'बाईची जात' म्हणजे काय ग आई?
'बाई' म्हणजे सरस्वती असणं
लग्नाच्या बाजारातलं रंगरुपाच्या भावातलं विकणं
'बाई' म्हणजे काली असणं
स्वत:च्याच घरात सातच्या आत असणं
'बाई' म्हणजे लक्ष्मी असणं
सासरच्यांसाठी फक्त धनाची पेटी असणं
'बाई' म्हणजे सगळ्यांचा विचार करत बसणं
स्वार्थ नावाच्या पापापासून पूर्णपणे मुक्त असणं
'बाई' म्हणजे होम मिनिस्टर असणं
दाराबाहेरच्या पाटीवर नावसुध्दा नसणं
'बाई' म्हणजे नुसतं शरीर असणं
मनाचं मात्र असून कोणालाही न दिसणं
'बाई' म्हणजे आई, मुलगी, बायको, बहिण असणं
नात्यापलीकडच्या नरांना नुसती मादी दिसणं
'बाई' म्हणजे युगायुगांचं कोडं असणं
अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या बुभुक्षितांची भारत'माता' असणं
--------
गणेशोत्सवाचे दिवस होते ते. साधारण ३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी आणि भाऊ संध्याकाळी आजूबाजूच्या गणपतींच्या दर्शनाला निघालो होतो. मला वाटतं दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन त्या दिवशी होतं. रस्त्यात लावलेल्या फटाक्यांमुळे मध्येमध्ये थांबावं लागत होतं. असेच एके ठिकाणी थांबलो होतो तेव्हा अचानक माझा भाऊ म्हणाला 'अग ती बाई बघ. तुझाच अवतार आहे. कानांत बोटं घालून बसलेय.'
मी पाहिलं आणि एकदम म्हणाले 'अरेच्चा! ही बाई अजून इथेच आहे? ३ तासांपूर्वी मी इथून गेले तेव्हाही इथेच होती अरे ती.'
'इथे रहात असेल ती' भाऊ म्हणाला.
'मला नाही वाटत. कोणाची तरी वाट पहात असल्यासारखी वाटत होती.'
'३ तास कोणी वाट बघतं का? तू पण ना. चल थांबले फटाके' असं म्हणत त्याने मला पुढे हाकत नेलं.
मी तिथनं गेले तरी ती बाई माझ्या डोक्यातून जाईना. डोक्यावरून पदर घेतलेली, ठळक कुंकू लावलेली, जराशी झगमगीत साडी नेसलेली म्हणजे बहुधा उत्तरेकडची असावी (मुंबईच्या भाषेत सांगायचं तर 'भय्यीण'!). दुपारी तिला पाहिलं तेव्हाही मला हेच जाणवलं होतं की ती तिथे रहात नव्हती. तिच्या नजरेत एक नवखेपणा होता. ही जागा तिला अपरिचित होती. दुपारपास्नं कशाला थांबलेली असेल तिथे? कोणाची वाट पहात असेल? घर सोडून निघून आली असेल का भांडून? पण जवळ तर काहीच सामान दिसत नव्हतं, अगदी छोटी पिशवीसुध्दा. आणि तशी आली असेल तरी ३ तास एकाच ठिकाणी कशाला थांबेल?
आणि मग अचानक एक विचार असा आला की एकदम चरकलेच. तिला नवर्याने इथे आणून सोडून तर नसेल दिलं? ह्या अनोळखी शहरात रात्री ती एकटी बाई कुठे जाणार? पोलिसांकडे गेली तरी ते मदत करतीलच कश्यावरून? तिला काही करणार तर नाहीत? त्या भीतीनेच तर ती पोलीसांकडे गेली नाही का? आपण तिला विचारायला हवं होतं. पण तसं विचारून मी काय करणार होते? अनोळखी बाईला घरी कसं आणायचं? त्यातून काय त्रांगडं झालं तर? आणि दुसर्या दिवशी तिचं काय करायचं? एक ना दोन मनाला नुसता भुंगा लागला. नेहमीप्रमाणेच कृती शून्य. त्यामुळे स्वत:चाच राग यायला लागला.
