डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार

Submitted by अतुल ठाकुर on 13 February, 2014 - 01:57

1016454_643263689067780_49011458_n.jpg

डॉ. अनिता अवचट यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या अफाट व्यक्तीमत्वाबद्दल अनिल अवचटांच्या पुस्तकात वाचलं होतंच. "संघर्ष सन्मान पुरस्कार" माहित असला तरी त्यांच्या स्मृतीदिनी हा पुरस्कार दिला जातो ही माहिती मला नवीन होती. नंतर त्यातलं औचित्य लक्षात आलं. मोठ्या मॅडमनी कॅन्सरशी जवळपास आठ वर्ष झुंज देत आपले कार्य अविरत चालु ठेवले होते. हा पुरस्कार देखिल विपरीत परिस्थीतीत झुंज देऊन पुढे आलेल्या दोन व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो. यावेळी मला हा सोहळा पाहायचा होता. मुक्तांगणचं अधिकृत निमंत्रण होतंच पण माझ्या संशोधनाचा हा एक भाग देखिल होता. यावेळचा सोहळा अनेक अर्थाने वेगळा होता. यावेळी प्रथमच हा पुरस्कार एका कलाकाराला दिला जाणार होता. माझ्यासाठी विशेष बाब ही होती की मायबोली संस्थळावर आमचे जेष्ठ स्नेही श्री. अशोकराव पाटील यांजकडुन शोभनाताईंबद्दल माहित झालं होतं. अशोकराव त्यांच्या सहवासात आलेल्या आणि त्यांना आवडलेल्या व्यक्तींशी त्यांच्या इतर मित्रांची ओळख करुन देण्याबाबत तत्पर असतात. तर या शोभनाताई देखिल या सोहळ्याला येणार होत्या. त्यांना भेटायचं होतंच. मला काहिसा अंदाज आला होता पण नंतर कळंलं कि दुसरा पुस्कार हा त्यांच्याच "पार्कीन्सन मित्रमंडळ,पुणे" यासंस्थेला मिळाला आहे. यामुळे आता प्रत्यक्ष परिचयात हा देखिल आनंद मिसळला जाणार होता. कधी नव्हे तो लवकर निघुन दादरहुन इंद्रायणी पकडली आणि साडे नऊ च्या सुमाराला एस.एम जोशी सभागृहात पोहोचलो. समारंभाची वेळ साडेदहाची होती आणि मी बर्‍यापैकी लवकर पोहोचलो होतो. तेथे एक आनंदाची बातमी वाट पाहात होती. मला पाहताच आमचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. उदार सर म्हणाले अहो तुमचे दोन लेख यावेळच्या मुक्तांगणच्या "आनंदयात्री" मासिकात छापुन आले आहेत. मुक्तांगणने मला दिलेली ही अनमोल भेट होती. डॉ अनिता अवचटांना मी कधी पाहिले नव्हते. त्यांच्या कार्याविषयी ऐकले मात्र खुप होते. हे लेख त्यांच्या स्मृतीसोहळ्यात छापले गेल्याने त्यांचा आशीर्वादच मला मिळाला असे वाटले.

