एक हृदयस्पर्शी 'स्क्रू' ! - एक वैद्यकीय सत्यकथा !!

Submitted by SureshShinde on 7 February, 2014 - 01:37

१९६६ च्या सुमारास एक विज्ञानरंजक चित्रपट पहिला होता, "fantastic voyage ". शास्त्रज्ञांनी कोठलीही वस्तू अतिसूक्ष्म करण्याची क्रिया शोधलेली असते पण हा परिणाम फक्त एक तास टिकत असतो. एका रशियन शास्त्रज्ञाने हा परिणाम जास्त वेळ करण्याचे आणि पुन्हा पूर्ववत करण्याचे तंत्र शोधलेले असते. अर्थातच अमेरिकेला हे तंत्र हवे असते. तो शास्त्रज्ञ अमेरिकेत पळून जात असताना रशियन हेर त्याला गाठतात आणि त्या मारामारीमध्ये त्या शास्त्रज्ञाला डोक्याला मार बसून मेंदूमध्ये रक्ताची गाठ होवून तो बेशुद्ध पडतो. त्याला शुद्धीवर आणून तो 'फॉर्म्युला' हस्तगत करण्यासाठी अमेरिकन हेर एक पाणबुडी तयार करतात आणि त्यात एक चार जणांची टीम एका लेझर गनसह पाठविण्याचे ठरवितात. आपल्या नेत्रसुखासाठी त्यात असते एक अमेरिकन स्त्री-हेर , मिस रयाकवेल वेल्च आणि एक रशियन डबल एजंट सुद्धा! या सर्वांना पाणबुडीसह 'न्यानो' रुपांतरीत करून त्या शास्त्रज्ञाच्या मानेतील मेंदूकडे जाणार्या रक्तवाहिनीमध्ये टोचले जाते. येथेच सुरु होते त्यांची त्या शास्त्रज्ञाच्या शरीरातील विस्मयजनक सफर !
उलट-गणती साठ मिनिटे !
ही कथा पुन्हा कधीतरी लिहिन.
पणआज येथे लिहिण्याचे कारण म्हणजे माझ्या अनुभवातील आणखी एक सत्यकथा.
माबो वरील एका सदस्याच्या मुलाच्या बाबतीतही असेच घडल्याच वाचनात आल्यामुळे ही कथा येथे उधृत करीत आहे. एक क्षुल्लक 'स्क्रू'ने मानवी शरीरात केलेला असाच एक विस्मयजनक प्रवास !

-----------------------------------------------------------
एक हृदयस्पर्शी "स्क्रू' !

screwpik.jpg

1980 सालातील एक दिवस. पुण्यातील शुक्रवार पेठेतील गाडीखाना चेस्ट क्लिनिकमध्ये त्यावेळी मी मानद तज्ज्ञ म्हणून आठवड्यातून तीन दिवस सकाळी चार तास जात असे. उपचार व तपासणी मोफत असल्यामुळे अनेक गरजू रुग्णांची खूपच गर्दी होत असे. एके दिवशी सकाळी बिबवेवाडीमधील माझे मित्र डॉ.ढेरे यांचे पत्र घेऊन एक मध्यमवयीन स्त्री आपल्या दहा वर्षांच्या आजारी मुलाला घेऊन गाडीखान्यात आली. त्या मुलाला, संतोषला गेला आठवडाभर ताप येत होता. डॉ.ढेरेंनी तापासाठी आठवडाभर ऍम्पिसिलीन नावाच्या उत्तम अँटीबायोटीकचा एक कोर्सही देऊन झाला होता. पण तरीही तापात उतार होत नव्हता. त्याला खोकला येत होता, दीर्घ श्वासानंतर छातीमध्ये दुखत होते, भूक मंदावली होती, खोकल्याबरोबर कधी कधी पांढरा-पिवळा "कफ'ही पडत होता.

