हे काय शहाणपण झालं?

Submitted by मयुरा on 24 February, 2014 - 05:14

आपल्याला कोणी सांगतं, अबरचबर खा म्हणून! कोणी सांगतं, मोबाईलवर सारखी बकबक करा म्हणून! व्यायाम करु नका म्हणून! फिरायला जायला कोणी मनाई केलेली आहे का? तरीही आपण स्वत:साठी बदलायला तयार नाही. आरोग्याचे बारा वाजलेले चालतील . हे काय शहाणपण झालं?

प्रसंग क्रमांक 1
साध्याशा दुखण्यासाठी दवाखान्याची पायरी चढलेल्या व्यक्तीला विविध तपासण्या करायला सांगितल्या. ते ऐकून त्याची डोकेदुखी अजूनच वाढली. त्याने सगळ्या चाचण्या करून घेतल्या. आपल्याला काहीही झालेलं नसताना सुद्धा या चाचण्या करायला सांगितल्याचं त्याचं म्हणणं होतं...
प्रसंग क्रमांक 2
जुनाट सर्दीवर खात्रीशीर उपाय केले जातील असं पत्रक वाचून एक व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर दवाखान्यात चौकशीसाठी गेली doctor यांनी माहिती घेतली. त्यांच्या फीचा अंदाज यावा म्हणून विचारलं तर त्यांची नुसती तपासण्याची फी ऐकूनच तिचा श्वास अजूनच गच्च झाला. नाक जरा जास्तच चोंदलं. माझ्या मुलीवर उपचार करायचे आहेत, तिला घेऊन येते असं सांगून तिने दवाखान्यातून काढता पाय घेतला.
प्रसंग क्रमांक 3
एका व्यक्तीला सततच्या उपचारांनी जेव्हा बरं वाटेना तेव्हा doctor यांन जरा वेगळीच शंका आली. अधिक चाचण्या करून घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. त्या व्यक्तीनेही त्यांना साथ दिली. चाचण्या वेळेत केल्याने शरीरातले काही घातक बदल वेळेआधीच लक्षात आल्याने अनारोग्याचा धोका टळला, याचंच त्याला समाधान होतं.