हळुहळु मंडळी जमत होती. नेहेमीपेक्षा वेगळा कुर्ता घालुन माधवसर आले. हास्यविनोदात रमणारे माधवसर आल्यावर गप्पांना उत येणारच होता. सगळेच जण घोळका करुन हास्यविनोदात रमलो होतो आणि तितक्यातच समोर उभ्या असलेल्या बाईंनी थेट आमच्या घोळक्याकडे पाहुन प्रश्न केला,"अतुल ठाकुर?" मी चटकन त्यांच्याकडे गेलो. "मी शोभनाताई" त्या हसुन म्हणाल्या. काही जणांशी ओळख झाल्यावर उपचारांची बंधनं राहात नाहीत. हा अनुभव शोभनाताईंच्या बाबतीत आला. आम्ही जणुकाही अनेक वर्षांची ओळख असल्यासारखे बोलु लागलो. त्यांनी त्यांच्या मिस्टरांशी ओळख करुन दिली. ते शुभार्थी आहेत हे काही माझ्या नीटसे लक्षात आले नाही. पार्कीन्सनच्या रुग्णांना शुभार्थी म्हणतात आणि त्यांना मदत करणार्‍यांना शुभंकर. पुढे समारंभात हेच शब्द वापरले गेले. आता गर्दी वाढु लागली. मुक्तांगणचे कार्यकर्ते जमले होतेच. ते झपाट्याने कामाला लागले. माधवसर हॉलमध्ये निघुन गेले होते. त्यानंतर मुक्तागणचे संस्थापक सदस्य असलेले आणि आयपी एच सारख्या संस्थेचे संस्थापक सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी येताना दिसले. सुरुवातीपासुन या सोहळ्याचे संचालन तेच करतात. ते आल्याबरोबर वातावरणाला गती आली. डॉ. नाडकर्णी सर्वांशी बोलत, हसत आत निघुन गेले. मागोमाग अनिल अवचटांचे आगमन झाले आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. अवचट मात्र काहीवेळ बाहेर पटांगणात रमले होते. त्यांना नमस्कार केला. मागे मुक्तामॅडम आल्या आणि आम्ही सारे जण आतल्या प्रशस्त हॉलमध्ये जायला निघालो. दरवाजाबाहेर पुस्तकांचा स्टॉल लागला होता. महेंद्र कनिटकर सर त्याची व्यवस्था पाहात होते. माझ्याकडे पाहात ते डोळ्यांनीच हसले. आणि लेखकाच्या म्हणुन "आनंदयात्री" च्या दोन कॉपीज माझ्या हातात ठेवल्या. महेंद्र सर मुक्तांगणमध्ये योग शिकवणारे आणि आम्ही देखिल योगाची आवड असणारे म्हणुन त्यांच्याशी जरा वेगळे नाते होतेच. काही पुस्तकांची खरेदी केली. काही फोटो घेतले आणि आत गेलो. मुक्तामॅडम सर्वांना भेटत होत्या. आधी मो़कळा वाटलेला हॉल नंतर खच्चुन भरला. दत्ता श्रीखंडे सरांसारखे कार्यकर्ते खुर्च्यासोडुन मधल्या पॅसेज मध्ये बसले होते. शेवटी मुक्तांगणची बहुतेक माणसे इतरांना आपल्या खुर्च्या देऊन मधल्या पॅसेजमध्येच बसली. स्टेजवर डॉ. अनिता अवचटांचा मोठा फोटो ठेवला होता. सन्माननीय पाहुणे स्टेजवर स्थानापन्न होताच सोहळ्याला सुरुवात झाली. अनिल अवचट, आनंद नाडकर्णी, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. विवेक सावंत, पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, दुसरे पुरस्कार विजेते "पार्कीन्सन्स मित्रमंडळा"चे सभासद श्री. शेंडे, सौ. शोभनाताई आणि श्री. कुलकर्णी स्टेजवर बसले होते.