संतोषची ही लक्षण ऐकून त्याला बहुतेक छातीमध्ये संसर्ग झाला असावा असा मी मनामध्ये विचार करीत होतो. संतोषला तपासल्यानंतर त्याच्या उजव्या फुप्फुसामध्ये येणाऱ्या आवाजांवरुन त्याला ""न्युमोनिया'' झाला असण्याची शक्यता मी त्याच्या आईजवळ बोलून दाखवली व ताबडतोब त्याच्या छातीचा एक्स-रे काढण्यासाठी चिठ्ठी दिली. क्लिनिकमधील मेडीकल ऑफिसर डॉ.खळदकर यांनी तातडीने एक्स-रे काढून तो एक्स-रे दर्शकावर लावून मला दाखविला. माझा अंदाज खरा दिसत होता. संतोषला उजव्या फुप्फुसातील खालील भागामध्ये म्हणजे लोअर लोबमध्ये न्युमोनिया झाला होता.
असा "लोबार'' न्युमोनिया होण्याचे कारण म्हणजे 'न्युमोकॉकाय' नावाचे जंतू असतात. या जंतूंचे वैशिष्ट्य असे असते की, त्याच्या भोवती एक बुळबुळीत पदार्थाचे आवरण असते. त्यामुळे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी अर्थात आपल्या सैनिक पेशी या जंतूंना पकडून खाऊ शकत नाहीत. त्यामुळे हे जंतू जीवघेणा आजार तयार करु शकतात. कधीकधी फुप्फुसातून मेंदूपर्यंत जाऊन तेथे संसर्ग करुन "मेनिन्जायटीस' तयार करु शकतात. अर्थात असे रुग्ण खूपच आजारी असतात.
तसा संतोष इतका जास्त आजारी अथवा सिरीअस वाटत नव्हता. दुसरी शक्यता होती की संतोषला टीबी असावा. डॉ.खळदकर व मी असे दोघे मिळून संतोषच्या केसविषयी चर्चा करीत होतो. त्या एक्स-रेचा अभ्यास करीत असताना मला त्या एक्स-रेमध्ये एक पांढरी 'शॅडो' दिसली. बहिर्गोल भिंगातून पाहताना तो एक "स्क्रू' असल्याचे दिसले.
"डॉ.खळदकर, आपल्या डिपार्टमेंटमध्ये एक्स-रे काढताना पेशंटचे कपडे काढून एक्स-रे काढण्याचा कंटाळा केलेला दिसतो. कारण पेशंटच्या खिशातला 'स्क्रू' एक्स-रे मध्ये दिसत आहे.'' संतोषची आई शेजारीच उभी होती. डॉ.खळदकरांनी तातडीने तिलाच विचारले.
"तुमच्या मुलाचा एक्स-रे काढताना त्याचे कपडे संपूर्ण काढले होते काय?''
"होय, त्याला पूर्ण उघडा करुनच फोटो काढलेला आहे'' त्याच्या आईने तत्परतेने माहिती दिली. संतोषची आई खरोखरच हुषार होती. तिला आमची चर्चा एका 'स्क्रू' विषयी चालली असल्याची कल्पना एव्हाना आलीच होती.
"डॉक्टर, माझ्या मुलाने एक महिन्यापूर्वी एक 'स्क्रू' गिळला होता. तोच तर हा 'स्क्रू' नसेल ना?''
तिने घाबरत घाबरतच आमच्या संभाषणामध्ये अडथळा आणीत अशी अनपेक्षित माहिती पुरवली. आम्ही दोघेही क्षणभर चक्रावलो व एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागलो.
आमची प्रतिक्रिया पाहून संतोषच्या आईने थोडी आणखी माहिती दिली.
"एक महिन्यापूर्वी संतोष व मी बसमधून चाललो होतो. बसल्या बसल्या माझी नजर चुकवून त्याने बसच्या समोरील सीटला लावलेला 'स्क्रू' काढून तोंडात धरला होता. अचानक बसने ब्रेक दाबला व संतोषने त्या धक्क्यामुळे चुकून तो 'स्क्रू' गिळून टाकला. आम्ही तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 'स्क्रू' बाहेर न निघाल्यामुळे मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांनी तपासून त्या 'स्क्रू'चा आकार लहान असल्याने तो शौचावाटे निघून जाईल असे सांगून त्याला दोन केळी खाण्यास देण्यास सांगितले होते. या गोष्टीला एक महिना होऊन गेला. आम्ही तो 'स्क्रू' विसरुन गेलो. पण तोच हा 'स्क्रू' असेल काय?''
