भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स

Submitted by अतुल ठाकुर on 25 January, 2014 - 22:00

the-matrix-13-300x200.jpg

मेट्रीक्स चित्रपट पाहताना पौर्वात्य मनाला ओळखिचे काहीतरी जाणवत असते. त्यातही आपण भारतीय मंडळी तर पटकन आपल्या अध्यात्मातील दाखले देऊन चित्रपटाशी असलेले भारतीय तत्वज्ञानाचे साम्य दाखवु लागतो. साम्य पाहायला गेले तर आहेच यात शंका नाही. मात्र ते पाहताना विरोध कुठे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तरच या विषयाचा नीट मागोवा घेतल्यासारखे होईल. साम्य पाहण्याच्या नादात विरोधाकडे बहुतेकांचे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते. या लेखात साम्य व विरोध या दोन्हींचा परामर्ष घेण्याचा विचार आहे.

निओ हा एक सर्वसाधारण घोळक्यापेक्षा वेगळा तरुण ज्याला या जगात कुठेतरी काहीतरी चुकते आहे याची जाणीव आहे. आणि त्यासाठी या जगाचे मुळ काय याच्या शोधात तो आहे. त्याला मॉर्फियस भेटतो. तो त्याचा गुरु बनुन त्याला जगाचे जे मूळ “मेट्रीक्स” त्याचे दर्शन घडवतो. हे करतानाच मॉर्फियसची अशी श्रद्धा आहे की निओ हाच जगाचा भविष्यातील तारणहार आहे. मॉर्फियसच्या मार्गदर्शनाखाली निओचे शिक्षण सुरु होते. पुढे प्रसंगवशात निओला आपल्यातील ताकदीची जाणीव होते. तो यंत्रांशी, ज्यांच्या ताब्यात आजचे जग आहे, युद्ध करतो आणि जगाचा सर्वनाश टाळतो. हे करत असतानाच मॉर्फियसकडे असलेल्या ट्रीनिटी या त्याच्या स्त्री सहकारीचे निओवर प्रेम जडते. दोघे मिळुन यंत्राशी शेवटचे युद्ध खेळतात आणि जिंकतात. मी सांगितलेला कथेचा गोषवारा त्रोटक आहे. तो पुरेसा नाही याची मला जाणीव आहे. तरीही ज्या विषयाचे विवेचन करायचे आहे त्यासाठी इतपत उल्लेख पुरे आहे असे मला वाटते.

आपले अध्यात्म यावर काय म्हणेल? निओ हा मोक्षेच्छु तरुण आहे. जगाचे कारण काय या आदिम प्रश्नाच्या शोधात आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही. जोपर्यंत निओची तयारी होत नाही मॉर्फियस त्याला भेटतच नाही. शिष्याची पुरेशी तयारी झाल्यावर गुरु आपोआप भेटावा त्याप्रमाणे निओची मॉर्फियसशी भेट घडते आणि त्याला मोक्षाचे दार खुले होते. गुरुगृही शिक्षण व्हावं त्याप्रमाणे मॉर्फियस त्याला तयार करायला घेतो. गुरुला शिष्याचे भूत, भविष्य, वर्तमान सारेकाही माहीत असते त्यामुळे निओकडुन जगाचा सर्वनाश टाळ्ला जाणार आहे याची माहिती मॉर्फियसला अगोदरच असते. प्रकृती आणि पुरुष या सांख्य तत्वज्ञानातील निराकार पुरुष म्हणजे निओ आणि साकार प्रकृती किंवा माया म्हणजे मेट्रीक्स याची जाणीव मॉर्फियस निओला करुन देतो. तो क्षण समाधीचा, ज्ञानाचा, स्वतःला ओळखण्याचा, मोक्षाचा, मुक्तीचा असा असतो. मी कोण या आदिम प्रश्नाचा उलगडा निओला होतो आणि तो आपल्या सामर्थ्याद्वारे जगाचा नाश टाळतो.

