उत्तरे शोधू नका प्रश्नात माझ्या..

Submitted by अनिल आठलेकर on 2 February, 2014 - 04:05

सांगतो सारे जरी शब्दांत माझ्या,
उत्तरे शोधू नको प्रश्नांत माझ्या.....!

सोबती आहेस तू,विश्वास आहे,
राहुदे माझे मला कोषात माझ्या....!

नाव या ओठी तुझे आले खरे,पण,
भाव होता भाबडा डोळ्यांत माझ्या...

मी भरारी घेतली आता कुठेशी,
हरवले आभाळही पंखात माझ्या....!

ठेवले ओलीस मी आयुष्य माझे,
आसरा मागू नको हृदयात माझ्या...!

एवढी ऐपत कुठे माझी सुखांनो,
नेहमी येऊ नका स्वप्नांत माझ्या....!

~ अनिल आठलेकर..
सोमवार,20/01/2014

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच रे !!
सगळे शेर जमून आले आहेत अजून छान जमवून आणता आले असते तुला पण असो आहे ते छानच आहे मला सगळे शेर आवडले पण हृदयात माझ्या हा जास्त आवडला
भाबडा भाव मध्ये राबता मला परफेक्ट वाटला नाही (वै म) तो भाव भाबडाच का असा प्रश्न पडला अजून दुसरा नेमका भाव आणता आला असता का तुला ..शेरात बरका ..(बाकी तू भाबडा आहेस म्हणून तुला तोच शब्द सुचला असणार असेही वाटले ;)) असो.....विचार करच
तांत्रिक मुद्दा असा की मतल्यातील दोनही ओळींत काफियांवर अलामतीच्या जागी अनुस्वार आहे पहा तो अनुस्वारच मग गझलेची अलामत ठरावी असे वाटते
त्या अनुस्वारा.. (आं) ..च्या जागी आ ही सूट मानतात काहीजण मलातरी हे योग्य वाटत नाही पण तुझा तू विचार कर
शुभेच्छा!!

अमुल्य << अमूल्यवरून आठवले ..अमूलची मस्तानी असते का रे (नसली तरी दुसरी कुठली पाजलीस तरी चालेल :))
(बाकी तुझ्याकडून फक्त मस्तानीचीच अपेक्षा ठेवू शकतो हा एक फार मोठा प्रॉब्लेमच आहे बघ !! :हाहा:)

सगळे शेर आवडले अनिलजी...

मी भरारी घेतली आता कुठेशी,
हरवले आभाळही पंखात माझ्या....!

आणि शेवटचा खूप आवडला..

धन्यवाद....

मस्त!!! सगळीच गझल आणि वापरलेलं वृत्तसुद्धा... छान बसलंय.
सगळेच शेर आवडले.

मस्त