आता आश्चर्य वाटण्याची पाळी आमची होती. नक्की हा तोच 'स्क्रू' होता. जो अन्ननलिकेवाटे पोटामध्ये न जाता श्वासनलिकेवाटे फुप्फुसात गेला होता आणि त्याने तेथे हळूहळू संसर्ग निर्माण करुन आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली होती.
"तुमचा अंदाज अगदी योग्य आहे. तुमच्या मुलाने गिळलेला 'स्क्रू' छातीमध्ये असून त्यामुळेच 'न्युमोनिया' झाला आहे. तो 'स्क्रू' काढल्याशिवाय संतोष बरा होणार नाही.''
बिचारी माऊली एकदमच विचारमग्न झाली.
"हे पहा, काळजी करण्याचे काही कारण नाही. त्याच्या छातीमध्ये दुर्बिण असलेली नळी घालून तो 'स्क्रू' काढून घ्यावा लागेल. त्याला 'ब्रॉन्कोस्कोपी' असे म्हणतात.''
आजकाल 'ब्रॉन्कोस्कोपी' खूपच सोपी व कमी त्रासदायक झाली आहे. 'फायबर ऑप्टीक' नावाच्या काचतंतूचा शोध लागल्यामुळे अशा लवचिक दुर्बिणीमधून फुप्फुसामधील आजारांचे निदान करणे आता खूपच सोपे झाले आहे. शेंगदाणे, खरे अथवा निखळलेले खोटे दात या दुर्बिणीमधून लिलया काढता येतात. आत जर कॅन्सरची गाठ असेल तर तपासणीसाठी तिचा तुकडाही काढता येतो. त्या काळी छोट्या बासरीप्रमाणे असणारी घट्ट धातूची नळी घालून अशा 'फॉरीन बॉडीज' काढत असत.
संतोषचे वडील एव्हाना दवाखान्यात येऊन दाखल झाले होते. त्यांच्याशी चर्चा करुन माझे मित्र नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ.प्रकाश जोगळेकर यांच्याकडे 'ब्रॉन्कोस्कोपी' करुन तो 'स्क्रू' काढण्याचे ठरले.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ.जोगळेकरांनी संतोषला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये भूल देऊन 'ब्रॉन्कोस्कोपी' केली. पण दुर्दैवाने संतोषला ती सहन झाली नाही व त्याच्या हृदयाचे ठोके मंदावू लागले. डॉ.जोगळेकरांच्या पटकन लक्षात आल्यामुळे त्यांनी संतोषला आपल्या दोन्ही हातांवर उचलून त्यांच्याच गाडीत घालून अत्यंत जलद वेगाने जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तोपर्यंत डॉ.जोगळेकरांच्या पत्नीने छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर अमीन, जे 'ब्रॉन्कोस्कोपी' करीत असत, यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले होते. सुदैवाने आम्ही सर्व जहांगीरमध्ये पोहोचेपर्यंत डॉ.अमीन तेथे तयारच होते. 'व्हेन्चूरी' नावाच्या पद्धतीने 'ब्रॉन्कोस्कोपी' करताना प्राणवायूचा पुरवठा करुन त्यांनी संतोषची 'ब्रॉन्कोस्कोपी' केली. पण आत श्वासनलिकेमध्ये 'स्क्रू' दिसत नव्हता. एखादेवेळी हा 'स्क्रू' अन्ननलिकेत असण्याची शक्यता वाटल्यामुळे तोच 'स्कोप' त्यांनी अन्ननलिकेतही घालून पाहिला. पण छे, 'स्क्रू'चा कोठेही ठिकाणा लागत नव्हता. आता खरोखरच चिंताजनक वातावरण निर्माण झाले. पुन्हा एक्स-रे काढला असता त्यात तो 'स्क्रू' त्याच ठिकाणी दिसल्यामुळे तो कसा काढावा यावर चर्चा सुरु झाली.
