ही आणि ती!
ही! एका शिंप्याची मुलगी! खरे तर शिंपीही नाही तो! फक्त फाटलेले कपडे कसेबसे शिवून द्यायचा! बायको जमीन सारवायची. संध्याकाळी जे पैसे घरात येतील त्यातून जमेल ती भाजी आणायची. तक्रार म्हणून नाही. काही वेळा उपास! उपास झाला की 'ही'ला समजावण्यात येत असे. आज आपल्या बाबांना काही नाही मिळाले बाळा, उद्या मिळेल हां? उद्या मिळाले की काहीतरी खाऊयात! आत्ता पाणी पिऊन झोप! 'ही'! झोपायची तशीच! तक्रार नाही. आपला बाबा गरीब आहे ह्याची जाणीव!
'ती'!
'ती'ला लहानपणापासून आरामच आराम! श्रीमंतीत लोळणारी 'ती'! शाळेत जायचे म्हणजे वकीलसाहेबांची मुलगी म्हणून जायचे. शिक्षकही दबकून! कोण जाणे उद्या कोणावर कोणती वेळ येईल? मालेगावात वकील किती? आणि त्यातही नावाजलेले? एकच!'ती'चे वडील! त्यांच्याकडे केस सोपवली की केस आपली! विषय संपला.
ही आणि ती!
एकाच शाळेत!
रोज शेजारी बसायच्या. त्यांना काय माहीत? आपला बाप वकील आहे की शिंपी? आपल्या बापाला मालेगाव घाबरते की मालेगावाला आपला बाप?
बिच्चार्या मैत्रिणी!
ही! शिंप्याची मुलगी! एक दिवस कौतुकाने हातात हिरवा चुडा भरून आली. आईने हिरव्या बांगड्या कौतुकाने भरल्या होत्या हातात. उगाचच! कौतुकाने! कसेबसे पैसे जमवून! अगदी सावळ्या सावळ्या कोपर्यापर्यंत हिरव्या बांगड्या!
आणि 'ती'! दोनच बांगड्या मनगटांत! नेमक्या त्याच दिवशी! दोनच! पण सोन्याच्या! पिवळ्याधमक!
दोन मैत्रिणी एकमेकींकडे बघतायत! की ही आणि ती किती सुंदर दिसते! 'ही' किती सुंदर दिसते हिरव्या बांगड्या घालून! 'ती' किती गोरी दिसते 'पिवळ्या' बांगड्या घालून!
क्षणभरच! क्षणभरच दोघींना वाटले की बांगड्या बदलाव्यात! एक्स्चेंज कराव्यात!
ऑफर केली गेली. 'ही'कडून नव्हे, 'ती'कडून!
'ती'ने ऑफर केली, 'तुझ्या हिरव्या बांगड्या घालून मी माझ्या घरी जाऊन दाखवू?'
'ही' म्हणाली. 'पण मग...... मला विचारतील ना की बांगड्या कुठे गेल्या हिरव्या?'
'ती' म्हणाली......'ह्या माझ्या पिवळ्या घे ना? एकच दिवस'
'ही' म्हणाली...... 'उद्या देशील ना परत माझ्या हिरव्या बांगड्या?'
'ती' म्हणाली......'होय'!
मग अदलाबदल झाली.
'ती' घरी आली. हिरव्या बांगड्या गोर्यापान कोपरांपर्यंत! चळचळ, सणसण आणि खनखन असे अनेक आवाज! लक्ष? लक्ष कोणाचेच नाही. आज 'ती'ने बहुधा हिरव्या बांगड्या घातलेल्या दिसतायत! इतकंच! सकाळी सोन्याच्या दोन बांगड्या होत्या हेच कोणाला आठवत नाहीये, 'ती'च्या आईलाही!
आणि वाड्यावर हाका!
"ओ आशाताई, ओ आशाताई, ओ बाहेर या हो आशाताई"
बघतात तर! 'ही'ला रस्त्यातून बडवत बडवत तिची आई 'ती'च्या वाड्यावर आलेली! म्हणते कशी?
"माझी 'ही' पायरी ओलांडून गेली बघा! माफी द्या! इतकं मारलंन तिला की आता पुन्न्हा नाही अशी वागायची! ह्या घ्या तुमच्या सोन्याच्या बांगड्या'
खूप मार खाल्ल्यामुळे ओक्साबोक्शी रडणारी 'ही' अनभिज्ञ चेहरा करून उभ्या असलेल्या 'ती'ला बघत होती.
दोघींच्या बांगड्या पुन्हा 'एक्स्चेंज' झाल्या.
पण......हे सगळे बघून डोळ्यातून पाणी आले यार!!!!!!
=======================================
-'बेफिकीर'!
जितकि साधि तितकिच सुंदर छोटी
जितकि साधि तितकिच सुंदर छोटी कथा. आवडली. पण बिचारी "हि" ला उगाच फटके पडले
होत असं त्या अजाण वयात
होत असं त्या अजाण वयात ब-याचदा, मी ही आईच ड्ब्यात ठेवलेल खर
मंगळसूत्र देवू ़़केल होत मैत्रिणीच्या बाहुलीला .
मस्त मांड्लीय !
आवडली, टचिंग.
आवडली, टचिंग.
मस्तच.. दोन निरागस जीव छान
मस्तच.. दोन निरागस जीव छान मांडलेत
जितकी साधी तितकिच सुंदर छोटी
जितकी साधी तितकिच सुंदर छोटी कथा. आवडली. पण बिचारी "हि" ला उगाच फटके पडले +१
आवडली.
आवडली.
अं हं ...काही खास वाटली नाही
अं हं ...काही खास वाटली नाही बुवा ही कथा !
धन्यवाद सर्वांचे (ही सत्यकथा
धन्यवाद सर्वांचे
(ही सत्यकथा आहे)
मला वाटलंच सत्यकथा असावी,
मला वाटलंच सत्यकथा असावी, त्या मार खाणाऱ्या छोटीसाठी खूप वाईट वाटले.
मला वाटलंच सत्यकथा असावी,
मला वाटलंच सत्यकथा असावी, त्या मार खाणाऱ्या छोटीसाठी खूप वाईट वाटले.>+१
(No subject)
त्या मार खाणाऱ्या छोटीसाठी
त्या मार खाणाऱ्या छोटीसाठी खूप वाईट वाटले.>+१
खूप निरागस असतं ते वय..
सत्यकथा आहे हे कळल्यावर खूप
सत्यकथा आहे हे कळल्यावर खूप वाईट वाटलं ही साठी.
खूप छान लिहिलेय
मस्त!
मस्त!
छान
छान