वैद्यकीय चाचण्या आवश्यक की अनावश्यक...तपासण्याची फी योग्य की अयोग्य...हा लेखाचा विषय नाही. मला लक्ष वेधायचंय ते तिसर्‍याच मुद्यावर. दोन माणसं एकत्र भेटली की एकदा तरी महागड्या वैद्यकीय उपचारांबद्दल बोटं मोडतात. दोन पेशंट एकत्र आले की doctor कसे लुबाडतात यावर त्यांचं एकमत होतं. मला सांगा, doctor काय करतात ते आपण नंतर पाहू. आपण नेमकं काय करतो हे जास्त महत्त्वाचं नाही का? doctorकडे जायची वेळ आपल्यावर आपण का आणतो? म्हणजे आपण वाट्टेल तसं वागायचं. आरोग्य राखणारे आहार-विहाराचे साधे नियम पाळायचे नाहीत. अगदी थोडासुद्धा व्यायाम करायचा नाही. वाट्टेल त्या ठिकाणी, वाट्टेल ते वाट्टेल तेवढं खायचं. शरीराचा जराही आदर करायचा नाही. त्याला पाहिजे तसं दामटायचं. वाकवायचं. फारसं महत्त्वाचं कारण नसताना रात्री उशिरा झोपायचं. सकाळी उशिरा उठायचं. आपणहून अनारोग्याला आमंत्रण द्यायचं. दवाखान्याची पायरी चढायची वेळ स्वत:वर आणायची याला काही अर्थ आहे का? गंभीर आजार, त्याची लक्षणं, त्यावरचे उपचार हा वेगळा आणि संवेदनशील भाग आहे. त्याच्या चाचण्या, त्यावरचे उपचार, त्यासाठी येणारा खर्च याविषयी कोणाचेच दुमत असणार नाही. पण सामान्यत: सर्वांनाचा सदासर्वकाळ गंभीर आजाराला सामोरे जावे लागत नाही अशांचं काय? त्यांच्या मोडतोड केलेल्या दिनचर्येचं काय?
संध्याकाळी शहराच्या कोणत्याही चौकात जा. खाद्यपदार्थांच्या सगळ्या गाड्या हाऊसफुल्ल असतात. खाऊगल्ली गर्दीने ओसंडून वाहत असते. लोक गरज नसताना खात असतात. पोटभरुंची गोेष्ट वेगळी आहे. पण इतरांचं काय? घरी चारवेळा पाण्याची भांडी निरखून पाहतात, ताट शंभरवेळा पुसून घेतात. फ्रीजवर थोडीशी धूळ साठलेली यांना चालत नाही. कामवाल्या बाईने भांड्याला साबण ठेवला की तिची तासडमपट्टी करण्यात यांचाच पुढाकार. पण हेच उंटावरचे शहाणे कळकट्ट हातगाड्यांवर मात्र रांगा लावून हादडतात. तिथे मिळणार्‍या तिखटजाळ पाणीपुरीचं, मिसळपावचं, समोश्याचं अजून कुठल्या कुठल्या अगम्य नावाच्या आणि चवीच्या डिशेसचं कौतुक करतात. तिथल्या अस्वच्छतेकडे कानाडोळा करतात. डोळ्यांना झापडं लावतात. खाऊन झालं की अर्ध्या फर्लांगावरसुद्धा गाडीनेच जातात.
व्यायाम करायला आपल्यापैकी कोणाकडेच वेळ नसतो. फार वाटतं व्यायाम करावा म्हणून, पण काय करणार, वेळच मिळत नाही हीच घिसीपिटी रेकॉर्ड चारवेळा वाजवून आपल्याच मनाचं समाधान करून घेणार्‍यांचीच संख्या प्रचंड आहे. पायी चालायचं म्हटलं की चेहर्‍यावर सगळ्या दुनियेचा वैताग गोळा होतो. सायकलसुद्धा नको असते. गल्लीच्या कोपर्‍यावरच्या दुकानात जायलासुद्धा गाडीच लागते. पायी पायी जा म्हटलं तर वेळेचं तुणतुणं वाजवलं जातं. जसे काही आपल्यापैकी सगळे चोवीस तास बिझी असायला, वेळेचा मिनीट न मिनीट महत्त्वाचा असायला, जिल्हाधिकारी किंवा फार कामाचेच आहेत. अहो, तेसुद्धा आरोग्यासाठी वेळ काढतात. व्यायाम करतात. बच्चनच्या कामगिरीला सलाम ठोकणारे बरेच जण तो रोज सकाळी 6 वाजता जिममध्ये हजर असतो हे सोयीने विसरतात. शर्ट काढलेल्या उघड्या अंगाच्या सलमानचा आदर्श ठेवणारे स्वत: मात्र बरगडी सिना असतात. अनेकांच्या पोटाचा घेर छातीच्या पुढे गेलेला असतो. उभे राहिले तर बाकीच्यांचं लक्ष वाढलेल्या पोटाकडे आधी जातं आणि मग चेहर्‍याकडे. पण तरीही व्यायाम नेहमी दुसर्‍यांनी करायचा असतो यावर बहुतेकांचं एकमत होतं.
लवकर निजे..लवकर उठे असं सांगायला काय जातं? लवकर झोपलं तर लवकर उठायला मिळेल. पण घरातला इडियट टीव्ही लवकर झोपू देईल तर ना! अनेकांची अख्खी संध्याकाळ डेली सोपला वाहिलेली असते. जेवणसुद्धा तिथेच. ही मालिका संपली की ती...आणि ती संपली की ही. जेवणानंतर शतपावली करायची असते हे doctor सांगून दमतात पण ती करतील तर शप्पथ. लवकर निजे...लवकर उठे..तया आरोग्यसंपत्ती मिळे...असं म्हणणार्‍यांना कधीच निकालात काढलंय आपण.