पाहुण्यांचे स्वागत फुले देऊन झाले. त्यानंतर काही विशेष अतिथींचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. त्यात मुक्तांगणचा पहिला रुग्ण श्री. महादेव घारे यांचाही समावेश होता. पुरस्कार प्रदान सुरु झाले आणि उपस्थीत पार्कीन्सन्स शुभार्थींची पुरस्कार घेताना किचित कंप पावत असलेली शरीरं पाहुन आमच्यासारख्या अनेकांना पार्किन्सन्सच्या दुखण्याचे गांभीर्य लक्षात आले. अर्थातच खुद्द त्या शुभार्थींचे चेहरे प्रसन्नच होते. विवेक सावंतांचे स्वागत अनिल अवचटांनी करताना "अविवेकाने विवेकाचे केलेले स्वागत" असा अवचटांचा शेरा उपस्थितांमध्ये हशा उडवुन गेला आणि कार्यक्रमाची देखणी सुरुवात झाली. सर्वप्रथम डॉ. नाडकर्णींनी डॉ. अनिता अवचट यांच्याबद्दल माहिती दिली. त्यांच्या स्वतःच्या भेटीचा किस्सा सांगितला. नाडकर्णींनी हौसेने गिरणीकामगारांच्या मानसिक आजारांवर पेपर सादर केला होता. त्याची सेमिनारमध्ये "रिसर्च डीझाईन" बरोबर नाही सांगुन बोळवण झाली होती त्यामुळे नाडकर्णी खट्टु झाले होते. तेव्हा डॉ.अनिता यांनी डॉ.नाडकर्णींना त्यांचा पेपर त्यांना सर्वात जास्त आवडला कारण तो एकमेव पेपर माणसांबद्दल होता असे सांगुन त्यांची कळी खुलवली. पुढे त्यांच्यात गाढ आणि अक्षय अशा मैत्रीची सुरुवात झाली. डॉ. नाडकर्णींनी पुरस्कार प्राप्त मंडळींना प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते अतिशय सोप्या भाषेत, हसत हसत प्रश्न करीत होते. मात्र त्या प्रश्नांमधुन त्यांच्यातला सायकियाट्रीस्ट आणि लेखक डोकावत होता. सहजपणे मार्मिक प्रश्न विचारुन समोरच्याकडुन उत्तर काढुन घेण्याची आणि आणि समोरच्याला पुरेसा वेळ देऊन बोलतं करण्याची त्यांची हातोटी विलक्षणच. अधुन मधुन "क्या बात है" सारखे प्रशंसोद्गार ते सहज काढीत. समोरच्याला वश करण्याची कला डॉक्टरांमध्ये आहे हे जाणवले आणि आजवर ते अतिशय मार्मिकपणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असल्याची प्रशंसा इतरांकडुन ऐकली होती त्याचे प्रत्यंतर आले.

प्रथम पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या शोभनाताईंनी डॉक्टरांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यास सुरुवात केली. बाकी दोघे शुभार्थी फार बोलु शकणार नव्हते त्यामुळे बोलण्याचे मुख्य काम शोभनाताईंनाच करावे लागले. शोभनाताईंच्या पतींना पार्कीन्सन्सचे निदान झाल्यावर तत्काळ ते स्विकारणे त्यांना स्वाभाविकपणेच जड गेले. त्यांचे कामावर देखिल लक्ष लागेना. या आजाराबद्दल माहिती नव्हती. जी काही माहिती होती ती अपुरी आणि चुकीची होती. मनातुन त्यांना आपला नवरा लाळ गळत असलेल्या अवस्थेत व्हीलचेअरवर बसलेला दिसु लागला. त्यानंतर सात वर्षे हे दांपत्य निरनिराळे उपचार घेत हिंडत होते. अनेक उपचार झाले पण फारसा उपयोग होत नव्हता. त्यावेळी त्यांना पार्कीन्सन्सच्या आधारगटाची माहिती मिळाली. नंतर शोभनाताईंनी मागे वळुन पाहिलंच नाही. त्या कामात स्वतःला झोकुन दिलं. समाजशास्त्रात पी.एच.डी केलेल्या शोभनाताईंना सामाजिक जाणीवा आणि आपले कर्तव्य अवगत होतेच. कुठेतरी सुरुवात व्हायला हवी होती. ती या गटाद्वारे झाली. आता त्या पती समावेत हे काम करतात. जवळपास तीनशे सभासद असलेल्या या मंडळाला अनेक जण अनेक तर्‍हेने मदत करतात. कुणी मिटिंगसाठी जागा विनाशुल्क अथवा नाममात्र शुल्क घेऊन देतात तर कुणी घरात कुणीच शुभार्थी नसतानादेखिल शुभंकराचे काम करतात. या मंडळाच्या सहली निघतात. त्यांच्या आर्ट थेरेपीचे कार्यक्रम होतात. त्यांच्यात माहितीचे आदान प्रदान होते. आणि पार्कीन्सन्ससोबत ही मंडळी अत्यंत आनंदाने काल व्यतित करतात. शोभनाताईंचा भर मुख्यतः वेळेवर योग्य माहिती मिळण्यावर होता. सात वर्षे आम्ही योग्य उपचार न मिळता अनेक ठिकाणी हे करुन बघ ते करुन बघ असे करीत हिंडत होतो असे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले आणि या आजारात प्रामुख्याने लोकांचे गैरसमज दुर करण्यावर भर दिला. त्यांचे मंडळ त्यासाठीच अहोरात्र कार्यरत आहे. काहीवेळा फक्त फोनवर बोलल्याने अनेकांना बरं वाटतं हे त्या आवर्जुन म्हणाल्या. तासतास भर फोनवर बोलणारी माणसे आहेत आणि शोभनाताई त्यांच्याशी न कंटाळता बोलत असतात. काही मोजक्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न श्री.शेंडे व श्री.कुलकर्णी यांनी केला मात्र त्यांची शरिरे कंप पावु लागली त्यामुळे त्यांना फार काही बोलता आले नाही. मात्र त्यातही जी काही उत्तरे त्यांनी दिली ती अत्यंत मार्मिक होती. शेंडेंनी या आजारात विनोदबुद्धी शाबुत असण्याचा फायदा होतो हे नमुद केले. कधी या सार्‍यामुळे भीती वाटली का या प्रश्नाला दोघाही शूभार्थींकडुन नकारार्थी उत्तर मिळाले. सारे सभागृह ही प्रश्नोत्तरे ऐकताना गंभीर झाले होते आणि योग्य तेथे प्रशंसेची दाद दिली जात होती.

