सरकारी वाहिन्या आणि गरिबी

Submitted by विजय देशमुख on 2 February, 2014 - 21:45

कित्येक वर्षांनी दुरदर्शनची एखादी मालिका बघितली - माझी शाळा. खरं तर ही मालिका बघण्याची इतकी उत्सुकता होती, की एकाचवेळी ५-६ भाग बघितले, आणि आवडलेही... पण....

काही गोष्टी फारच खटकल्या, ज्या बहुदा सर्वच सरकारी वाहिन्यांत खटकतात. प्रत्यक्ष दुरदर्शनवर ही मालिका सादर होतांना सुरुवातीचा कूsssssक असा आवाज येतो का? तो बहुदा संकलकासाठी किंवा कार्यक्रमाचे प्रक्षेपण सुरु करणार्‍या तंत्रज्ञासाठी असावा, पण मग तो प्रेक्षकांच्या माथी कशाला? याच मालिकेतील शाळेची प्रार्थना आणि त्या अनुषंगाने पहिला तास असण्याची एक सुचकता ज्या दृष्यांतुन येते, तिथे अतिशय संथ संकलन... आणि प्रत्येकवेळी 'मुक्त शिक्षण केंद्राची' काळी पांढरी पाटी.
शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अनेक मालिका आल्या, पण दुरदर्शनवर आलेल्या शाळा नेहमी गरीबच का दिसतात? का वास्तव दाखवण्याच्या नादात चांगल्या शाळा आहेत, हे विसरले गेलेय का?

कोणताही सण आला की मुंबई दुरदर्शन (सह्याद्री?) वर सामुहिक गायन प्रकार असायचा, त्यातल्या गायक-गायिकांची वेशभुषा, आणि तिथला गालिचा, किती वर्षाचा तसाच आहे, देव जाणे. खरं तर दुरदर्शनवरील कित्येक कार्यक्रम दर्जेदार होते. {आताचे माहिती नाही} पण काहिंचा अपवाद वगळता, इतर कोणतेही कार्यक्रम डीव्हीडीच्या माध्यमातुन किंवा यु-ट्युबच्या माध्यमातुन बाहेर आले नाहीत. जिथे इतर वाहिन्यांचे जवळजवळ ५०%हुन अधिक मालिका पुन्हा पुन्हा बघता येतात, तिथे ही लोकं इतकी उदासीन का?
यांचेच मोठे (वयाने) भावंड म्हणजे आकाशवाणी. आजही आकाशवाणीवरील कित्येक कार्यक्रमाची नुस्तीच आठवण निघते. मग नागपुर आकाशवाणीवरिल रविवारचा खास छोट्या दोस्तांकरता असलेला गोविंद गोडबोलेंचा कार्यक्रम 'बालविहार' असो, किंवा मुंबईचा 'बालदरबार".... कुठे आहेत ह्यांच्या ध्वनीफिती? इतरही कित्येक कार्यक्रम असतील, आपण पुढच्या पिढिलाही 'तोच' आनंद देउ शकतील... मग तो फास्टर फेणे असो किंवा चिंगी, अजुनही ऐकायला आवडतील, पण .....
तीच कथा बालचित्रवाणीची. केवळ चांगला कथा/कविता, पुस्तके, सीडीज तयार करुन ठेवणे, इतकच आपलं काम आहे, असा यांचा समज असावा. मार्केटींग शुन्य. पुण्याच्या बाहेर (आणि खुद्द पुण्यातही) बालचित्रवाणी नेमकं काय करते, त्यांचे काय उत्पादने आहेत, विकायला आहेत का?, याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. त्यातल्या काही व्हिडीओज/प्रोमोस बघितले, ते बघुनच ह्या सिडीज घेऊ(च) नये, असे वाटले. इतके संथ आणि कंटाळवाणे, खरच विद्यार्थ्यांना आवडेल का? नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी यांच्या तुलनेत, ह्या डॉक्युमेंटरिज म्हणजे किस झाड की पत्ती....
पण हे सगळं त्यांना कळेल का? की आमच्या गावचा रेशन दुकानदार जसा आमच्यावर उपकार करायला दुकान उघडतो, तसच यांचं आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या शेवटच्या वाक्यातच उत्तर दडलेल आहे.
कलाकार्/ब्याक्स्टेज कलाकार जीव ओतुन कामे करुन जातात पण शेवटी ...... जाऊद्या हो. नाही बोलवत तेच ते सारखे सारखे.