भोपाळ शताब्दीचा रौप्यमहोत्सव

Submitted by पराग१२२६३ on 19 February, 2014 - 10:58

भोपाळ शताब्दी – रेल्वेप्रेमींची लाडकी

भारतीय रेल्वे हा माझा सर्वांत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे आजच्या खास दिवशी माझे अनुभव सर्वांसमोर मांडायचा हा एक प्रयत्न.
आज (१९ फेब्रुवारी). भारतातील पहिली शताब्दी एक्सप्रेस मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळपर्यंत धावू लागली त्या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हापासून आजपर्यंत ही दक्षिण आशियातील सर्वांत वेगवान रेल्वेगाडी ठरली आहे. रोज नवी दिल्ली आणि आग्रा या दरम्यान ती ताशी १५० किलोमीटर वेगाने धावत आहे. इतकेच नाही तर दररोज सर्वांत लांब अंतर कापणारी ही शताब्दी आहे. तिच्या अशाच काही अन्य वैशिष्ट्यांमुळे भोपाळ शताब्दी आम्हा सर्व रेल्वेप्रेमींची लाडकी रेल्वेगाडी बनली आहे.
भोपाळ शताब्दी दररोज नवी दिल्ली आणि भोपाळ यांदरम्यान धावते. १२ जुलै १९८८ रोजी सुरू झालेली ही रेल्वेगाडी १८ फेब्रुवारी १९८९पर्यंत नवी दिल्ली आणि झाशीदरम्यान धावत होती. पुढील काळात शताब्दी एक्सप्रेस ही नवी संकल्पना इतकी लोकप्रिय होत गेली की, आज देशभरात विविध मार्गांवर २३ शताब्दी एक्सप्रेस धावत आहेत.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी ही नवी संकल्पना मांडली होती. त्या काळात भारतात शहरीकरणाने वेग घेतला होता. त्यामुळे व्यावसायिकांना आसपासच्या शहरांमध्ये वेगाने, आरामदायकरित्या जाता यावे आणि रात्रीपर्यंत पुन्हा आपल्या शहरात परतता यावे या हेतूने ही संकल्पना मांडण्यात आली होती. त्यावेळी असेही ठरले की, या रेल्वेगाडीत फक्त वातानुकुलित आसनव्यवस्थाच असेल. त्यानुसार पहिल्या शताब्दी एक्सप्रेसच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली, तेव्हा ताशी १४० किलोमीटर वेगाने धावू शकतील असे डबे आणि इंजिने तयार करण्यास सुरुवात झाली. खास या गाडीसाठी अत्याधुनिक डब्ल्यूएपी-३ हे विद्युत इंजिन तयार करून त्याला जवाहर असे नाव दिले गेले होते.
या शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करण्याची माझीही खूप इच्छा होती. ती मागील वर्षी जानेवारीत दिल्लीहून परतत असताना पूर्ण झाली. त्यावेळी या गाडीची जाणूनबुजून निवड केली होती. नवी दिल्लीपासून भोपाळच्या दिशेने मी माझ्या मित्रासह शताब्दीचा पहिलावहिला प्रवास सकाळी ठीक सव्वा सहा वाजता सुरू केला. सहा वाजेपर्यंत आम्ही आमच्या जागेवर (सी-५, ४८/४९) बसलो, तेव्हा आमच्यासमोर वृत्तपत्र तयार होतेच. दुसरीकडे डब्यातील पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमद्वारे प्रवाशांना सूचना करण्यात येत होत्या. गाडी सुटताच प्रत्येकाला पाण्याची बाटली मिळाली. त्याचवेळी नवी दिल्लीपासून हजरत निजामुद्दीनपर्यंत शेजारील मार्गावरून लखनौकडे निघालेली शताब्दी एक्सप्रेस आम्हाला समांतर धावत साथ देत होती. दोन्हीही शताब्दी एक्सप्रेसच. त्यातच दोघींचेही सारथ्य भारतीय रेल्वेवरील सर्वांत वेगवान डब्ल्यूएपी-५ या अत्याधुनिक विद्युत ‘अश्वां’कडे. त्यामुळे दोघांमध्ये जणू स्पर्धाच सुरू होती. नंतर मात्र आमच्या शताब्दीने वेग धरण्यास सुरुवात केली आणि तिकडे प्रवाशांच्या चहापानाची तयारीही सुरू झाली होती. प्रत्येकाला चहा-कॉफीचे कीट आणि चहा-कॉफी तयार करण्यासाठी गरम पाण्याचा थर्मासही दिला गेला. दरम्यान पलवल स्थानकाजवळ पोहचेपर्यंत आमच्या शताब्दीने ताशी १५० किलोमीटरचा वेग धरला होता. एवढ्या वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाडीतील, जर्मन तंत्रज्ञानाने तयार केलेल्या डब्यांमधून हा माझा पहिलाच प्रवास होता आणि एवढ्या वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाडीतील सीटवर बसून चहा करून पिण्याचाही पहिलाच आणि आगळावेगळा अनुभव होता. इतकेच नाही तर आमची शताब्दी १५० किलोमीटर वेगाने धावत असताना होडल स्थानकाच्या जवळ शेजारील डाऊन मार्गावरून मुंबईहून नवी दिल्लीकडे निघालेली राजधानी एक्सप्रेस ताशी १३० किलोमीटरच्या वेगाने निघून गेली. केवढा रोमांचक अनुभव होता तो. चहापान आटपेपर्यंत मथुरा जं. हा या गाडीचा पहिला थांबा जवळ आला होता. तेथे मिनिटाभराच्या थांब्यात काही प्रवाशांची चढ-उतार झाल्यावर गाडी आग्र्य़ाच्या दिशेने निघाली. पुन्हा ताशी १५० किलोमीटरचा वेग. आग्र्याला पोहचेपर्यंत आमचा भरपेट नाश्ताही झाला. ठीक ८.