रोझ डे

Submitted by विजय देशमुख on 13 February, 2014 - 01:36

"मॅडम, हॅपी रोज डे... हे तुमच्यासाठी..."
"माझ्यासाठी?" नताशाने वर पाहिजे. ८-१० ताजे पिवळे धम्म गुलाबाची फुलं, एका खाकी कागदात गुंडाळलेले. अचानक ती किंचाळत म्हणाली,
"हिंमत कशी झाली तुझी... आताच्या आत्ता चालता हो तू....आणि जाताना दांडेकरकडुन तुझा पगार घेउन जा... यू आर फायर्ड"
राजुला ती काय म्हणाली ते काही सेकंद कळलच नाही. तो चुपचाप बाहेर गेला. दांडेकरला तोपर्यंत फोन गेला होताच. त्याने नाईलाजाने राजुला एक पाकिट दिले.

***************************************************************************
"गुडमॉर्निंग मॅडम"
"गुडमॉर्निंग दांडेकर. कालचे पेपर्स तयार झालेत?"
"हो मॅडम."
तीने पेपर्स बघितले, सह्या ठोकल्या आणि पेपर्स कुरिअरने पाठवायला सांगीतले.
"काय? अजुन काही बाकी आहे का?" दांडेकरला घुटमळताना बघितले, तसं नताशा म्हणाली.
"मॅडम, हॅपी रोज डे" दांडेकरने एक पिवळंधम्म गुलाबाचं फुल तिला दिलं. ती काही बोलणार इतक्यात रुबीना आत आली,
"मॅडम, हॅपी रोज डे..." तिच्याही हातात पिवळं फुल, अगदी तसच...
रुबीना अन दांडेकर गेले अन नताशा त्या दोन फुलांकडे बघत बसली. लंचपर्यंत अजुन २ फुलं. तशीच ताजी .....
************************************************************
"मॅडम... मॅडम..." नंदन धावत येत होता. खरं तर आज नताशाला लौकर घरी जायचं होतं पण मार्केटींगवाले लोकं नेमके आजच उशीरा आले होते. त्यांचं रिपोर्टींग घेता घेता आणि एका क्लायंटला डॉक्युमेंट्स लौकर द्यायला सांगताना तिला ४ वाजलेच होते. आता बॉस सोबत मिटींग आहे तर मध्येच नंदन.
"व्हॉट यू नीड नाऊ?" ती थोडीशी वैतागलीच होती. एक तर नंदन म्हणजे डोकेखाऊ माणुस.
"नथिंग मॅडम, जस्ट हॅपी रोज डे" पुन्हा एकदा तेच पिवळे गुलाब. सगळे गुलाब एकाच दुकानातुन आणले की काय, असे. पण नंदनला विचारण्यात अर्थ नव्हता. त्याला समजवायला १० मिनिटं गेली असती. तीने थँक्यु म्हणत ते फुल घेतले.
**************************************
"सर, मग हे टेंडर..."
"लिव्ह इट. ते आपलं काम नाही असं समज."
"ओके सर, मी निघू..."
"अं एक मिनिट..." बॉसने एक कपाटातुन छानसं गुलाबाचं फुल काढलं अन तिला दिलं. ते पाहुन तिला डोक्यात कळ आली. पुन्हा पिवळा गुलाब, तोच...

*************************************
"दांडेकर... ताबडतोब माझ्या केबीनमध्ये या" तिने इंटरकॉमवर दांडेकरला बोलावले आणि स्वतःच कॉफी बनवली.
"मॅडम, मेहतांचे पेपर्स उद्या सकाळी दिले तर चालतील का? मी करतच आहो, पण ..."
"मला पेपर्स नकोत सध्या. बसा."
"अं" दांडेकर भांबावला. गेल्या २ वर्षात तो २-३ मिनिटांपेक्षा जास्त नताशाच्या केबीनमध्ये उभा राहिला नव्हता अन आज एकदम बसा !
"आय सेड,हॅव अ सीट..." नताशाने पुन्हा एकदा शांतपणे म्हटले तसा तो बसला. समोर कॉफिचा कप. दांडेकरला कळेच ना, काय चाललय.
"हे काय चाललय, मला कळेल का?"
"काय मॅडम" तो अधिकच गोंधळात.
"२ वर्षात कधीच आपण रोझ डे साजरा केला नाही. मग आजच तुमच्या सगळ्यांकडे इतके गुलाब कसे? तेही एकसारखे? एकाच दुकानातुन घेतले ?"
"ओह, ते होय," तो जरा सुखावला, " ते राजुने आणुन दिले सगळ्यांना.
"राजुने?"
"हो, त्याचं गुलाबाचं शेत आहे ना, १०० गुलाब त्याच्या वडीलांनी पाठवले, आपल्या ऑफिससाठी. सकाळी तो तेच वाटत होता..." पुढे काय झालं हे आठवुन दांडेकरला भरुन आलं.
"म्हणजे राजूने ते फुलं दुसर्‍यांना देण्यासाठी आणले होते?"
"हो..."
"राजु कुठाय?"
"तो गेला मॅडम"
"गेला? असा कसा गेला? आणि कुठे गेलाय तो?"
"गावाला निघुन गेला. तुम्ही म्हटलं तसा मी पगार दिला होता त्याला, पण न घेताच गेला..."
"त्याला शोधा. त्याचा पत्ता असेल ना आपल्याकडे"
"त्याला शोधताही येईल मॅडम, पण तो परत येईल असं वाटत नाही. दुसरा ऑफिसबॉय शोधू मी?"
तिला यावेळी मात्र काहिही उत्तर सुचले नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

नशीब राजूच्या वडीलांनी पिवळे गुलाबच पाठवले होते, लाल पाठवले असते तर राजू पोलिस स्टेशनला तरी असता नाहीतर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट तरी असता..

असे घडलेय का हो कुठल्या राजूशी ?

छान!