छायागीत ४ - मुड मुडके ना देख मुड मुडके...

Submitted by अतुल ठाकुर on 5 February, 2014 - 10:58

player_crop_640x300_345.jpghttps://www.youtube.com/watch?v=R3D3YNmg-Ak

लक्ष्मीमंदिरात नेतो म्हणुन जुगाराच्या क्लबात नर्गीसला आणणारा राजकपुर नेमका नादिराच्या हातात सापडतो. आणि ती थंडपणे त्याच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगु लागते. निरागस नर्गीस या अपरीचित वातावरणात अजुन सावरलेली देखिल नसते की कुणीतरी जबरदस्तीने तिच्याशी हात मिळवतात तर कुणी ओळख करुन घ्यायला पाहतात. "श्री ४२०" मात्र तेथेही नर्गीस कुठल्याशा गावाची राजकुमारी आहे अशी थाप ठोकायला मागेपुढे पाहात नाहीत. नादीरा मात्र आता अशी मागे हटणार नसते. नर्गीसच्या साडीकडे पाहुन माझ्याकडे अगदी अशीच साडी आहे पण धोब्याकडुन अजुन आली नाही असे नादीरा कुर्रेबाजपणे सांगते आणि नर्गीसचा बांध फुटतो. आपली फसवणुक झाली आहे हे तिला लख्ख कळुन चुकतं. ती तेथुन अश्रु ढाळत बाहेर पडते. राज कपूर तिच्या मागे "विद्या,विद्या" अशा हाका मारत तिला गाठण्याचा प्रयत्न करतो पण "आज दिवाली के दिन तुम्हे विद्या की नही माया के जरुरत है" असे म्हणुन त्याचा बॉस त्याला नादीराकडे वळवतो आणि सुरु होते "मुड मुडके ना देख मुड मुडके..."

श्री ४२० मधील हा एक अतीशय इंटेन्स सीन. नर्गीसने कमाल केलीय. तिचा अपमान आपल्यालाच इतका लागतो की ती लवकर निघुन जाईल तर बरं होईल असं वाटत राहतं. त्यानंतर मात्र राज कपूर आणि नादीरा वर्चस्व गाजवतात. त्यातदेखिल राज कपूर जास्तच. संगीताची आणि नृत्याची चांगली जाण असलेल्या राजकपूरने आपली दोन्ही कौशल्यं येथे छान दाखवली आहेत. तो नाचतो तर मस्तच पण वाद्य देखिल हातात घेऊन अशा तर्‍हेने वाजवल्याचा अभिनय करतो की जणु काही त्याला ते वाद्य वशच असावं. नादीराची नजर आणि देहबोली पाहुन निळ्या धारेची विष पाजळलेली कट्यार आठवते. नाचताना राज कपूर दृश्य घेऊन जातो मात्र ती कमतरता नादीराने नजरेने भरुन काढली आहे. आपले मित्र, आवडती माणसे पडद्यावर दाखवण्याची हौस राज कपूरला होती असे एकदा कुठेतरी वाचले होते. त्यानुसार या गाण्यात संगीतकार जयकिशन आपले दर्शन देऊन जातो. नादीराला या गाण्यात आशाचा आवाज फिट्ट बसला आहेच. आणि राजसाहेब मन्नाडेच्या आवाजात गात आहेत. दोन्ही गायक कलाकारांनी आवाजात उत्स्फुर्तता फार सुरेख दाखवली आहे. विशेषतः मन्नाडेने कडव्याच्या शेवटी "है...." म्हणुन केलेला कल्लोळ तर खासच.

राज कपूरच्या चेहर्‍यावरील हळुहळु पलटणारे भाव पाहण्यासारखे. नर्गीस निघुन गेल्याने उदास झालेला राज नर्तकिंच्या जमावात सापडतो. नादिरा मादकपणे डोळ्याने आव्हान देत असतेच. हळुहळु त्याच्या चित्तवृत्ती पालटु लागतात. चेहर्‍यावर हसु फुलु लागते. कधी त्याच्या हातात वाद्य येते आणि तो ते वाजवु लागतो त्याचे त्यालादेखिल कळत नाही. पुढे नादीराच्या सुरातच सूर मिसळुन "दुनिया उसिकी है जो आगे देखे" म्हणुन रोखठोक तत्त्वज्ञान सांगत त्यावेळेपुरता तरी नर्गीसला विसरुन राज स्वतःला व्यवहारी दुनियेत झोकुन देतो.

अतुल ठाकुर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users