणे बसून राहिली आहे.
हळूहळू संध्याकाळ होते.
जळक्या बोटांच्या मुलीची चलबिचल होऊ लागली आहे.
मध्येच ती उठते, बाहेर जायचे कपडे करते. नंतर परत बसून राहते.
'काय करायचंय जाऊन?' ती फणकार्‍याने स्वतःशीच म्हणते.
जसजशी सूर्यास्त होण्याची वेळ येते तेव्हा मात्र तिची घालमेल होऊ लागते.
अचानक ती ताडकन उठते आणि घराबाहेर पडते. डोंगराआड बुडी मारायला धावणार्‍या सूर्याकडे बघत ती धावत बागेकडे येते.
पण आज फारच उशीर झालेला आहे. बागेत फारच तुरळक लोक उरले आहेत. जे आहेत ते हळूहळू रेंगाळत बागेच्या फाटकाच्या दिशेने निघाले आहेत. ती पळत त्याच्या बाकाजवळ येते आणि सावधपणे थोडी दूर उभी राहून पाहते. पण आज तिथे कुणीच नाही.
कदाचित तो आज उशिरा येईल म्हणून ती वाट बघत उभी राहते. मध्येच आपल्या वहीच्या आठवणीने तिचे डोळे ओले होत असतात.
पण तो काही येत नाही.
काळोख पडायला लागला आहे. बागेत आता तिच्याशिवाय कुणीही उरलेलं नाही.
ती उठून उभी राहते आणि परत जायला निघते. निघता निघता मात्र तिच्या मनात काहीतरी येतं आणि ती त्याच्या बाकाजवळ जाते.
बाकावर तिची वही ठेवली आहे.
ती टुणकन उडी मारून धावत जाते आणि वही उचलते. आजूबाजूला ती निरखून पाहते. पण कोणी दिसत नाही. धडधडत्या अंतःकरणाने ती वही उघडून पाहते.
वहीच्या पहिल्याच पानात एक पत्र घालून ठेवलेलं असतं.

'माझ्या कवितांनो,
तुम्ही माझा विश्वासघात केलात.
या निष्ठूर, अरसिक जगात तुमची जागा नव्हती आणि या जगाला तुमची किंमत नव्हती. या जगातल्या अरसिक, क्रूर, लाचार, ऐहिक सुखोपभोगांमागे धावत सुटलेल्या क्षुद्र जंतूंची माझ्या कविता कानी पडण्याचीदेखिल लायकी नव्हती. तुम्ही या जगापलिकडच्याही जगासाठी होता.
हे जाणून मी तुम्हाला मुक्ती दिली.
पण तुम्हाला जाळूनदेखिल तुम्ही कोडगेपणाने माझ्या मर्जीविरुद्ध जिवंत राहिलात.
तुम्ही आता माझ्या राहिला नाहीत. आणि मी तुमचा राहिलो नाही.
यापुढे माझ्या लेखणीतून कधीही कविता उमटणार नाही.
झाडांच्या पानापानातून सळसळणार्‍या, वार्‍याबरोबर झेपावणार्‍या, युगानुयुगे निश्चलपणे अबोल डोळ्यांनी या सृष्टीकडे पहात उभे असलेल्या पाषाणांमधल्या अमूर्त कवितेला कागदावर उतरवून मूर्त रूप देऊन मी तिची किंमत कमी करणार नाही.
हे पाप माझ्या हातून यापुढे होणे नाही.'

जळक्या बोटांची मुलगी शहारते. तिच्या हातून ते पत्र गळून पडतं. तिच्या अंगातली सगळी शक्तीच अचानक गळून जाते. ती मटकन बाकावर कोसळते.
बराच वेळ ती बसून असते.
किर्र काळोख पडला आहे.
रातकिडे किरकिरू लागले आहेत.
बागेतले दिवे लागले आहेत.
तिच्या हातातली वही ती उघडून पाहते. तिला आश्चर्याचा धक्का बसतो.
ती पहिलं पान उलटते, मग दुसरं, मग तिसरं.
तिच्या चेहर्‍यावर हलकंच हसू फुटतं.
तिच्या वहीतल्या सगळ्या कवितांमधल्या सगळ्या रिकाम्या जागा त्याने भरून काढल्या आहेत.
हर्षोल्हासाने ती वही छातीशी धरते. तेव्हा मातीत पडलेलं ते पत्र तिला पुन्हा दिसतं.
जळक्या बोटांची मुलगी एकदा आपल्या वहीकडे, एकदा त्या पत्राकडे आलटून पालटून बघत बाकावर दोन तुकड्यांत पडून राहिली आहे.

* * *

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवट नाही कळला

जळक्या बोटांची मुलगी एकदा आपल्या वहीकडे, एकदा त्या पत्राकडे आलटून पालटून बघत बाकावर दोन तुकड्यांत पडून राहिली आहे.>> म्हण्जे नेम के काय झाले?

सॉलिड!

प्रितिभुषण,
तिचे २ तुकडे झालेत. कविता पूर्ण झाल्या म्हणून आनंदी एक, अन पत्रात लिहिलेय की नव्या कविता लिहिणार नाही, म्हणून दु:खी झालेला एक.

मस्तच........

>>> याच नादात तिची बोटे जळाली असतील हे किती अलगद पणे जाणवतं, कुठेही लिहीले नाही तरी.>>>>>>>>>>>>>> +1

Pages