...तो एकटाच होता, त्या रस्त्यावर! भरदूपारचं डांबर वितळवणाऱ्या उन्हात आणखी कुणी बाहेर असण्याची शक्यताही कमीच.
चढावर सायकल जड जाऊ लागली तसा तो पायउतार झाला, आता एका हाताने सायकलचं एक हँडल धरून मागे कॅरियरला लावलेला पत्रांचा गठ्ठा त्याने एकसारखा केला, उन्हाने रापलेल्या चेहऱ्यावरची घामाची धार निपटून काढली, सायकल रेटत चाल सुरूच होती, त्याच्या चपलांची करकर वगळता सारं निश्चल. मधूनच एखादी टिटवी वातावरणाची शांतता भेदत शांत होत होती. ओठांवरची कोरड जीभ फिरवूनही शमेना..
रस्त्याच्या उजव्या हाताला ठण्ण कोरडी पाणपोई, रांजणाला गुंडाळलेला लाल कपडा निस्तेज खाली गळून पडलेला, पाणपोईच्या त्या पत्र्याखाली दोन-चार पाखरं पाण्याचा थेंब शोधत गलका करणारी...
आज खरेतर फक्त एका पत्रासाठी तो ह्या गावाकडे निघाला होता, म्हातारीमाय प्राण डोळ्यांत आणून नातवाच्या पत्राची वाट पहायची आज पत्र आलं होतं, सोबत मनिऑर्डर होती, रणरण उन्हात तानाजी पत्र पोहोचवण्याचं कर्तव्य निभावत होता...
चढ संपला तशी त्याने सायकलवर पुन्हा टांग टाकली... एखादी झुळूक उन्हाची लाही जाणवून देत होती. मध्येच एकदा उतरून त्याने कळकट झालेला रूमाल काढून कानशिलांवर बांधला..
डांबरी रस्ता सोडून त्याची सायकल पायवाटेला लागली तो वाटेवरच्या मातीचा धुरळा उठला, डोळ्यांची उघड-झाप करत सायकल वेगाने निघाली..
एखादी बैलगाडी आली की ह्याने पायउतार होऊन कडेला उभे राहावे, बैलगाडीने धुरळा करत जावे, ह्याने डोळे मिटावेत.. पुन्हा सवार होऊन सायकल मारावी...
ती म्हातारी ह्याची कोण होती? पण गावात हा गेला की वेशीजवळाची झोपडी म्हातारीचीच.. ह्याने हाळी ठोकली की तिने लडखडत येऊन नातवांच पत्र आलं का चौकशी करावी.. ह्याने नाही म्हटलं तरी त्याला पाणी पाजावं, गुळाचा खडा द्यावा... किती मरमर करत येतोस रे बाबा पत्र वाटायला म्हणावं, परगावी गेलेली नाती तानाजीमुळे कशी टिकून राहिलीत ते कौतुकानं सगळ्यां गावकऱ्यांना सांगावं, ती माया तानाजीला धरून ठेवत होती...
"माजा नातू नाही राहत बग माज्यापाशी, म्या इतकं राबून त्येला शिकवीलं, मायबाप गेले त्येचे देवाकडं, पन मी टिकले, नैतर त्येला मोटं कुनी केलं असतं तान्या? माजी शेती होती मोप, दोन माडीचं घर बी हुतं, ईकलं ना मी तान्या, त्येला परदेशात धाडलं......पन आता सय येइना रे त्येला माजी, एक सुदीक पत्र टाकीना"
म्हातारीमाय तानाजीची वाट पाही, रोज निराशेने काहीबाही बोली, तानाजी पत्र वाटायला उठला की त्याला म्हणे.. "जरा झाडाखाली ते थांबावं तान्या इतकं उनाचं फिरशील तर मरशील उनानं, हे असलं उन लई वाइट, जप रं बाबा लेकरं बाळंवाला गडी ना तू"
आज तानाजी म्हातारीपेक्षा एक टक्का जास्तच खूष होता.. पत्र आणि मनिऑर्डर पाहून नातवाला अक्कल आलीये म्हणात धडपडीने निघाला होता...
वेस दिसायला लागली तसा त्याला अजूनच हुरूप आला... सायकल दुपटीनं निघाली.. तहानेनं कोरड पडल्या घशालाही म्हातारी पाणी पाजेल म्हणून इर्षेने निघाला.....