यानंतर नागराज मंजुळे यांनी उत्तरे द्यायला सुरुवात केली. अत्यंत संवेदनशील असलेल्या या दिग्दर्शकाने प्रांजळ आणि स्पष्ट उत्तरे देऊन प्रेक्षकांना जिंकले. मी भित्रा आहे. मला फार काही येत नव्हते त्यामुळे अपघातानेच मी चित्रपट क्षेत्रात आलो. त्यातही काही कळत नव्हते. फक्त वारेमाप चित्रपट पाहण्याचाच काय तो अनुभव गाठीशी होता. मात्र तंत्राचा बागुलबुवा केला नाही. तांत्रिक गोष्टी या माणसाने कलेसाठी राबवायच्या असतात. त्या स्वतःवर स्वार होऊ द्यायच्या नसतात याबद्दल मंजुळे नि:शंक होते. त्यांचा पारधी म्हणुन उल्लेख केला गेला होता मात्र ते पारधी नसुन वडार आहेत असे त्यांनी सांगितले आणि अशा चुका वारंवार व्हाव्यात. कूणाची जात कूणाला कळु नये. सरतेशेवटी सारं मिसळुन एक व्हावं असं त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. "फॅंड्री" या त्याच्या नव्या चित्रपटाच्या नावाबद्दल त्यांना विचारताच खरं तर हे नेहेमीच्या वापरातलंच नाव आहे आणि त्याबद्दल आपल्या सर्वसामान्य माणसांना कसलिच माहिती नाही. त्यासाठी मी याचा अर्थ सांगणार नाही. हा चित्रपट पाहुन तो आपल्याला कळावा ही माझी इच्छा आहे असे ते स्पष्टपणे म्हणाले. आपल्याकडे परीघाबाहेरची माणसे ही नेहेमी दुर्लक्षिली जातात हे नमुद करुन त्यांनी आपल्या दोन चित्रपटात भुमिका करणार्‍या दहा बारा बर्षाच्या दोन कोवळ्या मुलांना बोट दाखवुन प्रेक्षागारात उभे केले. हे दोघेही मागासवर्गीय समाजातील होते. यांची कथा कोण सांगणार असा प्रश्न त्यांनी उपस्थीतांना करुन सर्वांना अवाक करुन सोडले. अनिल अवचटांनी मात्र तेथेच त्यांना स्टेजवर बोलवुन दोघांचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला आणि त्यांना सलाम ठोकला. नागराज मंजुळेंची मुलाखत त्यातल्या प्रांजळपणामुळे रंगली होती.

