सिरींजमध्ये दडलेला मृत्यू !

Submitted by SureshShinde on 31 January, 2014 - 14:39

सिरींजमध्ये दडलेला मृत्यू!

syringe.jpg

26 डिसेंबर 2004:

श्रीलंकेच्या इतिहासातील एक काळाकुटृ दिवस ! गेल्या शंभर वर्षांतील सर्वांत मोठी व जीवघेणी "सुनामी'' याच दिवशी श्रीलंका बेटाच्या किनाऱ्यावर येऊन धडकली. त्यानंतरचे दोन दिवस साक्षात मृत्युनेच तेथे थैमान घातले. अपरिमित जिवीतहानी, वित्तहानी, तर झालीच पण या छोट्या बेटाची सुव्यवस्था, शासकीय यंत्रणा, आरोग्यसेवा यांवरही प्रचंड ताण आला. थोड्याच दिवसात जगातील हजारो सुहृदांनी पाठविलेल्या मदतीची दुसरी "सुनामी" श्रीलंकेत येऊन धडकली. त्यात होते "रुग्णोपयोगी साहित्य, औषधे, प्रतिबंधक लसी, आणि वैद्यकीय उपकरणे'' हे सर्व साहित्य एवढ्या मोठ्या प्रमाणात आले की, "देता घेशील किती दो करांनी?'' अशी विचित्र अवस्था श्रीलंकेमध्ये निर्माण झाली. हे साहित्य ठेवण्यासाठी गोदामे अपुरी पडली व पर्यायी साठवण व्यवस्था करताना शासकीय यंत्रणेला अक्षरश: नाकी नऊ आले. समुद्रसानिध्दय, धो धो पडणारा पाऊस, गळणारी छपरे, व त्यातच साठविलेली वैद्यकीय साधनसामग्री, यामुळे साहजिकच वातावरण झाले कुबट-कुजकट व त्यातूनच "सजला रंगमंच' एक कुविख्यात "सिरींज कांडा''साठी !

21 जून 2005 :

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे वैद्यकीय प्रशिक्षण देणाऱ्या मोठ्या सरकारी प्रसूती रुग्णालयांपैकी "डीएमएच' हे एक प्रमुख रूग्णालय. शिरोमी नावाची एक बावीस वर्षीय सिंहला तरुणी प्रसूतीपूर्व वेदनांमुळे डीएमएच मधील तीन नंबर वॉर्डमध्ये भरती झाली. सामान्य प्रसूती होत नाही असे पाहून प्रसूतीतज्ञांनी पोटावर शस्त्रक्रिया करून म्हणजेच 'सिझेरीयन' करून बाळाची प्रसूती करण्याचे ठरविले. 'डीएमएच' मध्ये भूलसेवा देणारे डॉक्टर्स त्यांच्या कामात निष्णात होते. त्यांनी नेहमीप्रमाणेच कंबरेखालील भाग बधीर करून म्हणजेच 'स्पायनल ऍनेस्थेशिया' देऊन शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. जसे दुखरा दात काढताना भूलीच्या औषधांचे इंजेक्शन हिरडीला दिले जाते तसेच या कंबरेखालील भूलीसाठी भूलीचे औषधाचे इंजेक्शन दोन मणक्यांच्या मधील जागेतून देऊन मज्जारज्जू व मज्जातंतू तात्पुरते बधीर केले जातात. आपला मेंदू हाडांच्या कवटीमध्ये तर मेंदूची शेपटी, मज्जारज्जू, ही मानेपासून ते कंबरेपर्यंत तेहतीस मणक्यांच्या पोकळीमध्ये सुरक्षित असतात. त्यांच्या भोवती जी संरक्षक आवरणे असतात त्यांना म्हणतात 'मेनिंजेस'. मेंदू व मेनिंजेस यांच्या मधील पोकळीत एक प्रकारचा द्रवपदार्थ असतो त्याला मेंदूजल अथवा 'सीएसएफ' म्हणतात. कंबरेखाली भूल देताना याच पोकळीचा छेद करून अथवा 'लंबर पंक्चर' करून आतील मेंदूजलामध्ये भूलीच्या औषधाचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन देताना पेशंटला या इंजेंक्शनद्वारा जंतुंचा संसर्ग होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरणाची खूपच खबरदारी घेतली जाते. अन्यथा रुग्णाला संसर्ग होऊन मेनिंजायटीस नावाचा आजार होण्याची शक्यता असते. सध्याच्या प्रगत भूलतंत्रामुळे अशा चिकित्सकजन्य-संसर्गाची शक्यता जवळजवळ नसतेच.