हा दृष्टीकोण पाहिल्यावर जेव्हा पारंपरिक भारतीय अध्यात्माशी आपण याचा सांधा जोडु लागतो तेव्हा अनेक अडचणी उद्भवतात. जर आपल्याला भारतीय अध्यात्माचा याचित्रपटाशी संबंध दर्शवायचा असेल तर चित्रपटातील दोन प्रमुख पात्रं वगळावी लागतील याची जाणीव फार थोड्यांना असेल. आपल्याकडे मोक्ष मिळवणार्‍यांचे सारे विकार, वासना शमलेल्या असतात. त्यानंतर त्यावाटेवर साधना सुरु होते. त्यामुळे सर्वप्रथम ट्रीनिटीला वगळावे लागेल. आपल्या अध्यात्मात स्त्रीप्रवेश अशक्य. त्यातही मुक्त झालेल्या पुरुषाला स्त्रीची मदत घ्यावी लागणे म्हणजे फारच झाले. आणि त्यानंतर मोक्ष मिळालेल्या पुरुषाने स्त्रीसंग किंवा प्रणय करणे ही सर्वथैव अशक्य गोष्ट. त्यामुळे मोक्षाच्या वाटेवर असलेल्या निओला भारतीय अध्यात्माप्रमाणे स्त्रीसंग वर्ज असल्याने ट्रीनिटीचे अस्तीत्व येथे शक्य नाही.

दुसरे वगळावे लागेल असे पात्र म्हणजे खुद्द मॉर्फियस. हे वाचुन काहींना धक्का बसेल पण नाईलाज आहे. शिष्यापेक्षा दुर्बळ गुरुची कल्पना भारतीय अध्यात्मात नाही. आपल्या अध्यात्माची कुठलीही शाखा अशी मांडणी मंजुर करणार नाही. आपल्याकडे गुरु हा नेहेमी वरचढच असतो. कदाचित वर्ण व्यवस्थेमुळे तो स्वतः युद्ध करत नसेल पण शिष्याला सारी विद्या शिकवतो. शिष्य विद्येचा गर्व वाहु लागल्यास त्याचा मद झटक्यात उतरविण्याचे सामर्थ्य आपल्याकडल्या गुरुंत असते. चित्रपटात मॉर्फियस दुबळा दाखवला आहे. मग तो निओला ज्ञान कसे काय देणार? एका आंधळ्याने दुसर्‍या आंधळ्याला वाट दाखवण्याचाच हा प्रकार. त्यामुळे आहे त्या स्वरुपात मॉर्फियस आपल्या परंपरेत मंजुर होणार नाही. विरोधाची स्थळे आणखि अनेक आहेत पण तुर्तास इतकेच पुरे.

साम्य स्थळ शोधायचं म्हटलं तर मुळात जे तंत्र मेट्रीक्स चित्रपटात दाखवलं आहे ज्यात मनाच्या सामर्थ्याने सार्‍या गोष्टी घडताना दाखलेल्या आहेत, ते माझ्या समजुतीप्रमाणे योगवशिष्ठाच्या जवळ जाणारे आहे. ही सर्व माणसं मनाच्या सामर्थ्याने पृथ्वीवर जातात. तेथे अचाट कामे करतात. आकाशात उडतात, एका इमारतीवरुन दुसर्‍या इमारतीवर उडी मारतात. फार काय हवं ते शस्त्र काही सेकंदात मिळवतात. त्याचवेळी त्यांचे देह मात्र दुरवर कुठेतरी यानात विशिष्ट यंत्राला जोडुन पहुडलेले असतात. शरीर आणि मनाचा संबंध अतीव निकटतेचा आहे. पृथ्वीवरील त्यांची प्रतिमा ठार मारली गेली तर ते प्रत्यक्षातदेखिल मारले जातात कारण मनाशिवाय शरीराचं अस्तित्व नाही. याउलट यानातल्या यंत्राशी संबंध तोडल्यासही ते मॄत्यु पावतात कारण शरिराशिवाय मनाचेही अस्तित्व नाही. गुहेत ध्यानाला बसलेला योग्याने मनाच्या सामर्थ्याने वस्तु निर्माण करावी तशातलाच हा प्रकार आहे. याबाबत योगवशिष्ठ काय म्हणते ते पाहु. त्यासाठी योगवशिष्ठातली इंदु ब्राह्मणाची गोष्ट सांगायला हवी.