बहुतेक तो 'स्क्रू' 'मायग्रेट' होऊन चरतचरत फुप्फुसामध्ये अथवा छातीच्या पोकळीमध्ये गेला असण्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले होते. आम्ही शस्त्रक्रिया गृहातून बाहेर येऊन संतोषच्या आई-वडीलांना झालेला प्रकार समजावून सांगितला व आता संतोषला वाचविण्यासाठी त्याची छाती उघडून मोठी शस्त्रक्रिया करुन तो 'स्क्रू' काढावा लागेल असे सांगितले. दोघांनाही रडूच कोसळले. आईने तर मटकन् बसूनच घेतले.
"डॉक्टर, हा माझा एकुलता मुलगा आहे. काहीही करुन त्याला या संकटातून वाचवा. मी काही फार श्रीमंत नाही पण पैशांची काळजी करु नका. उत्तमातील उत्तम डॉक्टरांना ऑपरेशनसाठी बोलवा.''
त्यांच्या आवाजातील आर्जव व डोळ्यातील अश्रू पाहून सर्वांचीच मने शोकाकूल होऊन गेली.
पुण्यातील उत्तम हृदय व फुप्फुस शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.अशोक कानिटकर यांना बोलविण्याचे ठरले. पुढील तासाभरामध्येच संतोष पुन्हा शस्त्रक्रियेसाठी सज्ज झाला. त्याच्या वडीलांनी व नातेवाईकांनी दोन बाटल्या रक्त देऊन तयार ठेवले होते.
डॉ.कानिटकरांनी संतोषच्या दोन बरगड्यांमध्ये छेद घेऊन छातीच्या आतील परिस्थितीचा अंदाज घेत असतानाच त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आम्हा सर्वांना माहिती सांगत होते. आत फुप्फुसाच्या लोअर लोबमध्ये सर्वत्र 'पू' झाला होता. तो सर्व त्यांनी 'सक्शन' मशीनने व स्पंजद्वारे कोरडा केल्यानंतरही त्या 'स्क्रू'चा मागमूस लागेना. समोरच टांगलेल्या एक्स-रे कडे पहात त्यांची बोटे संतोषच्या छातीच्या आतील भागांची चाचपणी करुन 'स्क्रू'चा शोध घेत होती आणि आम्ही सर्व सरांच्या चेहऱ्यावरील भाव पहात होतो. सरांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यामुळे सरांना 'स्क्रू' सापडल्याची आम्हाला पूर्वकल्पना मिळाली.
"अरे, प्रकाश "स्क्रू' तर माझ्या हाताला लागतोय पण तो 'डीप' आहे. बहुतेक "पेरीकार्डीयल कॅव्हिटी''मध्ये असावा.
आपले हृदय हे 'पेरीकार्डीयम' नावाच्या एका आवरणामध्ये अवेष्टित केलेले असते. हा 'स्क्रू' श्वासनलिकेमधून बाहेर येऊन, फुप्फुसामधून जाऊन 'मेडीयास्टायनम' नावाच्या भागातून हृदयापर्यंत जावून हृदयाशेजारील आवरण भेदून हृदयाशेजारी जाऊन बसला होता. डॉ.कानेटकर एक प्रथितयश हृदय सर्जन असल्यामुळे त्यांना हा 'स्क्रू' काढणे कठीण नव्हते. पण हृदयक्रिया अनियमित होण्याचा अथवा थांबण्याचा अथवा रक्तस्त्राव होण्याचा धोका होताच. आमच्या नजरा आता हृदयक्रिया दाखविणाऱ्या मॉनिटरवर लागलेल्या होत्या. डॉ.जोगळेकर तर संतोषची नाडी धरुनच उभे होते. पण सुदैवाने काहीही अघटीत न घडता पुढील काही मिनिटांतच डॉ.कानेटकरांनी तो छोटासा 'स्क्रू' सिस्टरने पुढे धरलेल्या स्टीलच्या किडनी ट्रेमध्ये टाकल्याचा आवाज आम्ही 'अनिमिष' कानांनी ऐकला आणि 'जीव भांड्यात पडणे' म्हणजे काय याची एक वेगळी अनुभूती त्या दिवशी आम्हा सर्वांना आली.
त्यानंतर वीस वर्षांनी...
सहा फूट उंचीचा धिप्पाड एक माणूस दुसऱ्या एका पेशंटला घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये आला. पटकन खाली वाकून नमस्कार करताना तो म्हणत होता, "सर, आपण मला कदाचित विसरुन गेला असाल, पण मीच तो 'स्क्रू' गिळलेला संतोष शर्मा !''