आता तर काय सर्वांच्या वेळापत्रकाचा फार मोठा हिस्सा मोबाईलने खाऊन टाकलाय. अनेकांचं तोंड कायम सुरूच असतं. दोनदा खाण्यासाठी आणि उर्वरित वेळ मोबाईलवर बोलण्यासाठी. हातातला मोबाईल शरीराने, मनाने दिलेली झोपेची रिंग ऐकू देईल तर ना! या मोबाईलमुळे काय झालंय माहिती आहे का? आवश्यक म्हणता म्हणता माणसं चोवीत तास सर्वांसाठी उपलब्ध झाली आहेत. कोणी केव्हाही कोणालाही अत्यंत किरकोळ कामासाठी किंवा बिनकामासाठीदेखील फोन करू शकतं. माणसंही फोन उचलत असतात आणि बोलत असतात. सदासर्वकाळ बहुतेकांचं हेच सुरू असतं.
यातलं काहीच पटत नाही म्हणता? एक करा. जरासं म्हणून पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडा. आजुबाजूला पाहा. तुम्हीही आमच्याशी सहमत व्हाल. अनेकदा आपणही त्या सगळ्यांपैकीच एक असतो हे मनातल्या मनात मान्य कराल.
खरंच गरजेचं असतं का हो हे आपल्यासाठी....सगळ्यांसाठी? गरजेची गोष्टच वेगळी. आवश्यक असेल तेव्हा खाल्लंच पाहिजे. मोबाईलवर बोललंच पाहिजे. कामं केलीच पाहिजेत. गाडी वापरलीच पाहिजे. पण वाढत्या बेशिस्तीचं काय? त्यापोटी आरोग्याचे बारा वाजताहेत त्याचं काय?
दोस्तांनो, सहज आणि सोपं, आरोग्याला पूरक दिनचर्या असणं फारसं अवघड नाही. ते कसं हे सांगणारे तज्ञ अनेक आहेत. त्यांची स्टाईल वेगवेगळी आहे; पण त्या सार्‍यांचं एका मुद्यावर नक्की एकमत आहे, ते म्हणजे थोडासा व्यायाम करायलाच हवा. अर्धा तास तरी चालायलाच हवं. दिवसातून चार वेळा खावं. पण अबरचबर चरणं टाळावं. नाही म्हणायला शिकावं. तज्ञांनाही समजतं लोक बिझी झाले आहेत ते. त्यामुळे त्यांनी या साध्याशा नियमांमध्ये देखील मोकळीक आणलीय. ते म्हणतात, अर्धा तास चालायला वेगळा वेळ काढायची गरज नाही. तुम्ही मोबाईलवर बोलत असतानादेखील उपलब्ध जागेत चकरा मारू शकता. फिरू शकता. दिवसातून दहा दहा मिनिटे चार-पाच वेळा चाला. घरचं खाणं बरोबर कॅरी करा. भूक लागेल तेव्हा खा. लिफ्ट असेल तिथे तिचा वापर टाळा. जिने चढून जा आणि उतरा. ध्यान करायला वेगळा वेळ काढणं श्नय नसेल तर नसू द्या. सकाळी उठल्यावर अंथरुणावरच पंधरा मिनिटे डोळे बंद करुन शांत बसा. मनाला आणि शरीराला आराम द्या. टीव्ही बंद करायची वेळ ठरवा आणि ती कसोशीने पाळा. घरी गेल्यावर तरी मोबाईलकडे दुर्लक्ष करायला शिका. गरज असेल तेव्हाच फोन उचला. एसएमएसवर काम भागवता आलं तर पाहा. पॉसिबल असेल तेव्हा वेळेत झोपा. वेळेत उठा. घराच्या गच्चीवर जाऊन सूर्योदय पाहण्याचा प्रयत्न करा. बेशिस्तीवर दुसर्‍यांनी उपाय सांगायची वेळ का आणतो आपण? या सवयी आपणच आपल्याला लावल्या. त्या आपणच बदलू शकतो. शेवटी ज्याची लढाई त्यानेच लढायची असते हेच खरं. सवयी एकदम बदलणार नाहीत हे एकदम बरोबर. पण सुरुवात करा तर खरं. मोबाईलवर बोलणं पाच मिनिटांनी कमी करता आलं तर पाहा. आठवड्यातून एखादा दिवस तरी अबरचबर खाणं टाळता आलं तर पाहा. पाच मिनिटे शांत बसायचा प्रयत्न करा. दिवसातून एकदा तरी दहा मिनिटे चाला.
हे पाळणं फार अवघड आहे का? याला फार पैसे द्यावे लागणार आहेत का? पण तरी आपल्याला पॉसिबल नाही असं का? एक लक्षात घ्या, शेवटी हे आपल्याच हिताचं आहे. झाला तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. कळतं पण वळत नाही हे खरं असलं तरी दवाखान्याची पायरी चढायला लागण्याआधी, शरीराने फटके देण्याआधी शहाणं व्हायला काय हरकत आहे?
बघा, हे तुमच्या-माझ्याच हातात आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> doctorकडे जायची वेळ आपल्यावर आपण का आणतो? <<<< अगदी बरोब्बर. अनुमोदन.
सगळा लेख सवडीने लक्ष देऊन वाचीन.
मात्र माझ स्पष्ट मत आहे व ते मी घरात नक्कीच मांडतो की उण्यापुर्‍या पाचपन्चवीस वर्‍षात शहरि जीवन इतके बशे झाले आहे की बाथरुममधली पाण्याची बादली देखिल उचलायची गरज पडत नाही, अ दिवसभरात जो काही शरिराला व्यायाम होतो तो म्हणजे चहाचा कप उचलुन तोन्डापर्यन्त नेणे.... हो फक्त चहाचा कपच कारण हल्ली टमरेला ऐवजी देखिल वहात्या पाण्याच्या नळ्या आल्यात. Wink
शरिराला काहीच हालचाल नसेल, अन आहार मात्र "उपलब्ध आहे व ऐपत आहे" म्हणून एखाद्या बॉडीबिल्डर च्या आहारालाही लाजवेल इतका होत असेल तर शरिराची वाट नै लागणार नै त काय होणार?
असो.
छान विषय,
[तरी हल्ली माबोवरील वातावरण बघता हे असे विषय शम्भरी गाठतील की नाही याची शन्का वाटते कारण यात कुठेच वंचितांची वगैरे दु:खे मांडली नाहीत, भद्रजनांची टर काढली नाही इत्यादी इत्यादी. ]