मुनी वशिष्ठ रामाला उपदेश करताना म्हणतात.” मन हेच जगत आहे. हे जे काही समोर दिसत आहे त्याला खरोखर काहीच अस्तित्व नाही. मनानेच या वस्तु निर्माण केल्या आहेत. तुला आता मी जी गोष्ट सांगेन त्यामुळे तुला मनाच्या अचाट सामर्थ्याचा अंदाज येईल. तुला लक्षात येईल कि मनाने एखादी गोष्ट ठामपणे ठरवली कि ती प्रत्यक्षात येते. प्राचिन काळी ब्रह्मदेवाला सकाळी झोपेतुन उठल्यावर पुन्हा नवीन सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली. परंतु त्याने अगोदरच निर्मिती झालेली पाहिली आणि नवलाने त्यानिर्माण झालेल्या जगतातील एका सुर्याला यानिर्मितीचे मूळ विचारले. तेव्हा तो सूर्य म्हणाला….जंबुद्विपात राहणार्‍या इंदु नावाच्या ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने पुत्रप्राप्तिसाठी शिवाची उपासना केली. त्यांच्या कठोर तपस्येने संतुष्ट होऊन शिवाने त्यंना दहा श्रेष्ठ पुत्र होतील असा वर दिला. हे पुत्र पुढे महाज्ञानी झाले. आईवडील निवर्तल्यावर आपल्या आयुष्याचे ध्येय्य काय याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. संपूर्ण जगाचा राजा जरी झालो तरी ते प्रत्यक्ष भगवंतापेक्षा श्रेष्ठ नसणारच तेव्हा ज्याने विश्व निर्माण केले तो प्रत्यक्ष ब्रम्हदेवच बनणे इष्ट म्हणजे म्हणजे सर्व प्रकारच्या अमर्याद निर्मितीचा आनंद घेता येइल. हे ध्येय्य निश्चीत करुन हे दहा पुत्र पद्मासनात ध्यानाला बसले.आम्ही स्वतःच ब्रह्मदेव आहोत आणि हे विश्व ही आमचीच निर्मिती आहे असा विचार त्यांच्या मनात अखंड, अविरत होता.अशा तर्‍हेने अनेक कल्पे गेली आणि हे दहा जगत प्रत्यक्ष त्यांच्या मनातुन निर्माण झाले.या दहा जगतांचे दहा सूर्य आहेत आणि मी त्यातला एक सूर्य आहे.” जाणकारांना, ज्यांनी मेट्रीक्स बारकाईने पाहिला आहे त्यांना ही कथा वाचुन चित्रपटाशी तिचे साम्य काय हे मुद्दाम फोड करुन सांगण्याची आवश्यकता नाही. मनाद्वारे जगताची निर्मिती ही भारतीय अध्यात्मातील योग दर्शनात वारंवार येणारी संकल्पना आहे. मेट्रीक्स पाहताना मला जाणवलेले हे सर्वात महत्वाचे साम्य आहे.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेट्रिक्स मी पाहिला नाही
असो
आपण शेवटच्या पॅराग्राफमध्ये दिले ते विचार माझेही आहेत>>>मनाद्वारे जगताची निर्मिती

शिष्य विद्येचा गर्व वाहु लागल्यास त्याचा मद झटक्यात उतरविण्याचे सामर्थ्य आपल्याकडल्या गुरुंत असते. <<<<< स्वानुभवावरून १००%सहमत