झोपडीजवळची गर्दी पाहून काहीसा भांबावला, नको ते विचार मनाशी आले, अशी अचानक गर्दी कशी, म्हातारीला बरं आहे ना, एका क्षणात अनेक विचार, हाताशी पत्र, मनिऑर्डर घट्ट धरत झोपडीजवळ गेला...
तिरडी पाहताच कळवळला..!!
"आरं तान्या, केवडा उशीर केलास बाबा.. तुला बघायचं म्हनून म्हातारीनं आतापर्यंत प्रान धरून ठेवला होता की रं, तूच होतास पोरा तिला, दे, दे चल खांदा"
चुरगाळलेलं पत्र खिशात कोंबताना, पडवीत ठेवलेला पाण्याचा पेला अन गुळाचा खडा त्याला दिसला.
...हुंदका आवरत त्यानं खांदा पुढे केला
-बागेश्री
(No subject)
वाचताना शेवट असाच असेल अशी
वाचताना शेवट असाच असेल अशी कल्पना आलेली पण तो असा नसेल म्हणुन उगाचच मनाला समजावित
होते
प्रेडिक्टेबल तरीही टचिंग !
प्रेडिक्टेबल तरीही टचिंग !
वा! खूप कमी शब्दात खूप भेदक
वा! खूप कमी शब्दात खूप भेदक लिहिलयस.
मला शेवटाचा अंदाज पॉझिटिव्ह वाटत होता. की म्हातारी वाट पाहतेय तर नातवाच्या नावाने पोस्टमननेच मनिऑर्डर पाठवली असेल. ... शेवट फार चटका लावून गेला.
छान लिहिलय! पण शिर्षक तानाजी
छान लिहिलय!
पण शिर्षक तानाजी हे पटले नाही. मूळ कथावस्तू म्हातारी, तिचा कोणतरी नातू, व यान्चेमधिल होऊ शकणारा दुवा म्हणजे तानाजी. त्यामुळे नेमके कशाला उठाव द्यायचा आहे / दिला गेला आहे, त्यापेक्षा शीर्षक वेगळे भासते.
दक्षे, इन केस जर मी तसा शेवट
दक्षे,
इन केस जर मी तसा शेवट केला असता ना, तर तू म्हणाली असतीस.. "किती ते गोड गिट्ट बागे"
जोक्स अपार्ट, तू म्हणतेस तसा छान शेवट मला सुचलाच नाही खरंतर.
मला तर वाटलेले की आज शिवजयंती
मला तर वाटलेले की आज शिवजयंती आहे (इं.तारखेवरुन की तिथीप्रमाणे खरी/खोटी हा गोंधळ नको) म्हणुन तानाजीबद्दल काही लिहलय किंवा तानाजीच्या कथेप्रमाणे काही आधुनिक तानाजी आहे
>>>> मला शेवटाचा अंदाज
>>>> मला शेवटाचा अंदाज पॉझिटिव्ह वाटत होता. की म्हातारी वाट पाहतेय तर नातवाच्या नावाने पोस्टमननेच मनिऑर्डर पाठवली असेल. <<<<<
दक्षे, अगदी अगदी, कथेच्या"तानाजी" यानावावरुन, व सुरवातीचा बराचसा भाग त्याची जीवनशैली वर्णन करण्यात गेल्यामुळे तू म्हणतेस तशीच "शन्का" मलाही आली होती, पण कथेत तसेदाख विले नाहीये, अन म्हणूनच कथेचे शीर्षक मला नन्तर खटकले. असो.
पोस्टमन इन द माउंटेन या कथेची
पोस्टमन इन द माउंटेन या कथेची आठवण झाली वाचताना
बागे व्हॉट आय इमॅजिन्ड इज नॉट
बागे व्हॉट आय इमॅजिन्ड इज नॉट गोड गिट्ट, इट्स काईंड..
जाई.... "...पोस्टमन इन द
जाई....
"...पोस्टमन इन द माउंटेन...."