सकाळी ऑफिसला जायचा रस्ता तिथूनच. ती बाई तिथे असू देत म्हणून प्रार्थना करावी का नसू देत म्हणून हेच कळेना. पण एक ठरवलं होतं की ती तिथे दिसली तर तिच्याशी बोलायचं आणि तिला घेऊन तडक पोलीस स्टेशन गाठायचं. पण त्या वळणाशी आले आणि तिथे ती नव्हती. अरे देवा! काय समजायचं मी? सुखरूप घरी गेली म्हणायचं का अजून काही?
अजूनही दर गणेशोत्सवाला त्या वळणावरून जाताना मला ती बाई आठवते. आणि तिचं काय झालं असेल अशी हुरहूर लागते. ज्या गोष्टींबद्दल आपल्याला काही करता येणं शक्य नसतं अश्या गोष्टी आपल्यालाच का दिसतात?
--------------
'ओट्स बिस्किट्स, पेप्पी, केलॉग्ज...' हातातली यादी बघत बघत मी वस्तू कार्टमध्ये टाकत होते. सहकार भांडारात विकेंड असूनही गर्दी नव्हती. नाहीतर पिकनिकला आल्यासारखे लोक सहकुटुंब सहपरिवार येतात. मुलं सैरावैरा धावत असतात. त्यांच्या आया बिस्किटांच्या isle मध्ये दिग्मूढ होऊन उभ्या असतात. त्यांचे नवरे 'गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा' असा निर्मम भाव घेऊन फिरत असतात. आणि कार्ट पुढे सरकवायला मला अक्षरश: भगीरथ प्रयत्न करावे लागतात. आज सुदैवाने लोण्यातून सुरी फिरवावी तश्या सहजतेने कार्ट घेऊन जाता येत होतं.
मजल दरमजल करत साबणांच्या सेक्शनपर्यंत आले तेव्हा माझ्या चेहेर्यावर लढाई जवळपास जिंकल्याचे भाव होते. शोधून शोधून दोन साबण मी कार्टमध्ये टाकले आणि एकदम थबकले. ह्या isle मध्येही फारशी गर्दी नव्हती - मी आणखी एक काष्टी पातळ नेसलेल्या आजी एव्हढ्या दोघीच. सहकार भांडारातल्या प्रत्येक isle मध्ये हमखास दिसणाऱ्या मदतनीस मुलीही नव्हत्या. मी थबकायचं कारण म्हणजे त्या आजीने अचानक नेलपेंटच्या isle मधली एक बाटली काढून शांतपणे हाताच्या बोटांना नेलपेंट लावायला सुरुवात केली.
मला काय करावं तेच कळेना. काही बोलावं तर आजी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या. पण त्या करत होत्या ते चुकीचं होतं. त्यांना ती बाटली विकत घ्यायची नव्हती हे उघड होतं. ते वापरून त्या ती ठेवून देणार होत्या आणि तीच बाटली पुढे कोणीतरी विकत घेणार होतं. इथे ह्यापुढे कधीही नेलपेंट विकत घ्यायचं नाही हा निश्चय करून मी कार्ट घेऊन पुढल्या isle मध्ये गेले तर तिथे एक मदतनीस मुलगी racks वर सामान रचून ठेवत होती. तिला मी हळूच त्या आजीबद्दल सांगितलं. तिने बहुतेक असला प्रकार आधी पाहिलेला असावा. कारण ती शांतपणे उठली, त्या isle मध्ये गेली आणि त्यांना हळू आवाजात म्हणाली 'आजी, ठेवा बरं ती बाटली परत.' मी त्यांना तिथून बाहेर पडताना पाहिलं. बहुतेक सून आणि मुलासोबत आल्या होत्या.