१५ वाजता आग्रा कँटला आगमन झाल्यावर बरेचसे प्रवासी - ज्यात ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती – येथे उतरले. पाच मिनिटांच्या थांब्यानंतर शताब्दी पुढच्या प्रवासाला निघाली.
आता मात्र गंगेच्या सपाट मैदानातून शताब्दी चंबळच्या खोऱ्यात प्रवेश केला होता. ही गंगेचे मैदान आणि दख्खनचे पठार यांची सीमा. म्हणूनच आतापर्यंत साधारणतः सरळ असलेला लोहमार्ग वळणावळणाचा झाला होता. परिणामी गाडीचा वेगही येथून पुढे ताशी १२० ते १३० दरम्यान राहणार होता. थोड्याच वेळात चंबळ नदीही ओलांडून गाडी मध्य प्रदेशात आली आणि लगेचच मुरैना येथे थांबली. त्यानंतर ऐतिहासिक ग्वाल्हेर नगरीत थांबा घेऊन गाडीने दख्खनच्या पठारावर आली होती. ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध किल्ल्याची झलकही यावेळी रेल्वेगाडीत बसूनच पाहता आली. आता १०.५० वाजले होते आणि शताब्दी आणखी एका ऐतिहासिक नगरीत, झाशीत आली होती. येथे गाडीतील प्रवासी बऱ्यापैकी उतरले. येथे भोपाळ शताब्दीचा सर्वांत मोठा आठ मिनिटांचा थांबा आहे. चालक आणि गार्ड बदलल्यावर शताब्दीने भोपाळच्या दिशेने कूच केले. त्यानंतर जेवणाआधीचे सूप आणि ब्रेड स्टीक दिले गेले. साधारणतः दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुपारचे जेवण आले. जेवणही विविध पदार्थांनी युक्त. जेवण झाल्यावर काही वेळाने भोपाळ जवळ आले होते. दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी भोपाळ शताब्दी आपल्या मुक्कामी पोहोचली आणि आम्ही रोमांचित होऊनच बाहेर पडलो.
परतीच्या प्रवासात ही शताब्दी भोपाळहून दुपारी पावणेतीन वाजता निघून रात्री पावणेअकरा वाजता नवी दिल्लीला पोहोचते. त्यावेळी प्रवाशांना झाशीच्या आधी नाश्ता, त्यानंतर ग्वाल्हेरच्या जवळ सूप आणि ब्रेड स्टीक दिल्या जातात. आग्र्याहून रात्री ८.३५ वाजता निघाल्यावर प्रवाशांना रात्रीचे जेवण पुरविले जाते.
गेल्या २५ वर्षांमध्ये या शताब्दीमध्ये काही बदल झाले आहेत आणि भविष्यात काही बदल येऊ घातले आहेत. अलीकडील काळात शताब्दी एक्सप्रेस ही संकल्पना अतिशय लोकप्रिय झाली आहे. म्हणूनच सुरुवातीला नऊ डबे असलेली ही गाडीही आता १५ डब्यांची झाली आहे. जर्मन बनावटीच्या या डब्यांमध्ये आता प्रत्येक प्रवाशाच्या आसनासमोर स्वतंत्र एलसीडी टी.व्ही. स्क्रिन बसविला जाणार आहे. त्यावर प्रवाशाला आपल्या आवडीचे टीव्ही चॅनेल पाहता येईल. प्रवाशांना वाय-फाय इंटरनेट सुविधाही पुरविण्यात येणार असून त्याच्याही चाचण्या पार पडल्या आहेत. प्रवासादरम्यान शॉपिंग करण्याची संकल्पनाही या गाडीत राबविण्याचा विचार असून त्याद्वारे प्रवाशांना परफ्यूम्स, घड्याळे, हँडबॅग्स अशा विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करता येतील. ही सर्वांत जास्त अंतर कापणारी शताब्दी एक्सप्रेस आहे. त्यामुळे तिचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आणि भोपाळमध्ये इंजिन बदलण्यासाठी आणि अन्य बाबींसाठी पुरेसा वेळ उपलब्ध व्हावा या हेतूने तिचा वेग ताशी २०० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडे या गाडीचे थांबेही प्रायोगिक तत्त्वावर वाढविण्यात आले आहेत.भो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा..आवडत्या विषयावरचा उत्तम लेख. Happy
गेल्या वर्षभरात भोपाळ शताब्दी एक्सप्रेसची सेवा प्रचंड सुधारली आहे. गाडीत उत्तम शास्त्रीय संगीत ऐकायला मिळतं. नव्या डब्यांचा एक मस्त व्हिडिओ यूट्यूबवर आहे.
हल्ली क्वचित गाझियाबाद शेडच्या वॅप-५ऐवजी वॅप-७ लावलं जातं.