एक गोष्ट पटत नाही प्रचंड असहमत आहे मी की...भारतीय अध्यात्माप्रमाणे स्त्रीसंग वर्ज !!<< असे काहीही नाही लोक फुकटचे गैरसमज करून घेतात ..असेलही आध्यात्मशास्त्राच्या एखाद्या शाखेत असे मानले गेले असेलही पण खरे पाहता आध्यात्मात काही विचारप्रवाह स्त्रीशिवाय पूर्णत्व नाही असे मानतात काहीतर शक्तीपूजकच आहेत
भारतीय आध्यात्म स्त्रीशिवाय अपूर्ण ...सृष्टीचा कर्ता पुरुष तर त्याची त्यानेच निर्माण केलेली स्त्री म्हणजे माया /प्रकृती होय ...हा पुरुष आणि माया मिळून जीवाला खेळवतात वेड्यात काढतात वापरून घेतात इत्यादी इत्यादी
मायेशिवाय पुरुषाला अस्तित्त्व असले तरी जाणवून येणे शक्य नाहीच असे मला वाटते ...अहो सिंपल आहे राव !शंकराला पार्वती विष्णूला लक्ष्मी कशाला असती मग ?

अजून एक गोष्ट !...एकं सत् हे मला पटते पण जगन्मिथ्या वगैरे मला पटत नाही ...विद्वानांनी असे भाष्य केवळ भावनेच्या आहारी जावून केले आहे असे माझे ठाम मत एखाद्या गोष्टीत रस उरला नाही ही अमुक गोष्ट भंकस वाटते (जसे आजकाल आमच्या गुरुदेवाना आमचे शेर कंप्लीट भंकस वाटतात ) अविश्वासार्ह्य वाट्ते वगैरे तिच्याबद्दल प्रेम उरले नाही की ती आहे काय नाही हाय अशी मनाची धारणा होते ..तस्श्याच मनोवस्थेत हे वाक्य उद्गारले गेले असावे ..कारण ह्या सगळ्या मनोव्यापाराना असत्त् म्हटले तर मनाला तरी सत् का मानायचे आणि त्या विठ्ठलालातरी ?

एक सिंपल लॉ़जिक आहे ... म्हणालो तर म्हणू ते आहे नाही म्हणालो तर काहीच नाही
असो ...विषय खूप खोलाचा आहे
थाम्बतो

अतुल ठाकूर,

लेख चांगला आहे. म्हणून काही वाक्यांवर टिप्पणी देत आहे.

१.
>> मोक्ष मिळालेल्या पुरुषाने स्त्रीसंग किंवा प्रणय करणे ही सर्वथैव अशक्य गोष्ट.

सहजावस्थेत असलेले संसारी स्त्रीपुरुष योगी आपापल्या जोडीदाराशी संग करून अपत्यांस जन्माला घालतात. अशी उदाहरणे आहेत. जुनं उदाहरण श्रीकृष्णाचं आहे.

२.
>> शिष्यापेक्षा दुर्बळ गुरुची कल्पना भारतीय अध्यात्मात नाही

खरा गुरू शिष्यादिच्छेत् पराजयम् (शिष्याकडून पराभव इच्छिणारा) असा असतो. गुरू शिष्याला त्याच्यासारखे बनवतात. त्यामुळे शिष्याचं एका गुरुत रूपांतर होतं.

श्रीरामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांना हात जोडून म्हणाले की साक्षात नर ऋषी असून लोकांच्या उद्धारार्थ आपण हा अवतार धारण केला आहे.

श्रीमत्स्येंद्रनाथ जेव्हा स्त्रीराज्यात विलासात अडकले होते तेव्हा त्यांचे पट्टशिष्य श्रीगोरक्षनाथ यांनी तिथून निघण्यासाठी आपल्या गुरूंना बोधून त्यांचं मन वळवलं होतं. या प्रसंगी श्रीमत्स्येंद्रनाथांना कीलोतळेपासून मीननाथ नावाचा मुलगाही झाला. तोही पुढे मोठा योगी झाला.

असो. बाकी, मनातून जगाची उत्पत्ती पटली! Happy

आ.न.,
-गा.पै.