साला मनाचं पण असं आहे ना की एखादी गोष्ट घडून गेली, झाली म्हणून त्यावर पडदा टाकत नाही. त्यावर काथ्याकूट करत बसतं. बरं हेही माहीत असतं की विचार करून दुसरा निष्कर्ष काढला तरी जे होऊन गेलंय ते बदलता येणार नाही. पण 'मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर'. त्यातून माझ्या मनाचं ढोर जरा जास्तच वढाय आहे. चेकआऊट लेनमध्ये उभी राहिले तरी त्या आजीचा विचार काही मनातून जाईना. त्या तरुण असतील तेव्हा नेलपेंट वगैरे भानगड नसेल. असलीच तरी ती चैनीची बाब असेल, परवडणारी नसेल. परवडत असली तरी 'आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं' ह्या पारंपारिक शिकवणीनुसार अनेक घरांतून होतो तसा "कोंढाण्याची अनेक लग्नं झाली तरी बिचारा रायबा बिनलग्नाचाच" असाही प्रकार झाला असेल. आणि मग एकदा एक ठराविक वय उलटून गेल्यावर लोक काय म्हणतील म्हणून मनात असून, परवडत असूनही वापरता आलं नसेल. बाईचं आयुष्य आपलं स्वत:चं असलं तरी त्याबद्दलचे निर्णय अनेकदा दुसऱ्यांचेच असतात - मग ते प्रत्यक्ष असोत वा अप्रत्यक्ष. आणि म्हणूनच आज ती छोटीशी इच्छा अश्या रीतीने पूर्ण करून घेण्याचा मोह त्यांना कदाचित आवरला नसेल.
असं असेल का? असं असेल तर मी केलं ते चूक? का बरोबर? पण असं नसेल तर आजीच्या घराच्या लोकांना ह्याची कल्पना द्यायला हवी होती का? परत त्यांनी कुठे तसं केलं तर तमाशा होऊ शकतो. मग मी केलं ते चूक? का बरोबर? आणि नेहमी मी काही का केलंच पाहिजे? Why couldn't I just walk away from it all?
प्रत्येक नव्या वस्तूसोबत User Guide देतात तसं जन्माला येताना एखादं गाईड का नाही मिळत आपल्याला? पावलोपावली असं चाचपडायचा अगदी कंटाळा आलाय आता.
--------------
'कितनेके दू?' कोपर्यावरच्या फुलवालीने तोंडभरून हसत माझं स्वागत केलं. तिच्यासमोर एक वयस्कर बाई उभी होती आणि तिच्यासाठी ती पिशवीत फुलं भरून देत होती. आज माझी नेहमीची फुलवाली दिसत नव्हती म्हणून मी हिच्याकडे आले होते.
'दस रुपयेकेही चाहिये, मिक्स देना.' असं म्हणून मी पर्समधून १० ची नोट काढली.
'अच्छा' असं म्हणत तिने त्या बाईच्या हातात तिची पिशवी दिली. आणि माझी फुलं भरायला सुरुवात केली. त्या बाईने पर्समधून वीस रुपयांची नोट काढली आणि तिच्यासमोर धरली. पण ही बयो आपली माझी फुलं भरण्यात दंग.
'ये लो, मुझे और जगह भी जाना है. देर हो रही है' ती बाई म्हणायला लागली तरी ही ढिम्मच. माझी पिशवी माझ्या हातात देऊन दहाची नोट घेऊन ती कपाळाला लावल्यावरच मग तिने तिची नोट घेतली.
घरी आल्यावर मी आईला म्हटलं 'ती कोपर्यावरची फुलवाली पण एक सर्किट आहे.'
'का? काय केलं?'
मग मी सगळी हकीकत सांगून म्हटलं 'ती बाई माझ्या आधी आली होती तरी माझी दहाची नोट तिने आधी घेतली. आहे की नाही सर्किट?'
'ती नोट तुझ्याकडून घेतल्यावर तिने कपाळाला लावली का?'
'हो, लावली खरी. का?'
'मग तू बोहनी केलीस तिची.'
'असेल ना. पण त्याचा माझी नोट आधी घेण्याचा काय संबंध?'
आई आधी काहीच बोलली नाही. मग म्हणाली 'सगळा मूर्खपणा आहे. ती दुसरी बाई आली होती तिच्या कपाळाला कुंकू नसेल ना?'
आता आई कोड्यात बोलत होती. खरं सांगू का? असल्या गोष्टी मी कधीच नोटीस करत नाही. पण त्या फुलवालीने तिची नोट घेतली नाही तेव्हा ही बाई आता जाम वैतागणार म्हणून सहानुभूतीने मी तिच्याकडे पाहिलं होतं तेव्हा तिने कुंकू लावलेलं नाही हे नोटीस केलं होतं. गळ्यात एक बारीकशी सोन्याची चेन होती. कशाला ह्या बाया असल्या चेन्स घालून साखळीचोरांना आमंत्रण देतात असंही माझ्या मनात येऊन गेलं होतं.