मस्त वर्णन.

रेल्वे आपलाही एकदम आवडीचा विषय. एक रेल फॅन क्लब काढायला हवा येथे. वॅप-७ हे भारतीय रेल्वेवरचे सर्वात शक्तिशाली पॅसेंजर इंजिन आहे ना?

एसी ट्रॅक्शन कन्व्हर्जन सुरू झाल्याने होपफुली पुणे-मुंबई लाईनवरही ही इंजिने लौकरच दिसतील.

माझ्या माहितीप्रमाणे वॅप-५ हे वॅप-७पेक्षा अधिक गतीनं धावतं.
हल्ली पुणे-निझामुद्दीन दुरोंतोला अधूनमधून वॅप-७ असतं.

अजूनही त्या प्रवासाच्या आठवणी येतात. कोकण रेलेवेचा प्रवास पावसाळ्यात दिवसा करावा.. ( रूळ खचलेले नसतील त्यावेळी Happy ) अप्रतिम नजारे दिसतात. त्या रेल्वेतील खानपान सेवाही खास असते.
कोकम कढी, मसाला दूध, मेथी कबाब..!

एवढ्या प्रचंड प्रमाणात आरक्षण व्यवस्था हाताळणारी यंत्रणा पण खासच आहे.

रडावयास आले!!! मी अकोला बडनेरा असा प्रवास दर आठवड्याला करायचो कारण अमरावतीला शिकायला होतो बीई करण्यासाठी. मग पुण्यात नोकरी लागल्यानंतर विदर्भ वासियांसाठी रेल्वे नव्हतीच. खाजगी गाड्यातून प्रवास नकोसा वाटे. आता मात्र रेल्वेगाडी निघाली आहे. मुंबईमधे नोकरीला असताना कुर्ल्याहून हावरा घ्यायचो. खच्चून भरलेली गाडी. कधीच स्वच्छ नसायची. दाटून ऐन वेळी प्रवास करायचो.
पण विदर्भ एक्सप्रेस सर्वात छान होती. ती अकोल्याहून निघायची आणि मी दादरला उतरायचो. फक्त वर्‍हाडी लोक दिसायची. शेगावला दर्शनाला येणारी मुंबईची लोक भेटायची. इगतपुरीचा चहा, इडली सार अजून आठ्वते.

मस्त लेख. मी एकदा जाणारच ह्या गाडीने. मला लखनौ भोपाळ हिंडायचे आहे. उमराव जान टेरिटरी,
बिर्यानी कबाब्ज शेर्स अँड नवाब्ज. इंजिनांची नावे इथे वाचूनच कळली. मी दक्षिण मध्य रेलवेला रंग पुरवायचे काम करत असे. ते निळे हिरवे पिवळे पट्टे, पोस्ट ऑफिस रेड तो खास ब्राउन कलर इत्यादी.
तेव्हा रेल मुख्यालयात फार चकरा होत.

लिफ्ट मध्ये एक महिला भेट॑ली. तिला तुमचे डिपार्ट मेंट कुठले असे विचारल्यावर तिने आर अँड डी सांगितले मग माझा अगदी कोचरेकर मास्तर झाला. ( अरे वा महिला प्रगती करत आहेत्. रेल्वेत आर अँड डी स्त्रिया करतात इत्यादि, उरात अभिमान दाटला. ) पण मग ते रीसीट्स अँड डिस्पॅच आहे हे कळले. पायाखालची फिशप्लेटच खिसकल्यावाणी फील आले. आय लव्ह भारतीय रेल. एक जहिरात कँपेन वर पण काम केले आहे तेव्हा ते स्टॅट्स आनी लॉजिस्टिक्स वाचून चक्कर आल्ती.

गुंटी, हुबळी विजयनगरम, मिरज हाय काय स्थानके होती. - आहेत. Happy