जात्यावरचे गाणे

Submitted by संतोष वाटपाडे on 4 February, 2014 - 21:21

कोंबड्यांची आरुळी...आली कानावर बाई,
ये गं दळण दळाया....सई बाई गं बाई.... सई बाई ॥धृ॥

रामपारी उठते...सये जात्याच्या वढीनं
आठवते माहेराला...बोलावते गं बापाला...सई बाई ॥

माहेराच्या गाण्याला..नको जाऊ देऊ वाया,
माजा भोळा इठुराया...अन माय रखूमाई....सई बाई ॥

बाजरीच्या दाण्याचं...पीठ मायळू उरलं
किती दिवस सरलं...डोळं पाण्यानी भरलं ...सई बाई ॥

गरीबाच्या घरात..आमी वाढलो लेकरं,
एक टायमाचं खाणं... तरी पोटात ढेकरं...सई बाई ॥

डोळ्याम्होर माय गं...यकटीच अंगणाशी,
भाऊ ताईसंगं माजा....माय बोल ना कोणाशी...सई बाई ॥

सासराच्या जात्यात....जीव अडकतो लई,
गरागरा फ़िरताना....हात थांबतंच न्हाई.....सई बाई ॥

मैतरणीच्या जोडीनं...बाई दळण निशीते,
डोळं हातानं पुशीते....वर व्हठानं हशीते..सई बाई ॥
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुरेख ....... किती ह्रदयस्पर्शी आणि अस्सल जात्यावरच्या ओव्या....