'मी बर्याचदा ह्या भाजीवाल्या बायकांना पण पाहिलंय असं करताना. एखादी बाई विधवा असेल तर तिच्याकडून बोहनी करत नाहीत त्या.' आई रागाने म्हणाली.
मला नक्की काय वाटलं ते शब्दांत मांडता येणारच नाही. कदाचित स्त्री असल्याचा अभिमान जिला आहे अश्या कुठल्याच स्त्रीला ते जमणार नाही. एक क्षणभर आश्चर्य वाटलं. आजकाल लग्न झालेल्या बायकाही कुन्कू/टिकली लावत नाहीत आणि मंगळसूत्र घालत नाहीत. पण ह्या दोन्ही गोष्टी नाहीत म्हणून ती बाई विधवा असेल असा निष्कर्ष काढायचा?
आश्चर्य एक क्षणभरच टिकलं. नंतर प्रचंड राग आला, अगदी मनाच्या तळापासून राग आला. एक काय ती टीचभर टिकली आणि मंगळसूत्राचे चार काळे मणी नाहीत म्हणून ती बाई अपशकुनी झाली? का? ते पण दुसर्या एका बाईच्याच लेखी? ह्यात आपण स्वत:लाच कमीपणा आणतोय असं त्या फुलवालीला एकदासुद्धा वाटलं नाही? का नाही वाटलं?
ही असली विचारसरणी फक्त अशिक्षित बायकांत असेल असा गोड गैरसमज मी अजिबात करून घेणार नाही. माझी स्वत:ची आजी आजोबा गेल्यानंतर कुंकू लावणार नाही असं म्हणत होती. सगळ्यांनी दातांच्या कण्या केल्यावर शेवटी टिकली लावायला तयार झाली. पण अजूनही ती काळी टिकलीच लावते. खुपते ती टिकली माझ्या डोळ्यांत. दरवेळी तिला पाहते तेव्हा खुपते. पण माझं जे आत तुटतं ते तिच्यापर्यंत कधी पोचलंच नाही.
'माझं अस्तित्त्व, माझं संपूर्ण अस्तित्त्व फक्त माझं स्वत:चं आहे. मै थी, मै हू, मै रहूंगी' हे आम्हाला कळायला अजून किती युगं जावी लागणार आहेत कोण जाणे.
--------------
'अरे यार, ये बिझनेस सुट पहननेका क्या फंडा है? I feel funny wearing it.' मी परत एकदा स्वप्नाला म्हटलं. बिझनेस स्कूलमधल्या माझ्या खास मैत्रीणीचं नावही स्वप्नाच.
'इंटरव्ह्यूजके लिये तो पहननाही पडेगा ना? तो फिर इयरबुक के लिये पहननेमे क्या तकलीफ है? उतनी practice हो जायेगी' हिला आम्ही सगळे गमतीने मिस्टर स्पॉक म्हणायचो. ही फक्त लॉजिकल विचारच करू शकते.
एव्हढ्यात बाहेर खडाजंगी ऐकू आली. आमची मापं घ्यायला एक टेलर आला होता. बाकी सर्वांची घेऊन झाली होती. आता माझ्या रूममेटची, शिवानीची मापं घ्यायचं काम चाललं होतं. दुसरी रूममेट अर्पिता तिच्यासोबत होती. मी आणि स्वप्ना घाईघाईने बाहेर गेलो. अर्पिता टेलरला झापत होती. 'ये बोलना आपका काम नही है. आप सिर्फ सुट सिलानेका काम किजीये. कपडा मॅडम सिलेक्ट करेंगी. आप कल आईये' टेलर 'सॉरी, सॉरी' करायला लागला आणि मग सगळं आवरून बाहेर गेला.
'हुआ क्या?' अर्पिता सहसा कधी चिडत नाही म्हणून मी विचारलं.