कॉलेजमध्ये असताना मी अधूनमधून घरातील अनेक कामे करत असे. इस्त्री, केर काढणे, कपडे धुणे ही कामे त्यात समाविष्ट असत. काल बरेच वर्षांनी मी दोन तीन कपडे चांगले पिळून धुतले तर मनगटे अशी भरून आली की जणू तासभर व्यायाम केलेला असावा. मस्त वाटले. नंतर मनात विचार आला की घरी घरकाम करणार्‍या ज्या बायका असतात त्या जर दररोज अनेक घरांमध्ये केर, फरशी, धुणी व भांडी करत असतील (म्हणजे करतातच) तर त्यांचे आरोग्य नक्कीच उत्तम राहणार! शिवाय त्या एका सोसायटीतून दुसर्‍या, वगैरे असे चालतातही भरपूर!

एक प्रकारे अशी सर्व कामे करून त्या स्वतःचा संभाव्य वैद्यकीय खर्च सेव्ह करतात आणि आपण अश्या वर्गात मोडतो की जो वैद्यकीय खर्चासाठी बरीच बचत करण्याचे मनसुबे रचणे व प्रत्यक्षात आणणे ह्यात गुंतलेलो असतो.

हे तरी काय शहाणपण?

ओ तै,
कशाला गरीबाच्या पोटावर पाय आणताहात? आँ? Sad
सम्जा, लोकांनी तुमचं आईकलं, अन शाने झाले. मं? आम्ही काय कराचं?? 45.gif

फार उत्तम लेख ! आम्ही डॉक्टर मंडळी पेशंटाच्या कानी कपाळी ओरडत असतो तेच आपण फार चांगल्या प्रकारे अधोरेखित केले आहे. हार्दिक अभिनंदन !
थोडेसे अवांतर :
पण जर सर्व जणांनी हा सल्ला पाळायचे ठरवले तर आमचे काय होईल ? पुन्हा फी वाढवावी लागेल ! Happy
( हे थोडेसे विनोदाने बर का ! )

>>>> पण जर सर्व जणांनी हा सल्ला पाळायचे ठरवले तर आमचे काय होईल ? <<<<<
कुंडलीशास्त्राप्रमाणे मनुष्याचे पूर्वसुकृतानुसार ज्या व्याधीविकारांचे भोग त्याला भोगणे भाग असते, ते व्याधीविकार/घातअपघात, व्यक्तिने वरील सर्व बाबी अंमलात आणल्या वा नाही आणल्या तरी उपस्थित होतातच. अन या व्याधिविकारांपासून आराम मिळवायला वैद्य/डॉक्टरची गरज लागतेच लागते. उलटपक्षी मी तर असे म्हणेन की असे व्याधीविकारांना तोंड देता यावे म्हणूनही तब्येत खणखणीत राखणे जरुरीचे असतेच.

एक लक्षात घ्या, की "वैद्य" ही संकल्पना समुद्रमंथनातून १४ रत्नांपैकी एक अशी उत्पन्न झालेली आहे असे हिंदू धर्म मानतो, अर्थात, वैद्य या संकल्पनेला मानवी जीवनात इतके महत्वाचे स्थान पूर्वापार देण्यात आलेले आहे. त्यामुळे निदान "हिंदुस्थानात तरी" अन्न/वस्त्र/निवारा या व्यतिरिक्त वैद्यकीला अंत नाही/अप्रतिष्ठाही नाही.

माणसास हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपतच "खरे" मित्र असू शकतात, व त्या मित्रांमधे एकतरी वैद्य/(डॉक्टर) असावा.

मयुरा...खुप छान्...पण बर्याचदा कळतय पण वळत नाही अशी अवस्था असते...माझ्य घरात 10 पैकी 3 च लोक हेल्थ concious aahet..बाकी मस्त आळशी गोळे...

पण जर सर्व जणांनी हा सल्ला पाळायचे ठरवले तर आमचे काय होईल ?>>> अहो ऐकत नाही न कोणी ,काळजी नको...सगळ्या क्षेत्रात मंदि येईल पण तुमच्या नाही..