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टरसाहेब आपण उत्तम साहित्यिक आहात की उत्तम डॉक्टर हेच समजानेसे झाले आहे. शेवटचा पॅरा त्याची साक्ष देतो !! Happy

बापरे तुमची वर्णन शैली अप्रतिम आहे. वाचता वाचता डॉक्टर कानिटकर यांच्या बरोबर श्वास रोखून आम्ही वाचक पण संतोषच्या हृदयापर्यंत पोचतो . तुम्हीं प्रसंग अगदी जिवंत करून लिहिता.
एक लहानसा तो स्क्रू पण काय काय करामती दाखवल्या.:)
लेखाचं नाव पण एकदम समर्पक " हृदयस्पर्शी स्क्रू " Happy

डॉ. डोळ्यासमोर चित्र उभे करणारी आपली लेखनशैली खरोखर अवर्णनीय.
आअपले सगळे लेख असेच असतात.

बापरे! काय बेफ़ाम अनुभव आहे हा!

'तज्ञ' म्हणजे काय हे कळले.
सर आपले लेखन अत्यंत ओघवते आहे..मीच ते ओपरेशन कारतीये असे वाटले.

"फॅन्टॅस्टिक व्हॉयेज" वरती बेतलेली एक कादंबरी वाचलेली आठवतीये- 'अतर्क्य' लेखक अठवत नाहि...पण भारतीय हेर पाकिस्तानात जातो.. आणि परत येताना सीमे वरती जखमी होतो आणि कोमात जातो...मग मेंदु तील गाठ काढण्यसठी हे टेक्निक वापरतात... भन्नाट आहे...

खूपच उत्कंठा शिगेला लागली होती , जसा जसा प्रसंगाचा शेवट जवळ येत होता..

शेवट वाचून हुश्श!! झालं... तुमच्या जवळ कितीकिती अनुभव आहेत, ते तुम्ही इथे सोप्या सुलभ पद्धतीने सांगत असता , खूप छान वाटतं वाचताना..

बापरे / आत्ता मी स्थिर झाले. एव्हडी धडधड वाढ्ली होती. फारच बोलक लिखाण. त्या मुलालाहि 'जिवेत शरदा शतम''.
धन्यवाद डॉ.

बापरे ............अगदी शेवटपर्यंत श्वास रोखून एका दमात वाचली.............. hatts off..

पुरंदरे शशांक लिहीतात कि, ...डॉ. साहेब, तुमच्या अनुभव-पोतडीत काय काय भरलेले आहे - कळतच नाही.
तुम्ही ही सर्व माहिती अगदी सामान्य माणसाला कळेल अशी जी इथे देत आहात त्याकरता तुमचे आभार कसे मानावे हे कळत नाही....... यांच्याशी अगदी १००% सहमत.
खरंच डॉ. तुमचे सर्वच लेख खुप आवडतात.

डॉक्टर, तुम्ही थेट ऑ.थियेटरातच नेऊन बसवता. अगदी डोळ्यासमोर घडला म्हणावं इतका जिवंत प्रसंग!

हॅट्स ऑफ टु यू & अदर डॉ. लाइक यु Happy

Pages