'अरे, अजीब ढक्कन टेलर है. इसने जो कपडा सिलेक्ट किया था बोलता है मॅडमको सुट नही करेगा. फिटिंगमे प्रॉब्लेम होगा. इसको क्या करना है?'
'जाने दे यार. बोल दिया ना उसको. शिवानी, तुझे जो चाहिये वोही कपडा सिलेक्ट करना' मी म्हटलं.
'वोही कपडा सिलेक्ट करूंगी मै. जिंदगीमे बहोत कॉम्प्रोमाईज किया है, अब और नही.' शिवानी एकदम म्हणाली आणि आत निघून गेली.
'आं, ये क्या हुआ?' अर्पिता चमकून म्हणाली. आणि मग आम्ही सगळ्या गप्पच झालो. प्रत्येकजण आपल्या विचारात. प्रत्येकीला काय काय आठवत होतं काय माहित.
माझ्या आईवडिलांनी नेहमीच मला माझे निर्णय स्वत: घेण्याचं स्वातंत्र्य दिलंय. पण आई कधीकधी चिडली की म्हणते 'बाईच्या जातीला एव्हढा आडमुठेपणा बरा नाही. चालली पाहिजे एव्हढी ऐट पुढे.' खरं तर आयुष्यात तडजोड करावी लागली नाही असा माणूस विरळा. पण 'बाईची जात' म्हटली की बर्याचदा एव्हढ्या तडजोडी कराव्या लागतात की पुढेपुढे आपण तडजोड करतोय ह्याची जाणीवही होत नाही.
शिवानीला त्या दिवशी कदाचित हेच जाणवलं असेल का?
--------------
'हुशारच होती साळवी. कशी पटापट गणितं सोडवायची. हेवा वाटायचा मला तिचा' आईने असं म्हटल्यावर मी हसायला लागले 'झालं तुझं साळवी पुराण सुरु'.
ही साळवी म्हणजे आईची शाळेतली खास मैत्रिण. आई तिच्या शाळेबद्दल बोलायला लागली की तिचा विषय निघायचाच. आईला अजूनही तिचं इतकं कौतुक आहे. 'घरी अभ्यासाला फारसा वेळ मिळायचा नाही तिला. वर्गात जेव्हढ ऐकायची त्यावर परीक्षा द्यायची आणि नेहमी पहिला नंबर.' हे वाक्य मी आजवर हजारो वेळा ऐकलं असेल.
'अक्षर पण सुरेख होतं तिचं. आणि परत एव्हढं असून काडीचा गर्व नाही. नाहीतर एकेक मुली होत्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणार्या'. आई नेहमी हे वाक्य म्हणताना मानेला झटका देते आणि मला मोठी मजा वाटते. एकतर शाळेत जाणारी आई हे दृश्यच imagine करता येत नाही. वर आई आणि ही तिची खास मैत्रिण काय बरं बोलत असतील - 'मनोज कुमार कसला मस्त दिसतो ना' - असे विचार येऊन अजून हसू येतं.
'घरी का वेळ मिळायचा नाही तिला?' एकदा मी विचारलंच.
'धाकटया दोन भावंडांचं सगळं करायला लागायचं.'
'का? आई नव्हती तिला?' मी शाळेत असताना आईसाहेब वेताळाला लाजवतील अश्या चिकाटीने आमच्या मानगुटीला बसायच्या.
'होती की. नेहमी आजारी असायची. ही दहावीला आणि आई खाटेवर'
'खाटेवर? म्हणजे?' हा शब्दप्रयोग नवा होता.
'अग म्हणजे बाळंतीण'
'चल, काहीतरीच. दोन भावंड होती तिला असं तूच म्हणालीस ना?'
'त्याने काय होतंय? आमच्या घरी यायची कधी कधी अभ्यासाला. एव्हढं करून शेवटी काय तर लग्नच करून दिलंन आईवडिलांनी. तिला पुढे शिकायचं होतं.'
'मग तू पुढे contact नाही ठेवलास तिच्याशी?' ह्या साळवीबाईंनी आमच्या आईसाहेबांच्या शाळेतल्या काही करामती सांगितल्या असत्या असं वाटून गेलं.