गापै

प्रतिसादा बद्दल आभार,

सहजावस्थेत असलेले संसारी स्त्रीपुरुष योगी आपापल्या जोडीदाराशी संग करून अपत्यांस जन्माला घालतात. अशी उदाहरणे आहेत. जुनं उदाहरण श्रीकृष्णाचं आहे.

यात स्त्री योगी कोण?

श्रीरामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांना हात जोडून म्हणाले की साक्षात नर ऋषी असून लोकांच्या उद्धारार्थ आपण हा अवतार धारण केला आहे.

माझ्या आजवरच्या वाचनात विवेकानंदांपेक्षा रामकृष्ण दुर्बळ होते हे आलेले नाही.रामकृष्ण आई समजुन लहान मुलीच्याही पाया पडत असत,

श्रीमत्स्येंद्रनाथ जेव्हा स्त्रीराज्यात विलासात अडकले होते तेव्हा त्यांचे पट्टशिष्य श्रीगोरक्षनाथ यांनी तिथून निघण्यासाठी आपल्या गुरूंना बोधून त्यांचं मन वळवलं होतं. या प्रसंगी श्रीमत्स्येंद्रनाथांना कीलोतळेपासून मीननाथ नावाचा मुलगाही झाला. तोही पुढे मोठा योगी झाला.

तंत्र शाखेचा यालेखात विचार केलेला नाही. तेथे स्त्री ही अत्यावश्यक गोष्ट आहे.

आध्यात्मशास्त्राच्या एखाद्या शाखेत असे मानले गेले असेलही पण खरे पाहता आध्यात्मात काही विचारप्रवाह स्त्रीशिवाय पूर्णत्व नाही असे मानतात काहीतर शक्तीपूजकच आहेत

भारतीय अध्यात्माची तंत्र शाखा वगळता मुख्य प्रवाहातील तत्वज्ञानात स्त्रीचा विचार केला आहे काय?

मुख्य प्रवाहातील तत्वज्ञानात स्त्रीचा विचार केला आहे काय? >>. हो

आपण याज्ञवल्क, मैत्रेयी आणि कात्यायणी ह्यांचे संवाद वाचावे. इनफॅक्ट मैत्रेयीला ब्रह्मवदिनी असे देखील म्हणले जाते.

येस सर आणि त्यानंतर आध्यात्मातील मुख्य प्रवाहातच स्त्रीनिंदाही भरपूर केलेली आहे. मैत्रेयी, कात्यायनी यांची उदाहरणे निव्वळ अपवादात्मक आहेत.

मोक्षाकडे जाण्याच्या वाटेत स्त्री ही अडथळा आहे असे कित्येक ठिकाणी नमुद केलेले दिसेल.

मेट्रिक्स=जगन्मिथ्या वगैरे संबंध नेहमीच ओढूनताणून लावलेले वाटतात, त्यामुळे अशी काही तुलना होऊ शकते असे मला वाटत नाही. तरीही, लिखाण छान वाटले.

त्यामुळे अशी काही तुलना होऊ शकते असे मला वाटत नाही. >> +1

मोक्षाकडे जाण्याच्या वाटेत स्त्री ही अडथळा आहे असे कित्येक ठिकाणी नमुद केलेले दिसेल. >> हो पण तुमचा प्रश्न तो नव्हता. प्रश्न होता "मुख्य प्रवाहातील तत्वज्ञानात स्त्रीचा विचार केला आहे काय" तर उत्तर हो आहे.

लेख छान आहे, विचार करण्याजोगा. Happy
आधी गामापै यान्नी जे मुद्दे मान्डलेत तिथेच थोडी मतभिन्नता होते आहे. बाकी सर्व विषय अचूक मान्डलाय. किंबहुना म्या ट्रिक्स बघताना या लेखातीलच विचार मनात येत होते, अन अरे हे सर्व तर आपल्याला आधिच माहित आहे असेही भासत होते. असो.