छान आठवण काढलीस या कथेची. तानाजीसारखाच पण आता निवृत्त झालेला एक पोस्टमन. त्याच्या जागी मुलाला पोस्टमनची नोकरी लागली आहे. मुलाला खेडेगावातील घरे दाखवून पत्रांचा योग्य बटवडा कसा करायचा हे शिकविण्यासाठी बाप त्याच्यासोबत, गुडघे दुखत असतानाही, जवळपास ५०-६० किलोमीटरचा डोंगराळ प्रवास करतो. फार सुरेख झाले आहे त्याचे चित्रण.....विशेष म्हणजे टपाल वाटत असताना गावकर्यांकडून बापाला मिळणारे प्रेम पाहिल्यावर त्याला उमजते की आपल्यापेक्षा गावातील लोकांनीच बापाला योग्यरितीने ओळखले आहे.
त्या नातवाच्या..... जिने
त्या नातवाच्या.....:राग: जिने त्याला लहानाचा मोठा केला, तिला पहायला/ भेटायलाही याला वेळ नसावा? आणी मनीऑर्डर पाठवतोय, भुक्कड! (सॉरी बागेश्री अशा प्रतीसादाबद्दल, गोष्ट खोटी आहे, पण अशा घटना प्रत्यक्षात घडतात, म्हणून सन्ताप येतो)
मलाही आधी तानाजी मालुसरेबद्दल आहे का असे वाटले होते.
आधी लिहायचे राहिले. अप्रतीम
आधी लिहायचे राहिले. अप्रतीम लेखनशैली आहे तुझी, दैवी वरदान! प्रसन्ग डोळ्यासमोर उभा रहावा, एवढा जिवन्त केला आहेस तू. असेच लिहीत रहा, मनाला भिडते.
मलाही आधी तानाजी मालुसरेबद्दल
मलाही आधी तानाजी मालुसरेबद्दल आहे का असे वाटले होते >> रश्मी सेम पिंच, म्हणून मी वाचणं चक्क टाळलं होतं. नंतर म्हणलं निदान नजर तरी मारू.
बागे, शिर्षक जरा वेगळं हवं होतं असं माझं ही मत.
...मला शेवटाचा अंदाज
...मला शेवटाचा अंदाज पॉझिटिव्ह वाटत होता. की म्हातारी वाट पाहतेय तर नातवाच्या नावाने पोस्टमननेच मनिऑर्डर पाठवली असेल. ... शेवट फार चटका लावून गेला... मलाही तसंच वाटलं.
मलाही आधी तानाजी मालुसरेबद्दल आहे का असे वाटले होते.
अपनी गलीमें मुझको न कर दफ्न
अपनी गलीमें मुझको न कर दफ्न बादे-कत्ल
मेरे पतेसे खल्कको क्युं तेरा घर मिले
तुझसे तो कुछ कलाम नही लेकिन ऐं नदीम
मेरा सलाम कहियो अगर नामाबर मिले
- गालिब
(पहिला शेर जाईसाठी, दुसरा रश्मीसाठी)
हृदयस्पर्शी कथा. तानाजी आणि
हृदयस्पर्शी कथा.
तानाजी आणि म्हातारी यांच्यातलं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचं होतं हे छान रेखाटलंय.
जो आहे तोच शेवट योग्य वाटला.
फक्त, म्हातारी मेली हे थोडं अप्रत्यक्षरीत्या सूचित केलं असतं तर शेवट अधिक प्रभावी झाला असता.
आवडलं !
आवडलं !
प्रसन्ग डोळ्यासमोर उभा रहावा,
प्रसन्ग डोळ्यासमोर उभा रहावा, एवढा जिवन्त केला आहेस तू. + १००
आभारी आहे
आभारी आहे
अरे देवा
अरे देवा
सुरेख लिहीलय. कथा उतारानं
सुरेख लिहीलय.
कथा उतारानं चाललेल्या सायकलसारखी सहज आणि समर्पक चालली. शेवटाला उतार पटकन तिव्र झाला आणि डेड एन्ड. हाही शैलीचा भाग असू शकतो आणि तो उत्तम आहे.
काही ठिकाणी शेवटी एका अनपेक्षीत / गूढ वळणानंतर ती थांबवतात. त्यातही मजा येते.
शुभेच्छा!!!
हबा thanks! एक प्रेडिक्टेबल
हबा thanks!
एक प्रेडिक्टेबल कथा लिहून पहायची होती, शेवट लक्षात यावा आणि तो तसाच असावा, म्हणून असा केलाय. तो किती यशस्वी ते ठाऊक नाही.
|| दंडवत ||
|| दंडवत ||
मस्तच
मस्तच