"अग, बाबांची बदली झाली तिथून नंतर. एकदाच भेटली होती. 'काय करतेस सध्या' असं विचारलं तेव्हा म्हणाली 'काय करणार? मोडलेली भाकरी जोडतेय'"
मला नवर्याच्या गैरसमजामुळे एमबीएचा कोर्स अर्धवट टाकून जायला लागलेली माझी मैत्रिण आठवली. कॅम्पसवर एकदाच भेटायला आली होती तेव्हा 'माय मॅरेज इज रॉकींग' असं उपहासाने म्हणाली होती. पुढे शिकायची इच्छा आणि हुशारी असतानाही मोडलेली भाकरी जोडण्यात जन्म घालवायला लागलेल्या अश्या किती साळवी असतील?
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते असं म्हणतात. ह्यातला 'मागे' हा शब्द फार सूचक आहे असं म्हणूनच मला वाटतं.
--------------
मागच्या महिन्यात एका मैत्रिणीशी बोलताना तिने हताशपणे 'पुढचा जन्म बाईचा नको' असं म्हटलं तेव्हा मी तिचं कसं चूक आहे हे जीव तोडून तिला सांगितलं. कारण पुढचा जन्म असेलच तर तो बाईचाच मिळावा असं अजून तरी मला वाटतं. पण आताशा हे सगळं बघून खूप राग येतो, निराश वाटतं. आपण कितीही प्रयत्न केले तरी हे सगळं नाहीच बदलता येणार असं वाटतं.
स्वर्गीय अभिनेत्री मीनाकुमारीचा एक शेर पुन्हा पुन्हा आठवत राहतो.
पूछते हो तो सुनो कैसे बसर होती है
रात खैरात की सतके की सहर होती है
-----
वि.सू. १ - कोणाच्याही कसल्याही भावना दुखावायचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास क्षमस्व
वि.सू. २ - ह्याआधीच्या पन्न्यांची लिंक माझ्या विपूत आहे
खूप छान !!!
खूप छान !!!
टीव्ही सिरीयल वरच्या धाग्यावर
टीव्ही सिरीयल वरच्या धाग्यावर तुमचे मार्मिक खुसखुशीत प्रतिसाद वाचायला नेहमीच मजा येते पण आज हे इतकं छान संवेदनशील लिहिलेलं वाचायला मिळालं! खूप छान लिहिलं आहे..मनापासून लिहिलं आहे त्यामुळे भिडलं!
आणि कित्येकींना केवळ मुलगी म्हणून अनेक तडजोडी करत जगावं लागतं हे जरी खरं असल तरीही मुलगी म्हणून उपजत असणारी एक special संवेदनशीलता ही cherish करण्याची आणि अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं! त्यामुळे I feel lucky/privileged to be borne as woman!
तुमचे ह्या सिरीज मधले बाकीचे लेख नक्की वाचून काढणार!
>>>>मी बर्याचदा ह्या
>>>>मी बर्याचदा ह्या भाजीवाल्या बायकांना पण पाहिलंय असं करताना. एखादी बाई विधवा असेल तर तिच्याकडून बोहनी करत नाहीत त्या.' आई रागाने म्हणाली.<<
हे असं पण असतं.. हे माहीतीच न्हवतं( ह्या भाजीवाल्या, गजरेवाल्या बायांची सोच).. हाय रे देवा... बाईच बाईला जाचते हेच खरं का?
>>आजकाल लग्न झालेल्या बायकाही कुन्कू/टिकली लावत नाहीत आणि मंगळसूत्र घालत नाहीत. पण ह्या दोन्ही गोष्टी नाहीत म्हणून ती बाई विधवा असेल असा निष्कर्ष काढायचा? <<
हायला, खरच. मी सुद्धा कधी रोजच्या रोज लावत नाही(किंबुहुना सवयच नाही.. व काही वाटत सुद्धा नाही). पण असे अर्थ काढत असतील का काही बायका ह्यावरून आठवले,
मी एकदा गावी गेलेले तेव्हा तिथल्या देवळातल्या बायका बर्याच वेळ आधीच माझं निरीक्षण करत होत्या व मग जेव्हा मला प्रसाद द्यायची व कुंकू लावायची वेळ आली तेव्हा जरासं थबकून मग काहितरी हायसं केल्यासारखे करून मगच मला कुंकू लावलं. ( देवळात गेलेले आईच्या सांगण्यावरूनच, व तिच्याच सांगण्याने साडी नेसलेली व छोटीशी टिकली लावली. व छोटसं मंगळसूत्र घातलेलं जे पटकन दिसत न्हवतं).