22 जून 2005 :

डीएमएच शस्त्रक्रिया गृहामध्ये शिरोमीची 'सिझेरीयन' शस्त्रक्रिया यशस्वीरित्या होऊन तिला कन्यारत्न प्रसूती झाली. बाळ बाळंतीण सुखरूपपणे वॉर्ड क्रमांक तीनमध्ये परतले. एक आठवड्यात शिरोमी व तिचे बाळ 'बिमसारा' यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळून ते दोघे आपल्या घरी परतले.

घरी पोहोंचल्यावर सुरू झाले शिरोमीचे दुसरे आजारपण ! तिला ताप येऊ लागला, घणाघाती डोकेदुखी, मानदुखी सुरू झाली. पोटात अन्नाचा कण राहात नव्हता, सतत उलट्या होऊ लागल्या. चक्कर येऊ लागली. दृष्टीवर परिणाम झाला. प्रकाश सहन होईना. ती सतत हातपाय पोटाशी धरून पडून राहू लागती. वडीलधाऱ्या मंडळींना शिरोमीची लक्षणे पाहून काळजी वाटल्याने त्यांनी तिला तातडीने पुन्हा 'डीएमएच' मध्ये नेले. तेथील ड्यूटी डॉक्टरांनी शिरोमीला तपासले व 'मेनिंजायटीस' ची शक्यता व्यक्त करून तिला 'सेप्टीक वॉर्ड' मध्ये दाखल करून घेतले व मेडिसिन विभागातील तज्ञ डॉक्टरांना पाचारण केले.

मेडिसिन तज्ञ डॉक्टरांनी शिरोमीचे निदान करण्यासाठी 'लंबर पंक्चर' म्हणजेच 'एलपी' करून मेंदूजलाचा नमुना तपासण्याचे ठरविले. तिच्या कंबरेतील दोन मणक्यांमधील जागेमध्ये सुई घालून 'मेंदूजल' काढत असतानाच डॉक्टरांच्या लक्षात आले की आतील मेंदूजलाचे प्रेशर वाढले आहे व एरवी स्वच्छ पाण्यासारखे दिसणारे मेंदूजल गढूळ पाण्यासारखे झाले आहे. अपेक्षेप्रमाणेच या मेंदूजलाचा प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल सांगत होता की शिरोमीला संसर्ग झाला आहे, अर्थात मेनिंजायटीस झाला आहे. शिरोमीवर ताबडतोब उपचार सुरू झाले. मेंदूजल तपासणीचा एक हिस्सा त्यातील जंतूची कृत्रिमरित्या वाढ करून त्यात कोणते जंतु आहेत व ते कोणत्या औषधाने मरतील याचा शोध घेण्यासाठी अर्थात 'कल्चर' टेस्टसाठी पाठविला गेला . तो अहवाल येईपर्यंत शिरोमीला सर्वसमावेशक प्रतिजैविकांचा अर्थात 'ब्रॉडस्पेक्ट्रम ऍटीबायॉटिक्स' चा उपचार सुरू करण्यात आला.

15 जुलै 2005 :

शिरोमीचे उपचार चालूच होते. तेवढ्यात आणखी एक तरुणी दाखल झाली डीएमएच मध्ये तर एक दुसरी झाली दाखल नॅशनल हॉस्पीटलमध्ये! दोघींनाही झाला होता 'मेनिंजायटीस', दोघींचेही 'सिझेरीयन' झाले होते व तेही 'डीएमएच' मध्येच आणि शस्त्रक्रियेची तारीख होती 21 व 22 जून 2005 ! आता मात्र डीएमएच मधील डॉक्टर्स चांगलेच हादरले. ही बातमी लवकरच वर्तमानपत्रांपर्यंत पोचली व 'सरकारी रुग्णालय, सिझेरीयन व मेनिंजायटीस' अशी गरमागरम बातमी पहिल्याच पानावर प्रसिद्ध झाली. आरोग्य खाते व श्रीलंका सरकार हळूहळू जागे होऊ लागले. महीनाअखेरपर्यंत आणखी दोन सिझेरीयन रुग्ण डीएमएच मध्ये तर आणखी दोन इतर रुग्णालयांत दाखल झाले. मात्र काही रुग्णांचे सिझेरीयन इतर सरकारी रुग्णालयात झाले होते. त्यामुळे संसर्गाच्या संशयाचा केंद्रबिंदू डिएमएच ऑपरेशन थिएटर नसून बधीरीकरणासाठी वापरली जाणारी उपकरणे म्हणजे सिरींजेस व सुया असण्याची शक्यता बळावली. या सिरींजेस व सुयांचा सरकारी भांडारातून पुरवठा झाल्यामुळे संशयाची सुई सरकारी वितरण व्यवस्थेकडे वळू लागली. एव्हाना वृत्तपत्रांनी 'सिरींजकांड' प्रकरणावर रकाने भरण्यास सुरूवात केलीच होती.