>>>>>> आपल्याकडे मोक्ष मिळवणार्‍यांचे सारे विकार, वासना शमलेल्या असतात. त्यानंतर त्यावाटेवर साधना सुरु होते. त्यामुळे सर्वप्रथम ट्रीनिटीला वगळावे लागेल. आपल्या अध्यात्मात स्त्रीप्रवेश अशक्य. त्यातही मुक्त झालेल्या पुरुषाला स्त्रीची मदत घ्यावी लागणे म्हणजे फारच झाले. आणि त्यानंतर मोक्ष मिळालेल्या पुरुषाने स्त्रीसंग किंवा प्रणय करणे ही सर्वथैव अशक्य गोष्ट. <<<<<<
केवळ जन्माच्या चार अवस्था, जसे की बाल्यावस्था, गुरुकुली शिष्य असतानाची ब्रह्मचारि अवस्था, नन्तर गृहस्थाश्रमी व शेवटी सर्वसंगपरित्याग करुन सन्यास इतकेच गृहित धरले, तर वरील विवेचन योग्य ठरते, मात्र या चारी अवस्थांमधे व्यक्तिस मोक्ष शक्य आहे हे देखिल धर्म मान्य करतो, व त्यानुसार उपासनांचे विविध मार्ग दर्शवितो.

>>>>> शिष्यापेक्षा दुर्बळ गुरुची कल्पना भारतीय अध्यात्मात नाही. आपल्या अध्यात्माची कुठलीही शाखा अशी मांडणी मंजुर करणार नाही. आपल्याकडे गुरु हा नेहेमी वरचढच असतो. <<<<<
या पेक्षा जरा वेगळ्याशब्दात हेच मान्डले तर असेही दिसते की "बापापेक्षा बेटा सवाई" या चालीवर गुरुपेक्षा शिष्य बढकर, अन हे मान्य होते. अन गुरूच्या दुबळेपणाची साक्ष काढायचीच झाली, तर थोडे खणल्यावर उदाहरणे मिळतील, मला याक्षणी आठवत नाहीत.
गुरू श्रेष्ठच हवा अशा आग्रहापेक्षाही हिन्दू धर्म "गुरूला श्रेष्ठ माना, त्याचेपुढे नतमस्तक व्हा" अशी अपेक्षा व्यक्त करतो असे मला वाटते. गुरु श्रेष्ठ आहे कि शिष्य श्रेष्ठ या वादात पडले जात नसावे असे माझे मत.

मात्र बाकी तुमचा लेख खूप छान आहे, मायबोलीवरील व एकन्दरीतच समाजातील "बुप्रावाद्यान्च्या" गदारोळात वेगळा उठून दिसतो आहे असे माझे मत.

लेखाबद्दल धन्यवाद.

>>>>> मनाद्वारे जगताची निर्मिती ही भारतीय अध्यात्मातील योग दर्शनात वारंवार येणारी संकल्पना आहे. मेट्रीक्स पाहताना मला जाणवलेले हे सर्वात महत्वाचे साम्य आहे. <<<<< अनुमोदन.

सामान्य माणसाची सामान्य ध्येय/अपेक्षा/घटनांची आवश्यकता, त्यांचेच मनाद्वारे एकाग्र होऊन, त्यांचेकडूनच व्हावी याच हेतूने विविध पुजापाठ/जपजाप्यादिक कर्मे-कर्मकांडे करुन/करवुन घेताना जातकाचे मनात त्या त्या इच्छा आकांक्षांचा उगम परिपूर्णरितीने व्हावा ही अपेक्षा असते असे मला वाटते.

लेख नेहमीप्रमाणेच सुंदर...

स्त्रीला भारतीय अध्यात्मात प्रवेश नव्हता याला अध्यात्मिक जाण असण्याच्या क्षमतेपेक्षा सामाजिकरित्या मिळालेला खालचा दर्जा हा जास्त कारणीभुत होता. स्त्री म्हणजे बुद्धीहीन, स्वतःचे विचार नसलेली, पुरुषांच्या वासना चाळविणारी त्यामुळे घृणित वगैरे वगैरे अपसमज समाजमान्य होते. तुलसीकृत रामायणात जागोजागी स्त्रीला भरपुर नावे ठेवली आहेत म्हणजे पुरुष अध्यात्मात पुढे जाउ शकत नाही कारण स्त्री त्याला मोह घालते. हाच विचार एखादया स्त्रीला अध्यात्मात पुढे जायचे असेल तर पुरुषही मोह घालतो याला मान्यताच नव्हती किंबहुना असे होउ शकते हेच मान्य नव्हते.