>>> सगळ्यांनी दातांच्या कण्या केल्यावर शेवटी टिकली लावायला तयार झाली. पण अजूनही ती काळी टिकलीच लावते. खुपते ती टिकली माझ्या डोळ्यांत. दरवेळी तिला पाहते तेव्हा खुपते. पण माझं जे आत तुटतं ते तिच्यापर्यंत कधी पोचलंच नाही. <<
प्रॉबलेम हा आहे ना, आजूबाजूच्या बायकाच(हो अगदी, शिकलेल्या, सवरलेल्या सुद्धा) नकोसे करतील जर एका विधवेने लाल टिकली आणि चमकदार साडी नेसलीच तर... की काय बया मिरवतेय अजून नवरा नाहिये तरी.. वगैरेने कमेंट्स.
(No subject)
ओह, बरेच दिवसांनी तुझे असे
ओह, बरेच दिवसांनी तुझे असे लिखाण वाचायला मिळाले .....
अतिशय आवडले ..... तुझी लेखन-स्टाईल
भारीच आहे .... पु ले शु ....
!!!!!!!! बराच वेळ हा लेख
!!!!!!!!
बराच वेळ हा लेख डोक्यात घुमत रहाणारेय आता :-|
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते असं म्हणतात. ह्यातला 'मागे' हा शब्द फार सूचक आहे असं म्हणूनच मला वाटतं. >>> अप्रतिम लिहीलं आहेस, स्वप्ना. आणि हे वाक्य हायलाईट आहे अक्षरशः.. केवळ सुंदर.
सुन्न !
सुन्न !
______/\______ स्वप्ना..स्वप्
______/\______
स्वप्ना..स्वप्ना...स्वप्ना... जियो!!!!!!!!!!!!
तुफान आवडले हे ही पन्ने...
अजून फ्रीक्वेंटली लिही ना...
मस्त स्वप्ना..
मस्त स्वप्ना..
जियो स्वप्ना. अतिशय आवडलं.
जियो स्वप्ना. अतिशय आवडलं.
अगदी आतवर पोहोचलं.
अगदी आतवर पोहोचलं.
अप्रतिम ...........
अप्रतिम ...........
(No subject)
सर्वांचे खूप आभार! जवळजवळ दीड
सर्वांचे खूप आभार! जवळजवळ दीड वर्षाने हा पन्ना टाकला. त्यामुळे मनातलं नीट उतरवता आलंय की नाही ही धाकधूक होती. तुमचे अभिप्राय वाचून जीव भांड्यात पडला.
वर्षू नील, एक अगदी खरं सांगू का? आजकाल मायबोलीवर लिहायला नको वाटतं. इथे इतक्या उखाळ्यापाखाळ्या काढतात लोक एकमेकांच्या की कशाला काही लिहा आणि विपरित कॉमेन्टस ओढवून घ्या असं वाटतं.
>>प्रॉबलेम हा आहे ना, आजूबाजूच्या बायकाच(हो अगदी, शिकलेल्या, सवरलेल्या सुद्धा) नकोसे करतील जर एका विधवेने लाल टिकली आणि चमकदार साडी नेसलीच तर... की काय बया मिरवतेय अजून नवरा नाहिये तरी.. वगैरेने कमेंट्स.
अगदी अगदी. बाईच बाईची सर्वात मोठी शत्रू आहे.
भारी
भारी लिहीलंय.
भाजीवाल्यांबद्दल ही बोहनीची पद्धत पहिल्यांदाच कळली.
भाजीवाल्यांबद्दल ही बोहनीची
भाजीवाल्यांबद्दल ही बोहनीची पद्धत पहिल्यांदाच कळली.>> मला पण!
स्वपना, एकदम खल्लास लिहिलंस! हे लिखाण दिवसभर डोक्याला त्रास देणार अता.