इकडे शिरोमीची तब्बेत दिवसेंदिवस बिघडतच चालली होती. तिचा आजार कोणत्याही औषधाला दाद देत नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या मेंदूजल तपासणीमध्ये कुठलेही बॅक्टेरीया जंतु सापडत नव्हते. शिरोमीला आता 'झटके' म्हणजे फिट्स येऊ लागले होते. तिच्या मेंदूचा काही भाग निकामी होत चालला होता. अखेर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना अपयश येवून 2 ऑगस्ट 2005 रोजी शिरोमीने इहलोकीचा निरोप घेतला. नियमाप्रमाणे शिरोमीचे शवविच्छेदन झाले. व त्याचा अहवाल पाहून संपूर्ण वैद्यक विश्र्व स्तंभित झाले. शिरोमीला झाला होता संसर्ग एक बुरशीचा ! या बुरशीचे नाव होते, 'ॲस्पर्जिलस फ्युमिग्याटस' ! शिरोमीच्या मेंदूचे नमुने 'हू' या आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना व सीडीसी या अमेरीकन संसर्गजन्य आजार संस्थाकडे पाठविण्यात आले.

तीन ऑगस्टपासून उरलेल्या इतर बुरशीबाधित रुग्णांना 'ऍम्फोटेरीसिन बी', हे बुरशीनाशक ॲन्टीबायॉटीक औषध सुरू करण्यात आले. ही साथ 'फंगस मेनिंजायटीस' ची असल्याने सरकारी सूत्रांनी मान्य केले. श्रीलंकेच्या मा.अध्यक्ष महोदयांनी या साथीची दखल घेऊन त्याची कारणे शोधण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली. डब्ल्यू.एच.ओ.व सी.डी.सी.येथील तज्ज्ञांची पथके श्रीलंकेमध्ये येऊन दाखल झाली. आतापर्यंत एकूण चौदा रुग्णांना बुरशीचा संसर्ग झाला होता. आठ जणींना सिझेरीयन करताना तर इतरांना बधीरीकरण करताना अथवा रक्ताच्या कर्करोगाची औषधे मेंदूजलामध्ये सोडताना संसर्ग झाला होता. जास्त प्रमाणात बुरशी संसर्ग झालेल्या रुग्णांना अनेक दिवस अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. नेहमीच्या बुरशीनाशक औषधाचा गुण न आल्यामुळे 'व्होरीकोनाझोल' हे नवीन महागडे ॲन्टीबायॉटीक औषध श्रीलंका सरकारने आयात करून या रुग्णांना दिले. चौदापैकी चार रुग्ण दगावले तर ज्यांना नवीन औषध मिळाले ते सर्वजण वाचले. मात्र त्यातील काहींना कायमचे अंपगत्व आले.

अध्यक्षीय समितीच्या अहवालाप्रमाणे बुरशी संसर्गाचे कारण शोधण्यासाठी हजारो सिरींजेस, सुया, भूलीच्या औषधांच्या कुप्या इत्यांदीची 'कल्चर' टेस्ट करण्यात आली. त्यापैकी त्रेचाळीस सिरींजेस मध्ये 'ॲस्पर्जिलस फ्युमिग्याटस' बुरशीचे जंतु सापडले. सुनामीनंतरचे देणगी मिळलेले साहित्य ठेवण्यासाठी जुने गळणारे गोदाम वापरण्यात आले व त्या दमट हवेमुळेच सिरींजेसमध्ये बुरशी वाढली होती, चार दिवस उघड्या हवेत राहिलेल्या बुंदीच्या लाडवावर येते तशीच ! अशाच शिळ्या ब्रेडच्या तुकड्यावर उगवलेल्या पण एका वेगळ्या प्रकारच्या बुरशीतूनच महान ॲलेझांडर फ्लेमिंगने पेनिसिलिन हे क्रांतिकारक औषध शोधले होते. पण ही बुरशी मात्र मानवांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास फुफ्फुसांचा जीवघेणा आजार निर्माण करते.

तज्ञ समितीच्या अहवालानंतर औषध कंपन्या, सिरींजेस उत्पादक, भूलतज्ञ डॉक्टर्स या सर्वांनीच सुटकेचा निश्र्वास सोडला, आरोग्य खात्याने सुमारे पंधरा लाख प्लॉस्टीकच्या डिसपोझेबल सिरींजेस जाळून नष्ट केल्या व श्रीलंकेला हादरवून सोडणारी "सिरींजमधील सुनामी' एकदाची संपली.

=================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उकळून वापरलेली सिरींज बाळासाठी सेफ आहे.>> उकळुन घेतली तरी त्यातल्या प्लास्टीक वर परिणाम होउन ते जाईल ना पोटा मधे?

Pages