तरीही वर उल्लेख केलेल्या काही वेदकाळातील स्त्रियांनी अध्यात्मात स्वतःचे स्थान निर्माण केले. तसेच हल्लीचे उदाहरण बघितले तर संत मीराबाई, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांनीदेखील अध्यात्मात उच्च पातळी गाठली. संत मीराबाईच्या एका कथेत ती एका उच्चकोटीच्या कृष्णभक्त पुरुष संताला भेटायला जाते त्यावेळी ते संत आम्ही स्त्रीशी बोलत नाही असे सांगुन भेटीस नकार देतात त्यावेळी मीराबाईं जगात श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय दुसरा कोणी पुरुष आहे का असे विचारते... त्यावेळी तो संत या बाईची अध्यात्मिक जाण ओळखतो व तिची भेट घेतो. कृष्णभक्तीच्या तत्वज्ञानात श्रीकृष्ण हा पुरुष असुन इतर सर्व जीव हे त्याची प्रकृती आहेत त्यामुळे स्त्री आहेत असे मानले जाते ज्यात इतर पुरुषही येतात.

तसेच संत मुक्ताबाईच्या उदाहरणात संत चांगदेव त्यांना चुकुन आंघोळ करतानाच्या अवस्थेत बघतात व खाली मान घालुन निघुन जातात. त्यावेळी मुक्ताबाई त्यांना विचारते गाय उघडयाने गावभर फिरत असते तिला बघुन तुला काही वाटत नाही पण मला असे बघुन तुला शरम वाटली कारण तु अजुनही शारीर पातळीवर विचार करतोस. जो संत आहे त्यास अंगावर कपडे असले काय नसले काय... त्याची वासना चळत नाही. तो देहातीत अश्या सहजावस्थेत स्वतःचा व इतरांचाही विचार करतो.

अश्या काही स्त्रियांनी पुरुषांनाही अध्यात्माचे धडे दिले आहेत. पण पुरुषांच्या संख्येत यांची संख्या नगण्य आहे.

तसेच गुरु हा शिष्यापेक्षा नेहमी श्रेष्ठ असावा लागतो असे काही नाही. गुरु फक्त शिष्याला त्याच्याजवळ असलेले ज्ञान देतो. त्या ज्ञानाचा उपयोग करुन आपली किती प्रगती करायची हे सर्वस्वी शिष्यावर अवलंबुन असते. श्रीकृष्णाचे गुरु हे सांदिपनी होते. परंतु श्रीकृष्ण त्यांच्यापेक्षाही ज्ञानात पुढे होते.

स्त्रीला भारतीय अध्यात्मात प्रवेश नव्हता याला अध्यात्मिक जाण असण्याच्या क्षमतेपेक्षा सामाजिकरित्या मिळालेला खालचा दर्जा हा जास्त कारणीभुत होता. स्त्री म्हणजे बुद्धीहीन, स्वतःचे विचार नसलेली, पुरुषांच्या वासना चाळविणारी त्यामुळे घृणित वगैरे वगैरे अपसमज समाजमान्य होते. तुलसीकृत रामायणात जागोजागी स्त्रीला भरपुर नावे ठेवली आहेत म्हणजे पुरुष अध्यात्मात पुढे जाउ शकत नाही कारण स्त्री त्याला मोह घालते. हाच विचार एखादया स्त्रीला अध्यात्मात पुढे जायचे असेल तर पुरुषही मोह घालतो याला मान्यताच नव्हती किंबहुना असे होउ शकते हेच मान्य नव्हते.