>>>वर्षू नील, एक अगदी खरं
>>>वर्षू नील, एक अगदी खरं सांगू का? आजकाल मायबोलीवर लिहायला नको वाटतं. इथे इतक्या उखाळ्यापाखाळ्या काढतात लोक एकमेकांच्या की कशाला काही लिहा आणि विपरित कॉमेन्टस ओढवून घ्या असं वाटतं. <<<
माझी आज्जी नेहमी म्हणायची " निर्लज्जम् सदा सुखी" मी ह्या वाक्याचा माझ्या आयुष्यात बराच वापर करते, अन् त्याचा मला फायदाही होतो. कुणी काहीही म्हणुद्यात, पण आलपे विचार चा॑गले असतिल तर ते सगळ्या॑पर्यत पोहचवायला हवेत. मग उखाळ्यापाखाळ्या काधणा-या॑कडे अपवाद म्हणुन बघायचे:)
स्वप्ना.... इज बॅक विथ अ
स्वप्ना.... इज बॅक विथ अ बँग!! जियो!! खल्लास लिहीतेस... काही काही वाक्यांना आपसूक निसटतं हसू सांडतं... पटलेल्याचं द्योतक!! "मागे" मधील सूचकता नव्यानेच उलगडली....
ज्या गोष्टींबद्दल आपल्याला काही करता येणं शक्य नसतं अश्या गोष्टी आपल्यालाच का दिसतात? >> खुपदाच होतं असं... हे आणि असे प्रसंग वरचे वर अनुभवायला ही मिळतात, पण संगू, ते तू लिहीलेस की जास्त प्रकर्षाने रिलेट होतात... पन्ने लिहीत राहा... चांगली मस्त जाडजूड डायरी होऊदे पन्ने पन्ने जोडून...
असंच एकाकी, उदास वेळी "मागची अधुरी पन्ने" चाळल्यावर भारी वाटतं!!! काहीतरी सापडल्यासारखं! त्या क्षणापुरतं का होईना.. पूर्ण झाल्यासारखं!!
छान लिहिला आहेस हा पन्ना.
छान लिहिला आहेस हा पन्ना. इतक्या मोठ्या ब्रेकनंतर लिहिलास त्यामुळे कदाचित जास्त मनापासून उतरला आहे असं वाटलं.
स्वप्ने..तू फक्त आपले पन्ने
स्वप्ने..तू फक्त आपले पन्ने उतरवत राहा बयो... हम हैं ना यहाँ ... तुझ्या पन्न्यांची आतुरतेने वाट पाहणारे..
खूप काळ तू काहीच उतरवलं नाहीस तर तुझ्या पन्न्यांप्रमाणे आम्हाला ही खाली खाली ( मिसिंग मिसिंग )वाटत राहतं ..
स्वप्ना....अप्रतिम....खूप
स्वप्ना....अप्रतिम....खूप दिवसांनी उगवलीस पण अतिशय सुंदर पन्ने घेऊन...
काय प्रतिसाद देऊ....निशब्द
खूप आवडले.
खूप आवडले.
मस्त लिहिलं आहेस.
मस्त लिहिलं आहेस.
फार म्हणजे फारच सुरेख
फार म्हणजे फारच सुरेख लिहिलंयस.
स्वप्ना, खुप त्रास झाला हे
स्वप्ना, खुप त्रास झाला हे वाचताना. असले अनुभव येतातच पण मन अजून दगड होत नाही.
कित्ती दिवसांनी लिहिलंस. खुप
कित्ती दिवसांनी लिहिलंस. खुप मस्त. एकदम मनापासुन लिहिलंय.
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!
तुम्ही वाचता म्हणूनच लिहावंसं वाटतं
>>मुलगी म्हणून उपजत असणारी एक special संवेदनशीलता ही cherish करण्याची आणि अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं! त्यामुळे I feel lucky/privileged to be borne as woman!
+१०००००
>>माझी आज्जी नेहमी म्हणायची " निर्लज्जम् सदा सुखी" मी ह्या वाक्याचा माझ्या आयुष्यात बराच वापर करते
मस्त लिहितेस तु हे पन्ने.
मस्त लिहितेस तु हे पन्ने.
खुप दिवसांनी लिहिलसं .. मस्त!
खुप दिवसांनी लिहिलसं .. मस्त!
Pages