शेवटी विवेक सावंतानी उठुन डॉ. अनिता अवचटांच्या आठवणी सांगितल्या. व्यसनासाठी उपचार घ्यायला आलेल्या आणि कंप्युटर मध्ये गती असलेल्या दोन मुलांना कंप्युटर कोर्सला दाखल करुन त्यांना शिकवण्याची विनंती मोठ्या मॅडमनी त्यांना केली होती. त्यावेळी एक दिवस घरी बोलावुन अशा रुग्णांशी कसे वागावे याचे शिक्षणच त्यांनी सावंतांना दिले. सावंतांनी त्यांचा उल्लेख अतिशय कृतज्ञतेने केला. कार्यक्रम संपत आला होता. अनिल अवचट स्टेजवर देखिल स्केच बुक घेऊन बसले होते. पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम संपल्यावर बाकी सारा कार्यक्रम त्यांनी प्रेक्षकांमध्ये बसुन पाहिला. चित्र काढत, कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकत, योग्य जागी दाद देत तेथे बसलेल्या या अवलिया माणसाचे अष्टावधानीपण देखिल यावेळी पाहायला मिळाले. अत्यंत रंगलेल्या अशा कार्यक्रमाची सांगता डॉ. नाडकर्णी यांनी अनिल अवचटांनी आपल्या पत्नीसाठी लिहिलेल्या कवितेने केली.

तिने लावला दिवा
आम्ही उघडले डोळे
तिने घातला वारा
भरली आमुची शिडे

डोक्यावर फिरवी हात
मन होते प्रसन्न शांत
कानात सांगते गुज
विश्वाची येते जाण

चुकली जर कोठे वाट
नेमके दाखवी बोट
पाऊल घसरते तेव्हा
सावरते धरुन तोल

कधी दमलो चालुन चालुन
ती पाय चेपते हलके
पांघरुण घाली अलगद
पडतात उद्याची स्वप्ने

-- अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक विस्मयकारी व्यक्तित्वांचा धावता परिचय करून देणारा लेख आहे.सुंदर आढावा अतुल, शोभनाताईंचे अभिनंदन, तुमचेही , स्मरणिकेत लेख निवडले जाण्यासाठी.

छान लेख आणि कविता
.शोभनाताईंचे अभिनंदन!

खूपच सुंदर लेख अतुलराव ....

अवचट दांपत्य ग्रेटच ....

शोभनाताईंचे हार्दिक अभिनंदन .... शोभनाताईंचीअवलने करुन दिलेली ओळखही सुरेख आणि निर्व्याज मैत्री कशी असते ते दर्शवणारी ....

भारतीताई म्हणतात तसे - "अनेक विस्मयकारी व्यक्तित्वांचा धावता परिचय"ही फारच छान ....

लेख छान लिहिलाय. कार्यक्रम फारच सुरेख झालेला दिसला लेखातुन. शोभनाताई तुमचे खुप खुप अभिनंदन. अवलने छान लिहिले.

भारतीताई +१

लेख फारच छान आहे.

अवल फार छान शब्दांत शोभना ताईंची ओळख करुन दिली आहेस.

शोभनाताईंचे अभिनंदन.

अतुल तुमचे आनंदयात्री मध्ये लेख छापून आल्याबद्दलही अभिनंदन.

सर्व प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार. अशोकरावांनी शोभनाताईंशी ओळख करुन दिली त्यामुळे त्यांना खास धन्यवाद. हे सारे ज्या मायबोली संस्थळामुळे झाले त्या संस्थळाचेही आभार Happy

तुम्हा सर्वांच्या कौतुकाच्या वर्षावाने मी गुदमरुन गेले तुम्हा सर्वांना धन्यवाद.असा प्रेम करणारा छान परिवार दिल्याबद्दल मायबोलीचे आभार
अतुल तुम्ही इतक्या तातडीने वृत्त सादर केलेत त्याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.आनंद यात्रित लेख आल्याबद्दल अभिनंदन.

Pages