स्वप्न गुलाबी पडण्यासाठी

Submitted by निशिकांत on 19 February, 2014 - 11:01

जीव तोडुनी राबराबलो जगण्यासाठी
थकून निजलो स्वप्न गुलाबी पडण्यासाठी

शक्य नसे ते करण्यामध्ये झींग आगळी
मृगजळ पुढती, मागे पळतो भिजण्यासाठी

आनंदी क्षण बघता बघता विरून जाती
दु:ख नेहमी कवेत असते धरण्यासाठी

माफक आशा मनात रुजली, शिक्षणातुनी
ज्ञानसाधना हवी नोकरी मिळण्यासाठी

अंधाराला आमंत्रण का उजेड देई?
काय चांगले जगात उरले बघण्यासाठी?

पदर ढाळला का तो ढळला? या शंकेने
अतूर झाले सभ्य मुखवटे गळण्यासाठी

लहान मास्यांनाही ठावे भविष्य त्यांचे
टपून बसले मोठे मासे गिळण्यासाठी

कसे कायदे करती नेते स्वार्थापोटी !
पळवाटांचा सुकाळ, पाणी मुरण्यासाठी

"आम आदमी" अभिमन्यूचा शिष्य असावा
चक्रव्युहाला भेदलेस तू, सरण्यासाठी

"निशिकांता" का हातमिळवणी काळोखाशी?
करतो आहे पूर्व तयारी विझण्यासाठी

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झिंग! झींग नव्हे!

गझलेतील अनेक शेर आवडले.

जीव तोडुनी राबराबलो जगण्यासाठी
थकून निजलो स्वप्न गुलाबी पडण्यासाठी

शक्य नसे ते करण्यामध्ये झिंग आगळी
मृगजळ पुढती, मागे पळतो भिजण्यासाठी

अंधाराला आमंत्रण का उजेड देई?
काय चांगले जगात उरले बघण्यासाठी?

पदर ढाळला का तो ढळला? या शंकेने
आतुर झाले सभ्य मुखवटे गळण्यासाठी

लहान माश्यांनाही ठावे भविष्य त्यांचे - किरकोळ टायपो, दुर्लक्ष करावेत.
टपून बसले मोठे मासे गिळण्यासाठी

आभार बेफिजी आणि वैवकु प्रतिसादासाठी. भूषणजी, शुध्दलेखनाच्या चुका दुरुस्त करत आहे. क्षमस्व.