फार सुंदर मांडलेत. धन्यवाद Happy

यशस्विनी, खूपच सुंदर लिहिले आहेस. तुझ्याकडे बरेच ज्ञान दिसते. ते तू आता इथे सर्वांना दे.. अर्थात नियमित लिहि.

यशस्विनी बरोबर आहे तुमचं

त्या एक्ट्या मनुने हे सगळे घोळ करून ठेवले
त्याच्या काळात परिस्थिती तशी असेलही काहीतरी म्हणून त्याने त्याची मते लिहिली असावीत आणि राजा म्हणतोय म्हणून जनतेने पाळले असेलही पण आता त्याचे अनेक विचार कालबाह्य ठरले आहेत
जे लोक त्याचे सध्या निरुपओगी असलेले विचार जसेच्यातसे पाळतात ते मला महामूर्ख वाटतात

असो

>>>> जे लोक त्याचे सध्या निरुपओगी असलेले विचार जसेच्यातसे पाळतात ते मला महामूर्ख वाटतात <<<<
कृपया निरुपयोगी विचार इथे मान्डुन उपकृत कराल काय? Happy

बर्‍याच शंका... आणि याला कुणाकडुन तरी योग्य / समर्पक उत्तर मिळेल ही अपेक्षा. Happy

चला मुळात मुक्ती / मोक्ष मिळवणे हे साध्य समजु. समजु हं.

आणि त्याअगोदर (just before / on the verge of ) "सर्वांतुन" बाहेर पडलेले मन. तेथे स्त्री / पुरुष / बालक हे भेदभाव असतील का? कि फक्त आणि फक्त पुरुष जातीत जन्म मिळाला कि मोक्ष मिळतो ? समजा असे नसेल आणि स्त्री सुध्हा मोक्ष मिळवायची तेवढीच हक्कदार असेल तर मग वरील नियमानुसार तिला पुरुष अडथळा ठरु शकत नाही का? मग जर ह्या बेसिक जाती एकमेकांचे अडथळे ठरत असतील तर ते एकत्र का आले असतील? मोक्ष मिळवणे म्हणजे निसर्गक्रमाच्या (निसर्गचक्राच्या )बाहेरची काही गोष्ट आहे का?

हाच विचार एखादया स्त्रीला अध्यात्मात पुढे जायचे असेल तर पुरुषही मोह घालतो याला मान्यताच नव्हती किंबहुना असे होउ शकते हेच मान्य नव्हते.>>> परत आपण 'नव्हते' असा भुतकाळ का वापरतो?

अगदी बेसिक गोष्टींबद्दल आणि अंतीम सत्याबद्दल चर्चा करताना देखिल आपण लिंगभेद 'आजही' विसरु शकत नाही का?

आणि गुरुबद्दल : मला ती एक गोष्ट आठवते. त्यांनी रस्त्यावरच्या शुमेकरला (मोची) देखिल गुरु बनवले होते कारण राजाची मिरवणुक समोरुन गेली तरी तो आपल्या कामात मग्न होता. तसे पहायला गेले तर माझा मुलगा कधी कधी माझा गुरु बनतो. त्यामुळे गुरु हा कधीच दुर्बळ नसतो. 'गुरु' आणि 'दुर्बळ' हे दोन ध्रुव आहेत, कधिच एकत्र न येणारे शब्द,

बाकि सगळे मस्त वाटले वाचुन. आज कुठला तरी पिक्चर बघावा असे वाटत होते म्ह्णुन चित्रपट शोधल्यावर हा धागा मिळाला. हाच बघतो परत एकदा. Happy

अतुल

लेख आवडला, यशस्विनी चे म्हणणे ही पटले. दोन मुद्दे सोडून चित्रपटाच्या शेवटाबद्दल काय म्हणणे आहे? तो अनंतात विलीन होतो - एव्हडे कळले , पण म्हणजे काय होते --तुमचे मत काय ?

शबाना,

निओ पहिल्या भागात अनंतात विलिन होत नाही. मला वाटतं ते तिसर्‍या भागात घडतं. आणि दुसरा व तिसरा भाग मला आवडलाच नाही. धड आठवत देखिल नाही.